आई तुझ्यासाठी मी असेन

AAi


नवऱ्याचे सगळे एका आदर्श बायको प्रमाणे करी
त्याची आवड निवड जपत
त्याची सगळी काळजी घेत
त्याला हवं नको ते बघत
स्वतःचा वेळ ही त्याच्या साठी खर्च करत
स्वतःकडे ,स्वतःच्या आवडी कडे दुर्लक्ष करत

इतके करून ही तो म्हणाला, माझ्या आई सर तुला नाही... ती ती आहे...तिची जागा कोणी घेऊ शकत नाही...अगदी तू ही..

तिला तिच्या शब्दाचा राग आला, इतके करून ,स्वतःला मी विसरुन जाते, तरी मी कुठेच नाही...

त्याला कळले ती रुसली, तिला मी दुखावले..

तो आला आणि म्हणाला, "खरंय की माझ्या आईसारखी तू नाहीच, पण मी कुठे म्हणालो की तू माझ्या आयुष्यात कुठेच नाहीस...फक्त इतकेच आहे...तू तू आहेस...तुला तुझी तुला कोणासोबत करण्याची गरज नाही...आणि ती होऊ शकत नाही...तुझे स्थान माझ्या मनात खूप वेगळे आणि मोठे आहे...त्याची बरोबरी आईसोबत करणे म्हणजे...तुझी किंमत तू कमी करणे...

ती.... तुला मी समजणार नाही हे आज कळले,मी उगाच धडपडत असते... तुला माझे अस्तित्व जाणवावे म्हणून माझ्या पेक्षा तुला जपत असते

तो... ह्याची गरज नाही, तुझी माझ्या सोबत जेव्हा लग्न गाठ बांधली गेली तेव्हा माझे अस्तित्व तुझ्या हातात सोपवले होते... आणि तेव्हा तू ही तेच केले होते...मग तुझ्या अस्तित्वचा मी स्वीकार केला होता...तेव्हा ठरवले जर तू माझ्या आयुष्यात नसशील त्या दिवशी माझे ही अस्तित्व नसेल..

ती... सर्व राग एका क्षणात बाजूला ठेवून ती आपले काम करायला निघून जाते.. आता त्याचे गोड बोलणे ही तिला वर वर वाटू लागते... बोलण्यात त्याला कोणी हरवू शकत नाही..मग उगाच का डोकं लावायचे

तो ही तिला पटवून देऊ शकत नाही की खऱ्या अर्थाने तिची बरोबरी कोणी करू शकत नाही, ती तिच्या जागेवर महान आहे पण म्हणून आई सोबत बरोबरी करणे म्हणजे किती चुकीचे आहे हे तिला का कळत नाही..

तितक्यात त्याला आईचा फोन येतो..ती म्हणते, "मी आज निघू ना गावाकडून तुझ्या घरी यायला, राहू म्हणते काही दिवस तुझ्या कडे, मग परत जाईन मी "

तो आता बायकोच्या तोंडाकडे बघतो, तिला जणू आई घरी यावी असे वाटत नसते..मग तोच आईला सांगतो, "आई आज नको येऊस तू,पुन्हा कधी तरी ये निवांत...तुला मी घ्यायला येईल, नाहीतर मीच तुझ्याकडे येईल..मस्त वेळ देईल तुला मी पण आज मी जरा कामात आहे..."

आई समजून जाते आणि काही प्रश्न न करता मुलगा म्हणाला तसे करते...तिने त्याला भेटण्याची खूप तयारी केलेली असते... त्याच्या आवडीचे किती तरी पदार्थ केलेले असतात, गावाकडून विकत आंबे आणलेले असतात... पापड, खाऊ,घरी बनवलेली मिठाई, लोणचे...तिने बांधून ठेवलेले असते... पण त्याला काही काम आहे तर पुन्हा कधी तरी जाऊ असे म्हणता ह्या वेळी ही ती घरीच थांबते...ही अशी तयारी करून घरी थांब म्हणायची त्याची ही 4 वेळ होती...तरी मन आवरून ,मारून मुलाला भेटण्यासाठी उत्सुक असलेली माऊली पुन्हा घरी थांबते... त्याच्या शब्दाला खरे समजून ..


इकडे बायको खुश होते..."तू माझ्यासाठी नाही म्हणालास म्हणजे ,मग चल मला कुठे तरी घेऊन चल फिरायला, आपण मस्त चार पाच दिवस बाहेर कुठेतरी फिरून येऊ...मग तुझ्या वरचा सगळा राग जाईल... मग मी तुला माफ करेल."

त्याला बायकोचा हा स्वभाव माहीत असतो, तिला आई नकोय आमच्या मध्ये हेच हवे असते, जेव्हा जेव्हा आई येणार म्हंटलो की तेव्हाच तिचा स्वभाव बदलतो, ती रुसून बसते, नको ते मुद्दे काढून आई कशी येणार नाही,आणि तिला हा कसा सांगेल की तू येऊ नको ही वाटत बघत असते...पण हे तिच्या आई च्या बाबत होत नाही..तेव्हा मात्र खूप खुश असते ,तेव्हा मात्र मला ही विसरते...आई म्हणजे देव आणि माझे अस्तित्व म्हणते तर मग माझी आई काय आहे.. तिला मी का सहज डावलतो, भांडण नको म्हणून आईला ही घरी आणता येत नाही पण हिची आई बिनधास्तपणे येते,पण माझ्या आईला तिच्याच लेकाच्या घरी यायला इतका विचार करावा लागतो, तिचा काहीच हक्क नाही का ह्या घरावर.. मला आईसाठी काही करायचेच आहे... मी जर बायकोला मान देऊन आईला तू येऊ नको म्हणतो तर मी आईसाठी सर्वप्रथम माझ्या मानसिकतेचा त्याग करायला हवा..

तितक्यात दारावरची बेल वाजते...


समोर बायकोची आई उभी असते..


सगळ्या बॅगा घेऊन..

आणि लगेच आपल्या लेकीकडे रडत जाते

तिला घडलेला प्रकार सांगते..


लेकीला काही कळत नाही आईला आज दादा कडे नागपूर ला जायचे होते...तिने किती वाट बघितली होती ह्या क्षणाची, तिने नातवांसोबत खेळता तेली, गप्पा करता येतील, मुलगा भेटेल, आणि छान काही महिने मजेत जातील, पण हे काय.?

ती... आई काय झालं ,का तू रडतेस सांगशील का मला..

आई... "अग दादाने फोन करून सांगितले की आई तू ह्यावेळी येऊ नकोस...पुन्हा कधी तरी ये..मला खूप काम आहेत...मला माझ्या बायको मुलांसोबत जरा फिरायला जायचे आहे, आपण पुन्हा कधी तरी निवांत भेटू...आता नको.."


ती....आई दादा असा कसा वागू शकतो ग...आईला डावलून बायको मुलांवर त्याचा इतका कसा जीव लागतो ...आईचे अस्तित्व काहीच नाही का...तिला ही भाव भावना आहेत हे त्याला कळत नाही का ...हे तर अतीच होत आहे त्याचे... बायकोचा धाक आहे तर...नाहीतर दादा असा वागणार नाही...

आई.... जाऊदे ग, मला आता कोणीच नकोय, पण मी तुझ्याकडे राहील...हेच माझे घर समजेन..तू तरी निदान मला टाकून कुठे फिरायला जाणार नाहीस ना..

ती... अग हे तुझेच घर आहे ,तू बिनधास्त रहा...ह्यांना ही आईची आठवण येत होती, पण आता तू आलीस तर त्यांना आईची कमी वाटणार नाही...आई कोणाची असो...आपलीच हवी असे काही नसते त्यांचे... तू रहा...

तो हे सगळे ऐकत होता, त्याला त्याची लाज वाटत होती, माझ्या आईला मी आज दुखावले होते, तिला किती वाईट वाटत असेल, ती कोणाकडे मन मोकळं करत असेल, तिला जर काही सांगायचे असेल तर कोणाला सांगत असेल
मी एकटाच मुलगा आहे, तिला ना लेक आहे जी समजून घेईल..त्याच्या डोळ्यात पाणी आले.. तो आत निघून गेला...बाहेर आला आणि हातात एक मोठी बॅग होती..

ती... अरे तू कुठे निघालास असा...आई आली आहे ना आपली...आणि तू निघालास... हे ठीक वाटत नाही..तिला आधीच दुःख झाले आहे..मग तुझे हे वागणे अजून दुःख देईल..

तो... तू बस तुझ्या आई सोबत, सांभाळ तिचे दुःख...मी मात्र माझ्या आईकडे जाणार आहे, कारण तिचे दुःख आणि अश्रू पुसायला माझ्या शिवाय कोणी नाही...आणि ती माझ्या कडे ते कधीच व्यक्त करणार नाही...

आणि तो निघाला आईकडे......स्वतःचे हरवलेले अस्तित्व शोधायला ही...