आई, मुले आणि त्यांची भाषा.. भाग २

कथा मायलेकांची


आई, मुले आणि त्यांची भाषा.. भाग २


मागील भागात आपण पाहिले की मुलांच्या अशुद्ध भाषा ऐकून स्मिता त्यांना बडबड करते. आता पुढे बघू काय होते ते.


" अरे देवा.. आज गजरही झाला नाही. श्शी बाई.. आता बाकीचे आवरायला उशीर होणार. मुलांना बिचाऱ्यांना चहा कॉफी पण मिळाली नसेल.. कसा मेला डोळा लागला काय माहित?" स्वतःला दोष देत स्मिताताई उठल्या.

" मासाहेब.. अजिबात चिंता करू नका. आम्ही दोघांनीही रामप्रहरी उठून तुमच्यासाठीही कषायपेयाची सोय केली आहे."

" कसले पेय????" स्मिताताई जोरात ओरडल्या.

" अग कषायपेय.. चहा.. अरे मग चहा म्हणा ना सरळ. आणि हे काय घातले आहे दोघांनी?" स्मिताताईंचे आता त्यांच्या कपड्यांकडे लक्ष गेले.

" मासाहेब, आम्हा दोघांना आमच्या जुन्या कपाटात ही वस्त्रावरणे सापडली. मग आम्ही दोघांनी ती परिधान करण्याचा विचार केला."

" तुम्ही काय बोलताय? एक अक्षरही मला समजत नाहीये. त्यात तो गजर का झाला नाही काय माहीत?" आधीच गजर न झाल्याने वैतागलेल्या स्मिताताई या सगळ्याने अजूनच वैतागल्या.

" गजर झाला नाही कारण आम्ही तो बंद करून ठेवला. तुमची निद्रा परिपूर्ण व्हावी म्हणून. आता तुम्ही तुमचे हस्त मस्तकावर मारून घेण्याऐवजी हे पेय पिऊन घ्या. म्हणजे थोडा आराम मिळेल." पडत्या फळाची आज्ञा मानून स्मिताताईंनी चहाचा कप तोंडाला लावला.

" सुंदर झाला आहे. कुठे शिकलात?"

" मासाहेब तुम्ही विसरलात. आम्ही गुरुकुलमध्ये राहतो. तिथे आम्हाला स्वतःची कार्ये स्वतः करावी लागतात. " साहिल म्हणाला.

" आणि मासाहेब तुम्ही मुखप्रक्षाळण करायचे विसरला आहात. करून बाहेर या. बाबामहाराज तुमची प्रतिक्षा करत आहेत." सलिल म्हणाला.

दोघे बाहेर पडले.

" या दोघा जुळ्यांनी लहानपणी जेवढा त्रास दिला नाही तेवढा आता देत आहेत." स्वतःशीच पुटपुटत स्मिताताई बाथरूममध्ये गेल्या. बाहेर दोघांनी इडली चटणी आणि सांबार तयार ठेवले होते. तोंड धुवून आलेल्या स्मिताताई बघून खुश झाल्या..

" अरे व्वा.. तुम्ही केलेत हे?"

" नाही मासाहेब. आम्ही दोघे रामप्रहरी तर उठलो. सुस्नात झाल्यावर काय करायचे असा विचार आमच्या मनात डोकावला. मग आम्ही सकाळचा फेरफटका मारायला म्हणून बाहेर गेलो तर तिथे एकजण हे विकत होता. आम्ही त्याची वास्तपुस्त केली. त्याची करूण कथा ऐकून आमच्या नेत्रात आसवं गोळा झाली." साहिल सांगत होता.

" हो ना.. ते नयनात दाटून आलेले पाणी आम्ही पाठी ढकलले आणि आपणा सर्वांसाठी हे घेऊन आलो. तेवढीच त्याला मदत. बरोबर केले ना आम्ही बाबामहाराज?" सलिलने पेपर वाचत असलेल्या बाबांना विचारले.

" ए, ते तुमच्यामध्ये मला घेऊ नका हं. आणि बाबामहाराज काय? मला संत झाल्यासारखे वाटते."


" बरं आबासाहेब.." मुलं ऐकायला तयारच नव्हते. या सगळ्या गोंधळाला स्मिताताई मात्र वैतागल्या होत्या.

काढू शकतील का त्या या सगळ्यातून मार्ग? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all