Login

आभास

About Aabhas


आभास

"उठ रे माझ्या पिल्लू, किती झोप ? उठ लवकर .. धावण्याच्या सरावाला जायचे आहे ना ? "


हे बोलणे,हा आवाज ऐकून पल्लवी झोपेतून खडबडून जागी झाली. पाहते तर ...काय ? आजूबाजूला कोणीच नाही. शेजारी आई तर गाढ झोपलेली.

मला तर खात्रीच आहे . हा आवाज बाबांचाच होता. पण हे कसे शक्य ?
बाबा कसे येतील मला उठवायला ? ते तर देवाघरी गेले ना....आम्हांला सोडून. मग मला त्यांचा आवाज कसा आला ? आणि मला ते उठवत आहे ,असे का वाटले ? निश्चितच मला ते येथे असल्याचा आभास होत असावा.


रोज मी सकाळी लवकर उठून रनिंग करण्यासाठी जाते ना..आज मला उठायला उशीर झाला. म्हणून बाबा मला उठवित आहे ,असे वाटले.
आणि
आईची झोपमोड होऊ नये म्हणून तिला न उठवता ती रोजप्रमाणे रनिंग करण्यास गेली.


पल्लवी ही आईबाबांची एकुलती एक मुलगी. आईबाबांचा तिच्यावर खूप जीव आणि तिचेही आपल्या आईबाबांवर जिवापाड प्रेम !
पल्लवी अभ्यासात तर हुशार होतीच पण ती धावण्यात ही खूप चपळ .
तिचा हा गुण तिच्या बाबांनी बरोबर ओळखला होता आणि तिला सर्वोतोपरी प्रोत्साहन ही दिले होते,मदत करत होते.
तिला रोज सरावासाठी उठवणे,तिला वेळोवेळी योग्य आहार देणे,तिची शाळा,अभ्यास या सर्व गोष्टींसाठी व्यवस्थित लक्ष ठेवून होते.
पल्लवीची आई ही तिच्या साठी कष्ट घेत होती. पण बाबा आपल्या पिल्लूची जास्त काळजी घेत होते.
पल्लवीला आईबाबांच्या प्रोत्साहनामुळे आपल्यातील धावण्याच्या गुणाला बळ मिळाले होते. ती ही त्यासाठी खूप परिश्रम घेत होती.

पण पल्लवीच्या आयुष्यात पुढे काही वेगळेच लिहून ठेवले होते.


पल्लवीचे शूज जुने व खराब झाले होते. हे बाबांच्या लक्षात आले होते. तिला शूज चांगले नसल्याने धावताना त्रास होऊ नये आणि तिची स्पर्धेत हार होऊ नये यासाठी त्यांनी तिच्यासाठी नवे शूज आणून तिला सरप्राइज देण्याचे ठरविले.

शूज घेऊन आनंदात घरी येत असताना त्यांना कारने उडविले. जागेवरच त्यांनी प्राण सोडला. लेकीला नवे शूज देवून आनंदाचे सरप्राइज देणार होते पण तिला बिचारीला वेगळेच सरप्राइज भेटले. त्यांचे अकस्मात जाणे हा पल्लवीसाठी,तिच्या आईसाठी खूप मोठा धक्का होता.

पल्लवी आईपेक्षा बाबांच्या जास्त क्लोज होती. तिचे आणि बाबांचे खूप छान बॉंडिंग जमले होते. तिच्या प्रत्येक समस्येला त्यांच्याकडे उत्तर असायचे. तिला त्यांचा खूप मोठा आधार होता.त्यांच्या प्रोत्साहनामुळेच तिने \"एक उत्तम धावपटू\" होण्याचे स्वप्न पाहिले होते. आणि हळूहळू लोकांना तिची ओळख ही होत चालली होती. सर्व काही छान सुरू होते आणि मध्येच असे का व्हावे ? हा प्रश्न तिला सतावित होता.

बाबांच्या जाण्याने पल्लवीला जीवन नकोसे वाटत होते. कशातच लक्ष लागत नव्हते. आता सर्व संपले. असे वाटून रडू यायचे.

माझ्यासाठी शूज आणण्यासाठी बाबा गेले नसते तर...

असे झालेच नसते. त्यामुळे बाबांच्या जाण्याला ती स्वतः ला जबाबदार समजत होती.

शाळा,अभ्यास यातही लक्ष नव्हते. धावणे तर बंदच करून टाकले होते.


