Feb 22, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

आईचं कौतुक(लघुकथा)

Read Later
आईचं कौतुक(लघुकथा)


"मला काही बोलायचं आहे!"
शाळेत असलेल्या मीटिंगमध्ये पालकांच्या गर्दीत बसलेली सुचिता बोलली.

"मॅडम, आधी तुमचं नाव सांगा!" मुख्यध्यापिका मॅडम बोलल्या.

"नमस्कार, मी सौ. सुचिता वाघमारे.. ऋषिकेशची आई. सुचिता तिची ओळख सांगून पुढे बोलू लागली.

"शाळेचे सगळे नियम फार छान आहेत पण मला तुम्हाला काही सुचवाव वाटतंय..अर्थात जर तुम्हाला ते पटल तर त्यात बदल विचार करा!"

"तुम्ही बोला मॅडम..आपण त्यावर नक्की विचार करू"

"मॅडम..आपल्या शाळेच्या सगळ्या कार्यक्रमांत मुलांना जेंव्हा आपण बक्षीस घेण्यासाठी स्टेज वर बोलावतो तेंव्हा त्यांना.. त्यांच्या आईच्या नावासहित बोलवावं अस मला वाटत"

"म्हणजे"

"मॅडम..मुलांना मोठं करण्यासाठी आई वडील दोघेही झटत असतात पण मुलांना चांगली शिस्त लागावी..त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे म्हणून सगळ्यात जास्त आई प्रयत्न करत असते. आपल्या समाजात स्त्री पुरुष समानता असली तरी अजूनही फक्त आईनेच मुलांवर लक्ष ठेवावं अशी अपेक्षा असते.
प्रत्यके आई तीच कर्तव्य नेटाने पार पाडत असते पण जेंव्हा तिची मुल शाळेत किंवा इतर कुठल्या कार्यक्रमात पहिली येतात किंवा पुढे असतात तेंव्हा कोणीच म्हणत नाही \"त्याची आई त्याला सगळ शिकवते किंवा त्याच्यावर सगळ्यात जास्त तीच लक्ष असत.\" जो तो आपल्या लेकाचे..नाहीतर आपल्या घराण्याचे गुणगान गात असतो.

मला फक्त एवढच म्हणायचं आहे की..मुलांना स्टेजवर बोलवताना त्यांच्या आईच नाव घेऊन बोलवावं. प्रत्येक आईला वाटत आपल कोणीतरी कौतुक करावं..\"तू मुलांना एवढं छान सांभाळतेस म्हणून आपली मुलं चांगल्या गोष्टी शिकत आहेत..\" चार लोकांत आपल कोणीतरी कौतुक करावं असं प्रत्येक आईला वाटत असत पण हे कौतुक आईच्या वाट्याला कधीच येत नाही. याउलट मुलं कधी खेळताना पडली..त्यांना लागलं तर सगळेच जण आईला दोष देतात \"लक्ष कुठे असत तुझ, दिवसभर घरात काय करत असतेस?\" आणखी खूप काही. आपल्या शाळेत किंवा इतर अनेक शाळेत काही आई अश्या आहेत ज्या बाहेर नोकरी करून, घर सांभाळून.. मुलांना बघत असतात..त्यांना चांगल्या गोष्टी शिकवत असतात. चांगल्या वाईट मधला फरक ओळखायला शिकवत असतात पण यात त्यांच्या वाट्याला काय येत? काहीच नाही! मला इतकंच वाटत इतर कोणी नाही निदान प्रत्येक शाळेने तरी आईचा तो सन्मान केला पाहिजे. आईला फक्त एवढच वाटते की आपल्या मुलाला जस त्याच्या वडिलांच्या नावाने ओळखतात तसच आईच्या नावानेही ओळखावं."

"आम्ही यावर नक्की विचार करू. कोणाला आणखी काही बोलायचे किंवा सुचवायचे असेल तर बोलू शकता."

मीटिंग संपली आणि सुचिता घरी आली. दुसऱ्या दिवशी शाळेत प्रजासत्ताक दिन होता त्याची तयारी करून घेत होती. राहून राहून तिच्या मनात मीटिंग मधे ती जे बोलली होती तेच फिरत होते.

दुसऱ्या दिवशी ऋषीकेशला तयार करून ती स्वतः त्याला स्कुटीने स्कूल मधे घेऊन गेली. लेकाने डान्स मधे भाग घेतला होता. सगळे कार्यक्रम पार पडले आणि मग बक्षीस समारंभाचा कार्यक्रम सुरू झाला. मुख्यध्यापिका मॅडमनी वकृत्व स्पर्धेत पहिल्या नंबर च नाव अनाऊंस केलं..

"तर...आपल्या इथे झालेल्या वकृत्व स्पर्धेत पहिला नंबर आलेल्या विद्यार्थ्याच आहे... ऋषिकेश सुचिता वाघमारे...."

टाळ्यांचा कडकडाट झाला. ऋषिकेश स्टेजवर त्याची ट्रॉफी घेण्यासाठी गेला आणि खाली खुर्चीत बसलेली सुचिता उभी राहून टाळ्या वाजवू होती. तिच्या डोळ्यात आज अभिमानाचे आणि आनंदाचे अश्रू होते कारण आज तिचा मुलगा तिच्या नावासहित स्टेज वर गेला होता. हा कौतुक सोहळा फक्त तिच्या मुलाचा नव्हता..तिचाही होता.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

नवीन रेसिपी घरी बनवून घरातल्याना खायला घालायला आवडते??.वाचायला आवडते आणि गप्पा मारायला तर खूपच आवडते?

//