Login

आधार भाग :3

Katha godavarichi

©️®️सायली जोशी
टीम -कोल्हापूर
कथामालिका विषय - कौटुंबिक कथा
शीर्षक - आधार भाग -3

सदाशिवने मात्र असल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले.
तरीही गोदा त्यांना घाबरून असायची. आधीच एकमेकांची मन जुळायची होती, त्यात हे असे प्रसंग...त्यामुळे गोदा भिऊन वागू लागली.
सासुबाईंचा त्रास जसा वाढू लागला. तसा तिने सदाशिवना सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

एक दिवस आत्याबाईंनी गोदाच्या सासुबाईंचे बोलणे ऐकले. पण त्यांना मध्येच बोलणे रास्त वाटले नाही म्हणून घरी त्यांनी आक्कांच्या समोर येऊन तणतण केली. आक्कांनाही गोदावरीची काळजी होतीच. त्या फक्त कोणाला बोलून दाखवत नव्हत्या इतकेच.

आक्का म्हंटल्या "मीच पाहते काय ते." मग कधी नव्हे ते आक्का गोदावरीच्या सासरी राहायला गेल्या.

आक्का राहायला आल्याने गोदाला काय करू अन् काय नको असं झालं होत, तर तिचा फुलणारा संसार पाहून आक्का मनातून खुश झाल्या.

आक्का पहिल्यांदाच राहायला आल्या म्हणून गोदावरीच्या सासुबाईंनी या गोष्टीकडे फारसे लक्ष दिले नाही. दोनाचे चार दिवस झाले, चाराचे आठ दिवस झाले तरीही आक्का जायचे नाव घेईनात. आता आक्कांना 'जा तरी कसे म्हणायचे' गोदावरी समोर मोठा पेच प्रसंग उभा राहिला. सासुबाई आता चिडचिड करू लागल्या. नको नको ते बोलू लागल्या. मग मात्र आक्का आपला पदर खोचून गोदाच्या सासुबाईंशी भांडू लागल्या. "हेच पाहायला थांबले मी. आमच्या लेकीला सुखात ठेवण्याचे वचन दिले ना, आता तिला जाच करता काय? चार बायकात तिची तक्रार करता? मी इथे आठ दिवस राहून सारी माहिती काढून घेतली हो. ही असली थेर बंद व्हायला हवीत. नाहीतर गाठ माझ्याशी आहे."
हे ऐकून गोदाच्या चेहऱ्यावर दुःख, आनंद, आश्चर्य असे मिश्र भाव उमटले. 'आक्का माझी बाजू घेऊन सासुबाईंशी भांडत आहेत' हे तिला उमजायला काही क्षण गेले.
"येऊ देत सदाशिवरावांना.. सारं काही कानावर घालते त्यांच्या." हे वाक्य ऐकून गोदा भानावर आली. तिने आक्कांना शांत करून आपल्या खोलीत नेले.
मग बराच वेळ दोघेही काही बोलल्या नाहीत. "माझं चुकलं गं. तुला आधाराची गरज होती तेव्हा मी ना तुला कधी आधार दिला ना कधी समजून घेतलं. सागरच्या जाण्याचा खापर मात्र तुझ्यावर फोडत राहिले. वन्सनी मला किती समजावलं! आता मात्र नाही ऐकून घ्यायची मी." आक्का मोठया आवाजात ओरडून बोलत होत्या. गोदाला कळेनासे झाले आता काय करायचं ते.

काही वेळाने सदाशिव खोलीत तणतणत आले. गोदाच्या सासुबाईंनी त्यांना काय सांगितले कुणास ठाऊक! म्हणाले, "गोदावरी आक्कांना जायला सांगा आजच्या आज आणि तुम्हीही जाणार तर जा त्यांच्या सोबत." सदाशिवना आजपर्यंत इतकं रागावलेल कधीच पाहिलं नव्हतं. गोदाला कळेना नक्की काय करायचं? ती तशीच उभी राहिली. "जा म्हणतो ना मी." आवाज ऐकून आत आलेला कृष्णा आपल्या वडिलांचा आवाज ऐकून एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. गोदाने आपले कपडे एका पिशवीत कोंबले, तोवर आक्कांनी आपले सामान बांधले होते. छोटा कृष्णा 'नवी आई कुठे चालली' असे म्हणून रडू लागला. तसे सदाशिवनी त्याला आपल्या जवळ ओढले. हे पाहून आक्कांनी गोदाचा हात धरला आणि त्या घराबाहेर पडल्या. गोदा सारखी मागे वळून पाहत होती, 'सदाशिव थांबवतात का आपल्याला?' पण त्यांच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडला नाही. सासुबाईही तोंड मिटून गप्पच होत्या.

घरी पोहोचताच गोदाचा बांध फुटला. आत्याबाई तिला समजावू लागल्या तर श्रीपादरावांचे म्हणणे पडले की 'आक्कांनी मध्ये पडायला नको होतं. सासू म्हंटल्यावर बोल लावणारच.' हा टोमणा आक्कांना झोंबला आणि त्यांनी श्रीपादरावांशी बोलणं बंद केलं. गोदा आणखीनच रडायला लागली, गोष्टी कुठवर गेल्या म्हणून.

दोन दिवसांनी वातावरण थोडसं शांत झाल्यावर श्रीपादराव सदाशिवच्या घरी जाऊन आले. तिथे  सासुबाईंनी गोदाच्या तक्रारींचा पाढाच वाचला. तेव्हा श्रीपादरावांना कळाले, हे प्रकरण तर आपल्या आक्कांपेक्षा जड आहे! त्यावेळी नेमके सदाशिव घरी नव्हते. मग श्रीपादराव सासुबाईंना चार समजुतीच्या गोष्टी सांगून घरी आले.

इकडे गोदाला कृष्णाची आठवण येऊ लागली. 'त्यालाही येत असेल का आपली आठवण! आणि सदाशिवरावांना? जर त्यांना आपल्याबद्दल काही वाटत असते, तर त्यांनी घराबाहेर जायला सांगितलेच नसते आपल्याला. खरं -खोटं पडताळायचं सोडून त्यांनी आपल्या बायकोलाच घराबाहेर जायला सांगितलं. निदान चूक कोणाची होती हे तरी जाणून घ्यायचं.'

नव्या संसाराची घडी आत्ता कुठे बसू पाहत होती. सदाशिवरावांशी मनाचे बंध जुळू पाहत होते, म्हणून 'आक्कांनी बोलायला नको होते' असे आता गोदाला वाटू लागले.
'आज सदाशिवरावांच्या जागी सागर असते तर..त्यांनी किती प्रेमाने समजूत काढली असती आपली. राग हा शब्द त्यांना माहीतच नव्हता जणू.' नकळत गोदाचे मन सागर आणि सदाशिवची तुलना करू लागले. 'आपण दुसऱ्या लग्नासाठी घाई केली का?' या विचाराने गोदावरी अस्वस्थ झाली.

माहेरची आठवण येते. पण तिथे धड चार दिवस राहता येत नाही. मुलगी लग्न होऊन सासरी गेली की लगेच पाहुणी होते का आपल्याच घरची? 'माहेरी गेल्यावर आपले लाड करून घ्यावेत, आईने जवळ घेऊन ख्यालीखुशाली विचारावी. चार गोष्टी समजावून सांगाव्यात, प्रसंगी कान धरावा. असा प्रसंग कधी आलाच नाही. परिस्थिती बेताची असली तरी माया का आटावी?' गोदाला आईची आठवण येऊ लागली.
'पण आज आक्का पाठीशी उभ्या राहिल्या आणि हक्काचं माहेरपण त्यांनी दिलं.
म्हणतात ना, सुख नशिबात असावं लागतं. जे होत ते ही नियतीने काढून घेतलं. आता पुढं काय वाढून ठेवलंय हे कोणाला माहीत?'

इकडे कृष्णा नव्या आईच्या आठवणीने आजारी पडला. त्याला समजावताना सदाशिवरावांच्या नाकीनऊ आले. 'आता गोदावरीला बोलवायचे तरी कोणत्या तोंडाने? आपणच तिला घराबाहेर जायला सांगितले.'

क्रमशः


 

🎭 Series Post

View all