Feb 27, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

आभास की वास्तव? (भाग - २९)

Read Later
आभास की वास्तव? (भाग - २९)

राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कथेचे शीर्षक - आभास की वास्तव? 

भाग - २९


थोडा वेळ विसावा घेतल्यानंतर संकर्षण पुढे बोलू लागला, " कुणाल एक दिवस अचानक युगच्या फार्महाऊसवर गेला होता आणि सोबतीला त्याची बहीणही गेली होती. कुणाल सवयीप्रमाणे धरा सोबत लगट करत होता त्यामुळे युग धराबद्दल इनसेक्योर फिल करत होता अन् कुठे ना कुठे त्याला भीती वाटत होती की, कदाचित कुणालच्या आकर्षक रुपाची भुरळ धराला लागू नये. त्याला मनातच धास्ती वाटत होती की, धरा कुणालच्या व्यक्तिमत्त्वाने इन्फ्लुएंस होऊ नये कारण कुणाल एक साधी संधी सोडत नव्हता धराशी फ्लर्ट करण्याची... धरा मात्र कुणाल हा युगचा मित्र असल्याने ती नाईलाजानेच हसून प्रतिसाद देत होती. तर दुसरीकडे कुणालच्या बहिणीचे युगशी लगट करणे धराला रुचत नव्हते. धरालाही युगबद्दल इनसेक्योर फिल होत होतं आणि ती कळत नकळत व्यक्त करत होती पण युगला ते कळत नव्हते. 


                सायंकाळी कुणाल आणि त्याची बहीण अंशिका फार्महाऊसवरून बाहेर पडताच युग आणि धरामध्ये शीतयुद्ध सुरू झालं होतं. दोघेही मुद्दाम कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद घालत होते. माझ्याशी व्हिडिओ कॉलवर बोलतानाही दोघे एकमेकांना टाळत होते. दुसऱ्या दिवशीही परत कुणाल आणि त्याची बहिण युगच्या फार्महाऊसवर गेले होते. परत तसेच घडले. साधारण एक आठवडा दोघेही शीतयुद्ध करून आतल्या आत झुरत होते अन् एक दिवस त्यांच्या भावनांचा विस्फोट झालाच... माझ्याशी व्हिडिओ कॉलवर बोलताना अन् सहजच चेष्टामस्करी करताना अशी परिस्थिती निर्माण झाली की, दोघेही अगतिकपणे त्यांचे प्रेम व्यक्त करून गेले. जेव्हा त्यांच्या लक्षात आले की, त्यांनी कळत नकळत त्यांच्या प्रेमाची कबुली दिलेली आहे तेव्हा दोघेही ओशाळले पण त्यानंतर त्यांनी परत एकमेकांसमक्ष खऱ्या अर्थाने कबुली दिली.


                मी दोघांसाठी खूप खूश होतो कारण दोघेही एकमेकांसाठी परफेक्ट मॅच होते. म्हणतात ना, लग्नाच्या गाठी स्वर्गातच जुळून येतात ते खरेच असावे, म्हणून योगायोगाने ते आधी करारात बांधले गेले अन् नंतर त्यांचे हृदय प्रेमाच्या बंधनात गुंफल्या गेले. त्यांना खरेखुरे विधिवत लग्न करायचे होते, कुठल्याही कराराविना अन् याची कल्पना त्यांनी मला दिली होती. मीही सहमत होतोच पण माझे एक महिन्यानंतर ग्रॅज्युएशन पूर्ण होणार होते. म्हणून त्यांनी लग्न एक महिन्यानंतर करण्याचे ठरवले. 


               तोपर्यंत त्या दोघांनी लग्नाची सर्व व्यवस्था केली होती, दोघेही खूप खूश होते. अशातच युगला एका डीलकरिता दिल्लीला जावे लागणार होते. का कुणास ठाऊक धराने युगला दिल्लीला न जाण्याचे सुचवले पण युगला धराच्या मनाविरुद्ध दिल्लीला जाणे भाग होते कारण ती डील त्याच्या व्यवसायाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची होती. म्हणून त्याने धराची समजूत काढली. तिनेही मनातील नकारात्मक विचारांना झटकून देत युगला दिल्लीला जाण्याची परवानगी दिली. 


