आधार भाग :1

Gosht godavarichi

©️®️सायली जोशी
टीम -कोल्हापूर
कथामालिका विषय - कौटुंबिक कथा
शीर्षक - आधार


"गोदा.. हिने माझ्या मुलाला गिळलं आणि वर
माझ्याच घरात राहते. तिला कसली लाज, ना कसली शरम! आमच्या डोक्यावर ओझं. काय करावं म्हणजे ही ब्याद जाईल इथून?" भाकऱ्या बडवीत आक्का तणतण करत होत्या.

इतक्यात साधना आत्या स्वयंपाकघरात आल्या. "वहिनी कितीवेळा सांगितले तुम्हाला, गोदाविषयी असे बोलत जाऊ नका. तिची काय चुक होती? तुम्ही तुमचा मुलगा गमावला आणि तिने आपलं सौभाग्य! तुम्ही समजून घ्यायला हवं तिला. तुम्हीच असं वागलात तर तिने कुणाकडे पहायचं?"

"तर तर.. ती अवदसा घरात आली नि सगळी वाट लागली." असे म्हणत आक्कांनी शेवटची भाकरी तव्यावर टाकली.

मागल्या दारातून आत येताना नकळत आक्कांचे बोलणे गोदावरीच्या कानी पडले आणि तिने हातात धरलेली कळशी तिच्याच पायावर पडून वेदनेने कळवळू लागली ती. हे पाहून आत्या धावत आल्या. गोदावरीला आत घेऊन त्यांनी पटकन कसलासा लेप बनवायला घेतला.
बघता बघता गोदाचा पाय सुजला. त्यातून कळाही येऊ लागल्या. पण काही न बोलता ती ओठ मिटून वेदना सहन करत राहिली.

"एकही काम धड होत नाही हातून. स्वतःच नुकसान आणि दुसऱ्याचंही." इकडे आक्कांची बडबड चालूच होती. पायातून येणाऱ्या कळांपेक्षा गोदाला आपल्या सासुबाईंची बडबड जास्त असहाय्य होऊ लागली म्हणून धडपडत उठून ती आपल्या खोलीत निघून गेली.
काही वेळातच आत्या लेप घेऊन खोलीत आल्या. "गोदा, तू वहिनींच बोलणं अजिबात मनाला लावून घेऊ नकोस. त्यांचा स्वभाव पहिल्यापासूनच तसा आहे आणि माणसानं सगळचं सहन करावं, असा काही नियम नाही बरं. सहन होत नसेल तर सरळ भांडून मोकळं व्हावं अन् जर भांडायलाही जमत नसेल तर गोष्टी तिथल्या तिथे सोडून द्याव्यात."

"आत्याबाई माझ्या दुःखापेक्षा सासुबाईंचं दुःख खूपच मोठं आहे. मला या घरात येऊन जेमतेम अडीच -तीन वर्षे झाली. त्यांनी तर आपल्या मुलाला गमावलं आहे. आपल्या मुलासोबत जन्मापासून राहत होत्या त्या, जवळजवळ सत्तावीस वर्षे.
जर बोलून त्यांचे दुःख मोकळं होत असेल तर होऊदे." आपल्या डोळ्यातलं पाणी लपवत गोदा म्हणाली.
"झाल्या गोष्टीचं दुःख आम्हालाही आहेच गं. माझा जीव की प्राण होता माझा भाचा. हे सारं जरी खरं असलं तरी, यात तुझा काहीच दोष नव्हता. त्यांनी तुला आधार द्यावा इतकंच माझं म्हणणं आहे." आत्याबाई पुढे म्हणाल्या.

एव्हाना लेप लावून झाला होता. गोदाला विश्रांती घ्यायला सांगून आत्याबाई स्वयंपाकघरात गेल्या.

"वहिनी आपल्याच माणसांबद्दल इतका राग बरा नाही. गोदाला पुन्हा प्रेमाने जवळ करा. दुःख मनात साठवलं आहे तिने. मोकळी होईल ती. आज ना उद्या पुन्हा लग्न होईलच तिचे. अजून कोवळ वय आहे. अशी एकटी रहाणार तरी किती दिवस!"

इकडे गोदाला आपल्या लग्नाचा दिवस आठवू लागला. ती माप ओलांडून घरात आली आणि साऱ्यांच्या प्रेमात न्हाऊन निघाली. माहेरची परिस्थिती बेताची. पण सासर भलं मिळालं म्हणून आई -बापाच्या हाती जणू स्वर्गच आला.
भरभरून प्रेम करणारा नवरा, जीव लावणारी नणंद, मायाळू सासू -सासरे आणि आत्याबाई..त्यांच्या सासरच्या मंडळींनी
लग्नानंतर केवळ दोन वर्षातच त्यांना कायमच माहेरी पाठवलं. तेव्हापासून त्या इथेच राहत. खूप खमक्या होत्या त्या. धीर न सोडता त्यांनी आल्या परिस्थितीला तोंड दिलं. त्या घरची कामं करत.अडलं -नडलं सारं पाहत होत्या.

आक्कांचा नवरा सतत दौऱ्यावर असल्याने त्यांना आपल्या नणंदेचा मोठा आधार होता. त्यामुळे आक्कांनी त्यांना कधी दुखावलं नाही आणि आत्याबाईंनी आक्कांच्या संसारात नसती
ढवळाढवळ कधीच केली नाही.

सागरवर म्हणजेच गोदाच्या नवऱ्यावर आक्कांपेक्षा आत्याबाईंचाच जास्त जीव. त्याचं जाणं त्यांनी फार मनाला लावून घेतलं होतं. त्यातून हळूहळू त्या सावरल्या आणि साऱ्यांना सावरायला धीर दिला त्यांनी.
आक्का मात्र सागरच्या जाण्याचा दोष गोदावरीला देत राहिल्या. सागराच्या जाण्याने गोदावरीही मनातून तुटून गेली होती, एकटी पडली होती. आधार हवा होता तिला.
'आता सासर हेच तुझे घर.' असे म्हणत गोदाच्या माहेरच्या लोकांनी हात झटकले. तिला अशी अपेक्षाच नव्हती. मग ती सासरीच राहू लागली.

आता आक्का मात्र तिचा दु:स्वास करू लागल्या. आपल्यावर माया करणारी सासू एकदम बदलल्याने गोदा बावरून गेली. पण आत्याबाई आणि सासरे पाठीशी उभे असल्याने ती हळूहळू सावरू लागली. आपलं दुःख मात्र तिने मनातच धरून ठेवलं.

सागरचं असं अचानक जाणं साऱ्यांसाठीच धक्कादायक होतं. गोदा आणि सागरचा संसार जेमतेम दोन वर्षांचा. या दोन वर्षांच्या काळात सागरने भरभरून सारं काही दिलं तिला. 'कधीतरी सुख शोधावं आणि त्याचं दान भरभरून आपल्या पदरात पडावं' अशी अवस्था झाली होती तिची.

पण कोणाची दृष्ट लागली म्हणतात ना, अगदी तसं झालं. अचानक कामावरून घरी येताना सागरचा झालेला अपघात..आणि काही कळायच्या आतच संपलं सारं.
निपचित पडलेल्या सागरला पाहून दुःखावेगाने गोदा रडलीच नाही. केवळ मुकेपणाने अश्रु ढाळत राहिली. साऱ्यांनी खूप समजावले तिला .पण आपलं दुःख मनातच साठवत राहिली ती.

दिवस सरत गेले, तसा आक्कांच्या वागण्या- बोलण्यात बदल होत गेला. गोदा त्यांना आता आपली अडचण वाटू लागली. जाता येता त्या गोदावरीला बोल लावू लागल्या. आत्याबाईंना मात्र हे सहन होईना.

वेळ पाहून त्यांनी आपल्या भावाच्या, श्रीपादरावांच्या कानावर ही गोष्ट घातली. "माझा संसार अर्ध्यावर सुटला. मी कोणाकडे काहीही मागितले नाही, कधी कसली तक्रार केली नाही. तसं जगणं आपल्या गोदाच्या वाटेला नको यायला. तिला पुढं अख्ख आयुष्य काढायचं आहे अजून. ते सुखांत जावं हीच इच्छा आहे माझी."

तसे श्रीपादराव म्हणाले, "ताई गोदावरीच्या मनात काय आहे याचा अंदाज घ्या. मग पुढचं पाहू. झालं गेलं विसरायला काळ हेच औषध. सारं काही ठीक होईल. नका काळजी करू.
मी बोलतो सुनबाईंशी."
इतकं बोलून श्रीपादरावांना भरून आलं. मग आत्या त्यांच्या पाठीवरून हात फिरवत राहिल्या बराच वेळ.

क्रमशः

🎭 Series Post

View all