आभास की वास्तव?

वास्तव अन् आभासाच्या कचाट्यात गुंतलेली एक रहस्यकथा!
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कथेचे शीर्षक - आभास की वास्तव? 

 भाग -१ 

             युग शरद दीक्षित, वय वर्षे अठ्ठावीस. पुण्यातील 'दिक्षित ज्वेलर्स शॉप'चा एकुलता एक वारसदार. त्याच्या आईवडिलांच्या निधनानंतर अवघ्या तेविसाव्या वर्षापासून त्याने शॉपची जबाबदारी स्वीकारली आणि पाहता पाहता हळूहळू शॉपची प्रसिद्धी ना केवळ पुणे तर अवघ्या महाराष्ट्रभर वाढवली.

             युग हा दिसायला अगदी सर्वसाधारणच होता पण तरीही लाखोंच्या गर्दीतही सहज कुणाचंही लक्ष वेधून घेईल असं उठावदार व्यक्तिमत्त्व होतं युगचं, हे सुद्धा नाकारता येणार नाहीच मुळी!

             थोडक्यात सांगायचं झालं तर सावळा वर्ण, सिल्की आणि सरळ केस, मत्स्य आकाराचे गहिरे निळे डोळे होते त्याचे, एखाद्याला सहज भुरळ पाडतील असेच! चेहऱ्याला शोभून दिसणारी अशी बेअर्ड आणि त्याच्या ओठांवर कायम वास्तव्य मांडणारं स्मितहास्य! उंच बांधा, धडधाकट शरीरयष्टी असा युगचा आऊटर अपिअरन्स होता.

             मुळात युगचा शांत स्वभाव असल्याने त्याचे फार कमी मित्र होते. पण त्याचे मोजून मापून काही निवडक मित्र देखील होते, त्यापैकीच एक म्हणजे 'संकर्षण प्रकाशराव देशपांडे.' तो युगचा जिवलग मित्र होता.

             संकर्षण खरं पाहता दिसायला अगदीच सर्वसाधारण पण त्याच्या चेहऱ्यावर खुलून दिसणारं मंद हसू नेमके प्रत्येकाचे लक्ष त्याच्याकडे आपोआप आकर्षित करायचे. त्याचा आऊटर अपिअरन्स सांगायचा झाला तर तो म्हणजे गौर वर्ण, कुरळे केस, त्याच्या चेहऱ्याला शोभेल अशी बेअर्ड, मध्यम उंची आणि सडपातळ बांधा. हाच काय तो संकर्षणचा आऊटर अपिअरन्स होता. 

             संकर्षणचा स्वभाव अगदी मनमिळाऊ, दिलखुलास, सहज कुणाशीही जुळवून घेणारा. त्याचे बरेच मित्र असले तरीही युगसाठी त्याच्या हृदयात जी जागा होती ती आजपर्यंत कुणीच घेऊ शकले नाही कारण युग आणि संकर्षणची यारी होतीच तशी लय भारी! 

                युगचा आणखी एक मित्र होता तो म्हणजे 'कुणाल मधुकर राऊत.' तो दिसायला अगदीच भारी! जिममध्ये कसरत करून कमावलेली आकर्षक अशी शरीरयष्टी, बायसेप्स, ट्रायसेप्स सगळंच काही होतं भूरळ घालणारं! त्याची शरीरयष्टी अशी होती जणू देव गंधर्व! कोणत्याही मुलीला सहज आकर्षित करायला पुरेशी असणारी. अगदी सुव्यवस्थित अन् इतर मुलांच्या तुलनेत जरा जास्तच आकर्षक होती त्याची शरीररचना. 

               थोडक्यात सांगायचं झाल्यास त्याची छाती भारदस्त होती, दंड सुध्दा मजबूत आणि संमोहित करणारे, शर्टच्या बाह्या फोल्ड केलेल्या असताना त्याच्या हाताच्या नसा स्पष्ट दिसायच्या. सिक्स पॅक्स, ऍब्ज सगळं नीटनेटकं होतं. कदाचित म्हणूनच कित्येक मुली निव्वळ त्याच्या शरीरयष्टीच्या दिवान्या होत्या. पण त्याच्या शरीररचनेशी तुलना केल्यास त्याचा चेहराही त्या स्पर्धेत मागासलेला नव्हताच. 

               गव्हाळ वर्ण, त्याच्या चेहऱ्याला शोभून दिसेल अशी स्टायलिश हेअरस्टाईल, मध्यम आकाराचे डोळे, गालावर पडणारी खळी, हलकीशी बेअर्ड पण यात भर घालायची ती त्याची फुल ऍटिट्युडने भरलेली दिमाखदार स्माईल. तर असा हा कुणाल राऊत! अन् असे हे तिघे संकर्षण, कुणाल आणि युग तिघेही बालपणापासून जिवलग मित्र होते. 

              पण या तिघांच्या जिवलग मैत्रीला दृष्ट लागली कारण नुकताच एक महिन्याआधी कुणालचा एका कार अपघातात मृत्यू झाला होता. कार अपघात होण्याचं कारण होतं की, कुणालने दारूसह इतर मादक द्रव्याचे सेवन केले होते आणि त्याच धुंदीत कार चालवत असल्याने त्याची कार एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकला धडकली. अपघात एवढा गंभीर झाला की, ट्रकच्या ड्रायव्हरसह कुणालचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. 

                 दुर्दैवाने कुणालचा मृत्यू ज्यादिवशी झाला, त्यादिवशीच युगची फ्लाईट क्रॅश झाली होती. सुदैवाने युगचा जीव वाचला मात्र त्याच्या डोक्यावर भयंकर गंभीर जखम झाल्याने साधारण एक वर्षे आधीच्या सर्व आठवणी तो विसरला होता. जणू तो अख्खा एक वर्षाचा काळ त्याच्या आठवणीतून गहाळ झाला होता म्हणून त्या एका वर्षात घडलेली एकही घटना त्याला पुसटशी सुध्दा आठवणे म्हणजे जवळजवळ अशक्यच होतं. 

                जवळपास एक आठवड्यानंतर युगला कोमातून जाग आली तेव्हा तो इस्पितळात होता आणि संकर्षण त्याच्या शेजारी बसला होता. संकर्षण नुकताच ऑस्ट्रेलियाहून त्याची बी.एच.एम.ची म्हणजेच बॅचलर्स ऑफ हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री पूर्ण करून आला होता. आगामी काळात पुण्यातच त्याच्या मोठ्या भावाच्या मदतीने आणि थोड्या बहुत प्रमाणात युगच्या मदतीने एक प्रशस्त सर्व सोयी सुविधायुक्त असं हॉटेल उभारण्याचा त्याने बेत आखला होता. 

                 म्हणूनच स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने संकर्षण ऑस्ट्रेलियाला डिग्री करायला गेला होता. तो ऑस्ट्रेलियाहून त्याची डिग्री पूर्ण करून भारतात येणार होता. तो त्याची डिग्री घेऊन परत येत असतानाच त्याला युगच्या अपघातासह कुणालच्या अपघाती निधनाची वार्ता कळली होती. युगबद्दल खबर मिळताच त्याने युग भरती असलेले इस्पितळ गाठून स्वतःचे बस्तान तिथेच हलवले होते. 

                 त्याने युगला एक क्षणही स्वतःपासून दूर ठेवलं नव्हतं. एवढेच नव्हे तर तो मुक्कामीच होता त्या इस्पितळात! रात्रभर जागरण करायचा. युगला काही गरज पडली तर, रात्री अपरात्री त्याला कोमातून जाग आली तर, असे नानाविध विचार करून तो झोपणेसुध्दा टाळायचा. 

                  संकर्षण ऑस्ट्रेलियाहून भारतात आल्यानंतर साधारण एक आठवड्यानंतर कोमातून युग शुध्दीवर आला. शुध्दीवर येताच त्याला नेहमीच एका कोमा रुग्णाला वा कुठल्याही स्मृतिभ्रंश झालेल्या व्यक्तीला पडणारा साधारण प्रश्न पडला की, नेमकं त्याला काय झालंय? आणि साहाजिकच युगनेही तेच विचारले. त्याच्या त्या प्रश्नाचे उत्तर संकर्षणने डॉक्टरांच्या परवानगीने युगला सांगण्याचे ठरवले. डॉक्टरांनी परवानगी देताच संकर्षणने युगला सर्वकाही सावकाश अन् अगदी विश्वासात घेऊन जेवढी हकीकत संकर्षणला ठाऊक होती, तेवढी त्याच्या परीने सर्व माहिती दिली.

                  सर्व जाणून घेतल्यानंतर कुणालच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून युग पार कोलमडला. त्याला त्याच्या बालपणीच्या सर्व आठवणी आठवत होत्या, ज्या त्याने कुणालसोबत जगल्या होत्या. त्याला कुणीतरी त्याचा जीव हिरावून घेतल्यासारखं वाटत होतं. पण त्या परिस्थितीत त्याला आधार द्यायला संकर्षण युगच्या सोबत होता, कालांतराने याचेही त्याला त्या धक्क्यातून थोडेबहुत सावरल्यानंतर समाधान वाटले. 

