आई रिटायर्ड होतेय- तिच्या मनाची व्यथा

Aaichya Mnachi Vyatha


आई रिटायर्ड होतेय- तिच्या मनाची  व्यथा

गोष्ट छोटी डोंगराएवढी

विषय- आई रिटायर्ड होतेय


वय झालं की एक स्त्री कोणत्या न कोणत्या कार्यातून मुक्त होत असते, नोकरी करणाऱ्या स्त्रिया नोकरीतून रिटायर्ड होतात, घरकाम करणाऱ्या स्त्रिया सून आल्यामुळे त्यांचा व्याप थोडा कमी होतो.

पण या रिटायरमेंट मध्ये आणि या वृद्धापकाळामध्ये त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.


वृद्धापकाळ जीवनातील अत्यंत कठीण काळ म्हणून गणला जातो. व्यक्तीला शारीरिक, भावनिक, मानसिक, वैचारिक समस्यांना सामोरे जावे लागते. कौटुंबिक समस्या, वैवाहिक समस्या, शारीरिक समस्या वृद्धापकाळातच सुरू होतात.

कुटुंबात मुले व सुना आपापल्या तोऱ्याने वावरतात. ते वृद्ध मातापित्यांचा सल्ला ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. त्यांना त्यांची अडचण होते. वृद्ध मातापिता घरात नको वाटतात. वृद्ध मातापित्यांना मात्र सुना, मुले, नातवंड हवेहवेसे वाटतात. आपल्या मुलांचे कौतुक ऐकावे वाटते. त्यांचे वैभव, त्यांची संपन्नता, त्यांची कारकिर्द हे सर्व मन भरून पाहावे वाटते. मुलांच्या व सुनांच्या तसेच नातवंडांच्या आनंदात रमून जावे वाटते. त्यांची सुख-दुःखे वाटून घ्यावी वाटतात. मुले व सुना-नातवंडे जीव की प्राण वाटतो.

ही माया, ममता, जिव्हाळा, अत्मियता, स्नेह, प्रेम वृद्धापकाळात भरभरून येते. याउलट स्थिती मुलांची, सुनांची व नातवंडांची असते. त्यांना वृद्ध आई वडिलांची अडचण होते. त्यांच्या आजारावर होणारा वैद्यकीय खर्च नको वाटतो. वृद्ध माता पित्यांच्या आजाराने कंटाळणाऱ्या मुलांना, सुनांना वृद्ध घरात नको वाटतात. काही मुले व सुना तर वृद्ध माता पित्यांना वाऱ्यावर सोडतात. त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. आणि काही वृद्धाश्रमात नेऊन ठेवतात.

ज्या आईने हे जग दाखविले, आपले पालन पोषण केले, जीवन साकार केले. हाल अपेष्टा, कष्ट करून जीवनाला आकार दिला त्या आईला मुलामुलींनी वृद्धापकाळात आधार देण्याची नितांत गरज असते.

मुला मुलीने व सुनेने वृद्ध माता पित्यांना समजून घेतले पाहिजे. त्यांच्या भावभावनांचा आदर केला पाहिजे. त्यांना मानसिक व भावनिक आधार दिला पाहिजे. आपल्या कर्तव्यापासून आपण परावृत्त होवू नये, तर कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रवृत्त व्हावे. वृद्ध माता पित्यांशी संयम व सामंजस्याने व्यवहार ठेवावे. वृद्ध माता पिता आपल्या मुलांकडून तसेच सुना व नातवंडांकडून सामंजस्याच्या तशाच आपुलकीच्या व्यवहाराची अपेक्षा ठेवतात.

मुलाने आपल्याशी मनमोकळेपणाने बोलावे. आपल्या तब्येतीची विचारपूस करावी. आपला सल्ला घ्यावा. घराच्या व्यवहारात आपल्यालाही विचारावे ही अपेक्षा धरून असतात. हे वागणे अपेक्षितच आहे. मुला मुलींनी, सुना नातवंडांनी या वृद्ध माता पित्यांचा सल्ला घ्यावा, विचार घ्यावा, त्यांच्याशी संयम व सामंजस्याचे संबंध ठेवावे व योग्य निर्णय घ्यावा. म्हणजे त्यांना आत्मिक समाधान मिळेल.

