आभास की वास्तव? (भाग - १९)

आभास आणि वास्तवाच्या कचाट्यात गुंतलेली रहस्यकथा... सत्य आणि असत्याचा सुगावा घेणारी कथामालिका...

राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कथेचे शीर्षक - आभास की वास्तव? 

भाग - १९


संकर्षणने हाक मारताच डॉ. शुभम माने विचारातून बाहेर आले आणि संकर्षणला म्हणाले, " माझ्या मते, युग अलमोस्ट ठीक आहे. फक्त अति ताणामुळे हे सर्व घडतंय. सध्यातरी तो आभासी जगात वावरतोय. त्याला सारखे भास होत आहेत आणि त्यामुळे त्याला होणारे भास हे प्रत्यक्ष वास्तविक जगात घडले आहे किंवा घडणार आहेत, असं त्याला वाटतं. हा केवळ त्याच्या मनाचा समज आहे पण लवकरच दूर होईल. " 


" बाप्पा करो नि लवकर सारे पूर्ववत होवो! " संकर्षणच्या वाक्याला दुजोरा देत डॉ. शुभम माने यांनी हुंकार भरला व नंतर दोघांनीही वर बघून बाप्पाला नमस्कार केला. 


                दुसरीकडे दारापाशी उभे असलेल्या संकर्षण आणि डॉ. माने यांच्या पाठमोऱ्या आकृत्यांकडे युग पाहत होता. त्याला इंजेक्शनमुळे फक्त दोन मिनिटे गुंगी आली होती त्यानंतर त्याला आपोआप जाग आली होती. म्हणून तो बेडवर लोळूनच गपगुमान त्या दोघांकडे बघत होता अन् तेवढ्यात अचानक त्याची नजर बेडवर गेली. 


                काही क्षणांसाठी त्याची नजर बेडवरच स्थिरावलेली होती अन् तेवढ्यात त्याचे डोळे आपोआप विस्फारले गेले कारण त्या बेडवर अगदी तीच डायरी होती जी डायरी धराकडे होती. बेडवर धराची डायरी पाहता त्याला परत दरदरून घाम फुटला. तो घाईघाईने थोडा नीट उठून बसला आणि त्याने एक आवंढा गिळून अन् जरा घाबरूनच ती डायरी हातात घेतली व तिला उघडली. त्या डायरीचे पहिले पान उघडताच त्या डायरीच्या पानातून ओठांचा आकार तयार झाला. हळूहळू त्या ओठांची हालचाल झाली व डायरीतून कर्णकर्कश असा आवाज बाहेर पडला. तो आवाज अगदी रडवेला व अधूनमधून हुंदके देणारा होता. त्याच कर्णकर्कश आवाजात खामोशियॉं गाण्याचे बोल युगच्या कानी पडू लागले...


खामोशियाँ आवाज़ हैं... तुम सुनने तो आओ कभी... 

छूकर तुम्हें खिल जाएंगी... घर इनको बुलाओ कभी... 

बेकरार हैं बात करने को... कहने दो इनको ज़रा... 

खामोशियाँ... तेरी मेरी, खामोशियाँ... 

खामोशियाँ... लिपटी हुई, खामोशियाँ... 


                त्या कर्णकर्कश आवाजाचा वेग वाढू लागला आणि युगच्या कानातून हळूहळू रक्त निघू लागलं. त्याला तो आवाज असह्य झाला व त्याने घाईघाईतच ती डायरी बंद करून खाली फेकून दिली. तो अजूनही कानावर हात ठेवून होता. थोड्या वेळात आवाज हळूहळू नाहीसा होऊ लागला पण युग मात्र भेदरलेल्या अवस्थेत त्याने खाली फेकलेल्या डायरीकडे कानावर हात ठेवून बघतच राहिला. तेवढ्यात त्याच्या कानाला एक वाऱ्याची झुळूक शिवून गेली पण त्या हवेच्या झुळूकेच्या प्रवाहातून त्याला एक वाक्य ऐकू आले, ' काही रहस्य हे उलगडलेलेच बरे असतात! '


               तो आवाज ऐकून युग आणखी जास्त घाबरला. त्याने सभोवताली चौफेर नजर फिरवली पण त्याला कुणीच दिसले नाही अन् तेवढ्यात त्याची नजर त्याच्या ड्रेसिंगटेबलकडे गेली. ड्रेसिंगला असलेल्या आरशातले दृश्य पाहून त्याचे डोळे बरेच विस्फारले. युग अगदी नखशिखांत घाबरलेला होता. तो घाबरूनच घाईगडबडीत त्याच्या बेडवरून उठण्याची धडपड करू लागला. त्याची नजर आरशावरून एक क्षणही हलत नव्हती कारण त्याला आरशात कुणालची अतिशय विद्रूप प्रतिमा दिसत होती व हळूहळू आरशातील कुणालची प्रतिमा आरशातून बाहेर येत असल्याचे युगला दिसले.


             कुणालचा चेहराही विद्रूप भासत होता. कुणाल खूप वेडेवाकडे चाळे करून दात विचकत हळूहळू आरशातून बाहेर येत होता. त्याला पाहून युगला भयानक घाम फुटू लागला अन् त्याची दातखिळीच बसली... पण तरीही तो महत्प्रयासाने तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला यश मिळत नव्हते. दुसरीकडे कुणाल आरशातून एकेक पाऊल टाकून अगदी तेवढ्याच वेगाने युगच्या दिशेने ' काही रहस्य हे उलगडलेलेच बरे असतात! ' हे वाक्य म्हणत वेडावाकडा हसत येत होता. 


                परत एकदा युगने भीतीने एक आवंढा गिळला व तो हळूहळू बेडच्या मागच्या दिशेने बेडवरूनच सरकत जात होता आणि अचानक त्याची पाठ भिंतीला टेकली. आता त्याला मागे जायला मार्ग नव्हता म्हणून युग हळूहळू बेडवरून उठून बाहेर जाण्याची धडपड करत होता. तेवढ्यात युगला त्या डायरीची हालचाल होताना जाणवली. तो डायरीकडे पाहत असताना क्षणार्धात त्या डायरीची पाने लागोपाठ पालटू लागली अन् त्यातून परत कर्णकर्कश आवाज येऊ लागला. परत एकदा तेच खामोशियाँ गाण्याचे बोल ऐकू येऊ लागले अन् तो आवाज अगदी रडवेला होता. अधूनमधून हुंदकेही बाहेर पडत होते. 


                दुसरीकडे युगची धडपड सुरूच होती आणि अचानक ती डायरी तोच कर्णकर्कश आवाज करून युगच्या दिशेने येऊ लागली. त्या आवाजाने युगच्या कानातून रक्त सातत्याने वाहतंच होतं. त्याने उजव्या हाताने कानाला बोट लावून बघितलं त्यातून रक्त येत असल्याचं त्याला जाणवलं. तो बोटाकडे पाहतच राहिला. एकीकडे त्याच्या दिशेने येणाऱ्या कुणालकडे त्याची एक नजर होती आणि त्याची एक नजर डायरीवर स्थिरावलेली होती. तो आळीपाळीने डायरी अन् कुणाल या दोघांकडे पाहत होता. दुसऱ्याच क्षणी त्या डायरीने आणि कुणालने एकत्रच युगच्या चेहऱ्यावर झडप घेतली. शेवटी एक भयावह किंकाळी फोडून युगने त्याचे डोळे मिटले. 


                युगची किंकाळी संकर्षण आणि डॉ.शुभम मानेच्या कानावर पडताच दोघांनीही युगकडे पाहिले तेव्हा त्याला पाहून दोघेही घाबरले आणि धावतच त्याच्याजवळ गेले. त्याच्याजवळ जाताच त्यांना दिसले की, युग अगदी मोठे डोळे करून ड्रेसिंगटेबलकडे पाहतोय अन् बेडवर जोरजोरात लागोपाठ हातपाय आपटत आहे. ते दोघेही त्याला हाक मारत होते पण युग वेगळ्याच धक्क्यात होता. त्याच्या कानावर त्या दोघांचेही आवाज पडत नव्हते. तो फक्त मोठमोठ्याने श्वास घेत होता. तुटक बोलत होता पण ते देखील नीट कळत नव्हते.


                युगला असे पाहून संकर्षण आणि डॉ. शुभम दोघेही घाबरले होते. ते त्याला वारंवार हाका मारून आणि त्याच्या हातांना व पायांना घासून शुध्दीवर आणण्याचा प्रयत्न करत होते पण युग योग्य प्रतिसाद देत नव्हता. म्हणून संकर्षणने बेडनजीक असलेल्या टेबलवरील पाण्याच्या जारमधून थोडे पाणी हातावर घेतले व नंतर पाण्याचे शिंतोडे युगवर उडवले पण तरीही युग धक्क्यातून सावरलाच नाही. म्हणून घाईघाईत संकर्षणने अख्ख्या जारमधले पाणी जसेच्या तसे युगच्या चेहऱ्यावर फेकले आणि योगायोगाने युगने डोळ्यांची उघडझाप केली. तो धापा टाकू लागला. त्याला बऱ्यापैकी शुद्ध आल्याचे कळताच संकर्षण आणि डॉ. शुभम माने यांनी सुस्कारा सोडला. त्यांच्या जीवात जीव आला. 


ते दोघेही त्यांचे वाढलेले हार्टबीट्स आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते आणि तेवढ्यातच युग बोलला, " संक्या... कुणाल... कुणाल इथेच आहे. संक्या, ती डायरी... ती धराची डायरी ती देखील इथेच आहे. ती डायरी बोलू शकते. त्या... त्या डायरीचे पान उघडताच त्यातून आवाज येतो. त्यातून कानांना वेदना देणारा असा कर्णकर्कश आवाज येतो. कुणाच्या तरी रडण्याचा... तो आवाज खूप असह्य असतो संक्या... खूप असह्य... संक्या, ती इथेच आहे. संक्या, कुणाल सुद्धा इथेच आहे पण तो माझ्या विरोधात आहे. त्याने माझ्यावर झडप घेतलेली... तो फक्त आपल्या कुणालसारखा दिसतो पण तो कुणाल नाहीये. तो कुणी दुसरा आहे, ज्याला माझा जीव घ्यायचा आहे. संक्या, म्हणून इथून खूप दूर जाऊ आपण... खूप दूर... जिथे कुणीच नसणार... कुणीच नाही... संक्या... कुणाल... ती डायरी... " 


युग तुटक तुटक बोलत होता. जोरजोरात श्वास घेत होता. बोलता बोलता त्याला धाप लागली. डॉ. शुभमने लगेच पाणी आणले व त्याला दिले. संकर्षण युगला मिठी मारून शांत करत होता पण युग शांत होईना. तो वारंवार तेच बडबडत होता मग संकर्षण युगच्या पाठीवर हात फिरवून त्याला म्हणाला, " युग, शांत हो! हे बघ, ऐक माझं! मला सांग, कुणाल इथे कसा असणार? कुणालचा मृत्यू झालेला आहे. हो ना? " 


" हो! हो पण तरीही कुणाल इथेच आहे. तो आणि ती डायरी त्या दोघांनी एकत्रच माझ्यावर झडप घेतली होती. कुणाल आणि ती डायरी संक्या... " युग म्हणाला आणि त्याने डायरी दाखविण्यासाठी बेडकडे इशारा केला. संकर्षण आणि डॉ. शुभम दोघेही एकदा बेडकडे आणि एकदा युगकडे आळीपाळीने पाहू लागले. युग मात्र डोळे विस्फारून बेडकडेच पाहत राहिला. 


क्रमशः

_______________________________________


©®

सेजल पुंजे

२६-०८-२०२२.

टीम नागपूर. 

🎭 Series Post

View all