आभास की वास्तव? (भाग - ८)

आभास आणि वास्तवाच्या कचाट्यात गुंतलेली रहस्यकथा... सत्य - असत्याचा शोध घेणारी कथामालिका...

राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कथेचे शीर्षक - आभास की वास्तव? 

भाग -  


                साधारण पाच मिनिटांनंतर डॉ. माने यांनी हिप्नॉसिस थेरेपी वापरून युगकडून त्याच्या स्वप्नांची तुटक माहिती गोळा केली आणि प्रत्येक क्षुल्लक माहितीची त्यांच्या नोटपॅडमध्ये नोंद करून घेतली. अर्धा ते एक तास ती थेरेपी डॉ. माने यांनी युगवर वापरली. नंतर त्यांनी हळूहळू त्याला हिप्नोटाइझ्ड अवस्थेतून बाहेर काढले. युगला लगेच पाच मिनिटाने जाग आली. जाग आल्यावर युग बेडच्या मागच्या दिशेने थोडं रेलून बसला, संकर्षण नजीकच्या काऊचवर बसलेला होता तर बेडच्या दुसऱ्या कडेला डॉ. माने युगशेजारी बसून होते. 


थोडा वेळ शांतताच होती पण मग युगनेच मुद्दा छेडून डॉ. मानेची विचारपूस करायला सुरुवात केली. तो थोडा कुत्सितपणे हसून म्हणाला, " तर मग डॉ. माने तुम्ही माझ्या मानसिक स्थितीबद्दल काय निदान लावले? तुमच्या थेरेपीनुसार काय झाले आहे मला? मी खरंच वेडा झालोय की आणखी वेगळे काही आहे? " 


" युग, असा कसा बोलतोय तू? " संकर्षणने एक भुवई उंचावून विचारले. 


डॉ. माने थोडे मंद हसले आणि म्हणाले, " संकर्षण, जस्ट रिलॅक्स! त्याला माझ्याशी असं बोलण्याचा हक्क आहे. इव्हन त्याला त्याच्या रिपोर्ट्सबद्दल मला जाब विचारण्याची मुभादेखील आहे. एक पेशंट म्हणून तर आहेच पण एक मित्र म्हणूनही आहे! " 


" व्हॉट रबिश? आपण कधीपासून मित्र झालो बरे? माझी आणि तुमची ओळख फक्त गेल्या एक दोन दिवसांपुरतीच मर्यादित आहे आणि तेवढीच खूप आहे. याउपर मला आणखी लगट नको. " युग शब्दागणिक डॉ. मानेचा अपमान करत होता. 


" युग, जरा गप्प बस आणि आवर घाल तुझ्या शब्दांना! " संकर्षण परत थोड्या चढ्या आवाजात बोलला.


डॉ. माने यांनी संकर्षणला नजरेनेच शांत केले व ते स्वतः युगशी बोलू लागले, " हो! युग, आपली ओळख नवीच आहे, अगदी गेल्या एक दोन दिवसांपुरतीच! पण तरीही आपण मित्र आहोत कारण डॉक्टरचे पेशंटबरोबर मैत्रीचे नाते असते. बरोबर ना! " 


" पेशंट? ओ हॅलो, मी काही पेशंट वगैरे नाही. मला माहीत आहे, मी फिट ऍंड फाईन आहे म्हणून आजपासून तुमचा नि माझा संपर्क येणारच नाही. म्हणून, मला तुमच्या मैत्रीची काहीच गरज नाही. " युग म्हणाला. 


" तरीही आपण मित्र आहोत आणि राहणार! " डॉ. माने हसून बोलले. 


" व्हॉट नॉन्सेन्स! आर यू इन्सेन? " युग चिडून बोलला. तसेच तो आणखी काही बोलणार त्याआधीच संकर्षण युगवर ओरडला. 


डॉ. माने यांनी परत त्याला नजरेनेच शांत करण्याचा प्रयत्न केला पण तो यावेळी गप्प न राहता म्हणाला, " नो शुभम! मी नाही गप्प बसणार. हा कितीदा तुझा अपमान करतोय आणि तू फक्त ऐकून घेतोय. युग माझा मित्र आहे पण तसाच तू सुद्धा माझा मित्र आहेस. म्हणून एका मित्राच्या समाधानासाठी दुसऱ्या मित्राचा झालेला अपमान मीही खपवून घेणार नाही. "


" हो, ठीक आहे! पण हा अपमान नाहीये म्हणून तू शांत हो! मला तर वाटतं, युगपेक्षा तूच जास्त चीडचीड करतोय. " डॉ. माने हसून बोलले. 


डॉ. माने आणि संकर्षणच्या संवादामुळे युग थोडा गोंधळून गेला. तो गोंधळूनच म्हणाला, " एक मिनिट! संकर्षण, तू आणि डॉ. माने इतकं फ्रॅन्कली बोलत आहात! याचा अर्थ तुम्ही दोघे खरंच मित्र आहात का? " 


" ह्म्म! " डॉ. माने आणि संकर्षण त्या दोघांनीही एकत्रच हुंकार भरला. 


" ओह! अम्म... सॉरी! डॉ. माने मला माहीत असतं, तर मी तुमच्याशी उद्धटपणे वागलो नसतो. मला संकर्षणने आधीच सांगितलेदेखील नाही की, तुम्ही दोघे मित्र आहात! " युगला स्वतःच्या उद्धटपणाबद्दल गिल्ट वाटत होते म्हणून त्याने लगेच माफी मागितली. 


" अरे, एवढे काही झालेले नाही. तू संकर्षणचा मित्र आहे म्हणजे माझाही मित्र आहेस. मित्रात मान - अपमान किंवा उद्धट वागणे वा न वागणे महत्त्वाचं नसतं. सो, इट्स ओके! " डॉ. माने बोलले अन् त्यावर युगनेही हुंकार भरला. 


" मग युग साहेब, आतातरी माझी मैत्री मान्य आहे की नाही तुम्हाला? " डॉ. माने मिश्किल हसून बोलले. 


" हो, आहे मान्य डॉ. माने! " युग म्हणाला व त्याने डॉ. मानेबरोबर हात मिळवला. 


" मित्र आहेस ना! मग आता डॉ. माने वगैरे असू दे आणि फक्त शुभम म्हण! " डॉ. माने हात मिळवताना हसून बोलले.


" हो, चालेल! आतापासून मी शुभमच म्हणणार! " युगने हसून प्रतिक्रिया दिली. 


" ह्म्म! आता हा भरत मिलाप झाला असेल तर मुद्द्याचं बोलायचं का? " संकर्षण खाकरत बोलला. 


" हो! " डॉ. शुभम माने बोलले. 


" ह्म्म, शुभम! आता मला सांग, तुझ्या आकलनानुसार युगची सध्या मनोवस्था कशी आहे? तो ठीक आहे ना? त्याची दिवसागणिक वाढणारी चीडचीड पाहता काही चिंतेचे कारण नाही ना? " संकर्षणने लागोपाठ प्रश्न विचारले. 


" अरे हो, किती ते प्रश्न! जस्ट रिलॅक्स! मी सांगतोय ना सर्व! " डॉ. शुभम बोलले. त्यावर संकर्षणने हुंकार भरून दुजोरा दिला. 


डॉ. माने पुढे बोलू लागले, " माझ्या निदर्शनास असे आले की, युग अगदीच तंदुरुस्त आहे. मागील महिन्यात बऱ्याच घटना अशा घडून गेल्या आहेत की, ज्याचा नक्कीच तुम्हा सगळ्यांच्या मनावर परिणाम झाला आहे. अगदी तसाच पण थोडा प्रभावशाली परिणाम युगच्या मनावर झाला आहे. 


                घडलेल्या घटनांचा अति विचार केल्याने युगला स्वप्न दिसत आहेत. त्या स्वप्नांवर युग ताबा करू पाहत होता म्हणून त्याला आणखीच त्रास होत होता आणि त्याची चीडचीड होत होती. " डॉ. माने एवढे बोलून थोडा वेळ थांबले व युग आणि संकर्षणच्या मनाचा वेध घेऊ लागले. दुसरीकडे युग आणि संकर्षण डॉ. माने जे सांगत होते ते अगदी लक्षपूर्वक ऐकत होते.


संकर्षण आणि युगचा अंदाज घेतल्यानंतर डॉ. माने पुढे बोलू लागले, " मला वाटतं, युगला काही दिवसांसाठी तरी का होईना पण रिफ्रेशमेंट हवी. घरातल्या घरात राहून युग नकारात्मक विचारांच्या डोहात खोलवर बुडत जातोय. त्यातून बाहेर येण्यासाठी तसेच मनाची होणारी कुचंबणा दूर करण्यासाठी युगच्या मनाला काही दिवसांचा विसावा मिळणे गरजेचे आहे.


                कोड्यात बोलण्याऐवजी स्पष्ट बोलायचे झाल्यास, युगचा घरातला वावर बराच वाढला आहे त्यामुळे त्याची घुसमट होत आहे. शिवाय अपघातामुळे झालेला स्मृतिभ्रंश त्याला बराच छळतोय. कळत नकळत स्वतःलाच दोषारोप करण्याची सवय युगला यामुळेच जडली आहे पण आता यावर आवर घालायला हवा! त्यासाठी युगला या चार भिंतीबाहेर पडायला हवं. 


                थोडक्यात माझ्या मते, सद्यपरिस्थितीत निसर्गाच्या सानिध्यात थोडा एकांत अन् थोडा विसावा युगने शोधला तर त्याच्या शरीरासह मनालाही शांती मिळेल व आपसुकच चीडचीडही बंद होईल. युगने एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन थोडा वेळ घालविला तर बरे होईल. त्यामुळे सगळी नकारात्मक ऊर्जा त्याच्या मनातून दूर ढकलल्या जाईल आणि नव्या जोमाने सकारात्मक ऊर्जेसह युगला नवी सुरुवात करता येईल.


                मोकळ्या हवेचा आस्वाद घेणे सध्या युगसाठी आवश्यक असल्याने एखाद्या ठिकाणाची भटकंती केली तर शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. "


युग आणि संकर्षण काही वेळ गप्प बसून डॉ. मानेच्या बोलण्याचा विचार करत होते. विचार करून झाल्यानंतर संकर्षण म्हणाला, " शुभम तू बोलतोय ते पटतंय मला! आणि मला वाटतं थोडा निसर्ग प्रवास वा भटकंती करायला युगही नकार देणार नाही. बरोबर ना युग? " संकर्षण युगकडे पाहून बोलला. 


" ह्म्म, जर त्या वेगवेगळ्या थेरेपीपासून बचाव करायचा असेल तर भटकंतीचा पर्याय मला जास्त आल्हाददायक वाटतोय! पण नेमके जायचे कुठे भटकंती करायला? " युग म्हणाला. 


                डॉ. मानेचा सल्ला संकर्षण आणि युग दोघांनीही सकारात्मक दृष्टीकोनाने घेतला. दोघांचाही पॉझिटिव्ह प्रतिसाद बघून डॉ. माने यांनी त्या दोघांना खंडाळा, लोणावळा किंवा महाबळेश्वरसारख्या एखाद्या ठिकाणाची भटकंती करण्याचे सुचवले. बऱ्याच पर्यायांचा विचार करून झाल्यावर युगने खंडाळा फायनल केलं. 


" ओके मग खंडाळा फायनल तर! " डॉ. शुभम माने बोलले. त्याला संकर्षण आणि युगने दुजोरा दिला. त्यानंतर मग डॉ. शुभम माने यांनी काही औषधी लिहून दिल्या.


क्रमशः

____________________________________________


©®

सेजल पुंजे. 

१३-०८-२०२२.

टीम नागपूर. 


🎭 Series Post

View all