Login

आईचा मित्र ( भाग एक )

कधीतरी होणाऱ्या मोहाची शिक्षा आयुष्यभर एखाद्याला का भोगायला लावावी.


आईचा मित्र ( भाग एक )

विषय : भूतकाळात डोकावताना

आज वडिलांच शुद्ध श्राद्ध पार पडलं. पाहुण्यांनी भरलेलं घर बघता बघता खाली झालं. घरामध्ये मी, माझी बायको आणि माझी आई  असे तिघेच जण उरलेलो आहोत. आई शून्यात नजर लावून बसलेली आहे.  वडिलांशिवाय जगणं याची ती कल्पना देखील करू शकत नाही. परंतू आता या वयात तिला  एकटं सोडणं अजिबात योग्य नाही. कारण आजकाल तिचे हात कापत असतात. डोळे अधू झाले आहेत. ती एकटी रस्ता ओलांडू शकत नाही. तेव्हा मी आणि माझ्या बायकोने विचार केला आहे की आईला आता घेऊन मुंबईला जायचं. आईजवळ हा विषय काढला त्यावेळी तिने स्पष्टपणे नकार दिला. ज्या गावात तिचं सगळं आयुष्य गेलं होतं. वडिलांशिवाय म्हणजे तिचं आणि वडिलांचं जमत नव्हतं असं नव्हे बरं.  वडिलांना कुशल तंत्रज्ञ म्हणून त्यांची कंपनी त्यांना वर्ष वर्ष परदेशामध्ये कामासाठी पाठवत असे.
वडील नाईलाजाने परदेशात राहात असत. परंतु दूर असले तरी त्या दोघांचे एकमेकांवर अतिशय प्रेम होतं.   नाईलाजाने वडिलांना तिला आणि मला सोडून परदेशात राहावं लागत असे. पण जेव्हा ते कधी काही काळासाठी भारतात येत. तेव्हा तो काळ आमच्यासाठी अतिशय आनंदाचा असे. ते आणि आई खूप गप्पा मारत असत. मी देखील त्यांच्याशी खूप मस्ती करत असे. त्यांनी सतत माझ्यासोबत राहावं असं मला वाटे. पण ते मला सांगत की माझ्यासाठीच ते आम्हा दोघांना सोडून इतक्या लांब राहत आहेत. काही दिवस राहून जेव्हा ते परत आम्हाला सोडून जात असतं त्यानंतरचा काळ आम्हा दोघांनाही खूप खडतर जात असे. मला तर त्यांच्या आठवणीने खूप रडू येई. आईला देखील रडू येत असे. परंतु ती माझ्यासमोर कधीच रडत नसे. आता वडील गेल्यावर देखील ती रडली नाही. ज्या  धैर्याने तिने स्वतःच्या हिमती वरती एकट राहून संसार करून दाखवला होता.त्याच हिमतीने तिने उर्वरित आयुष्य काढायचे ठरवलं होतं. परंतु आता ते शक्य नव्हतं हे मी तिला समजावून सांगितलं. कारण आता तिचं वय झालेलं होतं.

परंतु अट्टाहासाने ती, त्या गावाला सोडून नवीन गावी ,या वयात पुन्हा स्थिर होणे किती अवघड गोष्ट आहे. हे ती आम्हाला समजावून सांगत होती. पुन्हा या गावातल्या प्रत्येक गोष्टीशीआणि प्रत्येक घराशी तिच्या आठवणी निगडित होत्या. गावातला प्रत्येक जण तिला ओळखत होता. त्यामुळे तिला कधीच एकटं वाटल नव्हत. तसं पाहता  तिने आयुष्याचा, ऐन उमेदीचा काळ वडीलांशिवाय याच गावात एकटीने काढला होता. त्यावेळी गावानेच तिला सांभाळून घेतलं होतं.

आई बद्दल बोलायचं तर माझी आई ज्या काळात  नर्सिंग हा एक निषिद्ध असा व्यवसाय मानला जात  होता . त्या काळात आईने बीएसस्सी नर्सिंगला ऍडमिशन घेतली होती.  ती कुशल नर्स म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. गावातली कित्येक  बाळंतपण तिने डॉक्टरांच्या मदतीशिवाय कुशलपणे पार पाडलेली होती. त्यामुळे गावातले प्रतिष्ठित लोक देखील तिला अत्यंत आदराने घेत असतं. कोणाच्याही अडीअडचणीला ती धावून जात असे.

आमचं गाव तसं छोटसंच. मोजून दोन तीनशे घर होती. इथं ग्रामपंचायतीचे एक हॉस्पिटल होतं. त्या हॉस्पिटलमध्ये आई काम करत असे. ज्यावेळी मला सुट्टी असे. तेव्हा मी आई सोबत हॉस्पिटलमध्ये जायचो. तिथला औषधांचा वास मला खूप आवडायचा.  पांढऱ्या शुभ्र गणवेशातली आई मला खूप आवडायची. त्या हॉस्पिटलमध्ये एक उंचपुरे, गोरेपान, डोळ्याला सोनेरी चष्मा लावलेले एक डॉक्टर होते. ते तिथले मुख्य डॉक्टर होते. त्यांचं नावं डॉक्टर रॉय. सगळेजण ते सांगतील ते ऐकत असत.

आता पण या भूतकाळाशी काय करायचं आहे.मला आईला घेऊन मुंबईला जायचं होतं. मी आईचं कोणतही म्हणणं ऐकायला तयार नव्हतो. मी आईला सांगितलं की तू तयारी कर. मी यावेळी तुझं काहीही ऐकणार नाही आणि तुला एकटतर अजिबात सोडणार नाही.

शेवटी माझा निश्चय पाहून आईने मला म्हटलं,

" मी एका अटीवर येईल. मला जर तू मुंबईला गेल्यावर  डॉक्टर रॉयला भेटवणार असशील तरच मी येईल "

आईचं बोलणं ऐकून मला एकदम धक्का बसला. कारण मी लहानपणी ऐकलं होतं की डॉक्टर रॉय  आणि आई एकत्र काम करत असतं.दोघांची खूप मैत्री होती. नंतर दोघांमध्ये काहीतरी बे बनाव झाल्या मुळे डॉक्टर रॉय यांनी नोकरी सोडली होती . आणि ते मुंबईला निघून गेले होते. त्या बद्दल आईने वडिलांनाही सागितलं होतं. आता त्या गोष्टीला कितीतरी काळ लोटला होता. आता आईचं वय पासष्ट. आता या सगळया भूतकाळातल्या गोष्टी उकरून आई काय करणार होती कुणास ठाऊक. पण मी तिला नाराज करणार नव्हतो. मी तिला शब्द दिला की मी तिच्या मित्राला नक्की भेटवेल.

आणि आईला घेऊन मी मुंबईला आलो.