पण एके दिवशी स्वप्नात तिला बाबा दिसले आणि म्हणाले," जे झाले त्यासाठी तू स्वतःला जबाबदार नको ठरवू ...कदाचित माझे आयुष्य एवढेच असेल. पण तू तुझे आयुष्य का वाया घालवते आहेस? तू व्यवस्थित अभ्यास कर. तुझ्यातील धावण्याचा जो गुण आहे तो व्यर्थ नको घालू . मला विश्वास आहे की तू एक चांगली धावपटू म्हणून नाव कमवणार. माझे हे स्वप्न तू पूर्ण कर... मी जिंवत नसलो तरी माझे अस्तित्व, माझी सोबत तुम्हा दोघांबरोबर सदैव असेल. "

पल्लवीने आपले हे स्वप्न आईला सांगितल्यावर आईनेही तिला बाबांची इच्छा पूर्ण करण्याचे सांगितले.

पल्लवीने आपल्या आईबाबांचे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरविले.
तिने आयुष्य पुन्हा नव्याने जगायला सुरुवात केली.
शाळा,अभ्यास, सराव या सर्व गोष्टी ठरल्याप्रमाणे करू लागली. मदतीला आई होतीच. ती आपल्या विश्वात रमत चालली होती पण अनेकदा बाबांची तिला आठवण यायची . तिला जेव्हा बाबांच्या मार्गदर्शनाची गरज भासायची तेव्हा तिला आपल्या आजुबाजुला \"बाबा आहेत आणि ते आपल्याला काहीतरी सांगत आहे\" असा आभास व्हायचा.


पल्लवीची अभ्यासातील प्रगती व धावण्याच्या स्पर्धेतील तिला मिळणारे यश यामुळे ती आनंदात होती. आपण आपल्या बाबांचे स्वप्न पूर्ण करू . असे तिला वाटू लागले होते.


राज्यस्तरीय स्पर्धेत निवड होण्यासाठी पल्लवीला एका निवडीच्या स्पर्धेत भाग घेऊन ती जिंकायची होती. त्यासाठी ती खूप मेहनत घेत होती .
पण सरावादरम्यान तिच्या पायाला थोडी दुखापत झाली. तिला धावायलाही त्रास होऊ लागला.

\"आपण जर या निवड स्पर्धेत भाग नाही घेतला,जिंकलो नाही तर पुढची संधीही जाणार. आणि आपले स्वप्न, आपल्या आईबाबांचे स्वप्न पूर्ण नाही करू शकणार.\" या विचाराने ती दुःखी झाली.

पण तिने ठरविले प्रयत्न करून तर बघू..यश नाही मिळाले तरी चालेल पण हार मानायची नाही.

मग ठरल्या दिवशी , ती स्पर्धेत धावण्यासाठी मैदानात उतरली. तिचा पाय दुखत होता पण तिने आपले दुखणे कोणालाही जाणवू दिले नाही.

ती धावायला लागली आणि पायाला जास्त त्रास झाल्यामुळे जागीच थांबली.

तिला आपल्या बाबांची आठवण झाली. आणि काय ...
तिला समोर फक्त तिचे बाबाच दिसत होते. बाकी काही नाही.

बाबा तिला सांगत होते, " पळ बेटा...पळ ...थांबू नको...तुला काही होणार नाही.. मी तुझ्या सोबत आहे."


आणि मग पल्लवीला अंगात एकदम शक्ती आल्यासारखे वाटले आणि वेगाने धावायला लागली.

धावता धावता ती इतक्या वेगाने धावत होती की पुढे गेलेल्या स्पर्धकांना ही मागे टाकून पुढे गेली. दिलेल्या टारगेट पर्यंत जाऊन पहिली आली.आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली , तिची निवड झाली.

तिला खूप आनंद झाला. तिच्या आईलाही खूप आनंद झाला. तिने मनोमन बाबांचे आभार मानले. बाबाही आपल्याला आशिर्वाद देत आहेत असा आभास झाला.

बाबांमुळेच मी ही स्पर्धा पूर्ण करू शकली. असे तिला वाटले.

आज बाबा जरी नसले तरी त्यांचा मला होणारा आभास ही मला सतत प्रेरणा देत असतो.

खरचं, आईवडील आपल्या मुलांवर किती प्रेम करीत असतात! जिंवत असताना तर खूप काळजी घेत असतात. पण देवाघरी गेल्यानंतर ही ते आपल्याला प्रेरणा देत असतात, मार्गदर्शन करीत असतात.
त्यांचे अस्तित्व आपल्याला नेहमीच जाणवत असते ...
त्यांच्या आठवणीतून,त्यांच्या विचारांतून तर कधी त्यांच्या आभासातून.