Feb 28, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

आभास की वास्तव? (अंतिम भाग - ३१)

Read Later
आभास की वास्तव? (अंतिम भाग - ३१)

राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कथामालिका विषय - रहस्यकथा 

कथेचे शीर्षक - आभास की वास्तव?

अंतिम भाग - ३१


" संकर्षण तुमचा राग मी समजू शकतो पण आवरा स्वतःला... आणि पुढे तुम्ही काय केले ते सांगा. " इन्स्पेक्टर श्रेयस संकर्षणला धीर देत बोलले. 

" वास्तव जाणताच मी भांबावून गेलो होतो, मला त्याला जाब विचारायचा होता पण मला हे ही कळून चुकले होते की, पुराव्या शिवाय मी हतबल आहे. म्हणून मीही कुणालपुढे स्वतःला वेड्यात काढत राहिलो. मी कुणालच्या नकळत नियोजन करीत होतो. मी शुभमला सर्व सांगितले. शुभम माझा आणि युगचा मित्र होता. त्यालाही धरा भाऊ मानायची शिवाय त्याला माहिती होते, युगच्या किंवा धराच्या बाबतीत मी मस्करी करणार नाही. म्हणून आम्ही मिळून प्लॅन आखला.

                युगच्या खोलीतल्या ए. सी. त नायट्रस ऑक्साइड गॅस फिट केली कारण कुणाल त्याच खोलीत राहायचा. त्यामुळे दिवसरात्र नायट्रस ऑक्साइडच्या संपर्कात राहिल्याने त्याला भास होऊ लागले. त्यातच मी शुभमला घरी बोलावून घेतले. तो मानसोपचार तज्ज्ञ असल्याने त्याने दिलेल्या गोळ्या कुणाल खाऊ लागला. त्यामुळे तो परत आभासी कल्पनाविश्व रेखाटू लागला. शिवाय आम्ही मुद्दाम बेत आखला भटकंतीचा... त्यानंतर तो स्वतःच आभासी जगात वावरू लागला आणि मी त्याला बढावा देत राहिलो. " संकर्षण एवढे बोलून गप्प बसला. 

" पण या कुणालला दिसणारी धरा ती सुद्धा आभासीच होती का? " इन्स्पेक्टर श्रेयसने विचारले. 

" नाही. ती कुणालची बहिण अंशिका होती. " संकर्षण बोलला. 

" काय? कुणालच्या बहिणीने तुमची मदत केली? " इन्स्पेक्टर श्रेयसने विचारले. 

" हो! त्यामागे दोन कारण होते. पहिले की, ती माझी गर्लफ्रेंड असून युग व धराकडून प्रेमाची कबुली करून घेण्यात तिनेच महत्त्वाची भूमिका पार पाडली होती... दुसरे असे की, कुणालने आतापर्यंत बऱ्याच मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. हे तिला माहिती होते पण यावेळी त्याने हद्द पार केली होती म्हणून तिने मला साथ देण्याचे निवडले. तिच्यासाठीही एक फेस मास्क तयार केला होता त्यामुळे कुणाल कधीच ओळखू आले नाही की, ती त्याचीच बहिण आहे. त्याने जो मुखवट्याचा खेळ सुरू केला होता आम्हीही त्याच खेळाने त्याला मात देत राहिलो. असो... अंशिका देखील इथेच आहे. मी, शुभम आणि अंशिका आम्ही तिघेही आम्ही केलेल्या अपराधाबद्दल क्षमाप्रार्थी आहोत आणि असेल ती शिक्षा भोगायला तयार आहोत... पण आम्ही जे केले त्याबद्दल मला पश्चात्ताप नाहीये कारण मी माझ्या मित्राला आणि बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठीच सारे केले आणि याचा मला अभिमान आहे, पश्चात्ताप मुळीच नाही. " संकर्षण बोलला. 

" ह्म्म... सध्या तुमचा मित्र शुभम आणि अंशिका कुठे आहेत? " इन्स्पेक्टर श्रेयसने विचारले. 

" इथेच आहेत. हा तोतया सिद्धपुरुष दुसरा तिसरा कुणी नसून शुभम आहे तर अंशिका आतल्या खोलीत आहे. " संकर्षण बोलला व त्याने अंशिकाला हाक दिली. संकर्षणची हाक ऐकून अंशिका हॉलमध्ये बाहेर आली. ते तिघेही एकत्र उभे राहिले. 

" तुम्ही सगळ्यांनी काहीही गैर केलेले नाही फक्त काही प्रमाणात बेकायदेशीर वागलात पण त्यासाठी मी न्यायालयाला विनंती करेल, तुम्हा तिघांना कमीत कमी शिक्षा देण्यात यावी... " इन्स्पेक्टर श्रेयस बोलले. त्यावर त्या तिघांनीही माना डोलावल्या.

तेवढ्यात कुणालने त्याच्या आसपास असणाऱ्या हवालदारांना हिसका मारला आणि स्वतःच्या खिशात हात घालून एक पिस्तूल बाहेर काढली व तो सगळ्यांना धमकीच्या सुरात बोलला, " शिक्षा माय फूट! तुम्हा सगळ्यांचा निकाल तर मी लावतो. " 

                कुणालने असे बोलून पिस्तुलातून गोळी झाडली पण त्यातून गोळीच बाहेर पडली नाही. अचानक वातावरणात बदल झाला, विजांचा कडकडाट होऊ लागला. सिलिंगला असणारे फॅन, खिडक्या व दारांना असणारे पडदे, झुंबर वेगाने हलू लागले. कुणालने इतर हवालदारांची पिस्तुले हिरावून घेतली पण त्याच्या हातात असणारी पिस्तुले धुळीत मिसळल्या गेल्या. ते दृश्य पाहून सगळे गोंधळून गेले. त्यांना काहीच अंदाज लागत नव्हता. 

तेवढ्यात वाड्याच्या आत भलेमोठे वाळूचे वादळ शिरले आणि त्यातून दोन पुसटशा आकृत्या तयार झाल्या. ते पाहून कुणाल गोंधळून बोलला, " मला जे आता दिसतंय, ते फक्त मलाच दिसतंय की तुम्हा सगळ्यांनाही दिसतंय? हे वाळूचे वादळ तुम्हालाही दिसतंय ना... "

कुणी काही बोलणार त्याआधीच त्यातून दोन आवाज बाहेर पडले, " हो, सगळ्यांनाच दिसतंय पण त्यांना फक्त वादळ दिसतंय पण हा तुझा काळ आहे. तुझा मृत्यू... ओळखलंस? आम्ही युग आणि धरा आहोत, ज्यांची तू निर्घृणपणे हत्या केलीस. आता वेळ झालीये तुला तुझ्या कर्माचे फळ देण्याची... तुला काय वाटलं होतं, मेल्यावर आम्ही दोघे प्रेमाचा झिम्मा खेळत, हातावर हात ठेवून बसलेलो असणार... नाही! आम्ही वाट बघत होतो, या दिवसाची... आणि आज तो दिवस उगवलाच! जसं आमच्या मृत्यूला तू एक रहस्य बनवलंस, त्याचप्रमाणे आज तुझाही मृत्यू रहस्यच बनून राहील या जगासाठी... कुणाल... " 

" काय? काय करणार आहात तुम्ही? " कुणाल अडखळतपणे बोलत होता. बाकी सर्व त्याच्याकडे गोंधळून बघत होते कारण त्यांना वादळातून येणारा कोणताही आवाज ऐकू जात नव्हता. 

तेवढ्यात ते वादळ अर्थात युग आणि धरा कुणालला बोलले, " आम्ही तेच करणार जे करायला हवे! तुझ्या कर्माची तुला शिक्षा देणार. तू केलेल्या विश्वासघाताचे प्रतिफळ देणार... मैत्रीचा अपमान केल्याची शिक्षा तुला देणार... एका स्त्रीच्या चारित्र्याविषयी केलेल्या चेष्टेचा परिणाम तुला दाखवणार... प्रेमाचा बळी घेतल्यावर काय होते, याचे जिवंत उदाहरण दाखविणार आहोत आम्ही तुला... " एवढे बोलून ते वादळ कुणालच्या जवळ जाऊ लागले. 

                त्या वादळाने कुणालवर बरेच प्रहार केले. त्यालाही तेवढ्याच यातना दिल्या जेवढ्या त्याने त्या दोघांना दिल्या होता. सरतेशेवटी त्या दोघांनी मिळून एक अखेरचा वार केला अन् कुणालने अखेरचा श्वास घेतला. काही वेळाने ते वादळ आपोआप शांत झाले आणि ते वाळू बनून जमिनीवर स्थिरावले. सगळ्यांनी निरखून पुढे पाहिले तर कुणाल जमिनीवर पडलेला दिसला. इन्स्पेक्टर श्रेयसने कुणालची नाडी तपासून पाहिली व त्याला मृत घोषित केले. सगळे गोंधळात पडले होते. 

" इट्स सरप्राईजिंग! " इन्स्पेक्टर श्रेयस बोलले. 

" सर, कदाचित आम्ही कुणालला आभासी जगात गुंतवून ठेवले होते पण प्रत्यक्षात वास्तवानेच काळ बनून सूड घेण्याचा वसा पूर्ण केला असावा. " संकर्षण बोलला. 

" ह्म्म... म्हणतात ना, जसे पेराल तसे उगवेल... अगदी तेच झाले असावे. असो... पण मला सांगा, धरा नेमकी कोण होती? आणि ती कशी होती? तिच्याबद्दल तिच्या घरच्यांनाही खबर द्यायला हवी. " इन्स्पेक्टर श्रेयस बोलले. 

                संकर्षणने लगेच जमिनीवर पडलेली धराची डायरी उचलली आणि ती इन्स्पेक्टर श्रेयसला सोपवली. इन्स्पेक्टर श्रेयसने ती उघडताच त्यांच्या हातातून डायरी खाली पडली आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला सुरुवात झाली. 

" हो, तुमची सख्खी बहिणच होती धरा! तिचाच खून केला होता कुणालने... " संकर्षण इन्स्पेक्टर श्रेयसला आधार देत बोलला. तर दुसरीकडे संकर्षणचे शब्द ऐकून सर्व आश्चर्यचकित झाले.

इन्स्पेक्टर श्रेयसचे डोळे रडून लाल झाले होते. ते स्वतःशीच बोलले, " धरा, मला माफ कर! जेव्हा तुला गरज होती मी तेव्हाच तुझ्या सोबतीने उभा नव्हतो. मी गुन्हेगार आहे तुझा बाळा, मला तू शिक्षा दे. मी कायम तुझे रक्षण करण्यात कमी पडलो... मला तू शिक्षा दे! मी गुन्हेगार आहे तुझा बाळा... मी गुन्हेगार आहे तुझा... " 

तेवढ्यात जमिनीवर पडलेल्या त्या वाळूतून परत दोन आकृत्या तयार झाल्या आणि आता सगळ्यांना त्या आकृत्या स्पष्ट दिसू लागल्या. त्या आकृत्या म्हणजे धरा आणि युग होते. त्यातली एक आकृती अर्थात धरा बोलली, " भावड्या... तू स्वतःला दोष देऊ नको रे! मला माहीत आहे, तू तुझ्या मिशनवरून परतताच माझी शोधाशोध करायला सुरुवात केली होतीस प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष... घरच्यांचा कडाडून विरोधही केलास आणि जेव्हापासून मी तिथे नाहीये तू देखील आपल्या घरी जाणे सोडलेले आहे. मला सर्व माहिती आहे रे... मला माहीत आहे, माझा भावड्या माझ्यावर किती प्रेम करतो. म्हणून तू स्वतःला दोष देऊ नको. 
                
                भावड्या स्वतःबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस. तू माझा भावड्या होता, आहे आणि कायम राहशील. आभाळभर प्रेम तुला... काळजी घे स्वतःची! 

                मला माहीत आहे या आठवणींना घेऊन जगणे तुला कठीण होईल, म्हणून मी तुझ्या आणि आपल्या घरच्यांच्या आठवणीतून स्वतःला पुसून घेत आहे. शिवाय मी माझ्या संकर्षण दादूस व अंशिका वहिनी आणि शुभम दादालाही कोणती शिक्षा होऊ देणार नाही. म्हणून इथे काय झाले, हे कुणालाच कधीच आठवणार नाही. " 

" धरा... " इन्स्पेक्टर श्रेयसने भावूक होऊन धराला मिठी मारली. 

                सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. धराने युगला इशारा करताच त्याने चुटकी वाजवली. चुटकी वाजवताच इन्स्पेक्टर श्रेयस आणि त्यांचे हवालदार एका क्षणात आळेफाटा पोलिस ठाण्यात पोहोचले अन् दुसरी चुटकी वाजवताच ते सर्व जण युग, कुणाल आणि धरा बद्दल विसरून गेले. 

                दुसरीकडे युग आणि धराने मिळून आणखी एक चुटकी वाजवली. ती चुटकी वाजवताच कुणालचा मृतदेह राखेत रुपांतरित झाला. अंशिका, संकर्षण आणि शुभम तिथेच उभे होते. युग आणि धरा त्या तिघांच्याही आठवणी पुसणार होते पण त्या तिघांनीही नकार दिला. म्हणून त्यांच्या इच्छेखातर युग आणि धराने तिघांच्याही आठवणी तशाच ठेवल्या. त्यानंतर त्या तिघांनीही डोळे भरून अन् मन घट्ट करून युग आणि धराला निरोप दिला. त्यानंतर तिघेही पुण्याला परतले त्या गडद आठवणींसह... 


समाप्त

________________________________________

©®
सेजल पुंजे.
टीम नागपूर. 
१०-०९-२०२२.
 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//