Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

आभास की वास्तव? (भाग - ९)

Read Later
आभास की वास्तव? (भाग - ९)

राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कथेचे शीर्षक - आभास की वास्तव? 

भाग - ९


डॉ. माने यांनी औषधांची यादी संकर्षणच्या हातात देताच युग त्यांना उद्देशून म्हणाला, " आता ह्या मेडिसिन्स कशासाठी? मी तर पूर्णपणे ठीक आहे ना! " 


" हो युग, तू शंभर टक्के बरा आहेस! म्हणूनच यापैकी काही औषधी जेव्हा तुला अस्वस्थ वाटेल तेव्हाच घ्यायच्या आहेत आणि काही औषधी तुला रोज घ्यायच्या आहेत पण त्या फक्त झोपेच्या गोळ्या आहेत. झोपेच्या गोळ्यांनी तुला शांत झोप लागेल नि मग तुला ती वाईट स्वप्ने दिसणार नाहीत. याउपर काहीच होणार नाही. " डॉ. माने बोलले. 


" ओह! असं असेल तर मग ठीक आहे. " युग म्हणाला. 


" ह्म्म! बरं! काळजी घ्या दोघेही! आता मी येतो. " डॉ. माने यांनी असं म्हणताच युग आणि संकर्षण त्यांना बाहेर अंगणापर्यंत सोडायला आले. 


डॉ. माने त्यांच्या कारमध्ये बसण्याआधी संकर्षण आणि युगला उद्देशून म्हणाले, " तुम्ही दोघेही एकत्रच भटकंती करायला जा! युगला एकांताची गरज आहे एकटेपणाची नाही! म्हणूनच संकर्षण तू त्याची सावली बनून राहा. तुम्ही दोघे जमेल तेवढ्या लवकर तुमचा प्लॅन बनवा आणि फिरून या मोकळ्या हवेत! काळजी घ्या तब्येतीची आणि एकमेकांचीही... आणि कधीही काही गरज लागली तर मी आहेच. आता येतो मी, बाय! " 


                डॉ. माने यांनी युग व संकर्षणचा निरोप घेतला व ते त्यांच्या क्लिनिकला गेले. दुसरीकडे साधारण दोन दिवसांनंतर संकर्षण आणि युग यांनी 'दिक्षित ज्वेलरी शॉप'ला सुट्टी ठेवून सर्व कर्मचाऱ्यांना रजा दिली. मग ते दोघेही ठरविल्याप्रमाणे त्यांची जिप्सी घेऊन खंडाळ्याच्या दिशेने निघाले भटकंती करायला!


                साधारण पावणे दोन तासाच्या प्रवासानंतर युग आणि संकर्षणची जिप्सी खंडाळा तालुक्यात शिरली. संध्याकाळी चार वाजता ते पुण्याहून निघाले होते. आताशा साधारण पावणे सहा वाजत आले होते. 


                उन्हाळ्याचे दिवस असल्याने सांजही उजळून निघाली होती. आकाशात सुंदर अशी आभाही दाटलेली होती. ओपन जिप्सी असल्याने आजूबाजूचा परिसर न्याहाळत दोघेही सावकाश प्रवास करत होते. साधारण अर्ध्या तासानंतर त्यांची जिप्सी अंबरवाडी या गावाच्या सीमेनजीक पोहोचली. नजीकच्या एका लहानशा हॉटेलसमोर जिप्सी पार्क करून त्या दोघांनीही थोडा ब्रेक घेण्याचे ठरवले. हॉटेलमध्ये खूप तुरळक लोक होते त्यामुळे त्यांनी तेथे थोडा नाश्ता केला.


नाश्ता करताना संकर्षण युगला म्हणाला, " युग, मला वाटतं पुढेही एखादं हॉटेल असेलच. जर ते गावातल्या गावातच असेल तर आपल्याला एवढी अडचण होणार नाही. म्हणून आपण त्याच हॉटेलमध्ये रुम बुक करुया. "


"हो, चालेल! तू म्हणालास तसेच करुयात! " युग हसून म्हणाला. 


