आभास की वास्तव? (भाग - ६)

आभास आणि वास्तवाच्या कचाट्यात गुंतलेली रहस्यकथा... सत्य आणि असत्याचा सुगावा घेणारी कथामालिका!

राज्यस्तरीय करंडक कथामालिका


 कथेचे शीर्षक - आभास की वास्तव? 


 भाग -



                 वरवर पाहता सगळं नीट सुरू होतं म्हणजेच युगच्या तब्येतीत बऱ्यापैकी सुधारणाही दिसत होती पण तरीसुद्धा युग काहीसा डिस्टर्ब राहायला लागला होता. रोज रात्री - अपरात्री झोपेतून उठून जागा व्हायचा. कधी नित्य आहारापेक्षा फार कमी जेवायचा तर कधी अति जास्त जेवायचा, विनाकारण चीडचीड करायचा, बारीकसारीक गोष्टीतही कसर शोधायला लागला होता, त्याला अतिशय विचित्र सवयी लागल्या होत्या. उदाहरणार्थ, नखे कुरतडणे, अनायासे पाय थरथरणे. थोडा ताण जाणवताच लगेच मानेवर लागोपाठ हात फिरवणे. 


                 संकर्षण आणि युग एकत्रच युगच्या घरी राहत असल्याने युगच्या या हालचाली त्याच्या नजरेतून सुटत नव्हत्या. त्यालाही युगमधील बदलाव नवीनच होते म्हणूनच संकर्षणने युगकडून सविस्तर प्रकरण जाणून घेण्याकरिता बरेच अप्रत्यक्ष प्रयत्नही केले पण फारसा परिणाम झाला नाही. म्हणून संकर्षणने युगबरोबर त्या विषयावर स्पष्ट बोलण्याचा मनोमन निर्धार केला. 


" युग, ऐक ना! मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. " हॉलमधील सोफ्यावर बसलेल्या युगशेजारीच संकर्षण बसला आणि त्याला म्हणाला. 


" ह्म्म! बोल ना, काय बोलायचं आहे? " युगने विचारले. 


" युग मी आढेवेढे न घेता सरळ मुद्द्याचं बोलणं सोईस्कर मानतो म्हणून मी तुलाही स्पष्टच विचारणार. " संकर्षणने असं म्हणताच युगने त्यावर हुंकार भरला म्हणून मग संकर्षण परत त्याचं बोलणं कंटिन्यू करू लागला. 


" युग हल्ली मला तुझ्यात काही बदल जाणवत आहेत. म्हणजे तू खूप डिस्टर्ब असतो, तुझी सारखी चीडचीड होत असते आणि मुळात ही चीडचीड व्यवसायव्यापामुळेही नाहीये कारण शॉपमध्ये सगळं सुरळीत सुरू आहे. मग मला सांग, तू असा अस्वस्थ का आहेस? तू कोणत्या गोष्टीचा ताण घेतला आहेस का? " संकर्षणने लगेच मुद्द्याला हात घालून युगपुढे विषय छेडला. युग मात्र नजर चोरून घेत विषयाला टाळत होता पण संकर्षण त्याच विषयाला अनुसरून युगशी बोलत राहिला व अशारितीने त्याने युगला पळवाट शोधू दिली नाही.  


" हे बघ युग, कुणाल जसा तुझा मित्र होता तसाच माझाही होता. आता तो हयात नाहीये पण तो आपल्यासोबत नाही, असं म्हणता येणार नाही. म्हणजे मला म्हणायचंय की, तो त्याच्या आठवणीस्वरुप आपल्या हृदयात जिवंत आहे. कुणाल मरण पावला हे उघड सत्य आहे, ते नाकारता येणार नाहीच पण आताशा आपण फक्त त्यातच घुटमळत राहू शकत नाही ना! 


                  आपल्याला कुणालला विसरायचे नाहीये पण आपल्याला नवी सुरुवात करणे गरजेचे आहे अन् ती सुरुवात पॉझिटिव्ह हवी. युग तुझा हा बदलता स्वभाव नवी सुरुवात होऊ शकत नाही कारण यामुळे तू केवळ नैराश्यात जाशील, याव्यतिरिक्त काहीच नाही. ही चीडचीड, हा अग्रेसिव्हपणा, ह्या काही विचित्र सवयी, प्रत्येक बाबतीत शंका घेण्याची जडलेली सवय यामुळे तू बदलला आहेस पण तुझ्यातला युग हरवून गेलाय. 


                 युग आपल्या दोघांनाही मुव्ह ऑन करायचे आहे पण हे अशाप्रकारे नव्हे तर जरा सकारात्मक दृष्टीकोनाने! नव्या सवयी आत्मसात करायच्या आहेत पण सोन्यासारख्या असलेल्या जुन्या आठवणींना हृदयात जपून! युग, तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते! " संकर्षण युगला विश्वासात घेऊन युगची समजूत काढत होता. 


संकर्षणचे ऐकून घेतल्यावर युग काही वेळ गप्पच बसून होता पण नंतर थोडा खोल श्वास घेऊन युग संकर्षणच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, " संकर्षण, कदाचित तू मला वेड्यात काढशील पण मी खरंच खूप डिस्टर्ब आहे. तुला माझ्यात जाणवलेले बदल नक्कीच होत आहेत पण माझे त्यावर नियमन नाही. माझ्या नकळत मी असा वागतोय. बरेचदा माझी यामुळेच चीडचीड होत असते. मला नाही कळत आहे की, मी असा का वागतोय... 


