आभास की वास्तव? (भाग -२८)

आभास आणि वास्तवाच्या कचाट्यात गुंतलेली रहस्यकथा... सत्य आणि असत्याचा शोध घेणारी कथामालिका...

राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कथेचे शीर्षक - आभास की वास्तव? 

भाग - २८


इन्स्पेक्टर श्रेयस सर्व लक्षपूर्वक ऐकत होते. संकर्षणचे पाणी पिऊन होताच त्याने परत बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, " युग ड्राईव्ह करत असताना त्याने धराला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली. तिनेही थोडक्यात तिच्याबद्दल माहिती दिली व मदत केल्याबद्दल युगचे आभार देखील मानले. तो ड्राईव्ह तर करत होता पण तिला कुठे जावे, काहीच कळत नव्हते. ती अक्षरशः ब्लॅंक झाली होती; पण तिला तिच्या पुण्यातील एका मैत्रिणीचा पत्ता माहिती होता. 


                तिने युगला तिच्या मैत्रिणीचा पत्ता दिला व तिथे सोडायला सांगितले. युग धराला घेऊन तिच्या मैत्रिणीकडे गेला तर तिच्या मैत्रिणीने तिच्या बाबांच्या आणि मोठ्या वडिलांच्या भीतीने मदत करायला नकार दिला. हाती निराशा आल्याने धरा खचली होती अन् तेवढ्यात तिला माझी आठवण आली व तिने मला कॉल केला. 


                युगने मला सविस्तर सारे सांगितले होते. म्हणून त्यानंतर मी त्याला आणि धराला पुण्यातील रजिस्ट्रार ऑफिसमध्ये बोलावून घेतले कारण त्यावेळी मी तिथेच होतो. ऑस्ट्रेलियाहून काही दिवसांची रजा घेऊन सरकारी कामे उरकून घ्यायला माझ्या दादाने मला बोलावले होते. माझ्या सांगितल्याप्रमाणे ते दोघेही रजिस्ट्रार ऑफिसमध्ये पोहोचले. माझे काम आटोपवयाचे होते म्हणून मी त्यांना थोडा वेळ वाट बघायला सांगितली. माझे काम आटोपताच मी त्या दोघांजवळ गेलो, तेव्हा धरा तिच्या मैत्रिणीशी बोलत होती. बोलून झाल्यावर ती काळजीत पडली. 


                मी तिची विचारपूस केली तेव्हा तिने सांगितले की, तिचे बाबा आणि मोठे बाबा तिची शोधाशोध करत आहेत. त्यांनी तिच्या मैत्रिणीला कॉल करून विचारपूस केली. तेव्हा नकळत धराची मैत्रीण युगबद्दल बोलून गेली आणि त्यामुळे धराच्या कुटुंबियांना गैरसमज झाला की, युग आणि धराचे प्रेमसंबंध असल्याने ती घरातून पळून गेली. म्हणून तिच्या घरचे युग आणि धराच्या शोधात पुण्यात पोहोचले असून त्यांनी साधारण अंदाज लावला की, ते दोघे रजिस्टर मॅरेज करण्यासाठी पुण्याच्या रजिस्ट्रार ऑफिसमध्ये असतील. म्हणून ते सर्व रजिस्ट्रार ऑफिसमध्ये येण्यासाठी तातडीने निघालेले आहेत. 


                हे सर्व ऐकताच आम्ही तिघेही धास्तावून गेलो होतो. थोडा वेळ तर डोकं गार झालं होतं, अंदाजही लागेना काय करावे आणि काय नाही; पण तेवढ्यात मला एक कल्पना सुचली. मी त्यांना फसवे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला सांगितले. त्या दोघांनीही आधी नकार दिला पण नंतर कुठलाही मार्ग दिसत नसल्याने ते तयार झाले. म्हणून मग मी माझ्या वकिल मित्राच्या ओळखीने झटपट त्यांचे रजिस्टर मॅरेज उरकून घेतले. कराराची कागदपत्रे नंतर बनवायला सांगितली पण तात्पुरते तिच्या कुटुंबाची दिशाभूल करण्यासाठी म्हणून मॅरेज पेपर्सवर स्वाक्षऱ्या करून त्यांचे खोटे लग्न आटोपून घेतले.


                मॅरेज पेपर्सवर सही करताच दुसऱ्याच क्षणाला धराचे कुटुंबीय तिथे पोहोचले. त्यांनी धराला बरीच शिवागीळ केली, नको नको ते आरोप केले अन् सरतेशेवटी युग सोबत प्रेमविवाह केल्यामुळे ती त्यांच्यासाठी मेली, असेही स्पष्ट जाहीर केले. एवढेच नव्हे तर, एकदाही मागे वळून न बघता आल्या पावली गेले. तिच्या आईनेही निदान एकदा तिच्याकडे प्रेमाने पाहिले नाही. त्याउलट तिरस्कारयुक्त नजरेने पाहिले व निघून गेली. ते सर्व जाताच धराने टाहो फोडला. बराच वेळ तिची समजूत घातल्यावर ती शांत झाली. त्यानंतर तिला घेऊन आम्ही युगच्या एका फार्महाऊसवर गेलो. " एवढे बोलून संकर्षणने सुस्कारा सोडला. 


" तुम्हाला कळतंय तुम्ही काय केलं? तुम्ही का म्हणून कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची कल्पना सुचवली? संकर्षण हा भारत देश आहे, पाश्चात्त्य देश नाही. जरी युग तुमचा मित्र होता तरीही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे बरेच तोटे असतात. म्हणूनच आपल्या देशात अशा विवाहपद्धती फारशा प्रचलित नाहीत. शिवाय भारतासारख्या देशात विवाहाला कार्य मानले जात नाही तर एक संस्कार मानला जातो आणि तुम्ही या संस्काराची चेष्टा केली, असे नाही का वाटत तुम्हाला? " इन्स्पेक्टर श्रेयस बोलले. 


" मला माहीत आहे सर, मी तो सल्ला देणे चुकीचे होते; पण त्यावेळी मला जे सुचले ते मी सुचविले. आम्ही धराच्या कुटुंबियांना सत्य सांगू शकणार नव्हतो कारण धराने आधीच तिच्या कुटुंबियांची समजूत घालण्याचे वा त्यांना कन्व्हिन्स करण्याचे साम, दाम, दंड, भेद वापरून अतोनात निष्फळ प्रयत्न केले होते. म्हणून परत एकदा धोका पत्करणे सोयीचे वाटले नाही आणि म्हणूनच त्यांच्या डोक्यातील संशयाच्या किड्याला खतपाणी घालून कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा उपाय मला श्रेयस्कर वाटला. " संकर्षणने त्याची बाजू स्पष्ट केली. 


" तरीही चूक ते चूक असतं! " इन्स्पेक्टर श्रेयस बोलले. 


" मला माहीतीये सर! आणि त्यासाठी मी खरंच माफी मागितली होती धरा अन् युगची! " संकर्षण बोलला. 


" ह्म्म! असो! पुढे काय झालं? " इन्स्पेक्टर श्रेयस बोलले. 


" तो दिवस दगदगीतच गेला. दुसऱ्या दिवशी आम्ही तिघांनी एक वर्षाचा करार करायला माझ्या वकिल मित्राला फार्महाऊसवर बोलावले. त्याला स्पष्ट सांगितले की, युग आणि धरा हे विवाहित जोडपे आहेत, याची खबर कुणालाही लागता कामा नये. त्यानंतर आम्ही त्याला अटी व नियमांसह करार बनवायला सांगितला. त्याने आधी कच्च्या नोंदी करून घेतल्या व नंतर कराराचा मायना काय असेल, याचा थोडक्यात अंदाज घेऊन तो रवाना झाला. 


                साधारण एक - दोन दिवसात त्याने लेखी करार बनवला व तो आम्हाला दाखविला. त्यावर त्या दोघांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. त्यानंतर त्याची प्रत्येकी एक प्रत मला, धराला आणि युगला दिली. तसेच त्याने एक प्रत स्वतःकडे जपून ठेवली, जेणेकरून भविष्यात काही अडचण येऊ नये! कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सर्व काम आटोपताच आम्ही तिघेही थोडे निवांत झालो होतो. धराबद्दल कुणालाही काही कळता कामा नये म्हणून तिची राहण्याची सोय युगच्या फार्महाऊसलाच केली. माझ्या रजा फार कमी असल्याने मला ऑस्ट्रेलियाला परत जाणे अनिवार्य होते.


                माझी रजा संपण्याच्या एकदिवस आधी मी युगला धराची काळजी घेण्यासाठी बजावले. माझ्या मनात तिच्याविषयी असणारे प्रेम, काळजी, माया त्याला ठाऊक होती म्हणून त्यानेही मला आश्वस्त केले; पण तरी भावाचं हृदय बहिणीसाठी कायमच धडपडत असतं. म्हणून मी युगला विनंती केली की, तो दिवसभर त्याच्या कामात व्यग्र राहिला तरी चालेल पण निदान त्याने रात्री फार्महाऊसवरच राहावे. त्यामुळे तिला एकलकोंडेपणा भासणार नाही, तेवढीच तिला त्याची सोबत होईल; कारण या शहरात नवखी असल्याने तिची कुणाशी ओळख असणेच अशक्यप्राय... युगने त्यासाठीही हरकत दर्शविली नाही म्हणून धराची जबाबदारी युगवर सोपवून मी ऑस्ट्रेलियाला माघारी गेलो. 


                मी तिकडे ऑस्ट्रेलियामध्ये माझी बी. एच. एम. च्या पदवीचे शिक्षण घेत होतो. इकडे युग त्याचा व्यवसाय आणि धरा शासकीय इस्पितळात इंटर्नशिप करत होती. सगळं छान सुरू होतं. पाहता पाहता दिवस जात होते. आम्ही तिघेही व्हिडीओ कॉल किंवा साधा फोन कॉल करून एकमेकांची विचारपूस करायचो. हळूहळू त्या दोघांच्या अनोळखीपणाची जागा मैत्रीने घेतली अन् मैत्रीची जागा प्रेम घेऊ लागले होते. ते दोघेही एकमेकांची काळजी करायचे, मन जपायचे. त्यांना एकमेकांची खूप जास्त सवय लागली होती. म्हणूनच तर कधी ते एकमेकांत गुंतले, त्यांचे त्यांनाही कळले नाही... पण ते दोघेही कबूल करायला तयार नव्हते. जे प्रेम त्यांच्या डोळ्यात झळकायचे ते प्रेम व्यक्त करणे दोघेही टाळायचे. 


                म्हणूनच मी खोटा खोटा प्रस्ताव त्या दोघांपुढे मांडला. मी युगला कॉल करून सांगितले की, धरासाठी मी एक मुलगा पाहिलाय आणि तो मुलगा धरालाही हमखास पसंत येईल. ते कळताच युगचा चेहरा पडला होता पण त्याने तसे दाखवले नाही. दुसरीकडे मी धरालाही एकांतात कॉल केला आणि तिला सांगितले की, युगची एक मैत्रीण त्याला खूप पसंत करते आणि ती यावेळी त्याला लग्नासाठी मागणी घालणार असल्याचे सांगितले... आणि युग तिला नकार देणार नाही, असे चित्र रंगविले. त्यामुळे तीदेखील उदास झाली. दोघेही एकमेकांना गमावण्याच्या भीतीने धास्तावले होते अन् एक दिवस दोघांनीही त्यांच्या एकमेकांप्रती असलेल्या भावना, त्यांचे प्रेम कबूल केलेच पण माझ्यापुढे... त्यांना एकमेकांपुढेही कबुली द्यायची होती पण त्यांना भीती वाटत होती. 


                त्यांनी लाख प्रयत्नही केले प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे मन व्यक्त करण्याचा पण त्यांना मनातले प्रेम व्यक्त करताच आले नाही... परंतु, एक दिवस युगच्या फार्महाऊसवर योगायोगाने कुणाल आला आणि जणू नकळतच का होईना पण योगच जुळून आला, त्या दोघांनीही त्यांच्या प्रेमाची कबुली देण्याचा... " जुन्या आठवणी सांगताना संकर्षणच्या ओठांवर स्मित होतं पण त्या स्मित हास्याला एक वेदनेची किनारही होती. संकर्षणचे डोळे अलगद पाणावले. त्याने रुमालाने डोळे पुसले. थोडा खोल श्वास घेतला व पाणी पिऊन झाल्यावर अगदी दोन क्षणांसाठी विसावा घेतला. 


क्रमशः

___________________________________


©®

सेजल पुंजे. 

०८-०९-२०२२.

टीम नागपूर. 

                  


🎭 Series Post

View all