आभास की वास्तव (भाग - २)

आभास अन् वास्तवाच्या कचाट्यात गुंतलेली, रहस्याने नटलेली कथा!

राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कथेचे शीर्षक - आभास की वास्तव 

भाग - २ 


              युगला कोमातून शुद्ध येताच साधारण एक ते दोन दिवसानंतर त्याला डिस्चार्ज मिळाला. इस्पितळातील साऱ्या औपचारिकता आटोपून, सगळी आवराआवर करून संकर्षणसह युगने इस्पितळाचा निरोप घेतला. इस्पितळातून बाहेर येताच युगला थोडं मोकळं वाटू लागलं म्हणून त्याने त्या मोकळ्या हवेत जरा खोल श्वास घेतला, युगला असे करताना पाहून संकर्षण मात्र गालातल्या गालात मंद हसला. नंतर संकर्षण स्वतःच्या कारकडे वळला अन् त्याच्या मागोमाग युग देखील गेला. 


              संकर्षणने कारजवळ पोहोचताच कारचा दरवाजा उघडून मागच्या सीटवर युगच्या फाईल्स तसेच त्याचे इतर महत्त्वाचे दस्तऐवज आणि युगचे सर्व लगेजही ठेवले, जे युगने त्याचा अपघात होण्याआधी दिल्लीला फ्लाइटने जाताना बरोबर घेतले होते. दिल्ली प्रवास तर त्या लगेजसह सुखरूप झाला पण दिल्ली ते पुण्याचा परतीचा प्रवास मात्र युगसाठी अपघाती वळणाचा ठरला होता. असो.. 


               तर संकर्षण मागोमाग युगही कारजवळ पोहोचला, सगळं साहित्य आत ठेवल्यावर युग ड्रायव्हिंग सीटच्या बाजूच्या सीटवर बसला तर कार ड्राइव्ह करण्यासाठी संकर्षण ड्रायव्हिंग सीटवर बसला. त्यानंतर परत एकदा सगळं तपासून घेतल्यावर दोघांनीही सीटबेल्ट लावून घेतले. मग संकर्षणने कार स्टार्ट केली पण इस्पितळातपासून थोड्या दूर अंतरावर येताच संकर्षणला कार ड्राइव्ह करताना एक कॉल आला. 


संकर्षणने कॉल स्पीकरवर टाकला आणि कॉलवर बोलू लागला, " हॅलो, संकर्षण देशपांडे स्पीकिंग! "


" हॅलो, मी आळेफाटा पोलिस चौकीतून हवालदार भिडे बोलतोय. " पलिकडील व्यक्ती बोलली. 


               पोलिस ठाण्यातून कॉल आला हे कळताच संकर्षणने कार थोडी रस्त्याच्या कडेला लावली आणि त्याने कॉल स्पीकरवरून काढला व लगेच मोबाईल कानाला लावून तो बोलायला लागला. 


" हो, बोला ना सर! कसा काय फोन केला? काय काम काढलंत सर? " संकर्षण अगदी अदबीने बोलला. 


" ते तुमचे मित्र कुणाल राऊत आहेत ना, त्यांच्या अपघाताची केस बंद करण्यात आलेली आहे. " हवालदार भिडे बोलले. 


" काय? पण का? म्हणजे असं अगदी अचानक? अजून पूर्ण तपासणी देखील झाली नव्हती ना! " संकर्षण थोडा आश्चर्याने व जवळ जवळ ओरडून बोलला. 


" हे बघा, मी तुम्हांला प्रश्नोत्तरांचा खेळ खेळायला कॉल केलेला नाहीये म्हणून आवाज थोडा खाली ठेवा आणि इतर माहिती हवी असल्यास पोलिस चौकीला भेट द्या. कळलं? " हवालदार भिडेच्या आवाजात जरब होता. 


" सॉरी सर, मुळात मला तसं म्हणायचं नव्हतं. बरं, असो.. मी इतर माहिती सरांनाच विचारणार, पण तत्पूर्वी तुम्ही मला सांगाल का की, त्या सरांनी कधी बोलावलं आहे भेटायला? " संकर्षणने स्वतःच्या बाजूला थोडेसे नमते घेत विचारले. 


" जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर कारण साहेबांकडे फ्री वेळ नसतो; म्हणून जमलं तर आजच या! शिवाय महत्त्वाचा मुद्दा असा की, आमच्या मोठ्या साहेबांना त्या केस संदर्भात थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. " हवालदार भिडे बोलले. 


" बरं, ठीक आहे सर मी येतो, एक - दोन तासात! " संकर्षण बोलला. 


" अहं! फक्त तुम्ही एकटेच येऊ नका. इकडे येताना सोबत तुमच्या त्या मित्रालाही घेऊन या. काय नाव त्यांचं हा, मिस्टर युग दिक्षित! हा, त्यांनाही तुमच्यासोबतच घेऊन या, कळलं ना! " हवालदार भिडे गूढ हसून बोलले. 


" का? " संकर्षणने एकदा युगकडे आश्चर्याने अन् तेवढ्याच काळजीने पाहिले व थोडा विचार करून त्याने हवालदार भिडे यांना कॉलवर प्रतिसाद दिला. 


" ते काय आहे ना, सरांना फक्त तुमच्याशीच नव्हे तर तुमच्या त्या मित्राशीही बोलायचं आहे म्हणून स्वतः तुम्ही अर्थात मिस्टर संकर्षण देशपांडे आणि तुमचा तो खास मित्र युग दिक्षित, असे तुम्ही दोघेही सोबतच या, आमच्या या आळेफाटा पोलीस चौकीत! वाट बघतोय बरं का आम्ही! " हवालदार भिडे सूचक बोलले. 


" पण सर तुमच्या साहेबांना युगशी एवढं काय महत्त्वाचं बोलायचं आहे? " संकर्षण थोडा काळजीने बोलला. 


" हे बघा, देशपांडे! तुम्हाला स्पष्ट शब्दात मराठीत सांगितलेलं कळतच नाही का? तुम्ही जास्त प्रश्न विचारू नका. तुम्हाला जेवढं सांगितलेलं आहे तेवढं करा. सरांनी तुम्हा दोघांनाही का बोलावून घेतलं? कशासाठी बोलावून घेतलं? यातलं काहीच मला माहीत नाही पण जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर निमूट चौकीत या आणि सगळं सविस्तर स्वतःच साहेबांना विचारून घ्या. कळलं? " हवालदार भिडे चढ्या आवाजात वैतागून बोलले. 


" सर, तसं म्हणायचं नव्हतं ओ! म्हणजे ते काय आहे ना, युगची तब्येत सध्या बरी नाही आहे ना म्हणून.. म्हणून फक्त विचारायचं होतं की, जर युगचं काही काम नसेल तर त्याच्याऐवजी दोघांच्या वतीने मी एकटाच येईल पोलिस ठाण्यात! एवढंच म्हणायचं होतं मला, बाकी काही हेतू नव्हताच माझा! " संकर्षण बोलला.


" हे बघा मिस्टर देशपांडे, आम्हालाही तुमच्याशी चर्चा करण्यात एवढा विशेष रस नाहीच मुळी! फक्त साहेबांना काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे याशिवाय काही जुजबी विचारपूस सुध्दा त्यांना करायची आहे म्हणूनच त्यांनी तुम्हाला बोलावून घेतलं आहे. बाकी युग दिक्षितच्या तब्येतीची खबर आम्हालाही आहे, बरं का! 


               तुम्हाला कॉल करण्याआधी आम्ही इस्पितळात कॉल केला होता तर तेव्हा कळलं की, युग दीक्षितला आजच डिस्चार्ज मिळालेला आहे म्हणून त्यांची भेट घ्यायला आता काहीच हरकत नाही. एवढेच नव्हे तर, खास युग दिक्षितचा उपचार ज्या डॉक्टरांनी केला त्याच डॉक्टरांकडून पूर्व परवानगी घेऊन साहेबांनी तुमचे जिवलग मित्र मिस्टर युग दिक्षित यांच्याशी थोडी चर्चा करण्याचं ठरवलं. म्हणूनच आता तुम्ही जास्त सवाल जवाब न करता जमेल तेव्हा या, कळलं ना! ठेवतो फोन. जय हिंद! " हवालदार भिडे यांनी संकर्षणला खडे बोल ऐकवून पुढे संकर्षणचं काहीही एक ऐकून न घेता तडकाफडकी फोन कट केला. 


               कॉलवर बोलून होताच संकर्षणने मोबाईल त्याच्या खिशात ठेवला आणि तो काहीतरी विचार करून स्टेअरिंगवर हात ठेवून सीटच्या मागच्या दिशेने झुकून, थोडा रेलूनच आणि डोळे मिटून, थोडासा अस्वस्थ अशा अवस्थेत बसला. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट काळजी दिसत होती. 


