Login

आधार भाग : अंतिम

Gosht godavarichi

©️®️सायली जोशी
टीम -कोल्हापूर
कथामालिका विषय - कौटुंबिक कथा
शीर्षक - आधार भाग -5, अंतिम

सासुबाईंच्या माहेरी गोदाचे छान स्वागत झाले. तिथली सारी माणसे स्वभावाने प्रेमळ होती. त्यामुळे गोदा सहज त्यांच्यात मिसळून गेली. नव्या ओळखी झाल्या, नवी नाती जोडली गेली. कार्यक्रम छान पार पडला आणि दोघे घरी परतली.

त्या दिवसापासून गोदा आणि सदाशिवचे नाते अधिकच खुलत गेले. एकमेकांबद्दलची ओढ वाढली. त्यांच्या नात्यात मोकळेपणा येऊ लागला. नकळत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

कृष्णाही आता शाळेत जाऊ लागला.

सासुबाई गोदाच्या मागे लागल्या, "आता गोड बातमी द्या म्हणून. कृष्णाला पाठीवर बहीण किंवा भाऊ हवाच."

..आणि खरचं गोदावरीने दोन महिन्यानंतर गोड बातमी दिली. गोदावरीची ही पहिलीच वेळ! सासुबाई आता गोदावरीची काळजी घेऊ लागल्या. तिला काय हवं नको पाहू लागल्या. आत्याबाई, आक्कांनाही खूप आनंद झाला, ही बातमी ऐकून. सारेच आनंदात होते आता.

गोदावरीचे पहिलेच बाळंतपण म्हणून सातव्या महिन्यानंतर तिच्या सासुबाईंच्या संमतीने आक्कांनी गोदाला आपल्या घरी आणले.
'आज सागर असता तर, किती बरे झाले असते.' त्याच्या आठवणीत आक्कांनी डोळ्याला पदर लावला.'
मग हौसेने डोहाळ जेवणाचा थाट झाला. गोदावरीची सारी हौस पूर्ण केली आक्कांनी. घर सजले. नाजूक फुलांच्या माळांनी नटलेली गोदा फार सुंदर दिसत होती. सदाशिव सारे कौतुकाने पाहत होते. उगीचच त्यांना वाटून गेले, 'आता गोदाच्या मनातली कृष्णाबद्दलची माया आटणार तर नाही ना?' गोदावरीला हे जाणवले असावे कदाचित! तिने आपल्या अवती -भोवती बागडणाऱ्या कृष्णाला जवळ बसवून घेतले. तो ही आपल्या आईकडे कौतुकाने पाहू लागला. हे पाहून सदाशिवना 'आपण नसते विचार मनात घेऊन बसतो' असे वाटून गेले. "गोदा मनाने हळवी आहे, प्रेमळ आहे ती आपल्या कृष्णासोबत
छानच वागेल."

नववा महिना सरला आणि गोदाने एका गोड मुलीला सुखरूपपणे जन्म दिला. मुलीच्या जन्माने सारे खुश झाले. आक्कांनी गोदाला पुन्हा आपल्या घरी नेले. तिची योग्य ती काळजी घेतली. आत्याबाईंना तर गोदासाठी काय करू आणि काय नको असे झाले होते.

तेराव्या दिवशी बाळाचे बारसे झाले. मुलीचे नाव 'अवनी' ठेवले. दोन महिन्यांनी गोदा पुन्हा आपल्या सासरी गेली. कृष्णाला आपली ही छोटी बहिण फारच आवडली. आता कृष्णा आपल्या छोट्या बहिणीचे लाड करू लागला, तिला सांभाळू लागला. सदाशिवही आता आपल्या छोट्याश्या लेकीला जराही नजरेआड करत नसत.

इकडे पोस्टमन आल्याने कोणाचे पत्र म्हणून आत्याबाई लगबगीने बाहेर आल्या. पत्र वाचताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले आणि ते पत्र  दूर कोपऱ्यात फेकून देत त्या आक्कांना म्हणाल्या," माझ्या नवऱ्याने काहीच चूक नसताना मला घराबाहेर काढलं. इतकी वर्ष मी जगले का वाचले हे देखील पाहायला आले नाही कोणी. आता आधाराची गरज असल्यावर मी आठवले. एकटे पडले आहेत म्हणे ते. आज इतक्या वर्षानंतर त्याला माझी आठवण झाली, का? तर तो एकटा पडला म्हणून! आता पुन्हा बोलवतो आहे तिकडे. मी काही जायची नाही आता. वहिनी तुमचा आणि दादाचा आधार होता म्हणून मी जगले. नाहीतर कुठे गेले असते कोणास ठाऊक?"

दिवस सरत होते. अवनी आणि कृष्णा हळूहळू मोठे होत होते. श्रीपादराव आता थकले होते. नको म्हणत असता त्यांनी आपलं घर गोदावरीच्या नावे केलं आणि पैसा - अडका आक्कांच्या आणि आत्याबाईंच्या नावे ठेवला.
सदाशिवनी अगदी मुलाप्रमाणे श्रीपादरावांची सारी काळजी घेतली. पण अखेर व्हायचं तेच झालं. श्रीपादराव साऱ्यांना सोडून गेले. गोदाला फार दुःख झालं. लेक -जावई परगावहून येऊन भेटून गेले. तर आत्याबाई कोलमडून गेल्या.

श्रीपादरावांच्या जाण्याने आक्कांच्या मनात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. त्यांच्या आठवणी छळू लागल्या त्यांना.
आता गोदा अधून -मधून इथे येऊन राहू लागली. सदाशिवनीही त्यांना आधार दिला आणि काळासरशी सगळं काही ठीक होत गेलं.
आत्याबाई आणि आक्का गोदावरीच्या मुलांत रमून गेल्या.

"वन्स कधी कधी आपण एखाद्या माणसाला ओळखायला चुकतो. त्या व्यक्तीला जेव्हा आपली गरज असते तेव्हा तिच्यापासून दूर राहणं पसंत करतो. श्रीपादराव गेले आणि आमचं सर्वस्व गेलं. अशा वेळेस आधाराची खरी गरज असते. सागर गेला आणि मी गोदावरीला दूर केलं, तेव्हा तिला माझी जास्त गरज होती. त्याची किंमत आता कळते आहे मला. एखाद्या व्यक्तीच्या नसण्याची किंमत त्याच्या अस्तित्वापेक्षा अधिक असते हेच खरं." आक्का आत्याबाईंना सांगत होत्या.

"जेव्हा अचानक एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते, तेव्हा आपल्याला तिच्या नसण्यावर विश्वास ठेवणे फार कठीण जातं.
ती नसण्याचे दुःख  व्यक्त करता येत नाही किंवा त्या व्यक्तीच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असते.
मग मागे राहतात त्या फक्त आठवणी आणि त्या व्यक्तीविषयी आपल्या मनात साचलेले गैरसमज. वहिनी, आपलं माणूस जवळ असलं की मनाला आधार मिळतो. आपली गोदा प्रेमळ, निर्मळ आहे. तिने गोष्टी मनाला लावून घेतल्या नाहीत आणि आपलं सारं ऐकलं.
आता तिचा संसार मार्गी लागला, ती आपल्या संसारात रमली आहे. याहून अधिक काय हवं होतं आपल्याला? आणि सदाशिवराव आपल्याला काही कमी पडू देत नाही नाहीत. मुलाप्रमाणे आपली काळजी घेतात. यातच सारं समाधान आहे. आता आपला खरा आधार गोदावरीच."
इतके बोलून आत्याबाईंनी पदराने आपले डोळे पुसले आणि मी कायम तुमच्या सोबत आहे ' या भावनेने त्यांनी आक्कांचा हात प्रेमाने आपल्या हातात घेतला.

समाप्त.








 

🎭 Series Post

View all