कथेचे शिर्षक: आई माझं ऐक
विषय: आई रिटायर्ड होतेय
स्पर्धा: गोष्ट छोटी डोंगराएवढी
गावात मतदान असल्याने संदीप बऱ्याच दिवसांनी गावी आला होता. आईसोबत गप्पा मारता याव्या म्हणून तो आदल्या दिवशी रात्रीचं मुक्कामी आला होता. संदीपच्या मुलाची परीक्षा चालू असल्याने त्याच्या बायकोला येता आले नव्हते. संदीप येणार म्हणून आईने त्याच्या आवडीचा स्वयंपाक करुन ठेवला होता. संदीपला आईने आग्रह करुन जेवू घातले. जेवण झाल्यावर संदीप म्हणाला,
"आई इतक्या मोठया घरात तुला एकटीला बोअर होत नाही का?"
"ह्या घरात मी एकटी नाहीये. ह्या घरात तुझ्या बाबांच्या आठवणी आहेत. तुझ्या लहानपणाच्या आठवणी आहेत. पुढील आयुष्य घालवायला मला ह्या आठवणी पुरेशा आहेत." आईने सांगितले.
"आई तुला व बाबांना या गावाच्या बाहेर जायचं नव्हतं, तर मला कशाला शिकवलं?" संदीपने विचारले.
आई म्हणाली,
"अरे असं काय बोलतोय? ह्या गावात राहिलं तरी काय आहे. तू शिकलास म्हणून आज एवढ्या मोठ्या कंपनीत नोकरीला आहेस. गावात कोणाकडे गाडी नाही अशी तुझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे. तुझ्या नोकरीमुळे तुला इतकी सुंदर व चांगल्या घरातील बायको मिळाली. तुझं कल्याण व्हावं, म्हणून तुला आम्ही शिकवलं."
यावर संदीप म्हणाला,
"मला शिकवताना तुम्हाला हे माहितीचं होतं की, मी नोकरीच्या निमित्ताने गावापासून दूर राहील, मग त्यावेळी तुम्ही हा विचार का केला नाही की, आपल्याला सुद्धा ह्याच्या सोबत गावापासून दूर रहावे लागू शकेल. आई बाबा होते तोपर्यंत मी फारसा आग्रह केला नाही, कारण तुम्ही दोघे एकमेकांना सोबत होतात. आता बाबांना जाऊन एक वर्ष होऊन गेलं आहे.
आई मला कामामुळे सारखं सारखं गावी येता येत नाही. दररोज रात्री जेवण करताना तुझी आठवण आल्याशिवाय राहत नाही. आई अजून किती दिवस स्वतः स्वयंपाक बनवून खाणार आहेस. आम्हालाही तुझी सेवा करण्याची संधी दे ना. स्वातीने तर मला बजावून सांगितले आहे की, येताना आईंना सोबत घेऊन या म्हणून.
मला मान्य आहे की, तुला तिकडे लगेच करमणार नाही. आई घरापासून जवळ मंदिर आहे, तू तिकडे जाऊन तुझ्या समवयस्क बायांसोबत वेळ घालवू शकतेस. स्वाती तुला बोअर होऊ देणार नाही. स्वातीला तुला देवदर्शनाला घेऊन जायचे आहे. तन्मय व तन्वी मुळे घरात सतत दंगा सुरु असतो. आई त्यांनाही आजीचं प्रेम हवं आहे.
आई प्लिज आता गाव न सोडण्याचा हट्ट सोड. मी दर महिन्यातून एकदा तुला गावी घेऊन येत जाईल. हे घर जसं होतं तसंच राहिलं. सदाला घराची साफसफाई करायला लावू."
"संदीप मला तुझी काळजी कळतेय, पण तिकडे आलं की, स्वाती मला एकाही कामाला हात लावू देणार नाही. माझं स्वयंपाक घर सोडलं, तर मला कुठेच स्वयंपाक करता येत नाही. मला रिकामं बसवलं जात नाही." आई म्हणाली.
संदीप पुढे म्हणाला,
"आई तुला आता कामाची नाहीतर रिटायर्ड होण्याची गरज आहे. आई तू माझ्यासाठी इतकं प्रेमाने जेवण बनवलंस. तुला वाईट वाटू नये, म्हणून मी जेवलो, पण आई वरण भातात मीठ नव्हतं आणि भाजी प्रचंड खारट होती. शेंगदाण्याचा चटणीत दगड लागला. पोळी एका बाजूने करपलेली होती, तर दुसऱ्या बाजूने कच्ची होती.
आई ज्या घरात धुळीचा एक कण दिसायचा नाही, त्याच घरात कोपऱ्यात जाळे लागलेले आहेत. आई मी या सगळ्याची तक्रार करत नाहीये. हे सगळं याचसाठी सांगतोय की, तुझं आता वय झालं आहे. तुला रिटायरमेंटची आवश्यकता आहे."
"संदीप एक आई कधी रिटायर्ड होऊ शकते का?" आईने विचारले.
"नाही. आई कधीच रिटायर्ड होऊ शकणार नाही. एका आईला बरीच कामे असतात. सगळ्याच कामातून तुला रिटायर्ड व्हायला मी सांगत नाही. स्वयंपाक घरातून रिटायर्ड होण्याची वेळ तुझी आली आहे. तू स्वातीला स्वयंपाकाच्या टिप्स देऊ शकतेस. सण कसे साजरे केले जातात? हे तू सर्वांना सांगू शकतेस.
संदीप अजून कामावरुन घरी का आला नाही? तन्मय क्लासवरुन घरी का आला नाही? स्वातीने आज जेवण कमी का केले? तन्वी आज चिडचिड का करत होती? अशा अनेक प्रश्नांचा विचार तुला करायचा आहे.
घरातील सगळ्यांची काळजी करणे हे एका आईचे काम असतेच ना? हे काम तुला तर शेवटच्या श्वासापर्यंत करायचे आहे. आम्ही पुरुष कसे ठराविक वयात कंपनीतील कामात रिटायरमेंट घेतात. तशीच रिटायरमेंट तुला स्वयंपाक घरातून घ्यायची आहे. एक आई मात्र पूर्णपणे रिटायर्ड कधीच होऊ शकणार नाही हेही तेवढंच खरं आहे." संदीपने सांगितले.
संदीपने बऱ्याच वेळ समजावून सांगितल्यावर आई संदीपसोबत शहरात जायला तयार झाली. अथक प्रयत्नांनंतर आईने संदीपचे म्हणणे ऐकले. संदीपची आई स्वयंपाक घरातून रिटायर्ड व्हायला तयार झाली.
समाप्त
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा