Login

आई असतेच

marathi blog

आई गेल्यावरही असतेच जिवंत 
घरातल्या वस्तूंमधे, आठवणींमधे
आणि असते तिच्या लेकीमधे
दिसते तिच्या रुपात, लकबींमधे

डोकावते अचानक बोलण्यात 
हसण्यात, न बोलण्यातून सुद्धा 
तिच्या आवडीनिवडीत डोकावतेच आई
आई रेंगाळतेच लेकीत आजन्म 

आई झळकते मुलीच्या संसारात
पसा-यात, धांदरटपणात
पदार्थाच्या चवीत, मांडणीत
व्यापून उरतेच आई दशांगूळे

आई असतेच कायम
हवेपणात नकोपणात
लेकीचे आईपण घडतांना
कळत जाते आई नव्याने

दिसत जाते आई हळूहळू 
स्वतः वर खूश होतांना, वैतागतांना,
प्रत्येक टप्पा पार करतांना करते सोबत
आई असतेच कायम हरवलेपणात

पदोपदी दिसते चालीत, 
संसारा च्या पण
आई रुजत जाते लेकीत
परत परत उगवण्यासाठी