आशीर्वाद, हाच खरा आहेर

Generally cash gifts and presents are given at weddings or birthday parties to people. Sometimes this trend is just to show off , this can be financially stressful and draining activity for someone! giving best wishes and blessings can be the best g

सरीता आणि रमेशचे लग्नं धूमधडाक्यात दत्ता भाऊंनी म्हणजे सरिताच्या वडिलांनी लाऊन दिले. दोन्ही घरून पसंती होतीच,पत्रिका ही जुळल्या आणि चांगला मुहूर्त पाहून लग्नं लावले.सरीताच्या सासरच्यांनी हुंडा घेतला नाही (आता प्रथा नाही म्हणे) परंतु "आमच्या सगळ्या जवळच्या नातेवाईक, पाहुण्याचे स्वागत आणि मान-पान तुम्ही करालाच, ह्याची आम्हाला खात्री आहे" हे शांताबाईंचे, म्हणजे रमेशच्या आईचे वाक्य मात्र सारिताच्या वडिलांना खुणवत होते, की रमेशचे सख्खे काका, मामा, मावशी आत्या ह्यांना साड्या/ शर्ट देऊन त्यांचे मान-पान करणे त्यांच्या कडून अपेक्षित आहे.


सरिताच्या सासरकडच्या सगळ्या मंडळीचे स्वागत पद्धतशीर केले गेले. पुरुष मंडळींना पोशाख आणि बायकांना जरीच्या साड्या देऊन त्यांचा मान-पान केला. दत्ता भाऊंनी आपल्या लाडक्या लेकीचे लग्न थाटामाटात लाऊन दिले. लग्नाचा खर्च आणि त्यात सासरचे मान-पान ह्याचा खर्च जास्तच झाल्याने सरीताला खटकत होतं. परंतु दत्ता भाऊंनी तिला समजावले. " अगं पोरी, हे पहिलंच लग्नं आहे दोन्ही घरचं, असुदे, अतिथी देवो भव! मला थोड पुण्य मिळेल. तु नको खर्चाची काळजी करु."

सरिताचा, संसार सुरू झाला,आपल्या लेकीला सुखात पाहून तिचे आई वडील खूप खुश आणि समाधानी होते. सरिता देखील सासरी, दुधात साखर घोळावी अशी रुळली. तीन महिन्यांनी रमेश सरिताने गोड बातमी दिली. दोघेही खूप खुश होते. रमेश, सरीताचे सगळे हट्ट आणि लाड पुरवत होता. सासूबाईं देखील सरिताचे डोहाळे पुरवत होत्या, तिला हवं नको ते आवर्जून विचारत.

सरिता: आई तुम्ही कित्ती माझी काळजी घेता,मी खरंच खूप भाग्यवान आहे.

सासुबाई: माझ्या येणाऱ्या नातवासाठी, मला एवढं केलंच पाहिजे. तू फक्त सांग तुला काय खावस वाटत, काय करू तुझ्या साठी?

सरिता: आई, मला आणि रमेशला पहिली मुलगी व्हावी अशी इच्छा आहे. खरं तर मुलगा किंवा मुलगी काही असो, सुदृढ निरोगी असावे, हीच देवाकडे प्रार्थना.

सासुबाई: पहिला मुलगाच होणार, मला खात्री आहे! आपल्या घरात सगळ्यांचे तेच अनुभव आहेत मला,माझ्या थोरल्या जाऊ बाईंना, वंसंना, सगळ्यांना पहिले मुलगे आहेत बघ.

सरिता सासूबाईंन कडे पहात राहिली, काय बोलावे सुचेना....

सासुबाई: आणि सरिता, आई बाबांशी बोलणं झालं का तुझ? तुझे डोहाळजेवण करायचे आहे ना, तयारी करायला हवी त्यांनी. पहिलं डोहाळे जेवण आणि बाळंतपण माहेरी करतात, ठाऊक आहे ना त्यांना? आणि हो मान पानाच सगळं ठाऊक आहेच की तुझ्या आई वडिलांना, ते करतीलच सगळं पद्धतशीर! नाही का ?"

सरिता: अ.... हो, मी बोलीन आज उद्या आईशी तेव्हा सांगते.

सरीताचा कंठ दाटून आला, लग्नाला जेमतेम सहा महिने होतायेत आणि त्या खर्चातून वडील बाहेर पडले देखील नाहीत आणि आता हा बाळंतपणाच्या खर्चाचा डोंगर तिला दिसू लागला. ती जरा शांतच झाली. सासूबाईंच्या बोलण्याने तिच्या मनात विचारांचा कल्लोळ माजला! आई बाबांशी काय आणि कसे बोलावे सुचेना!

सरिताच्या जिवाची घालमेल सुरू होती,रमेशच्या नजरेने तिची ही अस्वस्थता सुटली नाही.

" काय ग सरू, काय झाल? कसला विचार करतेस ? काही हवय का तुला? आईची आठवण येते का? माहेरी जाऊन भेटायचे असेल आई बाबांना तर सांग, आपण रविवारी भेटून येऊ त्यांना."

" हो हो, जावे लागेलच, त्यांना डोहाळ जेवणाच सांगायचे आहे आणि सासुबाई म्हणाल्या, पहिलं बाळंतपण माहेरी करतात, सांग आई बाबांना"

" असेलही पूर्वी तशी पद्धत, माहेरच्यांनी करायचे सगळे खर्च पण मी तस नाही करणार. मला तुझे सगळे लाड कौतुक, डोहाळ जेवण करायचे आहे . आपल्या बाळाचा जन्म, आणि त्याचा सगळा खर्च कर ही माझी जबादारी आहे, हा सगळा खर्च आपण करू, मी करेन सगळ, तू नको काळजी करुस "

" खरं? खरच सगळं आपण करूया ना? खरं सांगू, रमेश मला सुध्दा असच वाटत होत, आपलं बाळ येणारे, आपण घेऊया सगळी जबाबदारी. बाबांना पुन्हा मोठ्या खर्चात टाकायचं म्हणजे मला खूप टेन्शन आलं आहे. दुपारीच सासुबाई म्हटल्या डोहाळजेवण बाळंतपण माहेरी करायचे.आणि  नुकतंच आपलं लग्नं झालं, आणि बाबांना पुन्हा लगेच एवढा खर्च करायला सांगायचं म्हणजे ...."

"आणि मुख्य म्हणजे ते प्रत्येक कार्यक्रमात नातेवाईकांचा " मान - पान" करणं  ते काही मला पटत नाही. म्हणजे, आपलेच सगळे सख्खे नातेवाईक आहेत ते, पण तरी नुकतंच आपल्या लग्नात सगळ्यांना आहेर देऊन केलेच की मान, आता लगेच डोहाळे जेवणात पुन्हा सगळ्यांना साड्या आणि शर्ट.ते  झाल्यावर लेगच काय तर बाळाचं असेल! कशाला हवेत सारखे हे मान पान? बाळ येणारे, जबाबदारी वाढली पुढे खर्च वाढतील, सारखे पैसे असे खर्च म्हणजे केवढी ओढा ताण होते.

सरिता मनातलं सगळं बोलून गेली. तिच्या बोलण्यात तथ्य आहे, हे रमेशला पटत होत. नुकताच राजा राणीचा नवीन सुरू झालेला संसार आणि येणाऱ्या बाळाची, त्यांचा संगोपनाची नवी जबाबदारी. नवीन जीव जन्माला येतो, तेव्हा नवीन आई बाबा होताना त्यांची मानसिक, शारिरिक आणि आर्थिक तयारी खूप महत्वाची असते. रमेशला ह्या सगळ्याची जाणीव होती.

" अच्छा, तर ही चिंता सतावत होती का माझ्या होणाऱ्या बाळाच्या आईला? कशाला तू ह्या सगळ्याचा विचार करतेस, मी आहे, नको काळजी करू."

रमेशच्या बोलण्याने सरिता ला खूप धीर मिळाला. नकळत तिचे अश्रू ओघळले आणि ती रमेशच्या मिठीत विसावली....

सातव्या महिन्यात डोहाळ जेवणाचा कार्यक्रम छान पार पडला आणि सरिता बाळंतपणासाठी माहेरी गेली. सरिताच्या सासुबाई खुश होत्या, सरिताच्या माहेरून भेट वस्तू, साड्या, घरच्या मोठ्या थोरांचे मान पान करण्यात आले. शांताबाईंनचे आपल्या नातेवाईकांना खुश ठेवण्यात आर्ध आयुष्य गेलं. कार्यक्रम कसलाही असो, जाऊबाई, नणंद बाई, जावई , सगळ्यांचे मान पान आणि आहेर त्या नियमित करत.

पण, ह्या वेळेस मात्र, गोष्ट वेगळी होती. रमेशने दत्ता भाऊंना, म्हणजे सासरेबुआ ना विश्वासात घेऊन समजाऊन सांगितले की, हा डोहाळे जेवण आणि मान पान हा सगळा खर्च तो स्वतः करेल. सरिता, येणाऱ्या बाळासाठी आणि त्याच्या आईला खुश ठेवण्यासाठी तो हे सगळ करत आहे. त्यांना सुरवातीला रमेशचे बोलणे पटत नव्हते, पण रमेशने विनवणी करून आपली ही इच्छा पूर्ण करण्यास दत्ता भाऊंकडे विनवणी केली.

सरिता माहेरी आपले डोहाळे पुरवून घेत होती,आईच्या हातचे पदार्थ खाऊन तिचे मन तृप्त होई. दरम्यान, रमेशने विडा उचलला, की तो आपल्या आईशी बोलेल आणि तिच्या डोक्यातून हे मना पानाचे खुळ काढेल.त्या दिवशी त्याने आई कडे विषय काढला ....

रमेश : "आई, आपण प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या आपल्या नातेवाईक मंडळींचे स्वागत प्रेमाने, हसतमुखाने करून, गोड घोड खायला घालून करतो.ते ही येतात, शुभेच्छा आशीर्वाद देतात, पण बऱ्याच वेळा त्या आहेर देण्या घेण्यात विनाकारण खर्च वाढतो आणि पैशांची आणि खर्चाची ओढाताण होते. लग्नं, बरस किंवा मुंज अशे मोठे कार्येक्रम पाठोपाठ चालू असले तर मात्र खूपच खर्च असतो."

आई: " अरे रमेश, तुला कुठे सगळं करायचे आहे, आहेत तुझे सासरे करतील ते सगळ, त्यांची जिम्मेदारी आहे आता, बाळंतपण आणि बरस करून द्यायची"

रमेश : आनंद कुणाचा, जिम्मेदारी कोणाची? खर्चात कोणाला पडतोय आपण?? मला हे नाही पटत आई. अगं, आपण आनंद सोहळा करतो, त्यात आपल्या नातेवाईक, मित्र परिवार सगळ्यांना सहभागी करून घेताना खूप छान वाटतं, मुख्य कारण असतं आपल्या आनंदात त्यांना सहभागी करून साजरा कारण. जमेल झेपेल तसं करावं. पण आपल्यामुळे समोरच्याला खर्चात पडून कसला आलाय आनंद साजरा करण??

रमेशच्या बोलण्याचा कल, सारीताच्या माहेरच्यांन कडे आहे हे आईला लक्षात आले

आई: का रे, सरीताचे माहेरचे करणार नाहीत वाटतं बाळंतपण? आणि नंतर बारस त्याचं काय?

रमेश: मी बाबा होणारे, बाळं माझं आहे, त्या अनुसंघाने माझी इच्छा आहे, की ही सगळी खर्चाची जबाबदारी मी घेणार आणि बाळ आलं की बारस करूच की आपण.

नातेवाईकांनी याव,आशीर्वाद शुभेच्छा द्याव्या .त्यांनी आणि आपण थोड समजून घ्यावे की वर्षभरात लग्नं अन् बाळ ह्या दोन्ही मोठ्या घटना घडत आहेत, त्यात आपले मान पान करणे आहेर देणे व घेणे महत्वाचे ??लग्नं झालेल्या जोडप्याला आणि नवीन आई बाबा होणाऱ्या जोडप्याला आशीर्वाद देऊन कौतुक करून सुद्धा सोहळा साजरा होईल. की त्या जरीच्या साड्या,  शर्ट पिस् दिले म्हणजे छान संपन्न होतो का कार्यक्रम??

