आईचा निरोप भाग 1

Katha Sukhachya Ani Dukhachya Kashnanchi
मध्यरात्री कसल्याश्या आवाजाने चारुलताला जाग आली. तिने पलीकडे पाहिले. वर्धन शांतपणे झोपला होता. "चिनू आणि कैवल्य तर पलीकडच्या खोलीत झोपले आहेत आणि आई - बाबा खाली! मग हा आवाज कसला?" घाबरतच तिने आपल्या खोलीचे दार उघडले. पाहते तर, मुलांच्या खोलीचे दार बंद होते. तशीच ती जिन्यावरून खाली आली तर सासुबाईंच्या खोलीतला दिवा सुरू होता.  

"आई, काही हवंय का?" चारुलताने हळूच दरवाजा ढकलला. 

"नाही गं. कसल्याश्या आवाजाने जाग आली मला. तू अजून जागी का? झोप जा..आणि जाताना दिवा घालावं हा."

"बरं, मलाही आवाजाने जाग आली म्हणून मी खाली आले." 

"अगं, एखादं मांजर वगैरे असेल काहीतरी. खूप रात्र झाली. जा झोप जा." 

तशी चारुलता दिवा बंद करून वर आली.
बराच वेळ तिला झोप लागली नाही. काही ना काही विचार मनात येत राहिले. पहाटे मात्र कधीतरी तिचा डोळा लागला आणि सकाळी उठायला नेमका उशीर झाला. गडबडीने खाली येऊन तिने दार उघडले तर समोर तिची शेजारची मैत्रीण उभी होती.
"नले, बेल वाजवता येत नाही का तुला? इतक्या सकाळी सकाळी अशी काय दारासमोर उभी राहिलीस?"

"तुझी सकाळ आत्ता झाली का? अगं, साडेसात वाजून गेलेत आणि मी बेल वाजवणार इतक्यात तू दार उघडलेस. बरं मला साखर हवी आहे." नलू आपल्या हातातली वाटी पुढे करत म्हणाली आणि चारू पाठोपाठ स्वयंपाकघरात आली.

"उठलीस का? आज रविवार म्हणून तुला उठवलं नाही. नाहीतर रोज धावपळ असतेच." बोलता बोलता सासुबाईंनी चहा गाळला. नलूला पाहताच आणखी एका कपात चहा गाळत त्या म्हणाल्या, "आता यांना काय हवं आहे?"

" साखर." नलू हसत म्हणाली.

"वाटलंच. आपल्या सामाना सोबत यांनाही एक साखरेचं पोतं आणत जा म्हणजे साखर मागायला सारखं इकडे यायला नको."

"काय ओ आई, साखर संपलेली लक्षात राहत नाही माझ्या म्हणून येते मी आणि तुमची साखर मला आवडते. मग तर झालं?" नलू चहाचा घोट घेत म्हणाली. 

"बरं, आम्ही दोघे मुलांना घेऊन वैदेहीकडे जाऊन यावं म्हणतो. दिवसभर मुले तिथे खेळतील आणि आमच्या मनमोकळ्या गप्पा होतील. वैदेहीचे सासू- सासरे नुकतेच यात्रेहून परत आले आहेत. तिथलं वर्णन ऐकून येतो." सासुबाई चारुला म्हणाल्या.

"आई, तुम्ही म्हणाल तसं. पण रात्री सगळे जेवायला इकडेच या. मी ताईंना फोन करते तसा." 

"हे आत्ताच सांगत नाही. नंतर श्रीहरीकडून निरोप पाठवते." सासुबाई.

"हा, श्रीहरी कोण? आणि कुठे जायचा प्लॅन आहे?" कैवल्य स्वतःचं आवरून खाली आला होता.

"श्रीहरी म्हणजे श्री..तुझ्या आत्याचा मुलगा." 
नलूने कैवल्यच्या डोक्यात एक चापट मारली.

"ओ..श्री दादा! नलू मावशी, आम्ही त्याला श्री म्हणतो ना म्हणून लक्षात नाही आलं. अच्छा म्हणजे आपण आत्याकडे जातोय का? मी पट्कन चिनूला उठवून येतो." कैवल्य पळतच वर गेला. 

"मीही निघते आता आणि चारू, एन्जॉय युअर टाईम हा!" नलू स्वयंपाकघरातून बाहेर येत चारुला डोळा मारत म्हणाली. तसा चारूने तिला मारण्याचा अभिनय करत आपले डोळे मोठे केले. मात्र तिच्या चेहऱ्यावर हसू, आनंद आणि लाज अशा भावनांचे मिश्रण झाले होते. तिने तिरके डोळे करून सासुबाईंकडे पाहिले, त्याही गालातल्या गालात हसत होत्या. 

"आई, नाश्ता?" चारू विषय बदलत म्हणाली.

"पोहे भिजवून ठेवले आहेत. फक्त फोडणीला टाक. यांचं आणि चिनूच आवरलं की आम्ही निघतो.

चारूने पोहे फोडणीला टाकले. तोपर्यंत चिनू आवरून कैवल्य सोबत खाली आली. 

"आत्याकडे जायचं म्हंटल्यावर एका हाकेत उठली चिनू." कैवल्य समोर ठेवलेला दुधाचा ग्लास उचलत म्हणाला. त्याने पटकन दूध पिऊन टाकले आणि चिनूने त्याचे अनुकरण करत आपला ग्लास संपवला. "आई, तू आणि बाबा नाही येणार?" 

"नाही. तुझा बाबा अजून उठला नाही. आज सुट्टीचा दिवस. त्याला झोपू दे. आपण जाऊन येऊ." चारूच्या सासुबाईंनी पोह्यांच्या डिश भरल्या. पटापट पोहे संपवून सगळे तिथून बाहेर पडले.

"हे काय? आज घरात कोणीच कसं नाही?" थोड्या वेळाने वर्धन खाली येऊन बाबांच्या खुर्चीत बसला. 

"चहा घ्या." चारुने आणलेला चहा त्याने पट्कन संपवला.

"आई आणि बाबा मुलांना घेऊन ताईंकडे गेले आहेत. त्यामुळे आज मलाही सुट्टी. तुम्ही आवरून घ्या. आपण फिरायला जात आहोत." चारूने पोह्यांची प्लेट वर्धन समोर धरली.

"हे कोणी ठरवलं?"

"मीच. आपण दोघेच एकत्र फिरायला जाऊन किती वर्षे उलटली! आज निवांत वेळ आहे म्हणून जायचं. बाकी कोणतीही सबब सांगायची नाही अजिबात." चारू गाल फुगवून म्हणाली.

"हम्म." वर्धन इतकेच म्हणाला.

इतक्यात नलू आली.

"काय हवं आहे?" वर्धन हसून म्हणाला.

"मला काही नको. उलट तुम्हा दोघांना जेवायला या असं सांगायला आले मी. सासुबाई आणि सासरे घरी नाहीत आणि मुलांना त्यांच्या मावशीकडे पाठवले आहे. आम्हीही दोघेच आहोत. तर जेवायला तुम्ही दोघे या." इतके बोलून नलू निघून गेली. 

क्रमशः
चारू आणि वर्धन या दोघांना एकमेकांसाठी वेळ मिळेल? यासाठी पुढचा भाग वाचायला विसरू नका. 

🎭 Series Post

View all