Feb 25, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

आई रिटायर्ड होतेय

Read Later
आई रिटायर्ड होतेय

कॅटेगरी : गोष्ट छोटी डोंगराएवढी 
विषय : आई रिटायर्ड होतेय
                           आई रिटायर्ड होतेय 

आई! पहाटे उठल्यापासून जी कामाच्या व्यापात व्यस्त होते ती अगदी रात्री झोपेपर्यंत या ना त्या कामात व्यस्तच असते. हल्लीचं एक ट्रेंडिंग वाक्य आहे, 'आई कुठे काय करते'. मी तर म्हणेन आई काय नाही करत? ती सकाळी उठून घरातील कामाला जाणाऱ्या, शाळा-कॉलेजात जाणाऱ्यांचे डबे बनवून देते. सोबतच सकाळच्या चहा-नाश्त्याचं पाहते. बरं घरात अशा व्यक्ती असतील ज्यांना अगदी सगळंच हातात नेऊन द्यावं लागतं, तर त्यांची उठबस करत राहते. केरकचरा काढणं, फरशी पुसणं, इतर साफसफाई ही कामं पण तिला चुकली नाहीच! कपडे धुणं असो किंवा मग दिवसभर भांड्यांचा पसारा, तिचं काम आपलं सुरूच असतं. आज जरी वॉशिंग मशीन आणि डिश वॉशरचा वगैरे जमाना आहे, तरी त्यातही तिचं लगबगीनं काम करणं चूकत नाही. आणि मुळात या सुखसोयी उपलब्ध असतीलच असंही नाही. दुपारचा स्वयंपाक, रात्रीचा स्वयंपाक करणं सुद्धा आहेच. घरात कोणी वयस्कर, आजारी व्यक्ती असतील तर त्यांची देखभाल करणं सुद्धा आलं. पाहुणे मंडळी आल्यानंतर पण तिची धावपळ सुरू असते.
बरं या व्यतिरिक्त इतर कामांमध्ये सुद्धा तिचा सहभाग बरेचदा असतोच. जसं की वीजबिल भरणं, भाजी आणणं, किराणा सामानाची यादी करण्यापासून ते अगदी घरी आणण्यापर्यंत, दूध व इतर गोष्टी आणणं आणि त्यांच्या बिलाचा योग्य तो हिशोब ठेवणं. प्रसंगी दवाखाना अन् औषधपाणी बघण्याचं कामही ती करते. मुलांच्या शाळेची तयारी करून देणं, अभ्यासाची मदत करणं हे सर्व आई करते. नातलगांत किंवा इतर कोणता कार्यक्रम असेल तर तिथे आपल्या परीने करावयाच्या गोष्टींसाठी ती अगदी नीट लक्ष देऊन तयारी करून आपली जबाबदारी पार पाडते. या ही पलीकडे जाऊन तिला इतरही कामं असतातच की! आणि तरीही आई काय करते हा प्रश्न पडावा, हेच हास्यास्पद असावं.
आई ज्या पद्धतीने घरासाठी राबते, त्यात तिची काळजी घेण्यासाठी घरातील सदस्य सुद्धा पुढे यायला हवे. कारण ती अगदी सराईतपणे स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत असते. कितीही आजारी असली तरी दिवसभराचा जो काही कामाचा व्याप असतो त्यातील थोडा तरी व्याप ती आवरणारच. दुर्दैवाने कितीतरी घरांमध्ये ही गोष्ट अगदीच दुर्लक्षित केली जाते.
कुठेतरी हे जाणण्याची गरज आहे की ऑफिसच्या कामातून जसं रिटायर होतात, तसंच कधीतरी तिला सुद्धा रिटायरमेंटची गरज भासणारच आहे. ती आपलं म्हणून जर घरासाठी इतकं करतेय, तर ही आपली पण जबाबदारी असेल की तिचं हळूहळू रिटायरमेंट कडे झुकणं आपण समजून घ्यावं. तिच्या सवयीनुसार तर कदाचित अगदी एकदमच सगळ्या गोष्टींतून अलिप्त होणं तिला जमणार नाही. पण वेळ आणि वयानुसार तिला समजून घेऊन वागलं तर ती सुद्धा आनंदी होईल. आई आयुष्यभर खूप काही करत असते. कदाचित ती स्वतः सगळ्या गोष्टींतून अंग काढून घेईन तेव्हा त्यातील बऱ्याच गोष्टींची जाणीव होईल. हळूहळू तिला एकेका जबाबदारीतून मुक्त करून तिला तिचा असा वेळ द्यावा. आई तिच्या 'आईपणा' आणि 'बाईपणा'तून पूर्णपणे रिटायर होणं तर शक्य नाही. पण आयुष्यात एका टप्प्यावर तर तिला पण आरामाची गरज भासणारच ना. वयानुसार तिच्यात होणारे बदल समजून घेणं आवश्यक असतं. हे काम केलं नाहीस म्हणून त्रागा करण्यापेक्षा, आई रिटायर्ड होतेय ही बाब मनापासून स्वीकारणं योग्य असेल.
-©® कामिनी खाने.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//