©®स्मिता भोस्कर चिद्रवार .
आई जेव्हा सासू होते
सकाळ झाली तरीही अवनी काल रात्रीच्या विहानच्या बोलण्याचाच विचार करत होती.कारणच तसं होतं.काल विहान जिगिषाला घेऊन घरी आला होता .तशी ती नेहेमीच घरी यायची.मनमोकळी वावरायची.पण आज जेव्हा दोघांनी " आमचं एकमेकांवर प्रेम आहे.तुमची परवानगी असेल तर आम्हाला लग्न करायचं आहे." असं सांगितलं तेव्हा अवनी आणि आशिष सुखावले.जिगिषा एक सुंदर , शिकलेली , मनमिळावू मुलगी होती .मुख्य म्हणजे दोघेही एकमेकांना साजेशे आणि सज्ञान होते त्यामुळे नाही म्हनण्याचा प्रश्न नव्हता.नाही म्हणायला जीगिषा गुजराती होती हा एक मुद्दा होता पण अवनी आणि आशिष काही जुन्या विचारांचे नव्हते आणि शेवटी आपला मुलगा आनंदात रहावा हे सगळ्याच आईबाबांसारख त्यांनाही वाटत होतं .
" मम्मा , पप्पा अहो सांगा ना , तुमचा होकार आहे ना ? तुम्ही म्हणाल ते ऐकणार आम्ही ." वीहान म्हणाला .
" हो आंटी ,अंकल,प्लीज सांगा ना . आम्ही आधी तुमच्याकडे आलोय.तुम्ही हो म्हणालात तरच माझ्या मम्मी , ड्याडला सांगू. " जिगिशा काकुळतीला येऊन म्हणाली .
अवनी काही न बोलता आत निघून गेली आणि दोघेही अजूनच बावरले.आशिष तिच्यामागे गेला.दोघे काही बोलणार इतक्यात अवनीने सगळ्यांना आत बोलावलं .
" अरे बघताय काय असे ? आम्हाला खूप आनंद झालाय .आधी देवाच्या पाया पडा.आजी आजोबांच्या फोटोला नमस्कार करा.जिगिशा बेटा ,हा प्रसाद ठेव देवापुढे आणि नमस्कार कर. " अवनी आनंदाने म्हणाली . सगळ्यांनी देवाचे आभार मानले .
अवनीने जिगिशाला मिठीत घेतलं तसा विहानसुद्धा तिच्या मिठीत आला .
" हे काय मम्मा ? माझ्या आधी तू तिला जवळ घेतलं ? थिस इस नॉट फेयर ना . " सगळे हसले.आशिषने सुद्धा लेकरांना मिठीत घेतले .
" आता आमच्याही पाया पडा बरं.चांगलं वाकून नमस्कार करा.आणि हो जिगिशा मी फार खाष्ट आहे.आणि विहानची आई तर एकदम कजाग आहे .तुला इथे खूप सासुरवास होणार .तेव्हा विचार कर ." आशिषच बोलणं ऐकून विहान आणि अवनी हसू लागले पण जिगिशा मात्र गोंधळली होती .
" अंकल , खाष्ट म्हणजे काय ? आणि दुसरा काय वर्ड म्हणाला तुम्ही ? आणि कसला वास आहे इकडे ? पण जे काही असेल ते तुम्ही दोघेही इतके कुल आहात की मी इकडे एकदम मस्त राहील याची गॅरंटी आहे मला . "
" घ्या आता करा सासुरवास ." अवनिने कपाळावर हात मारला आणि सगळे पुन्हा हसायला लागले .
" अग काही नाही गंमत करतायेत हे.आणि आता आंटी, अंकल नाही मम्मी , पप्पा म्हणायचं आम्हाला
पण एक सांगू तू आई म्हणालीस ना तर जास्त आवडेल मला .खरंतर विहानने मला आई म्हणाव अस मला खूप वाटायचं पण त्याच्या आज्जीला त्याने ' आई ' म्हणाव असं त्यांनी सांगितलं आणि त्यांच्या खुशिसाठी मी विहानला मम्मा म्हणायला शिकवलं .
आमच्याकडे विहानचे आज्जी - आजोबा त्याचे ' आई - बाबा होते आणि त्यामुळे आम्ही मम्मी - पप्पा ."
" हो नक्की आईचं म्हणेल मी तुम्हाला .तुमची इच्छा मी पूर्ण करणार आई ." जिगीशा म्हणाली आणि अवनीने डोळे पुसले.
आता छान काहीतरी जेवण बनवावे असा विचार करत असतानाच विहानने आईच्या आवडीची काजू पनीर आणि बाबांची आवडती मलई कोफ्ता ऑर्डर केली आणि रस मलाई आणि श्रीखंड आणायला खाली गेला.जिगिषाने किचन मध्ये जाऊन पटकन भात लावला.विहानला तिने मिक्स व्हेज आणायला सांगितलं होतं.नंतर तिने कणिक भिजवून ठेवली.अवनीने कोशिंबीर केली.विहान तितक्यात आलाच.जिगीशाने भाज्या परतल्या , मसाले घातले आणि तयार भात त्यात टाकून मस्त पुलाव बनवला . थोडे काजू फ्राय करून त्यात टाकले .
पार्सल आलंच होतं तेव्हा तिने विहानला टेबल लावायला सांगितलं आणि गरम गरम फुलके करून सगळ्यांना जेवायला वाढलं.हसत खेळत जेवणं झाली.थोड्या वेळ गप्पा मारून जिगिषा घरी परत गेली.गप्पा मारता मारता सगळ्यांनी मिळून किचन आवरलं.सगळं अगदी मस्त होतं. आनंदी आनंद होता.जिगिशाचे आई वडील नाही म्हणणं शक्य नव्हतं पण जरी ते नाही म्हणाले तरीही अवनी आणि आशिष त्यांना तयार करणार होतेच .' आता लवकरच जिगिशा घरात येईल आणि आपली मुलीची ईच्छा पुर्ण होईल .'
जिगीशा एक गोड आणि लाघवी मुलगी होती.घरी नेहेमी यायची , मोकळेपणाने वावरायाची.विशेष म्हणजे विहान आणि ती एकमेकांना अगदी अनुरूप असे होते .दोघांचं मस्त जमायचं. ' थोडं फार काही कुरबुर झालीच तर त्यात काय ? आपण घेऊ न सांभाळून.नशिबाने इतकी गोड सून घरात येणार तेव्हा आपणही तिचं स्वागत तसच थाटात करूया.तिच्यावर भरभरून प्रेम करूया.तिला हवं ते करायची परवानगी द्यायची आपण.आमचं दोघींचं एक मस्त नातं असेल .माझी सगळी स्वप्न ती पूर्ण करेल.मला जे जे करायचं होतं ते ते मी तिला करायला लावणार.माझ्या अपुऱ्या इच्छा , आकांक्षा सगळ्या आता तिच्या रूपाने पूर्ण होतील.मला जसं मन मारून जगावं लागलं तसं तिचं आजिबात होणार नाही.' अवनी विचारात हरवली होती.
विहान जिगिषाचं लग्न झालं आणि सून घरात आली.सुरुवातीचे काही दिवस हसत खेळत गेले.स्वयंपाकघर अर्थातच अवनी सांभाळत होती.रोज सगळ्यांचे आवडते पदार्थ ती आनंदाने करायची. जीगिषा सुद्धा बिनधास्त आपल्या आवडीचे पदार्थ तिच्याकडून करून लाड पुरवत होती.आरामात उठायचं आणि आयती ऑर्डर सोडून मस्त खायचं नाहीतर हॉटेलमध्ये जायचं अशी तिची मज्जा सुरू होती.
आणि कधीही लवकर न उठणारी जिगिषा एक दिवस लवकर उठून किचनमध्ये काहीतरी करतांना बघून अवनी हबकली.
"काय ग आज काहीतरी स्पेशल मिळणार वाटतं आम्हाला?तुला हवं ते कर.माझी काही मदत लागली तर सांग हं."
"नाही नाही झालंच माझं.तुम्हाला भूक लागली की खाऊन घ्या." जिगिषा तिथून निघून गेली आणि अवनीने रवा भाजायला घेतला. जिगिषाने मोमोस् बनवले होते पण सकाळी सकाळी अवनी आणि आशिष दोघांनाही ते सहन होणार नव्हते म्हणून अवनिने उपमा बनवला.दोघंही फिरायला निघून गेले.परत आले तर विहान उपमा खात होता.जिगिशा फोन वर कोणाशी तरी गप्पा मारत होती.
अवनीने आशिषला उपमा दिला आणि चहा ठेवायला आत गेली.तितक्यात जिगिशा बाहेर आली आणि दोघांना उपमा खाताना बघून चिडली.तिने बनवलेले मोमोस् तसेच होते.
"काय हे?मी इतक्या सकाळी उठून मोमोस बनवले आणि ते खायचं सोडून तुम्ही उपमा खात बसले?आई तुम्ही का केला उपमा?आणि तुम्हाला खायचा होता तर खा ना पण विहानला का दिला?"
