Login

आभास की वास्तव? (भाग - ३०)

आभास आणि वास्तवाचा पेच हा सुटेल का? सत्य आणि असत्याच्या खेळात सत्याचा विजय होईल का? आभास आणि वास्तवाच्या कचाट्यात गुंतलेली रहस्यकथा... सत्य आणि असत्याचा शोध घेणारी कथामालिका...

राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कथेचे शीर्षक - आभास की वास्तव? 

भाग - ३०


सगळेजण कुणालकडे पाहत होते. तेवढ्यात हवालदार भिडे म्हणाले, " पण हा कुणाल स्वतः त्याचा गुन्हा कबूल करेल, असे वाटत नाही ओ सर! " 


" मला खात्री होतीच म्हणून मी त्यासाठीही आधीच उपाय केला होता. " संकर्षण बोलला आणि त्याने खिशात हात घालून एक औषधीची बॉटल काढली व इन्स्पेक्टर श्रेयसला दिली. 


" ट्रुथ सीरम? " इन्स्पेक्टर श्रेयस बोलले. 


" ह्म्म... मी आधीच पूर्वतयारी केली होती. मला वाटले होते की, जर तुम्हाला सर्वांना इथे पोहोचायला उशीर झाला तर ऐनवेळी गोंधळ व्हायला नको. म्हणून मी हे इंजेक्शन आणि ट्रुथ सीरम आधीच खरेदी केले होते. जेणेकरून हे इंजेक्शन इंजेक्ट करून मला याच्याकडून सर्व खुलासा करून घेता येईल व ते सर्व रेकॉर्ड करून पुरावा तयार करता येईल. " संकर्षण बोलला. 


" संकर्षण तुमचा हेतू जरी प्रामाणिक असला तरी तुम्ही बऱ्याच अंशी बेकायदेशीर वागलात. असो... आणि तुम्हाला इंजेक्शन इंजेक्ट करता येत असेल तर लगेच करा इंजेक्ट... " इन्स्पेक्टर श्रेयस बोलले. 


                 लगेच संकर्षणने कुणालला ट्रुथ सीरम इंजेक्ट केले अन् नंतर त्याच्या तोंडावर पाण्याचे शिंतोडे उडवून त्याला जागे केले. साधारण दोन मिनिटे कुणी काहीच बोलले नाही पण नंतर जेव्हा त्याच्यावर ट्रुथ सीरमचा प्रभाव पडत असल्याचे इन्स्पेक्टर श्रेयसच्या लक्षात येताच त्यांनी कुणालला प्रश्न विचारायला सुरुवात केली. 


इन्स्पेक्टर श्रेयसने विचारले, " कुणाल, तू धराचा खून का केलास? काय वैर होते तुझे तिच्याशी? " 


कुणालवर ट्रुथ सीरमचा असर झाल्याने तो थोडा अडखळतच बोलू लागला, " वैर? ती धरा... तिने मला नाकारलं त्या युगसाठी... ती घरातून पळून गेली त्याच्यासाठी... हं! काय कमी होती माझ्यात? मी रूपाने, पैशाने सगळ्याच बाबतीत वरचढ होतो त्या युगच्या तुलनेत पण तिने त्याला पसंत केलं. कित्येक मुली माझ्यावर भाळतात अन् मी माझ्या पप्पांखातर तिच्याशी लग्न करायला तयार होतो. तिच्या घरच्यांनाही मान्य होतं पण तिने मला न पाहता नकार दिला. मी कसा हा अपमान पचवून घेणार होतो. 


                खूप शोधाशोध केली तेव्हा कळलं मला नाकारून ती त्या युग सोबत संसार थाटायचा विचार करतेय. मी सूडाच्या अग्नीत जळत होतो पण तरीही मी एक संधी देण्याचा विचार केला. मुद्दाम मी एका क्लायंटला रक्कम दिली आणि युगची मिटींग दिल्लीला अरेंज करायला सांगितली. जेणेकरून मला धराशी एकांतात बोलता येईल. मी खरंच नव्याने सुरुवात करून पाहणार होतो म्हणूनच त्यादिवशी मी फार्महाऊसवर गेलो. तिला सांगितले की, मी तोच व्यक्ती आहे, ज्याच्याशी तिचं लग्न होणार होतं. मी तिला सांगितले की, युग आणि तिच्यात मैत्रीचंच नातं असेल तर आता आमची ओळख झाल्यावर माझ्याशी लग्न करायला तिची हरकत नसावी... पण ती बोलली की, तिचं युगवर प्रेम जडलंय. 


                मी तिला समजवलं की, मी तिला सारं सुखऐश्वर्य देईल, राणी बनवून ठेवणार पण तिने नाही ऐकलं तेव्हा मात्र माझं डोकं तापलं. मग मी तिला ऑफर दिली की, लग्न नाही निदान तर एक रात्र ती माझ्यासोबत घालवू शकते... पण मी तिला असे म्हणताच ती चिडली आणि तिने माझ्यावर हात उगारला. साहाजिकच माझा इगो हर्ट झाला आणि मी तिचे केस पकडून तिला भिंतीवर आदळले; पण लगेच मी माफी मागितली आणि त्या ऑफरवर परत विचार करायला सांगितले. तिने परत विरोध केला आणि मला टशन देत ती लॅंडलाईन वरून पोलिसांना कॉल करू लागली. तेव्हा मात्र मी चिडलो अन् तिला मारझोड करू लागलो. तिचे डोके मी एका टेबलवर आदळले. त्यामुळे तिच्या डोक्याला जखम झाली आणि ती बेशुद्ध झाली. " 


" हरामखोर... तुला तर मी सोडणार नाही. " संकर्षणने मुठी आवळल्या आणि तो कुणालच्या अंगावर धावून गेला पण हवालदारांनी त्याला अडवून धरले. 


इन्स्पेक्टर श्रेयस संकर्षणला धीर देत म्हणाले, " संकर्षण तुम्हाला राग येणे साहाजिक असले तरी ही योग्य वेळ नाहीये. अजून पूर्ण खुलासा झालेला नाहीये म्हणून नाईलाजाने का होईना पण सध्या मौन पाळणे हेच श्रेयस्कर आहे. " इन्स्पेक्टर श्रेयसने असे म्हणताच संकर्षणने त्यावर निव्वळ हुंकार भरला. 


" पुढे काय केलेस तू कुणाल? " इन्स्पेक्टर श्रेयसने कुणालला विचारले. 


" पुढे ती धरा काही वेळ बेशुद्ध असताना मी युगला कॉल केला आणि त्याला बोललो की, धराच्या घरच्यांना धरा आणि युगमध्ये कोणतेच नाते नसल्याचे कळले आहे. तसेच मी त्याला सांगितले की, ते सर्व त्याच्या फार्महाऊसवर असून धराला खूप मारझोड करत आहेत. मी मुद्दाम भेदरलेल्या आवाजात बोलत होतो त्यामुळे त्याला माझ्यावर विश्वास झाला. मी मुद्दाम असे रिऍक्ट केले की, कुणीतरी माझा फोन हिसकावून घेत कॉल कट केला. त्यामुळे धराच्या काळजीत युगने तडख फार्महाऊस गाठले. 


                तो फार्महाऊसवर आला तेव्हा सुद्धा मी धराला मारझोड करत होतो. स्वतःच्या डोळ्यादेखत धराची अवस्था पाहून तो हादरून गेला. युगची चाहूल लागताच त्या धरालाही शुद्ध आली होती. तिने युगला माझ्याबद्दल सांगितलं आणि तिथून पळून जायला सांगितलं पण युग आपल्या प्रेयसीला संकटात सोडणारा नव्हता ना... त्या वेड्याने विचार केला तो मला मात देऊ शकेल आणि म्हणून तो मला मारण्यासाठी पुढे आला; पण माझ्यापुढे त्याचा निभाव लागला नाही. मी दोन मिनिटांत त्याला पछाडलं पण तरीही तो हार मानायला तयार नव्हता. पूर्ण रक्तबंबाळ झाला होता तो... पण मला टक्कर देत होता. तेवढ्यात मी माझ्या सॉक्समध्ये लपवून ठेवलेली बंदूक काढली आणि युगवर निशाणा साधला... 


                मला वाटलं, युग मेला आणि माझ्या वाटेतला काटा मी काढून फेकला पण झाले उलटेच... त्या धराने युगवर झाडलेली गोळी स्वतःवर झेलली अन् क्षणात ती मृत्यूच्या स्वाधीन झाली. त्याच्या कुशीत तिने शेवटचा श्वास घेतला पण डोळे मिटण्याआधी तिने त्याच्याकडून वचन घेतले, मला मारण्याचे... त्याने पण इमोशनल होऊन वचन दिले आणि धराला दिलेल्या वचनाची पूर्ती करण्याकरीता तो माझ्या अंगावर धावून आला पण तो काही करणार त्याआधीच मी त्याच्यावरही गोळी झाडली आणि त्याचाही खेळ खल्लास केला. त्यानंतर माझे लक्ष गेले धराच्या मोबाईलकडे तो खाली पडला होता. मला तो मोबाईल बंद दिसला. मी उघडून पाहिला आणि तपासले तेव्हा मला दिसले की, धराने संकर्षणला शेवटचा व्हिडिओ कॉल केला होता. मला कुठलाही धोका पत्करायचा नव्हता म्हणून मी लगेच बंदोबस्त करून स्वतःची आणि युगची प्लास्टिक सर्जरी करून घेतली. युगला माझा चेहरा देऊन त्याचा चेहरा मी घेतला. 