                युगनेही संकर्षणला दुजोरा दिल्याने गावातलेच एखादे हॉटेल बघून तिथेच रुम बुक करण्याचा बेत आखून दोघेही जिप्सी घेऊन अंबरवाडी गावात शिरले. दुरून ते गाव खूप सुंदर दिसत होतं पण जसजशी जिप्सी त्या गावात शिरत होती तसतसे त्या गावाचे सौंदर्य पाहता युग आणि संकर्षण अवाक् झाले होते. अक्षरशः तो परिसर पाहून दोघेही मंत्रमुग्ध झाले होते अन् त्यांच्याही नकळत त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले होते. 


                ते दोघे असेच सभोवतालच्या परिसराचा आस्वाद घेत असताना त्यांची नजर एका ठिकाणी स्थिरावली. तिथे एक म्हातारा इसम पाठमोरा उभा होता. त्या दोघांनीही त्या इसमाकडे थोडी विचारपूस करण्याचे ठरवले व त्यासाठी दोघे त्या इसमाकडे गेले. 


" काका, इथे एखादे हॉटेल आहे का? म्हणजे जिथे एखादी रुम बुक करून आम्हाला मुक्काम करता येईल? " संकर्षणने चौकशी केली. 


" नाही, इथे असे कोणतेच हॉटेल नाही. इथे साधे हॉटेल बरेच आहेत पण राहण्याची व्यवस्था असलेले हॉटेल फक्त शहरी भागात आहेत. " तो म्हातारा इसम म्हणाला.


                विचारपूस केल्यावर हाती निराशा आलेली पाहून युग आणि संकर्षण थोडे विचारात पडले. अचानक वातावरणातही बदल झाला होता. तसेच हळूहळू पाऊस पडण्याची शक्यता दाट झाली होती. ते दोघे त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी काही उपाय निघेल की नाही याचा विचार करत असतानाच त्या म्हाताऱ्या इसमाने त्यांना हाक दिली. 


" तुम्ही दोघे इथे नवीन आहात वाटतं. शिवाय येथील रस्त्याचीही जाणीव तुम्हाला दिसत नाही. माझ्या घरी माझी तरुण नात आहे. जर तुम्हाला माझ्या घरी मुक्काम करायला सांगितले तर पंचक्रोशीत उगाच चार गोष्टी ऐकाव्या लागतील. म्हणून मी तुम्हांला माझ्या घरी राहण्याचा सल्ला देऊ शकत नाही... पण तुमची परिस्थिती बघता मी एका घराचा पत्ता तुम्हाला देतो. ते घर पडीक आहे तिथे कुणाचाही वावर नाही. त्या घराचे मालक परदेशी राहतात बहुतेक! म्हणून काही दिवस तुम्ही दोघे आरामात तिथे राहू शकता. 


                तिथे तुमच्या राहण्याची सोय होईल शिवाय तुम्ही त्या घरी का राहता असा तुम्हाला कुणी जाब देखील विचारणार नाही. फक्त इतर काही सोयीसुविधा ज्या आवश्यक असल्या तरी त्या तिथे नसतील. तेवढे ऍडजस्ट करून घ्या. तसेच जेवणाची सोयही तुम्हाला स्वतःलाच करावी लागेल. जर तडजोडीने तिथे मुक्काम करायला तुमची काही हरकत नसेल तर हा घ्या पत्ता... " त्या म्हाताऱ्या इसमाने एका चिठ्ठीवर पत्ता लिहून दिला.


                ती चिठ्ठी हातात घेत संकर्षण आणि युगने एकमेकांकडे पाहिले. ते दोघेही तो पत्ता मिळताच भलतेच खूश झाले होते कारण असे वातावरण असताना त्यांच्या राहण्याची सोय झाली, यातच त्यांना समाधान वाटत होते. त्यांनी त्या इसमाचे आभार मानले व ते लगेच जिप्सीमध्ये बसून त्या घराचा पत्ता शोधायला निघाले. जिप्सी थोडी आडवळणावरून पुढे गेली व एका ठिकाणी थांबली. तिथेच ते घर होतं! त्या घराच्या आसपास कोणतंच घर नव्हतं. त्या घराच्या सभोवती ऐसपैस अंगण होतं आणि मधोमध ते घर होतं. एखाद्या वाड्याप्रमाणे प्रशस्त पहुडलेलं!