             खरंतर संकर्षणला युगच्या तब्येतीची काळजी होती कारण अजूनही तो पूर्णपणे ठीक झालेला नव्हता. डॉक्टरांनी विशेष काळजी घ्यायला म्हटलं होतं आणि त्यात जर कुणालविषयी एखादी गंभीर माहिती मिळाली; तर त्याने युगचे मन दुखावण्याची दाट शक्यता होती. याकरिताच संकर्षण काही तरी मार्ग निघेल या आशेने हवालदार भिडेशी बोलत होता पण सरतेशेवटी त्याचे सर्व प्रयत्न निष्फळच ठरले. 


             संकर्षण बराच वेळ त्याच स्थितीत बसलेला असताना युग संकर्षणचा चेहरा हळूच त्याच्या नजरेने टिपत होता आणि म्हणून थोडा कानोसा घेऊन लगेच त्याने थोड्या निर्धारानेच संकर्षणसह बोलण्याची सुरुवात केली. 


" संक्या, काय झालं? कॉल कट करताच तू एवढा गंभीर का झालास? पोलिस चौकीतून कॉल का आला होता आणि आपल्याला कुठे जायचंय नेमकं? काय बोलणं झालं तुझं कॉलवर? " युगने एकाच वेळी अनेक प्रश्न विचारले म्हणून मग संकर्षणने त्याचे आणि हवालदार भिडेचे कॉलवर झालेले संभाषण इत्थंभूत जसेच्या तसे सांगितले. 


त्यावर युग म्हणाला, " संक्या, माझी काळजी करू नको! मी अगदी ठीक आहे! चल लगेच जाऊ आपण. "


" युग, प्रश्न काळजीचा असला तरी मुळात का कोण जाणे पण मन बेचैन झालंय रे! कारण खरं सांगायचं तर मला काळजी बाकी कशाची नाही रे फक्त एवढंच वाटतंय की, तू नुकताच एका धक्क्यातून कसाबसा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतोय अन् त्यात जर आणखी नवीन काही माहिती पडलं तर तुला होणारा त्रास मला नाही पाहावल्या जाणार. 


             कुणालला आपण गमावलं पण आता आणखी कुठली रिस्क नको यार! कारण ज्या दिवशी कुणालचा अपघाती मृत्यू झाला त्याच दिवशी तुझीही फ्लाइट क्रॅश झाली होती, हेच पचनी पडायला जड जातंय. शिवाय खरं सांगायचं तर, भीती वाटते आता नवीन कोणताही धक्का सहन करण्याची. कधीकधी नव्हे आता तर प्रत्येक क्षणी मला वाटायला लागलंय की, आपल्या मैत्रीलाच मुळात कुणाची तरी दृष्ट लागली असावी. " संकर्षण थोडा भावनाविवश होऊन बोलला. 


" संक्या, काळजी नको रे करू. होईल सगळं नीट. हो आपल्या तिघांच्या मैत्रीत कुणालच्या सोबतीची, सहवासाची उणीव जाणवणार पण तो आपल्या हृदयात कायम चिरतरुण असणार! शिवाय मला वाटतं की, कदाचित आपले तिथे जाणे शुभ संकेत असावे म्हणजे जरा विचार कर! समजा, आपण जर तिथे गेल्यावर कुणालच्या अपघाताबद्दल काही ठोस पुरावा मिळाला तर? तर मग कदाचित आपल्या कुणालच्या अपघाताचा उलगडा देखील होईल ना!


                म्हणून आपण दोघांनीही पोलीस ठाण्यात जाऊन त्यासंदर्भात माहिती घ्यायला हवी. शिवाय, तुलाही वाटतं ना आपल्या मैत्रीसाठी काहीतरी करावं, मग आपल्या दोघांचे पोलीस चौकीत जाणे हाच योग्य निर्णय आहे, हेच वाटतं मला. म्हणून चल जाऊ तिथे आपण दोघेही! " युग संकर्षणची समजूत काढत बोलला. 


" हो युग बरोबर बोललास रे तू! पण मनात भीती आणि राग दोन्ही एकत्रच दाटून येतो की, जर समजा आपल्या कुणालचा अपघाती मृत्यू न होता कुणी प्रीप्लॅन केलेला खून असेल तर? तर काय करणार युग आपण? सांग ना काय करणार? " संकर्षणने त्याच्या मनातली शंका व्यक्त केली अन् दुसरीकडे संकर्षणनचं वाक्य ऐकून एकाएकी युगच्या चेहऱ्याचा रंग उडाला आणि तो देखील थोडे आश्चर्याने अन् गांभीर्याने संकर्षणकडे बघू लागला. 


क्रमशः

________________________________________________


©®

सेजल पुंजे. 

०३-०८-२०२२.

टीम नागपूर. 

___________________________________________________

                   नमस्कार कथेचा हा भाग कसा वाटला, हे सांगायला विसरू नका. धन्यवाद. 



🎭 Series Post

View all