"अग आम्हाला सहन नाही होत आता मैद्याचे पदार्थ.म्हणून मी उपमा केला आणि आम्ही फिरायला गेलो होतो आताच आलो.मला वाटलं तुमचं खाणं झालं असेल.विहान तिने इतकं प्रेमाने बनवल आहे तर तू खा ते.आम्ही पण एखादा टेस्ट करू की."अवनी म्हणाली.पण जिगिषा मात्र खूप चिडली होती काहीही ऐकून न घेता ती तणतणत निघून गेली.अवनी काही बोलायला जाणार इतक्यात विहानने तिला थांबवलं."मम्मी तू काही बोलू नको नाहीतर ती जास्तच बिथरेल.रागीट आहे ती.पण होईल शांत.मी बोलतो तिच्याशी.तू वाईट वाटून घेऊ नकोस."
दिवसभर जिगिशा काहीच बोलली नाही.तिने सगळे मोमोस् फेकून दिले.अवनी काही बोलणार होती पण विहानने नको म्हटल्यामुळे ती गप्पच होती.रात्री जिगिशाने झणझणीत पावभाजी बनवली.अवनी आशिषला तेही सहन होणारं नव्हतं.पण न खावं तर पुन्हा सूनबाई चिडेल.अवनीची पंचाईत झाली.पण तरीही उगीच प्रोब्लेम नको म्हणून दोघांनीही पावभाजी खाल्ली.रातभर खूप त्रास झाला.सकाळीही अवनीला ॲसिडिटीचा त्रास होतच होता पण तरीही ती गप्प होती.
पण आता मात्र हे रोजच होत होतं.जिगिशा जे पदार्थ करायची ते दोघांनाही जमायचं नाहीत आणि आपण काही केलं तर उगीच वाद होतील म्हणून बिचारे तसेच खायचे. विहान टूर वर गेलेला होता म्हणून अवनीला जास्तच धास्ती वाटत होती.त्याच्या अपरोक्ष उगीच काही व्हायला नको.नवीन आहे पोर तिच्या कलाने घ्यायला हवं.
जिगीशाचे मम्मी डॅडी जेवायला आले होते.तिने मस्त चमचमीत बेत केला होता."अग बेटा,हे काय केलं आहेस?आम्हाला सहन होत नाही माहिती आहे ना तुला?वय झालं आमचं असं चमचमीत,मसालेदार नाही पचत या वयात."
"मम्मा काय ग इकडे बघ आई ,पप्पा कसे खातात मी बनवलं ते?ते ही तुमच्याच वयाचे आहेत ना.त्यांना कसा होत नाही त्रास?" जिगीशा म्हणाली.
अवनी आशिष एकमेकांकडे बघत होते.त्यांचे चेहरे बघून सगळ्यांनाच काय समजायचं ते समजलं.
"अहो आई तुम्हाला खरंच त्रास होतो का अश्या खाण्यामुळे?मग मला का नाही सांगितलं इतके दिवस?तुम्ही काही म्हणाला नाहीत म्हणून मला वाटल की चालतंय म्हणून."
"अरे काय चाललंय इकडे?अवनी ताई तुम्ही स्पष्ट सांगा बरं.आमच्या पोरीने त्रास दिलेला दिसतोय तुम्हाला. रागवायचे बिनधास्त.पोरींना कळत नाही हो आजकालच्या.रोज असलं जेवण सहन होतं का तुम्हाला?" जिगीशाची आई बोलली तशी अवनिने धीर एकवटून सगळं सांगितलं.
"अहो आई त्या दिवशी माझं भांडण झालं होतं विहानशी आणि म्हणून माझा मूड खराब होता.आणि ते मोमोज इतके बेकार झाले होते ना की मलाही गेले नाही खायला म्हणून ते फेकले मी.तुम्हाला आराम द्यायचा आणि सगळं आपण करून तुम्हाला खुश ठेवायचं असं मी ठरवलं होतं आणि नंतर तुम्ही खात होतात सगळं म्हणून मला वाटलं चालतंय तुम्हाला सगळं.सॉरी ,सॉरी माझ्यामुळे त्रास झाला सगळ्यांना.पण यापुढे हे चालणार नाही हां.मला रागवायचे हक्काने.आता साधी खिचडी करते."
"अरे देवा!या सासू सुनांचा एकमेकींना समजून घेण्याचा आणि खुश ठेवण्याचा आट्टहास चांगलाच महागात पडला म्हणायचा.आता तरी आमच्यावर दया करा आणि जरा समजुतीने वागा म्हणजे मिळवलं."
आशिषराव म्हणाले आणि एकच हशा पिकला.सासू सुनेची जोडी आता आनंदाने आणि एकमेकींना समजून राहायला शिकली.सासू जेव्हा आई होते तेव्हा सगळंच सुखकर होतं.
©®स्मिता भोस्कर चिद्रवार.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा