आई मला खेळायला जायचंय

व्यथा आजच्या मुलांची


आई मला खेळायला जायचय..


"मिहीर.. परत हातात मोबाईल? तुला मी अभ्यासाला बसायला सांगितले होते ना?" शुभ्रा आपल्या लेकाला ओरडत होती.

" आई, अग आत्ताच घेतला आहे. मी इतका वेळ अभ्यासच करत होतो." मिहीरने स्वतःची बाजू मांडायचा प्रयत्न केला.

" नेहमीचे झाले आहे तुझे. मी बघितले की म्हणायचे आत्ताच मोबाईल घेतला. अरे नववीचे वर्ष आहे. आता अभ्यासाची सवय लागली तरच पुढच्या वर्षी चांगले मार्क मिळतील. नाहीतर आहेच. यावेळेस युनिट टेस्ट मध्ये किती कमी मार्क्स होते."

" आई, एटी पर्सेंट होते. हाय्येस्ट एटीफाय होता."

" तेच म्हणते आहे. किती कमी मार्क्स आहेत. शी... माझी ती मैत्रीण बघ. तिच्या मुलीला नेहमी नाईन्टी एट, नाईन्टी नाईन पर्सेंट मिळतात."

" आई, ती काव्या ना? मला माहीत आहे. तिला प्रायव्हेट ट्युशन्स आहेत. आणि ती आहे माझ्यापेक्षा जास्त हुशार. पण तिला थोडीच चेस खेळता येतो."

" चेसचे मार्क्स एक्झाममध्ये पकडणार आहेत का? सोड.. मला उशीर होतो आहे. मी येईपर्यंत ट्युशनचा आणि स्कूलचा होमवर्क करून ठेव. मला नंतर कंप्लेंट नको आहे."

" तू कुठे चाललीस?"

" माझ्या फ्रेंडची बर्थडे पार्टी आहे. तिने बोलवले आहे. तुमचा स्वयंपाक करून ठेवला आहे. बाबा ऑफिसमधून आला की जेवून घ्या."

" नॉट फेअर आई.. सॅटरडेला मला माझ्या फ्रेंडच्या बर्थडेला जायचे होते तर जाऊ दिले नाहीस. आता तू बरी चाललीस?"

" माझे शिक्षण झाले आहे. तुझे व्हायचे आहे. जास्त बोलू नकोस. जर टीचर ओरडली तर मला सांगू नकोस.."

" आई, काय बोललीस?"

" टीचर ओरडली तर मला सांगू नकोस." शुभ्रा वैतागून बोलली.

" थांब. आजीलाच फोन लावून सांगतो. मागच्या वेळेस तू ए टीचर म्हणाली होतीस तेव्हा आजी ओरडली होती तुला. टीचर गुरू असतात. त्यांना अहोजाहो बोलायचे असते ना?" मिहीर च्या हातात हुकमाचा एक्का आला होता.

" नको.. आईला फोन लावलास तर ओरडेल मला. तू थोडा वेळच मोबाईल खेळ. आता मला जाऊ दे. मी आल्यावर बोलते तुझ्याशी.." असे बोलून केलेल्या मेकअपवर शेवटचा हात फिरवत शुभ्रा म्हणाली. मिहीरही अभ्यास सोडून मोबाईलवर गेम्स खेळायला लागला. बाबांची यायची वेळ झाल्यावर त्याने शहाण्या मुलासारखा मोबाईल ठेवून मॅथ्सचे पुस्तक हातात घेतला. वेळेवर दरवाजाची बेल वाजली. थकलेला हरीश आत आला. त्याला बघून मिहीर उठला. त्याच्या हातात पाणी दिले.

" बाबा, चहा देऊ?"

" आई, गेली वाटते?" हरीश आत बघत बोलला.

" हो कधीच.."

" अच्छा.. मग तू काय करतो आहेस?"

" मॅथ्स.. बाबा मला थोडा डाऊट आहे."

" मी फ्रेश होतो मग करू." हरीश फ्रेश होऊन येईपर्यंत त्याला एक फोन आला. त्या फोनवर बोलून होईपर्यंत जेवायची वेळ झाली. जेवण झाल्यावर मिहीरला त्याचा प्रोजेक्ट आठवला. रात्री बारापर्यंत मग तो प्रोजेक्ट करत बसला. त्याला कंपनी म्हणून थोडा वेळ हरीश बसला. त्याच सुमारास शुभ्राही आली. उद्या सकाळी आठची शाळा आहे, लवकर झोप असे सांगून दोघेही झोपायला गेले. सकाळी दहा वाजता हरीशला ऑफिसला जायचे होते, त्यासाठी शुभ्राला उठून डबा करायचा होता. सकाळी आठच्या शाळेसाठी सकाळी सहा वाजता उठणारा मिहीर रात्री एकपर्यंत जागून प्रोजेक्ट करत होता..



कसा वाटला पहिला भाग? पुढील भागात बघू मिळते का मिहीरला खेळायला जायला.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all