               लगेच दुसऱ्या दिवशी युग दिल्लीला रवाना झाला. तो कॅबने एअरपोर्टला जात असताना मी, धरा आणि युग आम्ही तिघेही व्हिडिओ कॉलवर बोलत होतो. धरा उगाच नाटकी रुसून होती अन् खोटी खोटी युगची माझ्याकडे तक्रार करत होती. युगही हसूनच तिचा रुसवा काढण्याचा प्रयत्न करत होता. मी मात्र दोघांचीही खेचत होतो. आमची चेष्टामस्करी सुरू असताना डोअरबेल वाजली. धराने तिचा मोबाईल टेबलवरील मोबाईल स्टॅंडमध्ये ठेवला व व्हिडिओ कॉल म्युट केला अन् ती दार उघडायला गेली. दुसरीकडे युगकडून कॉल कट झाला. त्याने परत कॉल लावला पण कॉल व्यस्त दाखवत असल्याने तो त्या व्हिडिओ कॉलला जॉईन होऊ शकला नाही. त्याने मॅसेज करून मला सांगितले की, धरा जेव्हा व्हिडिओ अनम्युट करेल तेव्हा त्याला त्या कॉलला जॉईन करावे. मी ही युगला होकार दिला अन् व्हिडिओ कॉल लेफ्ट न करता तिथेच थांबून राहिलो. 


                मी व्हिडिओ कॉलवरच होतो अन् तेवढ्यात मला हॉलमध्ये कुणाल आलेला दिसला. तो धरा सोबत काहीतरी बोलत होता पण कॉल म्युट असल्याने मला काहीच कळत नव्हते. आधी धरा सोबत अदबीने वागणारा कुणाल थोड्या वेळाने आक्रमक झाला होता. मला काय करावे अन् काय नाही कळत नव्हते. माझ्या डोक्यात जात होता तो... अन् तेवढ्यात तो तिच्याशी लगट करू लागला. धरा त्याला विरोध करत होती तर तो तिच्याशी अक्षरशः भांडू लागला. त्याने आक्रमक होऊन तिचे केस पकडून तिला भिंतीवर आदळले आणि माझा पेशन्स तिथेच ढासळला. तेवढ्यात मला दिसले की, कुणालने कुणाला तरी कॉल लावला आणि लगेच त्याने कॉल ठेवला. कॉल ठेवताच तो परत धराला मारझोड करू लागला. मी पुरता ब्लॅंक झालो होतो. तेवढ्यात मला युग आठवला अन् दुसऱ्याच क्षणी कुणालने धराचे डोके स्वतःच्या मुठीत पकडले आणि तिला टेबलवर आदळले. त्यामुळे तिचा मोबाईल इम्बॅलन्स झाला आणि कॉल डिस्कनेक्ट झाला. 


                 त्यापुढे काय झाले मला माहीत नाही, कुणालने धरा सोबत काय केले मला ते ही माहिती नाही... पण कॉल डिस्कनेक्ट होताच मी परत कॉल लावण्याचे बरेच प्रयत्न केले परंतु तिचा मोबाईल स्विच ऑफ दाखवत होता. मी साधारण अंदाज बांधला की, मोबाईल डॅमेज झाला असावा पण मला धराची काळजी वाटत होती. मी युगला वारंवार कॉल करत होतो पण त्याचाही कॉल लागेना... मी पुढचा मागचा विचार केला नाही आणि इंडियाची फ्लाईट बुक केली पण मला तातडीने सीट बुक करता आली नाही कारण ऑलरेडी सीट्स रिझर्व्ह झालेल्या होत्या. म्हणून मला नाईलाजाने सहा तासांनंतरची फ्लाईट बुक करावी लागली.


