Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

आभास की वास्तव? (भाग - ३)

Read Later
आभास की वास्तव? (भाग - ३)
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कथेचे शीर्षक - आभास की वास्तव? 

भाग - ३


संकर्षणने विचारलेल्या प्रश्नाविषयी थोडा वेळ विचार केल्यानंतर युग म्हणाला, " हो यार संक्या, ही संभावना सुध्दा आहेच की, कुणालचा अपघात केवळ अपघात नसून पूर्वनियोजित हत्येचा कट असावा. तुला तर माहीत आहेच की, आपला कुणाल साधासुधा व्यक्ती नव्हता. तो तर खूप मोठा बिझनेसमॅन होता शिवाय त्याचे वैरीही भरपूर होते मग काय त्यापैकीच कुणी हत्यारे असावे का? आणि जर असे असेल तर? " युगच्या डोळ्यात राग उफाळून आला होता. त्याचे क्षणोक्षणी हावभाव बदलत होते. 

" तर काय? तेच विचारतोय मी युग? आपण करून करून काय करणार? हातावर हात ठेवून बघ्याची भूमिका घेऊन तमाशा पाहण्याशिवाय? " संकर्षण नाराजीच्या सुरात बोलला. 

" नाही, मी फक्त बघ्याची भूमिका नाही घेणार. मला नाही पटणार ते.. " युग म्हणाला.
 
" युग तुझं ठीक आहे रे, पटणार तर मलाही नाहीच पण आपण आणखी काय करू शकतो? " संकर्षण म्हणाला. 

" तुझं माहिती नाही पण मी ठरवलंय की, जर माझा अंदाज खरा झाला ना संक्या तर, खरं सांगतोय, मी त्या व्यक्तीला सोडणार नाही. मी त्या व्यक्तीचं जगणे अशक्य करणार. तो व्यक्ती मृत्यूसाठी तडफडला ना तरीही मी त्याला मरण देणार नाही. " युग तावातावात बोलत होता. त्याच्या शब्दात तर कमालीची अंगार होती. 

" युग, काय हे? थोडं आवर स्वतःला! तुझा राग समजू शकतो मी पण आपण काही चुकीचे पाऊल उचलू शकत नाही. गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी पोलिस आणि कायदे आहेत, ही सर्व व्यवस्था आहे. कळतंय ना! म्हणून तू नको एवढा हायपर होऊ. " संकर्षण युगचा राग पाहता त्याला शांत करण्यासाठी त्याची समजूत काढू लागला.

" हो, माहिती आहे मला म्हणून आपण एकट्याने काहीच नाही करायचं पण कायद्याच्या मदतीने त्या व्यक्तीला चांगलीच अद्दल घडवायची, फक्त एवढंच म्हणणं आहे माझं! " युग त्याची बाजू मांडून थोडा शांत आवाजात बोलला. 

" ह्म्म, अगदी बरोबर! मलाही पटलं तुझं, मलाही हेच म्हणायचं होतं. " संकर्षण युगला दुजोरा देत बोलला. 

" ह्म्म, बरं! आता चल, कार पोलिस चौकीकडे वळवून घे. आपण आधी तिथे जाऊया नंतर घरी जाऊयात! " युग म्हणाला. 

" ठीक आहे! " एवढे बोलून संकर्षणने कार आळेफाटा पोलिस चौकीच्या दिशेने वळवली. 

                  काही वेळाने थोडे अंतर पार करून कार आळेफाटा पोलीस ठाण्याजवळ थांबली. ते दोघेही कारमधून उतरले. युग अजून पूर्णतः स्टेबल नसल्याने त्याला आधार देत संकर्षण सावकाश चालू लागला. दोन मिनिटातच ते पोलिस ठाण्याच्या आत गेले. तिथे संकर्षणने सभोवताली नजर फिरवली तर हवालदार भिडेला ते दोघे दिसताच त्यांनी दोघांनाही स्वतःकडे बोलावून घेतलं. 

                 हवालदार भिडे जिथे बसले होते, तिथेच संकर्षण आणि युग गेले. संकर्षण काही बोलणार त्याआधीच हवालदार भिडे यांनी कानाला लॅंडलाईन फोन लावला आणि एक कॉल केला. थोडंफार बोलून होताच त्यांनी फोन ठेवला. 

संकर्षण हवालदार भिडे यांच्या चेहऱ्याकडे सूचक नजरेने पाहत असतानाच हवालदार भिडे संकर्षण आणि युगला उद्देशून म्हणाले, " इन्स्पेक्टर साहेबांनी तुम्हा दोघांना त्यांच्या केबिनमध्ये बोलावलंय म्हणून चला, माझ्या मागोमाग या! " 

                आदेश सोडून हवालदार भिडे केबिनच्या दिशेने जाऊ लागले तर त्यांच्या मागोमाग युग आणि संकर्षणही जाऊ लागले. हवालदार भिडे आधी केबिनमध्ये शिरले व त्यानंतर ते दोघे आत गेले. ते तिघेही केबिनमध्ये आत जाताच त्यांना एक व्यक्ती कंबरेवर हात ठेवून पाठमोरा उभा असल्याचा दिसला. धडधाकट शरीरयष्टीवरून तोच व्यक्ती इन्स्पेक्टर असावा, हे ओळखायला त्या दोघांनाही जास्त वेळ लागला नाही. 
   
" सर, कुणाल राऊत केससंदर्भात संकर्षण देशपांडे आणि युग दिक्षित तुम्हाला भेटायला आले आहेत. " हवालदार भिडे त्या पाठमोऱ्या व्यक्तीला उद्देशून बोलले.

हवालदार भिडेच्या वाक्याला उद्देशून तो पाठमोरा व्यक्ती बोलला, " ह्म्म! बरं, ठीक आहे भिडे! तुम्ही आता जाऊ शकता. " 

" ठीक आहे सर! जय हिंद सर! " एवढं बोलून सॅल्युट करून हवालदार भिडे केबिनबाहेर गेले. 

तो पाठमोरा व्यक्ती अजूनही पाठमोरा उभाच होता. त्या दोघांकडे न बघताच तो त्या दोघांना उद्देशून म्हणाला, " मिस्टर देशपांडे आणि मिस्टर दिक्षित, सिट हियर. "

                  दोन खुर्च्यांकडे इशारा करून ते इन्स्पेक्टर बोलले होते. त्यांच्या आवाजातला भरभक्कमपणा जाणून घेत ते दोघे निमूट खुर्च्यांवर जाऊन बसले. त्यांची नजर टेबलवर गेली तर तिथे एक नेमप्लेट होती, त्यावरील नाव युग आणि संकर्षणने मनोमन उच्चारले, " इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे. " 

                  तेवढ्यात तो पाठमोरा व्यक्ती त्या दोघांपुढे उभा राहिला. साधारण पस्तीस वय असलेला तो, गव्हाळ वर्ण, फ्रेंच स्टाईल बेअर्ड, ब्राऊन रंगाचे डोळे अन् त्या डोळ्यात लखलखणारे तेज! त्या इन्स्पेक्टर श्रेयसची धडधाकट शरीरयष्टी पाहून संकर्षण आणि युग या दोघांनीही मनातच त्यांच्या पर्सनॅलिटीची भरभरून प्रशंसा केली. 

ते दोघेही इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे यांना न्याहाळत असतानाच इन्स्पेक्टर श्रेयस त्या दोघांनाही उद्देशून बोलले, " तर युग आणि संकर्षण तुम्हा दोघांना हवालदार भिडे यांनी कळवलं असेलच की, आम्ही तुमच्या मित्राची म्हणजेच कुणाल राऊतची केस फाईल बंद करतोय. तर याविषयी तुम्हाला काही बोलायचं आहे का? म्हणजे तुमचा काही आक्षेप वगैरे आहे का? " इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळेने त्यांची धारदार नजर युग अन् संकर्षणवर रोखून प्रश्न उपस्थित केला. 

" आक्षेप म्हणता येणार नाही सर पण एक प्रश्न आहे. " संकर्षण जरा कचरतच म्हणाला. 

" प्रश्न? " इन्स्पेक्टर श्रेयसने भुवई उंचावून युग आणि संकर्षणकडे पाहिले. 

" हो, प्रश्न म्हणजे सर असे की, ही केस अपेक्षेहूनही लवकर क्लोज केली जात आहे असं वाटतंय आम्हाला. " संकर्षण थोड्या कापऱ्या आवाजात बोलला. 

" का? असे वाटण्यामागील काही खास कारण? " इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळेने धारदार नजर रोखून परत प्रतिप्रश्न केला. 

" हो, म्हणजे सर, खरं सांगायचं तर कुणालने खूप कमी वेळात त्याचा खानदानी व्यवसाय भरभराटीस लावला. त्या वाटचालीदरम्यान त्याचे वैरी देखील बरेच वाढले होते आणि..  " युग बोलता बोलता मध्येच थांबला आणि त्याने एक कटाक्ष संकर्षणवर टाकला. 

" आणि काय युग दिक्षित? हे बघा, तुम्ही कुठलीही माहिती अपूर्ण पुरवण्याचा प्रयत्न करू नका कारण असे झाल्यास अपुऱ्या पुराव्यानिशी तुमच्याच मित्राला आम्हाला योग्य न्याय मिळवून देता येणार नाही; म्हणूनच आम्हाला सहकार्य करा. जर तुम्हाला कुणावर काही शंका असेल तर तुम्ही ते देखील सांगू शकता. तुम्ही दिलेली माहिती गुप्तच ठेवल्या जाईल, याची जबाबदारी मी घ्यायला समर्थ आहे म्हणून तुम्ही बिनदिक्कत सगळं सांगा. " इन्स्पेक्टर श्रेयस युग आणि संकर्षणला विश्वासात घेत म्हणाले. 

                    युगने एकदा संकर्षणकडे पाहिले त्यावर संकर्षणनेही युगला नजरेनेच आश्वस्त केले, त्याचा सकारात्मक इशारा उमजून युगने बोलायला सुरुवात केली. 

" सर, तसा तर कुणाल खूप दिलदार, दिलखुलास व्यक्ती होता पण तो धनाढ्य बापाचा असा मुलगा होता जो एकीकडे श्रीमंत बापाच्या इज्जतीचा बोलबाला करायचा अन् दुसरीकडे त्याच बापाच्या आब्रूचे धिंडवडे काढायचा. थोडक्यात, त्याला बऱ्याच वाईट सवयी होत्या व त्यातलीच एक वाईट सवय म्हणजे दारू, सिगारच्या व्यसनासह ड्रग्ज घेण्याचे व्यसन! " युग म्हणाला. 


" काय? कुणाल राऊत ड्रग्ज घ्यायचा? मग केस तर इथेच क्लोज होतो ना कारण पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार कुणालने ड्रग्ज घेतले होते अन् त्या नशेच्या अवस्थेत ड्राईव्ह केल्यानेच अपघात झाला होता. सो, इट्स क्लियर! इट्स जस्ट ड्रंक ऍंड ड्राईव्ह केस! " इन्स्पेक्टर श्रेयस बोलले. 


" सर, इट्स नॉट टू इजी! आपण सहज अंदाज लावूच शकत नाही की, या केसमध्ये तपास करण्यासारखे काहीच नाही. " युग म्हणाला. 

" म्हणजे? " इन्स्पेक्टर श्रेयसने विचारले.

" म्हणजे सर हेच की, हो! कुणाल ड्रग्ज घ्यायचा आणि त्याच आधारावर केसबाबत निष्कर्ष काढता येईलही पण तरी देखील इतरही बाबी आहेत तपास करण्याकरिता! जसे, कुणालला आणखी एक घाणेरडी सवय होती, ती म्हणजे त्याला मुलींचा भयंकर नाद होता. " युग थोडा अडखळत म्हणाला. 

" ओह, विषय खोल भासतोय. " इन्स्पेक्टर श्रेयस हळूच पुटपुटले. 

" काय सर? " युग बोलता बोलता थांबला. 

" नथिंग, यु मे कंटिन्यू! " इन्स्पेक्टर श्रेयस म्हणाले आणि युग पुढे बोलू लागला. 


क्रमशः
_____________________________________________

©®
सेजल पुंजे. 
०६ -०८-२०२२.
टीम नागपूर. 
_____________________________________________ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//