                नंतर मी भोळेपणाचा आव आणून या संकर्षणला कॉल केला आणि त्याला सांगितले की, कुणालने धराचा खून केल्याने मी अर्थात युगने कुणालचा खून केला. संकर्षण बिचारा युगवर डोळे झाकून विश्वास ठेवायचा म्हणून त्याला माझ्यावर सहज विश्वास बसला. त्यानंतर मी सर्व बंदोबस्त केला. माझ्या माणसांना धराच्या मृतदेहाला एका अज्ञात ठिकाणी फेकून द्यायला सांगितले. शिवाय युगच्या मृत्यूला अपघाताचे वळण द्यायला सांगितले. नंतर संकर्षणची आणि जगाची दिशाभूल करण्यासाठी स्वतःचाही बनावटी विमान अपघात आणि स्मृतिभ्रंश रिप्रेझेंट केला आणि सगळ्यांना वेड्यात काढत राहिलो. " कुणाल निर्लज्जपणे खिदळत सांगत होता. पोलिसांनी कुणालचे ऑडिओ रेकॉर्ड करून घेतले होते. तेवढ्यात संकर्षणने हवालदारांना हिसका मारला आणि तो कुणालच्या अंगावर धावून गेला व त्याने त्याच्या नाकावर ठोसा मारून त्याला रक्तबंबाळ केले. तो परत एक दोन ठोसे मारणार होता पण हवालदारांनी त्याला अडवले. 


इन्स्पेक्टर श्रेयस संकर्षणला शांत करत बोलले, " संकर्षण शांत व्हा! आणि मला सांगा की, तुम्हाला कधी आणि कसे कळले कुणाल बद्दल? तुम्ही कसा काय अंदाज बांधला हा युग बनावटी आहे, तो युग नसून कुणाल आहे? " 


" डिस्चार्ज मिळाल्यानंतर युगच्या घरी आल्यावर त्या रात्री युग झोपल्याची खात्री करून मीही झोपायला गेलो... पण झोप काही लागेना अन् तेवढ्यात मध्यरात्री घरच्या लॅंडलाईनवर एक कॉल आला. घरातील सर्व लॅंडलाईन कनेक्शन इंटरलिंक असल्याने मी आणि या कुणालने एकत्र कॉल रिसिव्ह केले. मी काही प्रतिसाद देण्याआधीच पलिकडील व्यक्ती बोलत होती आणि त्याला प्रतिसाद कुणाल देत होता. 


               तो व्यक्ती या कुणालला प्लास्टिक सर्जरी बद्दल इन्स्ट्रक्शन्स देत होता. शिवाय कुणालची केस बंद झाल्याने कुणालाही युगच्या मरणाचा पत्ता लागणार नाही, असा तो व्यक्ती बोलला. त्याने सांगितले की, पोस्टमार्टम करणाऱ्या सर्व डॉक्टरांना लाच देऊन पुरावे नष्ट केले गेले आहे. तसेच स्मृतिभ्रंश झाला असल्याचे ढोंग करत राहायला सांगितले, जेणेकरून संकर्षण अर्थात मी वा इतर कोणीही कुणालवर संशय घेणार तर नाहीच नाही वा त्यादिवशी काय घडले याचा जाब देखील विचारणार नाही. तो व्यक्ती सारे कबूल करत होता आणि मला धक्क्यावर धक्के मिळत होते. त्या व्यक्तीचे बोलून होताच कुणालने त्याला दम दिला की, त्या व्यक्तीने परत कुणालशी संपर्क करू नये. जेणेकरून त्याचं सत्य कधीच उघडकीस येणार नाही. " संकर्षणने एवढे बोलून हाताची मुठ करून हात रागाने टेबलवर मारला आणि त्या आवाजाने सगळ्यांची तंद्री भंग पावली. 


क्रमशः

__________________________________

             

©®

सेजल पुंजे. 

१०-०९-२०२२.

टीम नागपूर. 

🎭 Series Post

View all