                 खरंतर संकर्षणही मनाने पार हादरलाच होता. एका आठवड्यात त्याचं अख्खं जग बदलून गेलं होतं. ' एका क्षणात होत्याचं नव्हतं होणे ' या परिस्थितीचा खरा साक्षीदार वा जिवंत उदाहरण म्हणजे संकर्षण होता. एकाचवेळी त्याने दोन धक्के सहन केले होते, ते देखील त्याच्या जिवलग मित्रांच्या आयुष्याबद्दल.

                 पहिलं म्हणजे तर कुणालचा मृत्यू अन् दुसरं म्हणजे अगदी त्याच दिवशी युगची फ्लाइट क्रॅश झाली होती. कुणालला जरी त्याने गमवाले होते तरी त्याला थोडं मनोमन समाधान वाटत होतं की, निदान युग सही सलामत होता. 

                 फक्त युगचा स्मृतिभ्रंश झाला होता पण आयुष्य गमावण्यापेक्षा आठवणींची गफलत एकवेळ सहन करण्याच्या हद्दीतील आहे, हाच विचार संकर्षणने केला. त्याने एक मित्र गमावला होता म्हणून कोमात असलेल्या युगला त्याला गमवायचं नव्हतं. युग कोमात असतानाही संकर्षण त्याच्याशी वारंवार बोलायचा, दररोज युगला शुध्दीवर येण्याची आग्रहाची विनंती करायचा, त्याच्याही नकळत त्याचा ताबा सुटायचा अन् तो रडायचा सुद्धा! आपल्या मित्राच्या अशा आग्रहाला कोणता मित्र नकार देणार? कदाचित म्हणूनच युगला कोमातून अवघ्या आठ दिवसात शुद्ध आली असावी. 

                 थोडक्यात, कोमातून शुद्ध आली म्हणा किंवा कोमात गाढ झोपलेल्या युगला संकर्षणने अलार्म बनून खडबडून जागे केले म्हणा, सगळं काही एकच आहे! शेवटी महत्त्वाचं ते एवढंच की, एका मित्राच्या हाकेने दुसरा मित्र मैत्रीच्या ओढीने प्रतिसाद देत जागा झाला. 

                खरं सांगायचं झालं तर युगच्या डोक्याला झालेली जखम ही कल्पनेपेक्षा जास्तच गंभीर होती. म्हणून डॉक्टरांनी तर काही अंशी आशाही सोडून दिली होती की, युगला शुद्ध येईल; कारण तो प्रतिसाद देत नव्हता. पण झोपलेल्या व्यक्तीला कुणीतरी पाणी टाकून उठवावे, अगदी तसाच काहीसा युग कोमाच्या अवस्थेतून शुध्दीवर आला होता. 

                युगचे असे शुध्दीवर येणे म्हणूनच डॉक्टरांना खरंच पेचात पाडण्यासारखे होते पण संकर्षणसाठी तो क्षण आनंदाचा पर्व होता. युगला शुद्ध आली हे जाणून घेता संकर्षण तर केवळ नाचायचा तेवढा बाकी होता. तो उत्साहाच्या भरात कदाचित नाचलादेखील असता पण तो इस्पितळात आहे, हे विसरून चालणार नव्हते. म्हणून त्याने स्वतःच्या आनंदाला आवरले असावे. पण युगला प्रत्यक्षात शुद्ध आलेली पाहून खरंच त्याच्या डोळ्यात पाणी साचले होते. आधीच हळवा असलेला संकर्षण त्या क्षणाला जास्तच भारावून गेला होता. 

               म्हणतात की, खऱ्या भावनेने, निरागस आर्ततेने एखाद्याला साद घातली तर नक्कीच प्रतिसाद मिळतो. कदाचित युग आणि संकर्षणच्या बाबतीतही असेच काहीसे झाले असावे. शेवटी प्रयत्नांतीत परमेश्वर म्हणतात ते काही खोटे नव्हेच! फक्त प्रयत्न हे सच्चेपणाने केलेले असावे, यश हमखास मिळतं, हाच विचार संकर्षणने मनोमन केला. नंतर त्याने त्याच्या लाडक्या गणरायाला वंदन केले व गणरायाचे कोट्यवधी आभार मानले. 

क्रमशः
_________________________________________________

©®
सेजल पुंजे
०१-०८-२०२२.
टीम नागपूर. 
…................................................................................ 


               वास्तव आणि आभास यांच्या कचाट्यात गुंतलेली, रहस्याने नटलेली ही कथामालिका वाचायला विसरू नका. पहिल्यांदाच रहस्यकथा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. अपेक्षा करते एरवीप्रमाणे तुम्हा सर्वांचे मला सहकार्य लाभणार. धन्यवाद. काळजी घ्या.

🎭 Series Post

View all