आई: अरे काय बोलतोय तू? नाव ठेवतील मला लोकं! काय तुझ मला कळत नाही बघ, नातेवाईकांचा मान पान करावा लागतो बाबा!

रमेश: ह्या अश्या मान पानात तुला आलेल्या कित्येक साड्या आहेर आवडले नाही असं नावं ठेऊन, देऊनच टाकल्यास तू, आवडल्या नाही, हलक्या आहेत, रंगच चांगला नाही. एकूण काय दिलं काय नाही काय लोक नावं ठेवणारच.नाही दिले,तर किमान पैसे वाचतील आणि ते पैसे योग्य त्या कारणासाठी वापरले जातील किंवा बाजूला काढून बचत म्हणून आपल्या आणि मुलांच्या भविष्यासाठी ठेवता येतील .

"आई, आम्ही लहान असताना, तू आणि पप्पा,नेहेमीच अश्या अनेक कार्यक्रमात मान पान करत, आणि मग काय ,आपल्या घरासाठी महिन्याच्या खर्चाला पैसे कमी पडले की करा तडजोड आणि पैशांची चणचण कायम भासत होती.आठवत असेल तुला?"

"मला हे सगळं माझ्या बाळाच्या बाबतीत नाही करायचे. आमच्या लग्नात देखील हुंडा घेतला नाहीस, पण पर्यायाने मान पान करायला लावलेच की तू सरीताच्या वडिलांना. नाहक खर्चात टाकल त्यांना, काय मिळालं हे करून?"

"जसं हुंडा पद्धत बंद झाली,तशीच मला ही मान पान परंपरा बदलायची आहे. पाहुण्यांनी देखील यावे, आशीर्वाद द्यावा, गोड घोड खाऊन आपल्या घरी जावे. त्यांना सुद्धा भेट वस्तू, आहेर देण्याचा भार नको आणि आपल्याला पण मान पान करायला नको! दोन्ही कडून सुटसुटीत पद्धत! प्रेम आशीर्वाद शुभेच्छा द्याव्या घ्याव्या."

"आत्ता मी हा बदल केला तर कुठे मी चार पैसे जोडून वाचवून माझ्या बाळाचे संगोपन, शिक्षण, लग्नं चांगल्या पद्धतीने करून देऊ शकतो"

"आई, तुझ्या येणाऱ्या नातवंडा साठी, पुढील नवीन पिढीसाठी हा एक सकारात्मक बदल करायला हवा, सगळ्यांचे आयुष सुखीच होईल,खात्री आहे मला."

शांताबाई, रमेशचे बोलणे ऐकून थक्क झाल्या. विचार करू लागल्या. त्यांच्या मनाला रमेशचे बोलणे टोचत होते. त्या रमेशशी काहीही न बोलता आत खोलीत निघून गेल्या!

दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी सारिताच्या माहेरी फोन लावला. सरिताची आणि घरच्यांची विचारपूस केली.

शांताबाई: " सरिता, कशी आहेस? आणि माझी नात काय म्हणते? सांग बाळाला, आजी वाट पाहते तुझी, लवकर ये म्हणावं. आणि हो, आपलं बाळ येणारे, बाळंतपणाचा सगळा खर्च आणि बारस हे आपण करूया. तुझ्या वडिलांना म्हणाव ,पैशांची खर्चाची कसली चिंता करू नका. त्यांना कुठलाच भार नको. बाळं आल्यावर जेव्हा बारस करू, तेव्हा नातेवाईकांना सांगू आपण की "आशिर्वाद हाच खरा आहेर" म्हणजे त्यांना ही दडपण नाही देण्या घेण्याचं आणि ते मान पान तरी हवेतच कशाला?"

सरिता ऐकतच राहिली.सासूबाईंच्या बोलण्याने तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू ओघळू लागले.....

"समाप्त"

©तेजल मनिष ताम्हणे

मानपान/ आहेर/ भेट वस्तू ह्या पेक्षा अधिक जास्त मौल्यवान म्हणजे आशीर्वाद आणि मनापासून दिलेल्या शुभेच्छा! त्या नक्कीच भरभरून द्याव्या.