                  मला आजकाल सारखे भास होत असतात. असं वाटतं, जणू कुणीतरी माझ्यावर पाळत ठेवून आहे. झोपेतही खूप विचित्र स्वप्न दिसतात. त्या स्वप्नांमुळे मी घामेजून जागा होतो पण जेव्हा स्वप्न आठवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा काहीच आठवत नाही पण परत जेव्हा झोपतो तर सेम तेच स्वप्न दिसतं. सगळे दृश्य तेच असतात पण झोपेतून जाग आल्यावर त्या स्वप्नांबद्दल जरा आठवण्याचा प्रयत्न केला तर डोकं जड होतं आणि भयंकर दुखायला लागतं. डोक्यात सनक जाते आणि मग मला गरगरायला होतं. 


                  स्वप्नात दिसणारे ठिकाण अनोळखी वाटत नाही, सगळं माझ्या ओळखीचं वाटतं पण तरीही जाग आल्यावर विचार केला की, सगळ्या प्रतिकृती पुसटशाच आठवतात. त्याचाच सातत्याने विचार करत असल्याने मला कधी कधी जेवायचे असले तरी जेवायची इच्छा होत नाही. याउलट कधी कधी नाईलाजाने मी अवाढव्य जेवण करतो. सगळ्याच बाबतीत अनियमितपणा वाढलाय. फक्त एक कृती सातत्याने करावीशी वाटते ती म्हणजे झोप घेणे. अस्वस्थ असलो तरी झोप येतेच! 


                  दुसरीकडे सतत मन कशाचा तरी शोध घेत असतं. असं वाटतं, मी काहीतरी मागे सोडलंय, खूप महत्त्वाचं कुणीतरी गमावलंय... ओह गॉड! डॅम इट! बघ परत डोकं दुखायला लागलंय. " युग वेदनेने ओरडला. युगची ही अवस्था पाहून संकर्षणला काळजी वाटली. युगचा हात हाती घेऊन संकर्षण युगला सावरण्याचा प्रयत्न करू लागला. 


" युग, शांत हो! आधी तू स्वतःला ताणमुक्त कर, जरा निवांत हो! तुला मी आधीही सांगितले आहे आणि परत तेच सांगतोय. युग, मला माहीत आहे तू डिस्टर्ब आहेस आणि तुझे असे डिस्टर्ब होण्यामागील कारणही मला माहिती आहे. त्याचमुळे मीही डिस्टर्ब आहे पण युग, खरं सांगू का? आपल्या कुणालचा कार अपघातात मृत्यू झाल्याने तू एवढा गोंधळला आहे, की तू त्याची धास्ती घेतली आहेस. हा सगळा प्रसंग तुझ्या मनावर छाप सोडून गेला आहे आणि असे होणे साहाजिकच आहे कारण तो आपला जिवलग मित्र होता. 


                  युग आपला कुणाल मरण पावला हे खरं आहे पण मला सांग, तो जिथे कुठे असेल आणि तेथून तो तुला अशा अवस्थेत पाहत असेल तर त्याला बरं वाटत असेल का? तू स्वतःला नुकसान करून घेतोय हे कुणालला सहन होणार का? नाही ना? " संकर्षण जसजसा बोलत होता तसतसे युगचे हावभाव बदलत होते. तो थोडा अस्वस्थ होऊन नखे कुरतडायला लागला. त्याचे हातपाय आपोआप थरथरत होते. ते पाहून संकर्षण परत पुढे बोलू लागला. 


 " जन्म आणि मृत्यू एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात, हे तूच म्हणतोस ना वारंवार? माहिती आहे की, कुणालचा वावर आपल्यासोबत नसणार पण म्हणून काय आता तू असाच डिस्टर्ब राहणार आहेस का? नाही ना? त्याला जाऊन आता एक महिना झाला आहे. 


                  युग, तुला आता मुव्ह ऑन करायची गरज आहे. कुणाल आपला मित्र होता आणि कायम असणारंच! राजा, मुव्ह ऑन करणे म्हणजे एखाद्याला विसरणे असं नसतंच ना! म्हणून आता नवी सुरूवात करायला हवी पण कुणालला विसरून नव्हे तर त्याच्या सोबत घालवलेले सुखद क्षण स्मरणात ठेवून! 


                  मी बोलतोय त्यावर तू शांत डोक्याने विचार कर. तुझे बरेच प्रश्न सुटतील, असं निदान मला तरी वाटतं. " संकर्षण एवढे बोलून गप्प झाला. 


" संक्या, तू सांगतोय ते पटतंय मला सर्व पण तुला वाटतंय तसं काही नाही रे! मला कुणालच्या मरण्याचं दुःख आहे पण गेल्या काही दिवसांपासून मला जाणवणारा अस्वस्थपणा हा कुणालचा अपघात वा मृत्यू या दोहोंशी संबंधित नाही. माझ्या स्वप्नात कुणाल कधीच दिसला नाही. मला कुणालच्या आठवणींचा त्रास नाहीये.


                  मी वारंवार सांगतोय की, सध्या मला जाणवणारी जी अस्वस्थता आहे ती फक्त नि फक्त मला दिसणाऱ्या स्वप्नांशी संबंधित आहे. असो! तुला कळणार नाही आणि तुलाच काय, आणखी कुणालाच काहीही कळणार नाही. " युग म्हणाला आणि नंतर सोफ्यावरून उठून उभा राहिला व स्वतःच्या खोलीकडे जाऊ लागला. तेवढ्यात परत युगच्या डोक्यात कळ गेली म्हणून त्याने डायनिंग टेबलनजीकच्या खुर्चीचा आधार घेतला.


क्रमशः


_______________________________________


©®

सेजल पुंजे.

१२-०८-२०२२

टीम नागपूर. 

_________________________________________



🎭 Series Post

View all