वयोमानाने त्यांना तेवढी कामे जमत नाही, आपण त्यांना समजून घ्यायला हवं.

मीनाताई नोकरीवरून रिटायर्ड होणार होत्या, ज्या दिवशी रिटायरमेेंट कार्यक्रम होता, सगळे आनंदाने त्यांना शुभेच्छा देत होते, पण मीनाताई त्यांच्या वेगळ्याच विचारात गुंतल्या होत्या.

"आता तर माझा पगारही नसणार, कसं भागणार सगळं, मुलं सांभाळ करतील का? त्यांना आपली अडचण तर वाटणार नाही ना? पैशाची गरज पडली तर करतील मुलं आपलं? आता तर शारीरिक व्याधी पण सुरू व्ह्यायला लागल्या. कामही जास्त होत नाही, मुलगा- सुन सांभाळून घेतील का? एक ना अनेक प्रश्न मीनाताईच्या डोक्यात गिरक्या घालत होते.

मीनाताईचे मिस्टर मुलं लहान असतानाच वारले. मुलगा सौरभ आणि मुलगी गार्गी दोघेही चांगलं शिक्षण घेऊन परदेशी गेले. गार्गीने तिथल्याच मुलाशी लग्न केल आणि ती तिथेच सेटल झाली

सौरभ मात्र भारतात परत आला, त्याच्याच पसंतीच्या मुलीशी त्याच लग्न झालं.

आणि तो आईजवळचं राहू लागला. मीनाताईच्या रिटायरमेंट नंतर त्या थोडंथोडं घरकाम करू लागल्या. वयोमानानुसार त्यांना तेवढं जमत नसे.

एकदा चुकून त्यांच्या हातून फ्लॉवरपॉट खाली पडून फुटला. मिहिरा त्यांना खूप बोलली.

आज त्यांना विनायकरावांची कमी भासली ते असते तर? बऱ्याच गोष्टी वेगळ्या राहिल्या असत्या.

मिहिरा त्यांच्याकडून कामाची अपेक्षा करायची. मीनाताई जमेल तेवढं सगळं काम करायच्या पण वयोमानाने कामाची स्पीड कमी होती.

त्यावरूनही मिहिरा त्यांना खूप बोलायची, तब्बेतीची विचारपूस तर दूरच कधी प्रेमाने बोलत नसे. मिनाताईला नातवंडाची आस होती पण ती काही पूर्ण झाली होऊ शकली नव्हती, सौरभ आणि मिहिराने वेळ घ्यायचं ठरवलं होतं.
गार्गीकडे एक मुलगी होती, पण तिच्याकडे जाण्याचा प्रश्नच नव्हता.

सगळ्या गोष्टी बदलत चालल्या होत्या. पूर्वीसारखं काहीच राहिलेलं नव्हतं.

टोचून बोलणे, अपमान करणे, त्यांना अडगळ समजणे इथपर्यंत गोष्टी पोहोचल्या होत्या.

एक दिवस सगळं असह्य झालं आणि मीनाताई घर सोडून निघून गेल्या. कुठे गेल्या कुणालाच काही पत्ता नव्हता.

काही महिन्याने त्यांना आईची मरणाची बातमी मिळाली होती पण त्यावेळी खूप उशीर झालेला होता. आई आज जीवनातून रिटायर्ड झाली होती.


आज समाजात वृद्ध मातापित्यांची हेटाळणी मुलांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे.

भले त्यांचा सल्ला व विचार पटणार नाही, पण त्यांना टाळू नका. त्यांच्या सल्ल्याची टाळाटाळ करू नका. त्यांचा अपमान करू नका. शेवटी वृद्ध माता पिताच आपल्याला कामी येतात. त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात. वृद्ध माता पित्यांच्या अपेक्षा सर्वांनी जपाव्यात. त्यांच्या भाव भावनांचा, त्यांच्या शारीरिक क्षमतेचा, व्याधीचा विचार करून मुला मुलींनी, सुनांनी त्यांना समजून घ्यावे. कारण ही वृद्धत्वाची वेळ आपल्यावरही येणार आहे, हे जाणून त्यांना आधार द्या व आधार तुम्हीही मिळवा.

हेच खरे जीवन आहे व हाच खरा जीवनाचा आनंद आहे.


समाप्त: