आई आणि सासूबाई

वागणे आईचे आणि सासूबाईंचे..


आई आणि सासूबाई..

" आई, मी आज या वड्या करून आणल्या आहेत तुला आवडतात म्हणून.. "
" कशा झाल्यात बघना?"
" छान झाल्या आहेत.."
" न खाताच कळल्या?"
" हो. कारण त्यात प्रेम भरले आहे ना."
थोड्यावेळाने घरातल्या सर्वांना त्या वड्या प्रसादासारख्या वाटल्या जातात. आणि घरातले सर्वजण कौतुक करत खातात..

" कशाचा वास येतो आहे?"
" वड्या करते आहे.."
" जरा चांगल्या कर.. मागच्या वेळेस तिखट, चिंचगूळ काहीच नव्हते.."

फोनवर..
" आमच्याकडे ना एक गोष्ट माझ्या आवडीची झाली ना तर शपथ.. आणि काही केले तरी ते बिघडलेलेच असते.. काही म्हणजे काहीच चांगले खायला मिळत नाही.."

थोड्या वेळाने बघितले तर सगळ्या वड्या संपलेल्या असतात..

" आई, हि एवढी जुनी साडी का नेसलीस?"
" कारण ती ना माझ्या लेकीने तिच्या पहिल्या पगारातून घेतली आहे.."
" तरिही.. खूप जुनी झाली आहे ती. देऊन टाक.."
" असू दे. तेवढीच आठवण राहते. "

" हि काय साडी आहे? काय तो रंग? काय तो पोत?"
" आई ,तुम्हाला सिल्कची साडी हवी होती म्हणून आणली.. काल आपल्या नेहमीच्या दुकानातून फोन आला होता. नवीन स्टॉक आला आहे म्हणून."
" अग पण मला विचारायचे ना? माझी काही पसंत आहे कि नाही?"
" चुकले माझे.. मला वाटले हा तुमचा आवडता रंग आहे.. करते मी हि साडी परत.."
"तो काय साड्या परत घेतो? ठेव.. माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आला आहे.. तेव्हा तिला देईन.."

" हे काय ग?"
" कानातले.. मला ना बोनस मिळाला म्हणून एक जोड तुला, एक जोड सासूबाईंना.."
" मला कशाला?"
" आता घेतला आहे तर वापर ना.."

" हे कानातले ना लेकीने आणि जावयाने केले हो हौशीने.."

" हे कानातले ना आमच्या मंथनने घेतले माझ्यासाठी.."
" आई, अग ते नयनाने केले आहेत.."
" पण तू आणि ती काय वेगळे आहात का? मी तर तूच केले असे सांगणार."

"अशी अचानक बरी आलीस तू?"

" तुला बरे नाही म्हणून औषध घेऊन आले आहे."

" ऑफिसमधून थेट आलीस ना? बस चहा ठेवते.."

"नको.. तुला बरे नाहीये. मी घरी जाऊन घेते."

" तू एवढे औषध घेऊन येऊ शकतेस.. मी चहा नाही का करू शकत?"


" किती हा उशीर? किती वाजले?"

"आज ऑफिसमध्ये थोडे जास्त काम होते.."

"सांगायचे ऑफिसमध्ये.. घरी म्हातारी माणसे आहेत.. त्यांना भूक लागते.. सांगायचे तिथे.."

"पुढच्या वेळेस स्वयंपाक करून जाईन.."


"हॅपी बर्थडे आई.."
" अरे हे काय? आधी सांगायचे ना तुम्ही येणार आहात ते.."
" मग त्याला सरप्राईज कसे म्हणणार सासूबाई?"
" थॅंक यू सो मच मंथन.. तू तर आमचा जावई नाहीस.. दुसरा मुलगाच आहेस."
" सगळे कौतुक त्याचेच.. माझे काय?"
" अग तू आहेस, म्हणूनच तो आहे ना."



" अरे काय हे? तुम्ही सगळे इथे?"
" सरप्राईज...."
" मला नव्हते माहित.."
" अग नयनाने आम्हाला बोलावले होते. तुझ्यासाठी सरप्राईज पार्टी आहे म्हणून ."
" हो. का? आणि जेवणाचे काय?"
" आई , जेवणाची ऑर्डर दिली आहे."
" काय फायदा? वाढदिवस माझा, पण ठरवणार सगळे तू? मला अजिबात हे आवडले नाहीये.."
" माझी चूक झाली.. परत असे नाही होणार.."


काही वर्षांनी..
" आमच्या सुनेला ना आमचे काही करायचेच नसते.. फक्त माहेरचा भरणा करायचा असतो.."


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई