राज्यस्तरीय करंडक कथामालिका
कथेचे शीर्षक - आभास की वास्तव?
भाग - ७
युगची अवस्था बघून संकर्षणला खूप काळजी वाटत होती म्हणून संकर्षण परत युगची समजूत काढू लागला, " कुठल्या स्वप्नांचा विचार करतोय तू? युग, स्वप्नांना झोपेपुरतेच मर्यादित ठेवायचे असते. जर झोपेतून जाग आल्यावरही तू त्या स्वप्नांचा वास्तविक जीवनाशी तर्क जोडू पाहशील तर तुला त्रास तर होणारच ना! म्हणून मी म्हणतोय की, नको इतका विचार करू. स्वतःला वेळ दे, गतकाळ सोडून वर्तमानाशी नातं जोडायला शिक. "
संकर्षण युगला नीट सल्ला देत होता, त्याची समजूत काढत होता पण का कोण जाणे, युगचा राग हा संकर्षण च्या प्रत्येक शब्दागणिक वाढत होता.
शेवटी युगचा ताबा सुटला आणि तो रागाने उफाळून चढ्या आवाजात संकर्षणला उद्देशून म्हणाला, " संक्या! एकदा सांगितलेलं कळत नाहीये का तुला? मला सांग आणखी किती वेळा तुला पटवून देऊ की, मला होणारा त्रास कुणालशी संबंधित नाही. मुव्ह ऑन वगैरे मलाही कळतं आणि मी त्यासाठी प्रयत्न देखील करतोय पण तुला ते कळतच नाही. तू निव्वळ माझ्यात त्रुटी शोधत राहतोस. आता शेवटचं सांगतोय, मी डिस्टर्ब आहे पण याचा कुणालशी काहीही एक संबंध नाही. कळलं? "
संकर्षण युगला काही प्रतिसाद देणार त्याअगोदरच युग डोक्यावर हात ठेवून हळू आवाजात पण आवेगाने पुटपुटू लागला, " ओह गॉड! नो वे! संकर्षण,मला परत त्याच आकृत्या नजरेपुढे दिसत आहे आणि तो कर्णकर्कश आवाज... नाही! मला नाही ऐकायचा. नाही, नाही! मला नाही ऐकायचा तो आवाज... आई गं! माझे कान... आता कदाचित माझ्या कानातून रक्त बाहेर पडेल हा आवाज ऐकून... बंद करा कुणीतरी तो आवाज! प्लीज! " असे बोलून युगने काचेच्या डायनिंग टेबलवर हात जोरात आपटला. लगेच काचेला तडा जाऊन त्याचे तुकडे झाले आणि ते काचाचे तुकडे त्याच्या हातात खुपसल्या गेले. क्षणार्धात युगचा हात रक्तबंबाळ झाला.
युगला असे वागताना पाहून संकर्षण जरा आश्चर्यचकितच झाला. त्याला नवल वाटत होते कारण मुळात युग शांत स्वभावाचा होता म्हणून त्याचे असे वागणे जणू अशक्यच! पण तरीही माईंड डिस्टर्ब असल्यामुळे तो असा वागला असेल, अशी समजूत बाळगून संकर्षणने तात्पुरता विषय थांबविला. मनातले विचार झटकून त्याने आधी युगला शांत केलं. नंतर युगची मलमपट्टी करून सभोवताली जमिनीवर पडलेले काचेचे तुकडे संकर्षणने कचरापेटीत टाकले आणि लगेच घर नीट आवरले. नंतर त्या विषयावर कुणी काहीच बोलले नाही, तो दिवस असाच गेला.
आणखी काही दिवस गेले, पाहता पाहता एक आठवडा झाला पण त्या गेल्या आठवड्यात शांत स्वभावाचा युग बराच चिडचिडा झाल्याचे संकर्षणला त्याच्या निरिक्षणाद्वारे कळून चुकले. या सर्व बदलांचे आकलन करून संकर्षणने त्याचे परिचित असलेले प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभम माने यांना गाठले.
संकर्षणने युगमध्ये त्याला जाणवलेले बदल, कुणालचे अपघाती निधन, युगचा स्मृतिभ्रंश, कुणालची केस याबद्दल इत्थंभूत माहिती डॉ. शुभम माने यांना दिली. तसेच त्याने डॉ. माने यांना युगच्या घरी बोलावून घेतले. डॉ. माने यांना युगच्या घरी बोलावून घेण्यामागे संकर्षणकडे दोन कारण होते. पहिले असे की, ते स्वतःच युगची तपासणी करून नेमकी त्याची मेडिकल कंडिशन ठरवू शकतील तर दुसरे असे की, हल्ली युग घराबाहेर पडत नव्हता. घरातल्या घरात स्वतःला कोंडून ठेवू लागला होता म्हणून डॉ. मानेची भेट त्यांच्या क्लिनिकमध्ये जाऊन युगने टाळलीच असती. म्हणूनच संकर्षणने सुचविल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीच युगच्या घरी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. माने यांनी युगची भेट घेतली.
युगला बोलते करण्याचे त्यांनी बरेच प्रयत्न केले पण तो डॉ. मानेशी नीट वागत नव्हता. त्याच्या वागण्यात थोडा अवघडलेपणा तर होताच पण थोडा आक्रमकपणा आणि उद्धटपणा देखील स्पष्ट झळकत होता. त्याच्या उद्धट वागण्याचा तर्क डॉ. माने यांना सहज लागला होता. त्यामुळे त्याच्या अशा बालिश वागण्यावर ते फक्त मंद हसून स्वतःचं काम निमूट करत होते.
डॉ. मानेला गालात हसताना पाहून युगच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि तो मनोमन धुसफूस करू लागला, " हा संकर्षण काय समजतो स्वतःला? काय गरज होती त्याला ह्या सायकिऍट्रिस्टला घरी बोलावण्याची? आणि त्याच्याकरवी का हा माझी तपासणी करून घेतोय? त्याला काय वाटतं मी वेडा आहे? मला वेड लागलंय? हं! हा कोण डॉ. माने की फाने माझी मानसिक अवस्था सांगणारा... एकदा हा माने घराबाहेर पडला की, मग सांगतो या संक्याला! हे दोघे मिळून मला आता जगापुढे वेडं ठरवतील बहुतेक... हं! "
संकर्षणने मानसोपचारतज्ज्ञाला युगच्या घरी बोलावल्याने युग संकर्षणवर बराच रुसला होता म्हणूनच त्याची चीडचीड होत होती. तरीही त्याने स्वतःवर बराच ताबा ठेवला होता पण डॉ. माने तेथून जाताच युग संकर्षणवर एकदाचा बरसलाच.
बराच वेळ तो त्याचा आक्रोश व्यक्त करत होता परंतु संकर्षणने युगला विश्वासात घेत त्याची समजूत घातली. तो युगला म्हणाला, " युग, शांत हो! एवढा असा ओव्हररिऍक्ट नको करू. मी किंवा डॉ. माने का म्हणून तुला वेडं ठरवणार? काय लाभ आमचा यात? काहीच लाभ नाहीये ना! आणि महत्त्वाचं म्हणजे विसरू नकोस की, सायकिऍट्रिस्ट हे आपल्याला वेड आहे की नाही हे तपासण्याऐवजी आपल्या बुध्दी अन् मनाचा वेध घेऊन आपल्या अस्वस्थतेचं कारण शोधण्याचा प्रयत्न करतात. म्हणून मनातल्या मनात भलतेच विचार करू नको. "
खरंतर ज्या गोष्टी युगला माहिती होत्या त्याच संकर्षणने सांगितल्या पण तरीही एक मानसोपचारतज्ज्ञ त्याचा इलाज करतील या विचारानेच युग धास्तावला होता. संकर्षण युगची समजूत काढत होता पण युग ऐकायला तयार नव्हता. त्याने स्वतःच अशी मनधरणी केली होती की, डॉ. माने हे एखादे सायकिऍट्रिस्ट नसून वेड्यांचे डॉक्टर आहेत व संकर्षण त्यांच्यासोबत मिळून त्याला वेडे ठरवणार आहेत. तो सतत हेच बरळत होता.
युग काही केल्या ऐकून घ्यायला तयार नव्हता म्हणून मग संकर्षणने शेवटचं अस्त्र वापरण्याचा विचार केला आणि त्याला उद्देशून म्हणाला, " युग, तुला माहिती आहे ना की, तू वेडा नाहीस. मग डॉ. माने किंवा आणखी कुणाकडूनही तपासणी करून घेण्याची तुला कुठलीही भीती नसावी आणि हरकत तर मुळीच नसावी! कारण डॉ. माने फक्त काही टेस्ट करतील, काही थेरेपीचे प्रयोग तुझ्यावर आजमावून पाहतील. त्या थेरेपींचे आउटपुट तर घाबरण्याजोगे येणार नाहीतच. मग युग तू स्वच्छंदपणे वावरायला परत मोकळा होशील.
मग आता स्वतःला खरे सिद्ध करण्यासाठी तरी परत एकदा डॉ. मानेची भेट घेशील की नाहीस? बघ, मला तर माहिती आहे तू वेडा नाहीस पण एकदा डॉ. मानेची खात्री झाली की, तुला कुणालाच काही प्रमाण देण्याची गरज भासणार नाही. बरोबर ना? " संकर्षणने युगला शब्दांच्या पेचात अडकवून त्याच्याकडून थेरेपीसाठी सरतेशेवटी परवानगी घेतलीच.
युगने मात्र एक अट ठेवली की, ज्या काही टेस्ट वा थेरेपी होतील, त्या युगच्या घरीच होतील. तो स्वतः डॉ. मानेच्या क्लिनिकमध्ये टेस्ट किंवा थेरेपी घ्यायला जाणार नाही. संकर्षणने युगची अट मान्य केली कारण संकर्षणकडे नकार देण्याचा पर्याय नव्हताच. युग थेरेपीसाठी तयार झाला, संकर्षण यातच समाधानी होता. म्हणून त्याने लगेच दुसऱ्या दिवशीची डॉ. मानेची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना युगची अट सांगून थेरेपीसाठी घरी यायला सांगितले.
दुसऱ्या दिवशी सकाळी नऊच्या सुमारास डॉ. माने युगच्या घरी आले. डॉ. माने युग आणि संकर्षणशी जुजबी बोलत असतानाच युगची चीडचीड होऊ लागली म्हणून तो डॉ. माने यांना वैतागूनच म्हणाला, " डॉक्टर! आपण सरळ थेरेपीला सुरूवात करुयात का? आपल्याला नंतर कधीतरी उसंत मिळेलच तर तेव्हा आपण निवांत गप्पा मारत बसूया! पण सध्या तुमचे इतर पेशंट्स सुद्धा असतील ना! तर तुम्हाला इथले काम आटोपून तिकडेही जायचे असेलच ना! म्हणून मला वाटतं, आपण ही मुक्त चर्चा नंतर कधीतरी करावी व सध्या तुम्ही ज्या कामासाठी आले आहात त्यावर लक्ष द्यायला हवे. नाही का! "
डॉ. माने युगची चीडचीड पाहून परत थोडे मंद हसले आणि थेरेपीसाठी तयार झाले. ते तिघे युगच्या खोलीत गेले. डॉ. माने यांनी युगला डोळे मिटून त्याच्या बेडवर निपचित पडायला सांगितले. युग डॉ. माने यांच्या सल्ल्यानुसार कृती करत होता. संकर्षण फक्त थोड्या अंतरावर उभा राहून निरिक्षण करत होता.
क्रमशः
_________________________________
©®
सेजल पुंजे.
१३-०८-२०२२.
टीम नागपूर.