अनुभव हा सर्वात चांगला शिक्षक आहे.फक्त त्याची शिकवणी कठोर असते. सुविचार वाचताना छान वाटतो.प्रत्यक्ष जीवनात मात्र अनुभवाचे कडू औषध प्यायचे कठीण जाते.तरीही असे अनुभवच जीवनाला नवीन वळण लावत असतात.असाच एक खराखुरा प्रसंग कथेत गुंफून सादर करत आहे.
कॉलेज सुटले आणि गणेश घरी जायला निघाला.घरी आल्यावर कपडे काढेपर्यंत आईने आवाज दिला,"गणा,जिवून घे.ते कापड धुवायची अस्त्याल तर दे."
गणेश रागावला,"आई,काय सारखी माग लागती.देतो की थोड्या वेळानं."
तर आपला नायक वाणिज्य शाखेतून पोतेभर गुण घेऊनही सी. ए.व्हायचे स्वप्न परिस्थितीमुळे सोडून अध्यापक महाविद्यालयात शिकत होता.त्यामुळे गणेशचे मन तिथे रमत नसे.त्यात घरी आईची भुनभून.त्यामुळे तो वैतागत असे.
तेवढ्यात आईने परत आवाज दिला,"गणा,आरे जिवुन घे."
तसे वैतागून गणेशने उत्तर दिले,"नाय जेवायचं मला,तू जा बर."
आई बिचारी गुपचूप धुवायला टाकायचे कपडे घेऊन गेली.
असे अनेक प्रसंग घडत असत.गणेश सगळा राग आईवर काढायचा.एकदा दुपारी गणेश घरी आला.आई कुठेच दिसेना.तसा गणेश कासावीस झाला इतक्यात आई येताना दिसली.
त्याने पुढे होऊन विचारले,"कुठ गेली होतीस आई?"
आई हसली,"आरे,जरा पाणी भरायला गेलते.रोज जाते की पाणी भरायला."
गणेश म्हणाला,", भूक लागली,जेवायला दे."
आई पटकन हांडे ठेवून आत गेली.जेवायला वाढले. भाजी बघून तो परत चिडला,"मला नको ही भाजी."
आईने परत नवी भाजी बनवली.
एक दिवस गणेशच्या फोनवर मावशीचा फोन आला,"काळूबाई देवीला जायचं आहे.आईला पाठव."
घरी आल्यावर गणेश म्हणाला,"आई,मावशीनं बोलावल आहे."
आई विचारात पडली,"मी गेल्यावर इथ खायला प्यायला कोण करायचं रे?"
गणेश हसला,"तुला जायचं आहे ना?"
आई म्हणाली,"आता मावशी एवढं बोलावती,आई काळूबाईच्या नवसाचा हायेस तू."
तो दिवस होता चोवीस जानेवारी दोन हजार चार.काळूबाई देवीची यात्रा म्हणजे पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या यात्रांपैकी एक.पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर मांढरदेव गावातील हे देवस्थान.
तर आई यात्रेला निघाली.पौष महिना होता.गणेश म्हणाला,"मावशीकड पोचली की फोन कर."
आई गेल्यावर गणेश नेहमीप्रमाणे कामे आटोपून आला.संध्याकाळी मावशीकडे पोहोचल्याचा आईचा फोन आला.
दुसऱ्या दिवशी गणेश नेहमीप्रमाणे उठून कॉलेजला गेला.दुपारी येताना चर्चा ऐकू आली,"तिकड काळूबाई डोंगरावर अपघात झाला."
गणेशला वाटले एखादी एस. टी.किंवा गाडीचा अपघात असेल.गावात पोहोचला.दबक्या आवाजात चर्चा चालू होती.पंचक्रोशीत अनेक भाविक यात्रेला गेले होते.
आता मात्र गणेश घाबरला.घरी आला.सगळीकडे डोंगरावर चेंगराचेंगरी झाली.बरीच माणसे गेली.अशी चर्चा चालू होती.आईचा चेहरा डोळ्यासमोर येताच गणेश कासावीस झाला.
एवढ्यात मित्राने आवाज दिला,"गणेश,चल जरा फिरून येवू."
तसा गणेश म्हणाला,"नको,मला घरी जायचं आहे."
मावस भावाच्या फोनवर सतत फोन करत होता.अजिबात संपर्क होत नव्हता.
सकाळी पहाटे लवकर उठून जेवायला करणारी,नेहमीच आपल्या अवतीभवती असणारी आपली आई कशी असेल?तिला काही झाले तर नसेल?
आता गणेश खूप घाबरला होता.तेवढ्यात गावातील एक माणूस येताना दिसला.
त्याला आवाज देवून गणेश म्हणाला,"तात्या,डोंगरावर लई लोक मेली काय हो?"
तसे तो म्हणाला,"आर,किती मेली काय माहित, पर घटना लई मोठी हाय गड्या.घरातलं कुणी गेलं हाय का यात्रेला?"
गणेश उत्तर न देता चालू लागला.आवंढा घशात अडकला होता.
घरी लहान भाऊ,बहीण आणि वडिलांना काहीच न दाखवता जेवण चालू होते.एवढ्यात काहीही संपर्क होत नव्हता.फोन बंद येत होते दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिन लवकर उठून जायचे होते. मन प्रचंड अस्वस्थ होते.
आख्खी रात्र झोप लागली नाही.दुसऱ्या दिवशी सकाळी एका अनोळखी नंबर वरून फोन आला,"हॅलो,तुमच्या मावस भावाने निरोप दिला.त्यांचा शेजारी बोलतोय.सगळे सुखरुप आहेत."
डोळ्यांना धारा लागल्या.आई सुरक्षित आहे.कधी एकदा आईला पाहतो असे आता झाले होते.दुसऱ्या दिवशी आई आली.तिच्या हातातून पिशवी घेतली आणि चालायला लागलो.
आई म्हणाली,"नशिबाने वाचले,माझ्या समोरची माणसं गेली. काकानी मला वडून बाहेर काढलं."
आई बोलत असलेले काही कानापर्यंत जात नव्हते.समोर सुखरुप असलेली आई पाहून मन भरून येत होते.आई बरोबर गणेश शांतपणे.चालत होता.
वरील प्रसंग माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.अनाथ होणे,पोरके होणे म्हणजे काय?त्या एका दिवसाने शिकवले.आईला आपण नेहमी ती असेलच असे गृहीत धरतो.पण आई नाही?अशी कल्पना केली तरी संपूर्ण जग सूने भासते.
आजही हा प्रसंग आठवला की आई म्हणत असते,"देवीची कृपा म्हणून वाचले.माझ्या पोराचं काय झालं असत?"आपण नसतो तर पोरांचे काय होईल?हाच विचार करणारी आई.
म्हणूनच फ.मु.म्हणतात तसे
आई असते एक शिदोरी
सरतही नाही अन् उरतही नाही.......
आई असते एक शिदोरी
सरतही नाही अन् उरतही नाही.......
ही शिदोरी कायम सोबत रहावी.इतकंच.