आई येतो हं...

Story of happy family, which destroy by one accident.

सुमित हा दिसायला रुबाबदार, देखणा, मनमोकळ्या स्वभावाचा मुलगा होता. सुमितच्या कुटुंबात त्याची आई, मोठा भाऊ अजय, वहिनी अर्चना आणि पुतण्या निरव असे सहा जणांचे हसतेखेळते कुटूंब होते. सुमितच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी एका अपघातात निधन झाले होते. वडिलांच्या निधनानंतर पूर्ण कुटुंबाला सावरायला बराच काळ लागला. निरवच्या आगमनानंतर सुमितच्या कुटुंबात आनंदीआनंद झाला होता, त्या एवढयाशा जिवामुळे सर्वजण आपले दुःख विसरत चालले होते.

अजय आईचा लाडका होता तर सुमित वडिलांचा लाडका होता, वडिलांच्या अचानक जाण्याने सुमितच्या मनावर चांगलाच आघात झाला होता. सुमित त्याच्या वडिलांसोबत मित्राप्रमाणे गप्पा मारत असायचा.

अजयचे लग्न झाले, त्याला एक मुलगाही झाला, आता आईला वेध लागले होते ते सुमितच्या लग्नाचे. सुमित दिसायला छान होताच शिवाय त्याला नोकरीही चांगल्या पगाराची होती. कोणी मुलगी किंवा तिच्या घरचे सुमित सारख्या मुलाला नकार देतील हे अशक्यच होते. आई सकाळपासून सुमितच्या मागे लागली होती. आई त्याला म्हणत होती की ," सुमित सुधाकर मामाने तुझ्यासाठी एक चांगली मुलगी सुचविली आहे, तिचे कुटूंब गावाकडे राहतात पण ती इथे पुण्यात नोकरी करत आहे. खेडेगावात जडणघडण झाल्यामुळे ती संस्कारी मुलगी आहे, तिचे कुटुंबही सुसंस्कृत आहे, हल्ली संस्कारी मुली बघायला मिळत नाहीत, पुढच्या आठवड्यात एकदा मुलीला भेटून घे, तुला जर ती पसंत असेल तर आपण पुढे बोलणी करू शकतो."

सुमित वैतागून म्हणाला," आई सकाळपासून काय ही एकच भुणभुण लावली आहे. मी सांगितलंय ना की मला इतक्यात लग्न करायचे नाहीये."

आई म्हणाली," सुमित तुझ्या मनात दुसरी कोणी मुलगी आहे का? असेल तर तस सांग, मला काहीच अडचण नाहीये"

सुमित चिडून म्हणाला, "आई तस काही नाहीये,तुला माझ्या बोलण्याचा अर्थच कळत नाहीये. आज बाबा असते ना त्यांनी बरोबर मला समजून घेतलं असतं"

इतक्या वेळ बघ्याची भूमिका घेतलेला अजय बोलू लागला," सुमित बाबांचा विषय काढून मूळ मुद्याला फाटा फोडू नकोस, तुला आता लग्न करायला काय प्रॉब्लेम आहे ते स्पष्टपणे सांग"

सुमित शांतपणे बोलू लागला," दादा मला वाटतंय की मी लग्नासाठी मानसिकरित्या तयार नाहीये. दादा हल्ली मुलींच्या मागण्या खूप वाढल्या आहेत, त्या मी पुरवू शकेल का? तुला माझा मित्र शुभम माहीतच असेल ना, त्याचे लग्न झाल्यावर महिनाभरातच त्याची बायको त्याला घेऊन आई वडिलांपासून वेगळी रहायला निघून गेली. दादा मी तुझ्यापासून, आईपासून व निरवपासून दूर नाही राहू शकत किंवा मला ही कल्पना ही करवत नाहीये"

अजय म्हणाला," तुझ्या मनातील शंका रास्तच आहेत, आपल्या कुटुंबावर विभक्त रहायची वेळ येऊच शकते म्हणून तर आपण मागच्या वर्षी शेजारचा फ्लॅट विकत घेतला. आपण एकमेकांपासून दूर जाण्याची वेळच येणार नाही. आणि हे बघ सुमित लग्नाचे एक वय असते व या वयातच आपण समोरच्या व्यक्तीला समजावून घेऊ शकतो, याच वयात अडजस्टमेंट करू शकतो"

अजयचे बोलून झाल्यावर अर्चना बोलू लागली, "सुमित भाऊजी आपण मुलगी निवडतानाच अशी निवडू की जी एकत्र कुटुंबात राहील, सर्वच मुली सारख्या नसतात, कुटुंब तोडण्याची मुलींना हौस नसते, शुभमच्या बायकोने जो निर्णय घेतला त्यात त्याच्या आई वडिलांची काहीतरी चुक असूच शकते ना, टाळी ही कधीच एका हाताने वाजत नाही. मी माझ्यावरूनच सांगते, लग्न झाल्यावर मला स्वयंपाक येत नव्हता, आपल्या आईंनी मला न रागावता,न ओरडता , प्रेमाने स्वयंपाक शिकवला. मी ऑफिसमध्ये गेल्यावर त्या घरातील सर्व कामे आवरून घेतात, निरवला सांभाळतात, तेवढाच माझ्या कामांचा भार हलका होतो आणि छोट्या मोठ्या कुरबुरी प्रत्येक कुटूंबात होतच असतात.तुम्ही काही काळजी करू नका तुमच्या बायकोला मी व आई चांगल्या रीतीने हाताळू, तिला आमच्यापासून वेगळी राहण्यासाठी एक पण कारण देणार नाही. निरव बाळा तूच काकांना सांग तुला काकू पाहिजे की नाही"

तो एवढासा निरव सुमित जवळ गेला व त्याच्या बोबड्या आवाजात म्हणाला, " काका मला काकू पाहिजे"

त्याचे बोलणे ऐकून सर्वच जण हसायला लागले.

सुमित म्हणाला," ठीक आहे आई, मी पुढच्या आठवड्यात सुधाकर मामाने सुचवलेल्या मुलीला भेटायला जाईन पण उद्या मला माझ्या मित्रांसोबत लोणावळ्याला जाण्याची परवानगी द्यायची."

आई काळजीने म्हणाली," सुमित उद्या अमावस्या आहे, नंतर कधी तरी जा"

सुमितने केविलवाण्या नजरेने अजयकडे पाहीले.

अजय आईला म्हणाला," आई त्याला जाऊदेत, काही होत नाही."

आई म्हणाली," तुझे बाबाही असेच अमावस्येच्या दिवशी बाहेर गेले होते आणि ते परत आलेच नाही."

अजय म्हणाला," आई ही अंधश्रद्धा आहे, आपण अमावस्येच्या दिवशी दिवाळी साजरी करतो. अमावस्येला जर अघटित घडत असते तर सर्व जगच एकाच ठिकाणी थांबले असते, कोणीच अमावस्येला घरातून बाहेर पडले नसते."

आई तिथून निघून जाता जाता म्हणाली, "तुम्ही आजकालची मुलं माझं थोडीच ऐकणार आहेत, तुझ्या बाबांच्या जाण्याने आपल्या घराची काय दुर्दशा झाली होती याची कल्पना तुम्हाला आहेच. सुमित तुला जायच असेल तर जा."

आई निघून गेल्यावर सुमित अजयला म्हणाला, "ही आई परवानगी तर देते पण सोबत किती lecture ऐकवते, सरळसरळ हो म्हणाली असती तर काय झाले असते?"

दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील सगळे उठण्याच्या आधी सुमित अंघोळ करून तयार होता. अर्चनाने त्याच्यासाठी चहा, नाश्ता तयार केला होता. सुमित पोहे खाता खाता म्हणाला, "वहिनी पोहे खूप मस्त झाले आहे, तुमच्या हातचे पोहे खाल्ल्याशिवाय दिवसाची सुरुवात झाल्यासारखी वाटत नाही"

अर्चना म्हणाली," भाऊजी एवढा मस्का लावण्याची गरज नाहीये"

अजय म्हणाला," सुमित तुझी नौटंकी बंद कर, तुझ्यावर आई रागावली आहे, अर्चना नाही. गाडी नीट चालव आणि हो त्या राघवच्या मागे बसू नकोस. तो खूप harsh गाडी चालवतो. रात्री दहाच्या आत घरी यायचे, उशीर झाल्यावर घरात प्रवेश मिळणार नाही. आणि हो दुसरी व महत्त्वाची गोष्ट आईला घरातून बाहेर पडताना 'आई जातो' म्हणू नको,'आई येतो हं' अस म्हणायचं."

सुमित म्हणाला," दादा मी शाळेच्या पिकनिकला नाही चाललोय. केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी आपला आभारी आहे."

निरव झोपेतून उठून आल्यावर सुमितने त्याला उचलून घेतले, त्याची पप्पी घेतली व तो म्हणाला, " निरव आज काका तुझ्यासाठी एक कार आणणार आहे,दिवसभर आजीला व आईला त्रास द्यायचा नाही."

सुमितने जॅकेट अंगात चढवले, डोळ्याला गॉगल लावला, हेल्मेट हातात घेतले. आई देवपूजा आटोपून हॉलमध्ये आली होती. आईला बघून सुमित म्हणाला," आई येतो हं..."

आईने सुमितकडे आश्चर्यचकीत होऊन पाहिले व ती म्हणाली," बाळा जपून जा आणि लवकर ये"

संध्याकाळी चारच्या सुमारास आई अर्चनाला म्हणाली," अर्चना सुमितचा काही फोन आला होता का?"

अर्चना म्हणाली, " नाही ना आई, का? काय झाले? तुम्ही खूप काळजीत दिसत आहात."

आई म्हणाली," खूप हुरहूर वाटत आहे ग, अजय व निरव कुठे आहेत?"

अर्चना म्हणाली," निरव झोपेतून उठल्या पासून सतत काकाचा जप करत होता, यांनी सुमित भाऊजींना फोन लावला पण त्याचा फोन लागला नाही म्हणून हे निरवला घेऊन चक्कर मारायला गेले आहेत."

पाचच्या सुमारास अजय निरवला घेऊन घरी परत येतो. आई सुमितला सारखा फोन लावायचा प्रयत्न करते पण त्याचा फोन काही केल्या लागत नाही. अजय राघवला व त्यांच्या ग्रुप मधील इतर मित्रांना फोन लावायचा प्रयत्न करतो पण कोणाचाच फोन लागत नाही. आतातर अजयलाही सुमितची काळजी वाटू लागली होती.

साडेसहाच्या सुमारास अजयचा फोन वाजतो. अजय फोन उचलतो तर समोरून राघव बोलत असतो," अजय दादा मी राघव बोलतोय, दादा I'm sorry, सर्व चुक माझीच आहे"

अजयला राघवच्या बोलण्याचा अर्थ कळत नव्हता, तो त्याने घाबरून विचारले,"राघव काय झाले? सुमित कुठे आहे?"

राघव रडक्या स्वरात बोलू लागला," दादा मी गाडी चालवत होतो, रोड स्लीपरी होता, सुमित सतत सांगत होता तरी मी गाडी कमी स्पीडने चालवत नव्हतो, गाडीचा स्पीड हळूहळू वाढवत होतो आणि नव्हते व्हायला पाहीजे तेच झाले, जास्त स्पीड असल्याने गाडी सरकली, मागे बसलेला सुमित उडून पडला व मी गाडीसोबत सरकत पुढे गेलो. मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने सुमितला चिरडले. माझ्या डोळ्यासमोर आपल्या सुमितने प्राण सोडले शेवटी तो एवढंच बोलला की 'दादाला व आईला सॉरी सांग, मी त्यांचे ऐकायला हवे होते' ,दादा आम्ही सुमितचे शव घेऊन घरी येत आहोत."

राघवचे बोलणे ऐकल्यावर अजयचा फोन हातातून निसटून खाली पडला, एका क्षणासाठी त्याला घेरी आल्यासारखे वाटले. फोन खाली पडल्याचा आवाज झाल्याने अर्चना व आई दोघीही बाहेर आल्या. अर्चना म्हणाली," अहो काय झाले? कोणाचा फोन आला होता?"

अजय एवढंच बोलला,"अर्चना आपला सुमित आपल्याला कायमचा सोडून गेला. आई तुझ्या मनातील भीती खरी ठरली. मी त्याला जाण्याची परवानगी द्यायला नको होती."

आई म्हणाली," अजय काहीही बोलू नकोस, आज कधी नव्हे ते सुमित मला म्हणाला होता 'आई येतो हं...' तो असा कसा जाऊ शकतो."

एका अपघाताने एक हसतेखेळते कुटुंब संपले होते. सुमितच्या मृत्यूला अजय स्वतःला जबाबदार धरायचा. निरव रोज दारात उभा राहून आपल्या सुमित काकाची वाट बघत असायचा. आई तर सुमितच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरायचे नावच घेत नव्हती. घरातील सर्वजण जगण्यासाठी श्वास तर घेत होते पण त्या घरात परत हसण्या खिदळण्याचा आवाज कधी येईल कुणास ठाऊक? 

राघवने परत कधीच बाईकला हात लावला नाही.

©®Dr Supriya Dighe