आईचं माहेर

Story of lovely bond between mother and daughter

आईचं माहेर

कुकरच्या शिट्टीने प्रमिलाताईंना जाग आली. रूममध्ये जाड कपड्याचे पडदे लावलेले, त्यामुळं सूर्य उगवला की नाही कळायला मार्गच नव्हता. त्यांनी हडबडून मोबाईलमध्ये पाहिलं, "बापरे! साडे नऊ!" प्रमिलाताईंना ओशाळल्यागत झालं.

"एवढा उशीर कधीच होत नाही आपल्याला उठायला. काय वाटेल चिनुला? जावई पण काय म्हणतील? मेल्याहून मेल्यासारखं वाटतंय मला तर." प्रमिलाताई स्वतःशीच पुटपुटत उठल्या.

चिनु (चिन्मयी) प्रमिलाताईंचं शेंडेफळ. नचिकेतराव आणि चिन्मयी दोघंही सॉफ्टवेअर इंजिनिअर, पुण्याला मोठ्या कंपनीत जॉबवर. मृण्मयी मोठं कन्यारत्न आणि जावई ईशान; दोघे मुंबईत. मृण्मयी बँकेत तर ईशानराव कॉमर्सचे प्राध्यापक, दोघंही घड्याळाच्या काट्यावर पळणारी. सुधाकरराव प्रमिला ताईंचे 'अहो'. सुधाकरराव शाळेत मुख्याध्यापक होते, सध्या सेवानिवृत्त जीवन मोठ्या हेकड स्वभावाने जगत होते. मागच्या वर्षी चिनुचं लग्न झालं होतं. लव्ह मॅरेज!  सुधाकररावांचा विरोध करायचा म्हणून विरोध... बाकी नचिकेतरावांमध्ये नाव ठेवायला जागा नव्हती. लग्न झाल्यापासून चिनु प्रमिलाताईंच्या मागे लागली होती, 'घरी ये' म्हणून. शेवटी दिवस उजाडला, आदल्या दिवशी प्रमिला ताई सुधाकररावांशी भांडून लेकीच्या घरी आल्या होत्या.

"काय बाई चिने, अग पडदे जरा पातळ कापडाचे लावायचे. सूर्य वर आला की नाही कळायला नाव नाही. अन् माझ्या फोन मधला अलार्म तूच बंद केलास ना? शोभतं का असं? कसं दिसतं ते जावयाच्या घरी आली अन् सासू मस्त झोपा काढतेय? काय म्हणतील नचिकेतराव?" प्रमिलाताई चिनुवर थोड्या चिडल्या होत्या.

"अहो आई, काही नाही होत. चिनु नाही का तिकडे आली की मस्त ढाराढुर झोपा काढते. हे पण तुमचंच घर आहे की! चला तुमच्या लेकीच्या हातचा फक्कड आल्याचा चहा घेऊ." नचिकेत.

"हो गं आई, आता आली आहेस तर मस्त मोकळी रहा. घरी अजूनही बाबांच्याच नियमांने सगळं चालतं. मस्त मनसोक्त रहा, तुझं माहेरच समज हे." चिनु बोलली आणि प्रमिलाताईंच्या डोळ्यासमोर त्यांचं माहेर उभं राहिलं.

प्रमिलाताई घरातल्या सगळ्यात मोठ्या, त्यांच्या पाठीवर तीन भाऊ. सुधाकररावांचं चांगलं स्थळ आलं म्हणून प्रमिलाताईंचं लग्न लवकरच झालं. लग्नानंतरचं पहिलं वर्ष सोडलं तर त्यानंतर त्या वर्षातून दोनदा माहेरी यायच्या. दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी भाऊ घ्यायला यायचा. दिवाळीच्या सुट्ट्या संपेपर्यंत त्या माहेरी राहायच्या, सुधाकरराव शिक्षकी पेशाचे असल्याने शाळा सुरू होण्याआधी त्यांना घेऊन यायचे. तसंच उन्हाळ्यातही पंधरा-वीस  दिवस राहायला मिळायचं. माहेरवाशीण म्हणून त्या यायच्या; पण त्यांची आई अजूनही सासुरवाशीण होती. प्रमिलाताईंच्या माहेरी त्यांची आजी म्हणेल तीच पूर्व दिशा असायची. माहेरी गायी, म्हशींची बरकत होती. घरात सतत पाहुण्यांचा राबता होता. सगळा स्वयंपाक चुलीवर असायचा. त्यामुळं त्यांची आई सतत कामाला बांधलेलीच असायची. लेक माहेरी आली तरी तिच्यासोबत निवांत बसून दोन शब्द बोलायला प्रमिलाताईंच्या आईला वेळ कुठे होता. माहेरी आल्या की प्रमिलाताईच मग आईच्या मागोमाग उठायच्या, तिच्यासोबत दिवसभराची कामं आटोपताना जे बोलणं व्हायचं तेच काय ते बोलणं व्हायचं माय-लेकीचं. पुढे मृण्मयी झाल्यावर 'आपल्या आईने आपल्या लेकीला घेऊन दोन घटका बसावं.' असं प्रमिलाताईंना वाटायचं;  पण त्या माय-माऊलीला ती पण फुरसत नसायची.

माहेरहून परत जाताना प्रमिलाताईंची आई त्यांना घरी बनवलेलं कुरडया, पापड्या, लोणचं, उडीद-मुगाचे पापड, तूप, घरी केलेल्या डाळी-साळी असं कितीतरी समान शिदोरी म्हणून द्यायची. आपल्या लेकीला सोडायला एसटी स्टँडवर मात्र प्रमिलाताईंच्या आई मागे लागून यायची. एसटीची वाट बघत दोन घडी का होईना माय-लेकी एकमेकींकडे फुरसतीने बघायच्या. सुधाकरराव सोबत असायचे म्हणून कधी बोलणं व्हायचंच नाही. प्रमिलाताईंची एसटी अगदी दूर जाईपर्यंत त्यांच्या आई तिथेच उभ्या असायच्या. प्रमिलाताईसुध्दा आई दिसेनाशी होईपर्यंत खिडकीतून बाहेर बघत राहायच्या आणि आईच्या डोळ्यात साठलेला श्रावण लेकीच्या डोळ्यातून मनसोक्त बरसायचा.

कालांतराने प्रमिलाताईंची आजी वारली. प्रमिलाताईंना वाटलं आईचा सासुरवास आता तरी संपेल; पण पुढे तीन सुना आणि त्यांच्यासोबत जुळवून घेण्यात नवीन सासुरवासाचा जन्म झाला. नंतर प्रमिलाताईंना चिन्मयी झाली, मग दोन लेकरांची शाळा, अभ्यास, वाढते वर्ग, घरी सासू-सासऱ्यांचे आजारपण यात त्यांचं माहेरपण छोटं छोटं होत गेलं. एक दिवस त्यांच्या आईला देवाज्ञा झाली आणि छोटं झालेलं माहेरपण संपलं ते कायमचंच. त्यानंतर एकाही भावाने प्रमिलाताईंना माहेरी बोलावलं नाही आणि एकाही भावजयीने कधी प्रेमानं विचारलं नाही.

"आई, चहा घ्या ना. कोणत्या विचारात हरवल्या?" नचिकेतच्या बोलण्याने प्रमिलाताई भानावर आल्या.

"चिनु, अगं ऑफिसला जायचं असेल ना तुम्हाला?" प्रमिलाताई.

"अगं सुट्टी टाकलीये मी तू येणार म्हणून. बघ आज गुरुवार, उद्याचा शुक्रवार दोन दिवस सुट्टी घेतलीये आणि शनिवार, रविवार तर सुट्टी असतेच. त्यानंतर तू आहे तितके दिवस वर्क फ्रॉम होम... आहे की नाही मज्जा. मी तुझ्यासाठी ड्रेस आणून ठेवला आहे. चल पटकन आवरून घे, थोडं खाऊन घे मग निघू आपण. चार दिवस मस्त दोघीजणी हिंडू-फिरू, मस्त मजा करू." चिनु खूप उत्साहात बोलली.

"अगं, पण नचिकेतरावांच्या जेवणाचं कसं?" प्रमिलाताई.

