आईचा निरोप भाग 2

Katha Sukhachya Ani Dukhachya Kashnanchi

नलू गेली आणि श्रीहरी आला.

"मामा, आज संध्याकाळी सर्वांनी मिळून हॉटेलमध्ये जायचा प्लॅन आहे. मामीला सांग स्वयंपाक करू नको." आईने निरोप पाठवला आहे. श्री दारातूनच वर्धनला म्हणाला. आवाजासरशी चारू बाहेर आली.

"श्री, अरे थांब. खाऊन जा काहीतरी."


"नको. आज सुट्टी नाही मला. संध्याकाळी भेटू. तोपर्यंत एन्जॉय युअर टाईम." श्री हसत हसत म्हणाला. 


"श्री, गप्प बस हा. आजीने सांगितले का सगळ्यांना?" चारूने कपाळावर हात मारून घेतला. तसा श्री गालातल्या गालात हसत निघून गेला. 

वर्धन आणि चारुलताच्या लग्नाला जवळ जवळ तेरा वर्षे झाली होती. लग्न झाल्यापासून चारूने घरची जबाबदारी स्वीकारली. तिच्या सासुबाई चांगल्या होत्या, त्यांनीही तिला मनापासून साथ दिली. चारू कधी आपल्या सासुबाईंच्या शब्दापुढे गेली नाही. तिच्या आईची शिकवणच तशी होती. आईने जसा मन लावून संसार केला तसाच तीही करत होती.


यथावकाश संसाराचा वेल बहरला. कैवल्य आणि चिनूच्या जन्मानंतर घर अगदी भरून गेले. त्यानंतर चारू खूपच व्यस्त झाली. वर्धन आणि तिला एकमेकांसाठी वेळ मिळेनासा झाला. 

तिच्या स्त्री सुलभ भावना मधेच डोके वर काढत. कधी नवऱ्यासोबत फिरायला जावे, एकमेकांसाठी खरेदी करावी, लंच, डिनरला जावे. पण संसाराचा व्याप इतका होता की, हे शक्य नव्हते. शिवाय वर्धनचे कामाचे स्वरूपही व्यस्ततेचे होते.


मुले मोठी झाली, तसा चारुला वेळ मिळू लागला. आता राहिलेल्या इच्छा पूर्ण कराव्या म्हणून ती वर्धनच्या मागे लागली. पण वर्धन स्वतःमध्ये गुरफटला होता. चारू सतत व्यस्त असण्याची त्याला सवय झाली होती. शिवाय त्याचा व्याप होताच. तो नुसताच होकार देई. पण प्रत्यक्ष तिच्यासाठी काहीच करत नसे. त्यामुळे चारूची चिडचिड होई. 

पण आज सासुबाई म्हणाल्या, तसा चारूला मनातून खूप आनंद झाला. तिला माहिती होतं, सासुबाई मुद्दाम मुलांना घेऊन चालल्या आहेत. मग तिनेही आढेवेढे घेतले नाहीत.


"चल. आवर. आपणही ताईकडे जाऊ." वर्धन.


तसा चारूने आपल्या कपाळावर हात मारून घेतला. "मुद्दाम करता की तुम्हाला काही समजत नाही? आपल्याहून लहान असणाऱ्या श्रीला समजतं आणि तुम्हाला नाही?"


"आता काय झालं?" काही न समजल्याचा आव आणत वर्धन म्हणाला.


"आपल्या दोघांना वेळ मिळायला हवा म्हणून आई आणि बाबा मुलांना घेऊन गेले आहेत. काहीही झालं तरी आज फिरायला जायचं म्हणजे जायचं." चारू हट्टाने म्हणाली. "मी नलूला सांगून येते. आम्ही आत्ताच बाहेर पडतो आहोत म्हणून. तिच्याकडे जेवायला नंतर जाता येईल कधीतरी."


चारू नलूकडे आली तेव्हा ती पोळ्या लाटत होती. तिचा आग्रह चारुला मोडवेना. मग त्यातल्या त्यात मधला मार्ग म्हणून नलूने अखेर डब्बा बांधून दिला.


चारू घरी येईपर्यंत वर्धन आवरून तयार होता. मग तीही आवरायला पळणार इतक्यात वर्धन म्हणाला,

"साडी नेसू नकोस. बाईकवर बसता येत नाही नीट." हे ऐकून चारू तिथेच उभी राहिली. "नको. आई..आईंना आवडायचे नाही ते." 


"कोणी काही म्हणत नाही. उगीच आपले तुझ्या मनाचे मांडे. नवरा सांगेल ते गप्प ऐकायचं." आज कितीतरी दिवसांनी वर्धनने असा हट्ट केला होता. ही शेवटची मात्रा बरोबर लागू पडली. नवरा सांगेल ते ऐकायलाच हवं.


