Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

आधार भाग :2

Read Later
आधार भाग :2

©️®️सायली जोशी
टीम -कोल्हापूर
कथामालिका विषय - कौटुंबिक कथा
शीर्षक - आधार भाग -2

दुसऱ्या दिवशी आसपास कोणी नाही, हे पाहून आक्कांनी श्रीपादरावांकडे गोदावरीच्या लग्नाचा विषय काढला. तसे श्रीपादराव अचानक भडकले. "तुम्हाला इतकी घाई का? सुनबाईंना सावरायला थोडा वेळ तरी द्या. तुम्ही या साऱ्याला त्यांना जबाबदार धरता हे पाहिलं आहे आम्ही. तुम्ही एक स्त्री आहात आणि एका स्त्रीने स्त्रीला समजुन घ्यावं हे उमजायला हवं तुम्हाला, का या गोष्टी आम्हीच समजवायच्या?"
श्रीपादरावांचा असा अवतार पाहून आक्का गडबडल्या. कसेबसे सावरून घेत त्या पुन्हा आपल्या कामाला निघून गेल्या.

"सुनबाई आत येऊ का?" श्रीपादराव गोदावरीच्या खोलीत येत म्हणाले. सासऱ्यांना असं अचानक आलेलं पाहून गोदा उठून बसली. श्रीपादरावांनी थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या.
मग सरळ मुद्याला हात घालत ते म्हणाले, "तुझा पुन्हा नव्याने संसार सुरू व्हावा ही आमची इच्छा आहे. पोरी पुन्हा लग्न करशील?
तुझे लग्न झाले की आम्ही जबाबदारीतून मोकळे होऊ. आम्ही काय आज आहोत तर उद्या नाही. कोणत्याही वयात साथ, सोबत, आधार हवा माणसाला. गैरसमज करून घेऊ नको. बाप या नात्याने बोलतो असं समज आणि शेवटी नियती ठरवते आपल्या नशिबी काय असावं ते! विचार करून निर्णय घे. घाई गडबड अजिबात नाही."

'मामांजी म्हणतात ते खरंच, त्यांच्यावर आपली जबाबदारी आहेच. माझ्या माहेरच्या लोकांनी आपली जबाबदारी झटकली. आत्याबाई आणि मामांजींचा आधार आहे म्हणून मी इथे आहे. नाहीतर माझे काय झाले असते माहीत नाही.'
गोदावरीच्या मनाची घालमेल होत होती. सागरचा विचार तिच्या डोक्यातून जात नव्हता. अजूनही तिचं सागरवर प्रेम होतं. दुसऱ्या लग्नाचा विचारही तिला करवत नव्हता.


दुपारी आत्यांनी खोलीत गोदासाठी जेवणाचे ताट पाठवले. पाय पुन्हा ठणकत होता म्हणून कसेबसे चार घास खाऊन गोदा पडून राहिली.

स्वयंपाकघरात झाकपाक करून आत्या पुन्हा लेप घेऊन आल्या. लेप लावताना आत्या म्हणाल्या,
"दुःख कुरवाळत बसलं की जास्तच मोठं होतं गं. मग आपल्याला सवय होऊन जाते सतत दुःखात राहायची. तू विचार करून निर्णय घे. आमची जबरदस्ती नाही. माणूस गेलं म्हणजे आपलं आयुष्य थांबत नाही ना आणि आपल्या आयुष्याचे निर्णय आपणच घ्यायला हवेत. आम्ही किती दिवस पुरणार आहोत तुला? त्यात हे आक्कांचं वागणं असं. तुझी नणंदही आपल्या संसारात मग्न. आता तू तुझ्या संसारात रमलीस म्हणजे आम्हालाही काळजी उरणार नाही."
आत्याबाईंच्या या बोलण्याने गोदाच्या मनावरचे दडपण थोडे दूर झाले.

श्रीपादरावांनी आपल्या जवळच्या मित्रांना आणि आप्तेष्टांना गोदावरीसाठी स्थळ असल्यास पाहण्यास सांगून ठेवले होते. त्यानुसार त्यांच्या एका मित्राकडून आलेले 'सदाशिवचे स्थळ' ते पाहून आले.
राहायला घर, चांगल्या पगाराची नोकरी, घरी आई आणि पदरी दोन वर्षांचा मुलगा ,असे सारे काही उत्तम वाटल्याने श्रीपादरावांनी घरी येऊन आक्का आणि ताईंच्या कानावर ही गोष्ट घातली.
आत्यांनी ही गोष्ट उचलून धरली. पण आक्कांनी मात्र यात अजिबात लक्ष घातले नाही.

पुढे दोन दिवसांनी सदाशिव आणि त्यांच्या आईने येऊन श्रीपादरावांची भेट घेतली आणि गोदावरीलाही पाहिले. बसल्या बैठकीत त्यांची पसंती आली. मग पुढच्या दोन दिवसात गोदावरीने विचार करून आपली पसंती आत्यांच्या कानी घातली. गोदावरीच्या या 'होकाराचा' सर्वात जास्त आनंद आक्कांना झाला तर श्रीपादरावांनी पुढची बोलणी करून लग्नाचा मुहूर्त पाहिला आणि लग्न अगदी साधेपणाने पार पाडायचे ठरवले.

