आडूपर

सासू आणि सुनेच्या नात्यातील एक कटु सत्य

"सूनबाई, चहा केलाय तुझा.हे बघ ठेवते इथे."

" हो हो,घेते मी."

   आज सासूबाईंनी रेखाला अर्धाच कप चहा दिला होता.रोज तर फुल भरून मिळायचा मग आज का असे? असा विचार करत रेखा चहा पीत होती.तशीही ती त्यांना काही बोलू शकत नव्हती ; कारण रेखाला खूप वर्षांनी दिवस गेले होते; अन् थोडी नाजूक परिस्थिती असल्याने तिला डॉक्टरांनी सक्त बेडरेस्ट सांगितली होती.त्यामुळे दिवस राहिले आणि दुसऱ्याच महिन्यापासून ती वेगळ्या खोलीत राहत होती.

" सासूबाई प्रदीप नाही का आला अजून?" असे विचारत ती हॉल मध्ये बसायला गेली तर,

" रूम बाहेर कशी आलीस तू?तो आला की आधी येतोच ना तुझ्या रूम मध्ये! जा रूम मध्ये आधी."

असे सासुबाई रेखाला म्हंटल्यावर ती लगेच आत गेली.थोडी घाबरलीच होती ती आज त्यांना.त्यांचे हेक्याने बोलणे आजवर तिने खूप सहन केलं होतं.तरीही त्यांच्यापुढे ब्र शब्द काढायची तिची कधीच हिंमत झाली नाही .घरातील सारे काही ती टापटीप छान करायची.पण दिवस गेल्या पासून तिला बेड रेस्ट असल्याने घरातले सारे काम सासूबाई बघत होत्या .त्यामुळे रेखाला त्यांची आडूपर होती.

    सासूबाई जसे म्हणतील तसे आणि तेच खायचे,तेवढेच खायचे असे तिला बंधन होते.त्यात प्रदीप देखील आईपुढे काहीच चालत नसल्याने गप्प होता .एव्हाना तिला ६ वा महिना लागला होता.ती मात्र आता पुरती कंटाळली होती.डोहाळे पुरवायचे तर दूरच पण आयते खात असल्याने सासूबाईंची चिडचिड,तेच तेच मर्यादित जेवण तिला आता सहन होत नव्हते.

तिने तिच्या आईला फोन केला अन् सारे काही सांगितले..

एक दिवस अचानक स्नेहा,तिची नणंद आली,

" आई मी यावेळी चांगली ३ महिने राहणार आहे.मला माझ्या लाडक्या वहिनीचे डोहाळे पुरवायचे आहेत,तसेच तिच्याशी छान गप्पा मारायच्या आहेत.."

" अन् मी काय तिला कोंडून ठेवले आहे का मग स्नेहा?"

" अग तसं नाही ग आई. तुझी आडूपर नको तिला आता. मी आले आहे ना!"

" अन् तुझ्या घरचं काय?"

" मी सारी व्यवस्था लावून आले आहे.तू आता बिनधास्त रहा."

" वहिनी, ए वहिनी बाहेर ये ना! "

रेखा आणि  स्नेहा  नणंद भावजय म्हणून नाही तर मैत्रिणीच होत्या एकमेकींच्या.रेखा बाहेर आली..

" तुला काय खावस वाटत ते आजपासून मला सांगायचं.काहीच टेन्शन घ्यायचं नाही.माझ्या बाळंपणात तू सुद्धा माझे लाड पुरवले होतेस ना,मग ही आडूपर नसून परतफेड समज."

    तेव्हापासून रेखा घरात स्वच्छंदी वावरू लागली.आपल्या मुलीने स्नेहानेच असे फर्मान सोडले होते म्हणून सासूबाई देखील पुरत्या खजील झाला होत्या; पण एकीकडे त्यांना आपल्या चुका हळूहळू लक्षात यायला लागल्या होत्या .

     इकडे रेखाच्या आईने स्नेहाच्या घरची जेवणाची जबाबदारी घेतली होती; कारण त्या दोघी एकाच गावातील होत्या.लेकीच्या संसारात लुडबुड नको म्हणून तिने सारी हकीगत स्नेहाला सांगितली होती,अन् स्नेहानेही त्यांचे म्हणणे ऐकून घेत आपल्या भावजयीची काळजी घेण्याचे त्यांना आश्वासन दिले होते.

सारे काही सोपस्कर पार पडले,रेखाने  गोंडस बाळाला जन्म दिला आणि आईला सांगू लागली,

" आई स्नेहा ताईंनी माझी खूप काळजी घेतली. मला त्यांची मदत कधीच आडूपर भासू दिली नाही.मी खूप आनंदात घालवले माझे शेवटचे ३ महिने."

स्नेहा आणि रेखाची आई एकमेकींकडे बघत हसल्या अन् त्यांनी बाळाचा गोड पापा घेतला ...

    वाचकहो,आजही सासू आपल्या मुलीचेच का ऐकून घेते?तिचेच का लाड पुरवते? सून सुद्धा लग्नानंतर नव्या घरची जबाबदारी असतेच ना? मग तिला काही अडचण आली तर तिला मदत करणे,म्हणजे तिला आडून पाहणे हे योग्य नाही.शेवटी सासूच्या म्हातारपणात तीच तर कमी येणार आहे; दरवेळी लेक धावून येवू शकत नाही. बरोबर ना? 

    प्रस्तुत कथेत नणंद आपल्या भावजयीला समजून घेते,म्हणून सारे आनंदी आनंद पार पडते.पण अशी परिस्थिती सगळीकडे नाही.अजूनही तिला मदत म्हणजे इतरांची आडूपर तिला असते हे पुर्णतः चुकीचे आहे.आजकालच्या आधुनिक जगात सुद्धा अशी बुरसटलेल्या विचारांची माणसे मी पाहिलेली आहेत.तेव्हा बरोबर काय अन् चूक काय याचा उलगडा मला या कथेच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचविणे उचित वाटले.

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे