आभास की वास्तव? (भाग - ५)

आभास आणि वास्तवाच्या कचाट्यात गुंतलेली रहस्यकथा.. सत्य असत्याचा शोध घेणारी कथामालिका..

राज्यस्तरीय करंडक कथामालिका


कथेचे शीर्षक - आभास की वास्तव? 


कथामालिका भाग क्र. - ५


                  केबिनबाहेर आल्यावर संकर्षण आणि युग हे दोघेही सावकाश चालत पोलिस ठाण्याच्या बाहेर आले. नंतर कारच्या बॅकसीटवर लगेज बॅग ठेवून दोघेही पुढच्या सीटवर येऊन बसले. मग सीटबेल्टवगैरे लावून घेताच संकर्षण कार ड्राईव्ह करू लागला. त्याने लगेच पोलिस ठाण्याच्या पार्किंगमधून गाडी युगच्या घराच्या दिशेने वळवली. 


अर्धा रस्ता पार केल्यावर एक पुल लागला तिथे एका झाडाच्या सावलीत संकर्षणने कार थांबवली. एकाएकी कार थांबविण्यामागे संकर्षणला युगने कारण विचारले. त्यावर संकर्षण युगकडे वळून बोलला, " तुला काय झालंय युग? सध्यातरी तू मला अनस्टेबल वाटत आहेस. काही झाले का? तुझी तब्येत ठीक आहे ना? " 


" ह्म्म, काही नाही! तू कार ड्राईव्ह कर ना... मी एकदम ठीक आहे. " युगने विषयाची टाळाटाळ केली. 


" युग लपाछपी खेळायचे वय नाही आपले... म्हणून आता लवकर सांग, काय झालंय नक्की? " संकर्षण नजर रोखून बोलला. 


" राग, राग आणि फक्त रागच येतोय मला आणि तो सुध्दा स्वतःचाच... संक्या, यार... का माझा त्या अपघाताने स्मृतिभ्रंश झाला? आज जर मी या कंडिशनमध्ये नसतो तर कदाचित कित्येक प्रश्न मिटले असते आणि कदाचित आपल्याला आरोपीची खबरही लागली असती... पण आज या घडीला मी हतबल झालोय. डॅम इट! " युग बोलला पण बोलताना युगच्या डोळ्यातली अंगार स्पष्ट दिसत होती. त्याने बोलता बोलता स्वतःच्याच हातावर हातही मारून घेतला. 


" युग! शांत हो जरा! यात तुझी कोणतीच चूक नाही म्हणून स्वतःला दोष देऊ नको. या सर्व घटनेत नियतीनेच घात केला आहे... सारे कळेल रे लवकरच! हे देखील कळेल की, आपल्या मित्राचा अपघात झालाय की खून... पण जो निकाल हाती येईल त्यात आपल्या मित्राला नक्की न्याय मिळणारच; शिवाय इन्स्पेक्टर जोंधळेंही आपल्या सोबत आहेच म्हणून काळजी करू नको. फक्त स्वतःवर आणि आपल्या मैत्रीवर विश्वास कायम ठेव! " संकर्षण युगला धीर देत बोलला. 


" तू बोलतोय ते शंभर टक्के नक्कीच खरं आहे पण संक्या... तूच सांग ना का चीडचीड करू नये मी स्वतःवर? तू स्वतःच बघ ना, आज त्या मोबाईल कॉलवरचं बोलणं मला आठवलं असतं तर सध्या परिस्थिती वेगळी असती, असे वाटत नाही का तुला? " युग अजूनही स्वतःलाच दोष देत होता. 


" युग, मला कळत आहे तुझी कळकळ आणि स्वतःलाच हतबल पाहून होणारी तळमळ! पण ही वेळ स्वतःवरच दोषारोप करून घेत हतबल होण्यासारखी नाही! कारण जर समजा, कुणालचा खून झाला असेल तर आरोपीला हेच अपेक्षित असेल की, आपण असे हतबल व्हावे, स्वतःला दोष देत बसावे अन् मग त्या आरोपीने आपल्याला असे हतबल बघून आपल्यावर हसावे... म्हणून आपल्याला शांत राहणे गरजेचे आहे. असे हायपर होऊन आपण का म्हणून त्या आरोपींना संधी द्यायची आनंद साजरा करण्याची? तुला कळतंय ना, मला काय म्हणायचं आहे ते? " संकर्षण युगची समजूत काढत बोलला. 


" ह्म्म! " युगने मात्र थंड प्रतिसाद दिला. 


" हे बघ युग, थोडा शांत हो आणि धीराने काम घे! हे बघ आपल्याला दिरंगाई करायची नाहीये पण आपल्याला धीर कायम ठेवायचा आहे. जरा एकदा विचार कर! समजा, आपल्या कुणालला कुणी कट करून, एखादे षडयंत्र रचून ठार मारले असेल तर... तर कुणालला न्याय मिळायला हवा ना? आणि तो कसा मिळणार? तर तो न्याय आपणच मिळवून देणार, आपल्या एकीने अन् धीराने! म्हणून आता सध्या शांत हो! स्वतःला सावर! सर्वकाही आपल्या कुणालच्या हिताचेच होईल. विश्वास आहे ना माझ्या गणरायावर आणि तुझ्या कान्हावर! मग नक्की सर्व ठीक होईल... लवकरच! " संकर्षण आशेने बोलला. 


" हो आहे! अगदी अमाप विश्वास आहे! " युग म्हणाला. 


" बास! आणखी काय हवे! तो श्रीकृष्ण सदैव तुझा सखा बनून तुझ्या पाठीशी आहे! म्हणून सर्वकाही लवकरच ठीक होईल पण सध्या तुला संयम साधणे गरजेचे आहे. ते जमले की सारे प्रश्न हळूहळू आपसूकच मिटतील आणि उत्तर हळूच समोर येतील. काळजी नको रे करू! 


                  या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची आपल्यात क्षमता आहे. फक्त वेळोवेळी स्वतःला हतबल करून न घेणे, हेच योग्य आहे. आपल्याला एकमेकांचा आधार व्हायचं आहे पण तत्पूर्वी स्वतःला सावरायचे आहे आणि नंतर एकजुटीने आपल्या कुणालला न्याय मिळवून द्यायचा आहे. समजलं ना तुला! " संकर्षण म्हणाला. 



" ह्म्म! बरोबर बोलतोय तू संक्या! तथ्य आहे तुझ्या बोलण्यात... आता फक्त एकच आशा आहे की, बरं होईल जर माझ्या आठवणी मला लवकर आठवतील तर! म्हणजे मग केस सॉल्व्ह करण्यात तेवढीच मदत होईल. " युग कुणालच्या लगेज बॅगकडे पाहत बोलला. संकर्षणनेही त्या लगेज बॅगकडे पाहून सुस्कारा सोडला. 



" ह्म्म! होईल सगळं नीट, काळजी नको करू! " एवढं बोलून संकर्षणने युगचा मुड ठीक करण्यासाठी कारमधला एफ.एम. लावला. त्यावर मिलिंद गाबाचे ' मैनु मेरे यार मोड दो... ' हे गाणे सुरू होते.


                  ते गाणं ऐकताच युग परत भावनाविवश झाला, संकर्षणही भावूक झाला होता. त्या दोघांनाही कुणाल सोबत केलेल्या गमतीजमती, बालपण ते तारुण्य या प्रवासात जगलेल्या आठवणी सर्वच आठवत होतं पण नंतर गाणं संपताच दोघांनीही एकमेकांना सावरले. त्यानंतर सीटवर नीट बसून मग ते दोघेही युगच्या घरी गेले. 


                   घरी पोहोचल्यावर त्या दोघांंनीही कुणालचे लगेज युगच्या खोलीतील एका अलमारीत नीट ठेवले. नंतर दोघेही फ्रेश झाले. तो दिवस त्यांचा कुणालच्या आठवणीतच गेला. दोघांनीही नीट जेवणही केले नाही. संकर्षणचा मुक्काम युगच्या घरीच असल्याचे आधीच निश्चित होते कारण युगच्या तब्येतीत पाहिजे असा सुधार नव्हता; शिवाय अशा अवस्थेत त्याला एकटं सोडणे धोक्याचेच होते. म्हणून युगच्या खोलीशेजारी संकर्षणची खोली होती. रात्री थोडेफार जेवण करून युगने त्याच्या औषधी घेतल्या. त्यानंतर त्याला लगेच झोप लागली.


                   युग झोपून असल्याची खात्री झाल्यावर संकर्षणने जरा उसासा घेतला आणि नंतर तो गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडी आठवू लागला. त्याने युगवर एक कटाक्ष टाकला आणि त्याची पावले त्या अलमारीकडे वळली, जिथे कुणालचे लगेज ठेवून होते. त्याच्याही नकळत त्याने अलमारी उघडली आणि त्यातून कुणालची लगेज बॅग बाहेर काढली. ती बॅग उघडून त्याने त्या बॅगमधील कपडे तसेच इतर काही फाईल्स बाजूला करून त्यात असलेली एक फोटो फ्रेम हातात घेतली. त्या फोटो फ्रेमला पाहताच संकर्षणचे अश्रू अनावर झाले. त्याने ती फोटो फ्रेम क्षणाचा विलंब न करता छातीशी कवटाळून घेतली कारण ती कुणाल, संकर्षण आणि युग या तिघांच्या बालपणीची फोटो फ्रेम होती. 


" वाटलं नव्हतं, या फोटोमध्ये हसणारा कुणाल एक दिवस असा फोटो फ्रेममध्ये कैद होऊन फक्त एक आठवण बनून राहील! " संकर्षण हळूच पुटपुटला. 


                  काही वेळाने संकर्षणने स्वतःचे अश्रू पुसून घेतले. युगला जाग आली तर तो परत अस्वस्थ होईल, या भीतीने संकर्षणने सगळे नीट ठेवले व लगेज बॅग परत जशीच्या तशी अलमारीत ठेवली. नंतर युगचे पांघरूण नीट करून त्याने लाईट्स ऑफ केले. दार नीट लोटून घेतले आणि नंतर तो त्याच्या खोलीत गेला. संकर्षण बरेचदा कुस बदलत राहिला पण मनातील असंख्य विचाराने त्याला थोडी उशिराच झोप लागली. दुसरा दिवस उजाडला तो दिवसही कुणालच्या आठवणीतच सरला. असेच एकामागोमाग दिवस जाऊ लागले. 



                   म्हणायला दिवसामागून दिवस जात होते पण तेवढेच ते दिवस संकर्षण आणि युगला जड जात होते कारण दिवसागणिक कुणालची अनुपस्थिती त्यांच्या मनाला पोकळ करत होती. असेच काही दिवस सरले. युग अद्याप पूर्णतः स्वस्थ झाला नव्हता म्हणून संकर्षणने शॉपवर प्रामाणिक नोकरवर्ग नेमून घेतला होता; शिवाय संकर्षण स्वतःदेखील अधूनमधून युगची शॉपमधील भूमिका पार पाडायचा. त्याची सर्व कामे तो पाहायचा, जेणेकरून युगचा व्यवसाय तोट्यात जाऊ नये. 


                   संकर्षण युगच्या व्यवसायासाठी घेत असलेली मेहनत पाहून युगला भारावून यायचे आणि म्हणून त्याला त्याच्या अशा जिवाभावाच्या मित्राचा आणि जिवलग मैत्रीचा अभिमान वाटायचा. 


क्रमशः

__________________________________________


©®

सेजल पुंजे.

११/०८/२०२२.

टीम नागपूर. 

🎭 Series Post

View all