काही मिनिटांतच चारू आवरून बाहेर आली. फिकट गुलाबी रंगाचा चुडीदार, त्यावर साजेशी ओढणी..एरवी तिच्या वेणीची शेपटी पाठीवर रुळत असायची. पण आज त्या जागी एका पिनेमध्ये थोडे केस बांधून बाकी सोडलेले होते. चारू आज वेगळीच दिसत होती. 


"नेहमी अशी तयार होणार असशील तर रोजच फिरायला नेईन." वर्धन डोळा मारत म्हणाला.


"चला..काहीतरीच तुमचं." चारू लाजून म्हणाली.

नलूने दिलेला डब्बा तिने पिशवीत ठेवला. कुलूप लावून किल्ली नलूकडे दिली.


अवघ्या काही मिनिटांतच वर्धनची बाईक आड वळणाला लागली. पावसाळा नुकताच संपला होता. चारही दिशांना हिरवं रान पसरलं होतं. मधेच गार वाऱ्याची झुळूक येई आणि मन प्रसन्न करून जाई. 

"कुठे जातोय आपण?" चारू वर्धनच्या कानाशी येऊन म्हणाली.


"समुद्रकिनारी.." वर्धन जरा मोठ्याने म्हणाला.


"जायला वेळ लागेल ना?" चारू पुन्हा कानाशी कुजबुजली.


"आज आपल्याकडे भरपूर वेळ आहे. संध्याकाळी सहाच्या सुमारास निघू. ताईकडे जाऊ." वर्धनने बाईकला वेग दिला.


सुमारे अर्ध्या तासाने बाईक एका हॉटेल जवळ थांबली. एक रूम घेऊन वर्धन आणि चारू दोघे फ्रेश होऊन फिरायला बाहेर पडले.


"आज किती मोकळं वाटतंय सांगू! बऱ्याच दिवसांनी हे क्षण अनुभवते आहे मी." चारूने वर्धनचा हात हातात घेतला आणि दोघे वाळूतून बराच वेळ भटकत राहिले. समुद्राच्या पाण्याचा स्पर्श चारुला खूप सुखावून गेला. "मुले हवी होती आज." चारूला आपल्या मुलांची आठवण आली. बराच वेळ भटकून दोघे हॉटेलमध्ये आले. नलूने दिलेला डब्बा होताच. पण वर्धनने आज काही वेगळेच पदार्थ मागवले. ज्यांची नावे चारुला माहित नव्हती. जेवण झाल्यावर चारूने हट्टाने आईस्क्रीमही खाल्ले.


सहाच्या सुमारास दोघे तिथून बाहेर पडले.

--------------------------------

वैदेहीकडे गप्पा रंगात आल्या होत्या. मुलेही खेळून दमली होती. सहाचा ठोका पडला तसा वैदहीच्या सासुबाईंनी गरम गरम चहा आणला आणि मुलांना खाऊही आणला. 

चारू आणि वर्धन पोहोचले, तशी मुले त्यांना जाऊन बिलगली. "कुठे गेला होता दोघे?"


"आम्ही सांगत नाही. ते आमचं सिक्रेट आहे बरं." चारू मुलांना जवळ घेत म्हणाली. तिला जाणवले वैदेही आपल्याकडे टक लावून पाहत आहे. 

"आज वेगळीच दिसते आहेस. पण असे ड्रेस छान दिसतात तुला. नेहमी असेच वापरत जा." हे ऐकून चारू सावरून बसली. तिने एक नजर आपल्या सासुबाईंकडे टाकली.


"आईकडे नको पाहू. ती काही बोलणार नाही. तिच्यावतीने मी परवानगी दिली असे समज हवं तर आणि इतकी वर्षे झाली लग्नाला, थोडं आपल्या मनाचं करायचं गं." वैदेही चारुला म्हणाली.


ती काही बोलणार इतक्यात श्री आला. "एक जोडी समुद्रकिनारी फिरून आलेली दिसते." हे ऐकून चारू कावरी-बावरी झाली.


"हे तुला कोणी सांगितले?" वर्धन. 


"तशा खुणा आहेत तुमच्या बाईकवर आणि शूजवर." श्री मोठ्या आवाजात म्हणाला.


"आता तुमची चोरी पकडली गेली. आम्हीही येणार पुढच्या सुट्टीत, समुद्रकिनारी." वैदेही वर्धनला म्हणाली. हे ऐकून मुलांनीही दंगा सुरू केला. ऐकतील ती मुले कसली? पुढच्या आठवड्यात तिथे जायचे प्रॉमिस घेऊनच मुलांनी आपला हट्ट सोडला.


क्रमशः

सुखाच्या सागराला दुःखाचा किनारा जोडला गेला नाही तर सुखाची किंमत कशी कळेल?

सासरी रमलेल्या चारुला कोणत्या दु:खाचा सामना करावा लागेल? यासाठी पुढचा भाग नक्की वाचा. 

🎭 Series Post

View all