                मला तर आणखी काही सुचत नव्हते. माझी ग्रॅज्युएशनची एक्झाम आधीच देऊन झाली होती. ऑफिशियल ड्रिग्री एक - दोन आठवड्यात येणार होतीच म्हणून मी पुण्यात गेलो तरी माझ्या शिक्षणावरही परिणाम होणार नव्हता; पण त्यावेळी मी हा देखील विचार केला नव्हता. मला फक्त फिकीर होती ती एवढीच की, ते तीन तास कसेबसे सरून जावे आणि मी फ्लाईट घेऊन लवकरात लवकर पुण्याला जावे. 


                मी एअरपोर्टला आधीच जाऊन बसलेल़ो होतो आणि सातत्याने प्रयत्न करत होतो युगला कॉल करण्याचा पण हाती निराशाच येत होती. माझ्या डोळ्यापुढे धराचा चेहरा येत होता. कुणालने तिला केलेली मारझोड आठवून क्षणाक्षणाला माझा राग उफाळत होता. मी त्याच विचारात होतो अन् साधारण तीन साडेतीन तासानंतर मला युगचा कॉल आला. तो खूप घाबरलेला होता आणि तो फक्त एवढाच बोलला की, कुणालने धराचा त्याच्या डोळ्यादेखत खून केला आणि म्हणून त्याच्या नकळत त्याने कुणालचा खून केला. मी ते सर्व ऐकून शॉक झालो होतो. कळतच नव्हते काय वागावे अन् काय बोलावे. जे कुणालने केले त्यासाठी नक्कीच युगने त्याला योग्य शिक्षा दिली आहे, मला असे वाटले... पण धराचा नाहक बळी गेला होता, ही सल माझ्या मनाला पोखरून गेली. 


                तर दुसरीकडे माझ्या मनात पुढे काय, हा प्रश्न होताच म्हणून मी युगला धीर दिला आणि त्याला सांगितले की, मी तिथे येतोय त्यामुळे नंतर सर्व मिळून सोबत निस्तरता येईल... पण युगने मला पुण्यात येण्यापासून अडवले आणि तो बोलला की, तो सर्व त्याच्या परीने सांभाळून घेईल. त्याने सर्व बंदोबस्त केलेला आहे, त्याने कुणालचे शत्रू असलेल्या काही अंडरग्राउंड गुंडांच्या मदतीने कुणालच्या मृत्यूला अपघाती वळण देण्याचे नियोजन केले असल्याचे युगने सांगितले व कॉल कट केला. त्यानंतर त्याने माझ्याशी संपर्क केला नाही. त्यानंतर मला कॉल आला तो युगच्या फ्लाईट क्रॅशचा... मी इथे आलो आणि वेगळेच पैलू माझ्यापुढे उलगडत गेले. मला कळले की, बिकटप्रसंगी युगने एवढ्या चतुराईने मार्ग काढल्याचे मला नवल वाटायला नको होते कारण मला चतुर वाटलेली विकृत बुद्धी युगची नसून कुणालची होती. " संकर्षणच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. 


" म्हणजे संकर्षण त्यादिवशी फार्महाऊसवर नेमके काय झाले आणि धरा व युगची हत्या कशी झाली? हे तुम्हालाही माहिती नाहीये का? " इन्स्पेक्टर श्रेयसने विचारले. 


" हो सर! " संकर्षण उदास होऊन बोलला. 


" मग आता आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे या कुणालकडूनच वदवून घ्यावी लागतील तर... " इन्स्पेक्टर श्रेयस सोफ्यावर बेशुद्ध अवस्थेत लोळणाऱ्या कुणालकडे पाहून बोलले आणि त्यांनी असे बोलताच सगळ्यांच्या नजरा सोफ्यावर असलेल्या कुणालवर स्थिरावल्या. 


क्रमशः

_______________________________


©®

सेजल पुंजे.

१०-०९-२०२२.

टीम नागपूर.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//