आता घरात लग्नाची घाई  सुरू झाली. गोदावरीच्या माहेरची मंडळी आली आणि गोदावरी आणि सदाशिवचे लग्न अत्यंत साधेपणाने पार पडले.

घरातून निघताना श्रीपादरावांनी तिला 'अखंड सौभाग्यवती भवं 'असा आशीर्वाद दिला. आत्यांनी गोदावरीला जवळ घेतले त्यांच्या मिठीत शिरून गोदावरीने पोटभर रडून घेतलं. आता गोदा आक्कांच्या समोर जात अपेक्षेने त्यांच्याकडे पाहू लागली. पण आक्कांनी गोदावरीला क्षणभर जवळ घेतले आणि त्या तिच्यापासून दूर जाऊन उभ्या राहिल्या. मग भरल्या डोळ्यांनी गोदावरीने सारं घर पुन्हा एकदा पाहून घेतलं आणि ती आपल्या नव्या घरी जाण्यास निघाली.

गोदावरी घरातून गेली आणि घर जणू सूनं सूनं वाटू लागलं. गोदावरी आपल्या नव्या सासरी गेली आणि आक्कांनी कोणाच्याही नकळत पोटभर रडून घेतलं. कितीही झालं तरी गोदा त्यांची सून होती आणि त्यांना तिची सवयही तितकीच झाली होती. आक्कांनी जरी तिला कितीही दूर लोटलं असलं तरी, नकळत त्यांना गोदावरीचाही आधार होताच. तिची अनुपस्थिती त्यांना आता ठळकपणे जाणवू लागली होती.
गोदाच्या आठवणीने त्यांचे डोळे कधी कधी भरून येत. मग आत्याबाई त्यांना म्हणत, "वहिनी पोटी माया असेल तर समोरच्याला ती दाखवावी. नाहीतर दोघांचाही कोंडमारा होतो."
पण आता काहीच उपयोग नव्हता. जेव्हा गोदावरीला आक्कांचा आधार हवा होता, तेव्हा त्यांनी तिला दूर केलं होतं. त्यामुळे आक्का मनात कुढत होत्या.

गोदावरी आता हळूहळू आपल्या संसारात रमू लागली होती. सदाशिवच्या मुलाला 'कृष्णालाही' तिचा लळा लागला होता. सदाशिव आणि तिचं नातं हळूहळू खुलू पाहत होतं. तिच्या सासुबाईंनी तिला सुनेची जागा कधीच देऊ केली होती आणि घरचा सारा कारभार तिच्या हाती सोपवला होता. एकंदरीत गोदावरी खुश होती आपल्या नव्या संसारात.

सदाशिव तसे चांगले होते. पण अजूनही ते आपल्या बायकोला, 'आशाला 'विसरू शकले नव्हते. आईच्या आग्रहखातर त्यांनी गोदावरीला पसंत केले खरे, पण तिला बायको म्हणून स्वीकारायला त्यांचे मन तयार होत नव्हते. गोदावरीही सागरला विसरू शकत नव्हती. त्यामुळे या 'नवीन नात्याला 'थोडा वेळ हवा आहे हे दोघेही जाणून होते.

कधीतरी जुन्या आठवणी गोदावरीच्या मनात घर करत. मग ती आत्याबाईंना आणि श्रीपादरावांना जाऊन भेटून येई. कधी कधी आत्याबाई हक्काने तिच्या घरी येऊन दोन दिवस राहत असत.

पण 'नव्याचे नऊ दिवस' म्हणतात ना, तसे गोदावरीच्या सासुबाईंनी आता आपले रंग दाखवायला सुरुवात केली. आत्याबाईंचे येणे -जाणे त्यांना फारसे आवडेनासे झाले. गोदाच्या नव्या सासरी त्यांनी नाक खुपसू नये, असे त्यांना सारखे वाटे. पण आत्याबाई केवळ काळजी पोटी इथे येत होत्या. त्यांनी ना कधी गोदाच्या नसत्या चौकशा केल्या, ना तिला संसारात कसले सल्ले दिले.

मात्र सासुबाई आता गोदाला बोलू लागल्या. टोमणे मारू लागल्या. सारखी चिडचिड करू लागल्या. गोदाने त्यांचे बोलणे फारसे मनावर घेतले नाही. पण हे आता रोज रोज होऊ लागले. भरीत भर म्हणजे सासुबाई शेजारी -पाजारी तिच्या चुगल्या करू लागल्या. सदाशिवचेही कान भरू लागल्या. त्या दोघांना एकमेकांशी बोलू देईनात.
कृष्णालाही त्या आता काही बाही सांगून गोदावरीला टाळायला पाहू लागल्या.

क्रमशः


 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Sayali Joshi

Housewife

आपल्या मनातले शब्द जेव्हा कोणीतरी वाचतं, तेव्हा मिळणारा आनंद वेगळाच असतो.

//