  

                संकर्षण आणि युग दोघेही त्या घराला पाहून आश्चर्यचकित झाले कारण त्या म्हाताऱ्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे घराची अवस्था नव्हतीच मुळी! ते कोणत्याच अंगाने पडीक घर वाटत नव्हते. याउलट त्या घराभोवती फुलांच्या झाडांनी वेढा घातलेला होता. तसेच अख्खे घर छान उजळून दिसत होते. 


                 त्या घराची अशी रोशनाई पाहता दोघांनाही वाटलं की, कदाचित ते दुसऱ्या पत्त्यावर आले असावे म्हणून त्यांनी परत एकदा चिठ्ठीत दिलेला पत्ता तपासून पाहिला. पत्ता पाहताच लक्षात आले की, ते दोघे योग्यच ठिकाणी आले होते. म्हणून दोघे जरा कचरतच त्या घराचे फाटक उघडून आत गेले. फाटकाचा थोडा आवाज झाला, युगने फाटक नीट लावले आणि नजर त्या घराकडे वळवली. त्या घराच्या व्हरांड्यावर एक झोपाळा होता अन् तिथे एक पंचविशीतील तरूणी झोपाळ्यावर बसून डोळे मिटून एक गाणे गुणगुणत होती. 


                 तेवढ्यात ती तरुणी गप्प झाली कदाचित तिला युग आणि संकर्षणची चाहूल लागली असावी. तिने लगेच डोळे उघडले. ते दोघे तिला तिच्याकडेच येताना दिसले म्हणून ती उठून उभी राहिली. 


संकर्षण थोडा अवघडूनच त्या तरुणीशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला. तो म्हणाला, " हॅलो, एक्सक्युज मी! मी संकर्षण आणि हा माझा मित्र युग! आम्ही दोघेही या गावी सहज भटकंती करायला आलेले आहोत. आमचा एखाद्या हॉटेलमध्येच मुक्काम करण्याचा बेत होता पण गावात शिरल्यावर कळलं की, या गावी राहण्याची व्यवस्था असणारे एखादे हॉटेलच नाही. " 


" ह्म्म... " तिने हुंकार भरला व नंतर ती तरुणी त्या दोघांनाही आळीपाळीने पाहू लागली. 


" आम्ही आमचा प्रॉब्लेम एका काकांना सांगितला. ते याच गावकरी आहेत तर त्यांनी आम्हाला या घराचा पत्ता दिला. ते बोलले की, हे घर पडीक असतं. या घराचे मालक परदेशी राहत असल्याने इथे कुणीच राहत नाही तर आम्हाला इथे मुक्काम करता येईल... पण आता तुम्ही इथे राहत आहात म्हणजे हे घर तुमचेच असावे. कदाचित त्या काकांनी चुकीचा पत्ता दिला असावा. " संकर्षण कसनुसं हसून म्हणाला. 


" नाही! तुम्ही योग्य त्या पत्त्यावर आले आहात. आधी हे घर पडीकच असायचे पण गेल्या एक वर्षापासून मी इथे राहतेय. " ती तरुणी थोडे अडखळत म्हणाली. 


" ओह अच्छा! मग ते काका... त्यांना माहीत नाही का? त्यांनी आम्हाला पत्ता दिला ना... " संकर्षण लागोपाठ प्रश्न विचारत होता आणि तो परत काही विचारणार त्याआधी त्या तरुणीनेच त्याला अडवले. 


क्रमशः

_____________________________________


©®

सेजल पुंजे. 

१४-०८-२०२२.

टीम नागपूर. 
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//