आभासी भेट

रोजचीच ही आभासी भेट त्याची,तिच्या जगण्याची आशा झाली.कल्पनेतून त्याला असं अनुभवणं,हिच तिच्या सुखाची परिभाषा झाली.

कवितेचे नाव:- आभासी भेट

कवितेचा विषय:- सुखाची परिभाषा

जिल्हास्तरीय कविता स्पर्धा फेरी २


ओलेत्या नजरेत भरूनी त्याला,

ती पुन्हा एकदा हळवी झाली.

लटका राग तो तिचा रोजचाच,

मनी मात्र बहरून प्रीतीची पालवी आली.


क्षणीक राग तो तिचा अलवार सरला, 

अन् गालावर चढली गुलाबी लाली.

हरवली त्याच्या सहवासात,

विराजस चंद्राची ती चांदणी झाली.


मिलनाची घटका ती रोजचीच,

बघता बघता सरून गेली.

सोडवत तिचा हात घट्ट त्याने,

निघण्याची पुन्हा तयारी केली.


काळीज भरून आलं अन्,

डोळ्यांत आसवांची तिच्या गर्दी झाली.

उद्या भेटेन गं पुन्हा सखये,

त्याने पुर्नभेटीची प्रांजल वर्दी दिली.


हळुवार झुळूक वाऱ्याची त्याला,

तिच्या कल्पनेतून दूर घेऊन गेली.

देशकार्याला प्राधान्य देत त्याने,

लवकरच प्रत्यक्ष येण्याची ग्वाही दिली.


रोजचीच ही आभासी भेट त्याची,

तिच्या जगण्याची आशा झाली.

कल्पनेतून त्याला असं अनुभवणं,

हीच तिच्या सुखाची परिभाषा झाली.


©® आर्या पाटील

जिल्हा- पालघर