"मी आज उशिरा जातोय तर उशिरा येईल घरी, माझ्या जेवणाची काळजी करू नका. मस्त एन्जॉय करा आणि हे चार दिवससुद्धा मज्जा करा. मला पण माझा वेळ मिळेल त्यानिमित्ताने." नचिकेतच्या अशा बोलण्याचं खूप कौतुक वाटलं प्रमिलाताईंना.

दोघी माय-लेकींनी चार दिवस मस्त हिंडणे, फिरणे, मौज मजा करणे यात घालवले. नंतर चिनुचं वर्क फ्रॉम होम सुरू झालं. ऑफिसची कामं सांभाळून ती मिळेल त्या वेळात प्रमिलाताईंना एक एक पदार्थ बनवून खाऊ घालत होती. लेकीनं दिलेलं माहेरपण उपभोगण्यात दिवस कसे गेले कळलेच नाही आणि प्रमिलाताईंचा जायचा दिवस उजाडला होता. रविवार होता. नचिकेत सकाळीच कुठेतरी बाहेर गेला होता. दुपारी तो परत आला ते दोन-चार पिशव्या सामान घेऊन.

"मिळालं ना सगळं?" चिनु नचिकेतच्या हातातल्या पिशव्या घेत बोलली.

"आई, हे बघ गं. इथे जवळच गृहोद्योग करणाऱ्या बायका हे सगळं बनवून देतात. हे बघ कुरडया, पापड्या, सांडग्या, उडीद-मुगाचे पापड, शेवया, काळा मसाला, गोडा मसाला, तिखट सगळं आहे." चिनु सामान दाखवत होती.

"कशाला आणलं गं? मी बनवते ग सगळं घरी. तुला तर माहितीये की." प्रमिलाताई.

"हो, पण आता बनवत जाऊ नको. वयाच्या मानानी झेपत नाही गं तुला. उगी उसना आव आणून काही बनवायची गरज नाहीये. विकत मिळतं ना सगळं तर घ्यायचं आणि त्या बायका पण गरीब असतात, त्यांना तेवढीच आपली मदत होते." चिनु उगी रागे भरल्यासारखे बोलत होती.

"आणि हे माझ्याकडून खास... बाबांसाठी... चितळेची बाकरवडी, मिठाई, लक्ष्मी-नारायण चिवडा आणि ही स्पेशल रत्नागिरीवरून आणलेल्या हापूस आंब्याची पेटी. माझा मित्र आहे तिकडचा त्याने आणून दिली. चिनु आण सगळं सामान इकडे, नीट पॅक करून ठेऊ म्हणजे न्यायला सोपं जाईल." नचिकेत.

प्रमिलाताई लेक-जावयाकडे कौतुकाने बघत होत्या. ट्रेनची वेळ झाली. चिनु आणि नचिकेत प्रमिलाताईंना सोडायला स्टेशनवर आले होते. टू टायर ए सी च्या बोगीत, रिझर्वेशन केलेल्या बर्थवर प्रमिलाताईंच सामान दोघांनी नीट लावलं. तेवढ्यात ट्रेनची शिट्टी वाजली. चिनु आणि नचिकेत दोघे खाली उतरले. चिनु बाहेरून खिडकी जवळ येऊन उभी राहिली होती. प्रमिलाताई तिला आतून 'जा' असं म्हणत होत्या पण त्यांचा आवाज बाहेर जात नव्हता. ट्रेन हळूहळू पुढे सरकत होती, चिनुसुध्दा ट्रेनच्या सोबत चालत होती. 'अगं, पडशील गं चिनु, नको असं करू,' प्रमिलाताई आतून बोलत होत्या, त्यांचा कंठ दाटून आला होता.  चिनुचे डोळे ही अश्रूंनी भरून आले होते. ट्रेनची गती वाढली आणि चिनु दिसेनाशी झाली, प्रमिलाताई काचेतून बघण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होत्या. डोळ्यात श्रावणधारा घेऊन प्रमिलाताई सीटवर बसल्या.

"कोण, लेक होती का?" सहप्रवाशाने प्रश्न विचारला.

"नाही, माय होती माझी." प्रमिलाताई डोळ्यातल्या श्रावणधारेत मनसोक्त भिजत होत्या.

                                © डॉ. किमया मुळावकर
फोटो- गुगलवरून साभार
(कशी वाटली ही लघुकथा, नक्की सांगा. आवडली तर लाईक करा.)