आई , तुझे फ्रेंड्स कुठे असतात ?

.
तो दिवस खूप धावपळीत गेला. हर्षदच्या कॉलेजचे सर्व मित्र घरी आले होते. त्यांना सर्वाना प्रभाच्या हातची पावभाजी प्रचंड आवडायची. प्रभा विलक्षण सुगरण स्त्री होती. आपल्या हाताला असलेल्या चवीमुळे तिने सासरी सर्वांचे मन जिंकले होते. हर्षदला तिचा खूप अभिमान होता. ऑफीसच्या टिफिनमध्येही प्रभा थोडी जास्तच भाजी आणि सोबत चपात्या द्यायची. हर्षदच्या ऑफिसचे मित्र हक्काने हर्षदच्या टिफिनवर तुटून पडायचे. हर्षद एक नामांकित वकील होता. सहा फूट उंचीचा आणि जिमची प्रचंड आवड होती. आपल्या पिळदार शरीरयष्टीमुळे तो खूपच आकर्षित व्यक्तिमत्वाचा धनी बनला होता. याउलट प्रभा लहान शहरातील मुलगी होती. दोघांचेही अरेंज मॅरेज झाले. प्रभाने आपल्या स्वभावाने हर्षदचे मन जिंकले. दोघांना एक गोंडस मुलगी झाली. असो. त्या दिवशी गप्पांना भलतेच उधाण आले. कॉलेजच्या आठवणीत सर्वजण रमले. प्रभाच्या हातची चविष्ट पावभाजी खाऊन सर्वजण तृप्त मनाने घरी निघून गेले. रात्री प्रभा दमली असल्यामुळे लगेचच झोपी गेली. सकाळी परत लहानग्या पुहूला शाळेला जाण्यासाठी तयार करायचे होते. दुसऱ्या दिवशी परत हर्षद ऑफीसला जाण्यासाठी आणि पुहू शाळेला जाण्यासाठी तयार झाले. प्रभाने त्यांच्यासाठी नाश्ता बनवला. घरभर गरम पोह्याचा वास सुटला.

" वाह , चविष्ट झालेत पोहे. " हर्षद म्हणाला.

" बाबा , तुझे किती फ्रेंड्स आहेत रे. स्कुल कॉलेज ऑफिस. " पुहू म्हणाली.

" हो प्रिन्सेस. तुझा बाबा लहानपणीपासूनच एक्सट्रोव्हर्ट आहे. " हर्षद म्हणाला.

" आई , तुझे फ्रेंड्स कुठे असतात ?" पुहूने विचारले.

" माझ्याही खूप जिवाभावाच्या मैत्रिणी होत्या बरं. पण लग्नानंतर त्या टचमध्ये राहिल्या नाहीत. " प्रभा म्हणाली.

काही वेळानंतर पुहू आणि हर्षद दोघेही निघून गेले. दिवसभर हर्षदच्या मनात हाच विषय घोळत होता. रात्री त्याने प्रेमाने प्रभाला जवळ घेतले. प्रभा लाजली.

" तुला आठवण येत नाही का तुझ्या मैत्रिणींची ?" हर्षदने विचारले.

" येते हो पण इतकी नाही. लग्नानंतर आयुष्य बदलून जाते बायकांचे. मग कसली मैत्री आणि कसले काय. माझे बाबा खूप कडक होते. मोठा भाऊ कॉलेजपर्यंत सोडेल आणि तोच घरी घेऊन येईल. माझ्याकडे फोनच नव्हता म्हणून त्यामुळे फोन नंबर वगैरे दूरच राहिले. नवरा-मुलेबाळ यांच्या जबाबदारीमुळे बायकांची मैत्री हरवून जाते. " प्रभा म्हणाली.

थोड्यावेळाने दोघेही झोपले.

***

@ काही दिवसांनी

त्या दिवशी " फ्रेंडशिप डे " होता. पुहूने हट्ट करून प्रभाला गार्डनमध्ये नेले. थोड्यावेळाने दोघेही परत आले तेव्हा प्रभाला धक्का बसला. प्रभाच्या सर्व जुन्या मैत्रिणी घरी जमल्या होत्या. जिवाभावाच्या मैत्रिणींना बघून तिचे डोळे पाणावले.

" तुम्ही सर्व इथे कसकाय ?" प्रभाने विचारले.

" जीजूने सर्वकाही प्लॅन केलं. आमच्या पतींकडूनही परवानगी मिळवली. " एकजण म्हणाली.

" आता तुम्ही सर्वजण बसा. मी तुम्हाला सर्व्ह करतो." हर्षद म्हणाला.

प्रभा मैत्रिणींसोबत सोफ्यावर बसली. हर्षदने वेगवेगळे पदार्थ बनवले होते. ते त्याने स्वतःच सर्व्ह केले. प्रभाला उठूही दिले नाही.

" आता तरी सांगा तुम्ही कसे केले हे ?" प्रभाने वैतागून विचारले.

" तुम्ही बायका आमच्यासाठी राबराबता. आम्ही पुरुष वाटेत कुणी मित्र भेटला तर वेळेचे भान ठेवत नाही. मस्तपैकी पार्टी करतो. पण तुमचे तसे नसते. तुम्हाला घर सांभाळायचे असते. म्हणून मी तुझ्या मोठ्या भावाशी संपर्क केला. फेसबुकवर तुझ्या मैत्रिणींना शोधले. त्यांच्या पतींशी बोलून त्यांना समजावले आणि फ्रेंडशिप डेला तुला सप्राईज द्यायचे ठरले. तुम्ही आमच्या मित्रांसाठी इतकं करू शकतात मग आम्ही तुमच्या मैत्रीसाठी इतकेही नाही करू शकत का ?" हर्षद म्हणाला.

सर्व मैत्रिणी त्यादिवशी प्रभाच्या घरीच थांबल्या. हर्षदने ऑफिसमधून दोन दिवस सुट्टी घेऊन सर्वांचे आदरातिथ्य केले. दुसऱ्या दिवशी सर्वजण फिरायला गेल्या. मैत्रिणींना भेटून प्रभाच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. पहिल्यांदा ती स्वतःचे आयुष्य मनसोक्तपणे जगत होती. याला कारणीभूत तिचा पती हर्षद होता. हर्षदचा तिला अभिमान वाटू लागला.

©®पार्थ धवन