आई, लेक आणि कॉलेजचे डेज.. अंतिम भाग

लेकीचे डेज.. आईची परिक्षा


आई, लेक आणि कॉलेजचे डेज.. भाग ३


" माझी नथ??"

" अग, कुठे ठेवली होतीस? असेल इथेच कुठेतरी."

" त्या दिवशी मी तुझी ज्वेलरी बघितली तेव्हा ठेवली होती इथेच.."

" बाळा, तू नथ घालणार कशी? तुझे नाक तरी टोचले आहे का? आता सापडत नसेल तर जाऊ दे ना."

" आई, मी चापाची नथ आणली होती."

" नक्की का?"

" तुझा माझ्यावर विश्वासच नाही." हे नेहमीचे ठेवणीतले वाक्य ऐकल्यावर नेत्राने शोधमोहिमेला सुरुवात केली. प्रिशाला साडी नेसून हलणे *डिफिकल्ट* जात असल्यामुळे ती नेत्राला *गाईड* करत होती. आणि बिचारी नेत्रा आईपणाला जागत नथ शोधत होती.

" आई, तुझ्या कपड्यांमध्ये गेली का बघतेस का?" आता एवढ्या कमी वेळात शोधणे हे जिकीरीचे काम.. परत अख्खा कपड्याचा डोंगर खाली आला. दागिन्यांचे डबे रिकामे झाले. तरी नथ काही सापडेना. तिथे प्रिशाचे रडणे सुरूच होते.

" मी इथेच ठेवली होती.. प्रॉमीस.. मला आठवते ना.." फक्त इथे म्हणजे कुठे हे काही तिला आठवत नव्हते. प्रिशा नथ सापडत नाही म्हणून रडकुंडीला आली तर नेत्रा हा पसारा परत एकटीने आवरायचा या कल्पनेने. प्रिशा परत नवीन जागा सांगणार तोच तिचा फोन वाजला.

" प्रिशा.. आहेस कुठे?"

"घरी.."

" आवरून नाही झाले अजून?"

" अग.. माझी नथ सापडत नाहीये. आपण घेतली होती बघ."

"डफर.. ती माझ्याकडे राहिली आहे. तेच बघत होते तुला आठवते का?"


" मग सांग ना तसं.. कधीची शोधते आहे मी?" हे वाक्य ऐकल्यावर चमकून नेत्राने लेकीकडे बघितले. पण ती आता नथ सापडल्याच्या आनंदात होती. तिला आता काही बोलणे म्हणजे आई किती छळ करते याचे रडगाणे सुरू होणार. मग नेत्राने तिचे तिला हवे तसे फोटो काढून दिले. परत परत ती छान दिसते याची खात्री पटवून दिली. तिची ट्रेडिशनल डे ची साडी इस्त्री करून आणण्याचे प्रॉमीस केले.. तेच नाही भरपूर गजरेही आणणारच याची खात्री पटवली. प्रिशा घराबाहेर पडली याची खात्री पटल्यावर तिने हुश्श केले.. घरात आल्यावर पडलेला पसारा बघून आजचा दिवस असा मग उद्याचा कसा, हा विचार करत तिने घर आवरायला सुरूवात केली.

पसारा आवरून झाल्यावर तिला मोठी माणसे सांगायचे ते पटले. मुलींना जास्त शिकवायचे नाही.. म्हणजे कॉलेज नाही.. कॉलेज नाहीत म्हणजे हे कसले कसले डेज नाहीत.. ते नाहीत म्हणजे हे असे आईच्या जीवाला लागणारे घोरही नाहीत.. तुम्हाला पटते का?

शेवटचा उतारा हा विनोद म्हणून घेतला आहे, तो विनोद म्हणूनच घ्यावा. मुलींनी भरपूर शिक्षण घ्यावे हेच माझे मत आहे.

तर मुलींचा साडी डे म्हणजे आईच्या जीवाला घोर.. तुम्हाला काय वाटते? सांगायला विसरू नका.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all