Login

आभास की वास्तव? (भाग - २७)

आभास आणि वास्तवाच्या कचाट्यात गुंतलेली रहस्यकथा... सत्य आणि असत्याचा शोध घेणारी कथामालिका...

राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कथेचे शीर्षक - आभास की वास्तव? 

भाग - २७


" काय? " इन्स्पेक्टर श्रेयस आश्चर्यचकित होऊन जवळजवळ ओरडून बोलले. 


इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळेचा आवाज ऐकताच युग गप्प झाला कारण संतापात व तावातावात तो बरंच काही बोलून गेला होता अन् आताशा त्याला त्याची चूक देखील कळून चुकली होती. तो उगाच सारवासारव करण्याचा प्रयत्न करत बोलला, " सर मी... मी... चुकून बोलून गेलो. मला असं काही म्हणायचं नव्हतं. मी युगच आहे. " 


" गप आता... खूप खोटं बोललास तू यापुढे एक शब्दही उच्चारायचा नाहीस! " संकर्षण बोलला आणि त्याने बनावटी युगच्या चेहऱ्याला हात लावून त्याच्या चेहऱ्याचा बनावटी मास्क काढला. मास्क काढताच सगळ्यांना कुणालचा चेहरा दिसला आणि परत एकदा तिथे शुकशुकाट पसरला. 


" ओह माय गॉड! " इन्स्पेक्टर श्रेयस नवल व्यक्त करत हळूच पुटपुटले. 


" हेच सिद्ध करायचं होतं मला सर! त्याकरिता मला बरेचदा खोटंही बोलावं लागलं... पण मी जे केलं त्यामागे माझा हेतू चुकीचा नव्हता. तरीही मी कायद्याला स्वतःच्या हातात घेतले आणि त्यासाठी मी हवी ती शिक्षा भोगायलाही तयार आहे. " संकर्षण इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळेपुढे दिलगिरी व्यक्त करत बोलला. 


तेवढ्यात दोन्ही हवालदारांना धक्का देऊन बनावटी युग अर्थात कुणालने दोन्ही हवालदारांची पिस्तुले बळकावली व त्यानंतर जोरजोरात तो खूनशी हसू लागला. त्याने एक पिस्तूल संकर्षणवर ताणली व तो संकर्षणला उद्देशून म्हणाला, " तुला शिक्षा हमखास मिळणार पण ती शिक्षा हा दोन दमडीचा इन्स्पेक्टर नव्हे तर मी देणार! आता तू पण मर जसा तो युग मेला आणि त्याची ती धरा मेली... हा... हा... हा... "


इन्स्पेक्टर श्रेयस कुणालच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते अन् तेवढ्यात कुणालचे लक्ष त्यांच्याकडे गेले. म्हणून त्याने त्याच्या दुसऱ्या हातातली पिस्तूल इन्स्पेक्टर श्रेयसवर ताणली व कुत्सितपणे खिदळून तो बोलला, " आणि सुपर जिनियस इन्स्पेक्टर श्रेयस तुम्हीही मोक्षप्राप्तीच्या वाटेने वाटचाल करा आता... पृथ्वीतलावर बरेच केस सॉल्व्ह केले असतील ना आता मृत्यू लोकात बसा हं... मेलेल्या माणसांचे केस सॉल्व्ह करत! " 


               कुणाल बेभान होऊन खिदळत होता आणि तेच औचित्य साधून दोन हवालदारांनी एकीकडे हालचाल करून त्याची दिशाभूल केली. तर दुसरीकडे इन्स्पेक्टर श्रेयसने लगेच कुणाल ज्या हवालदारांच्या दिशेने जात होता त्या दिशेनेच जवळच असलेला एक स्टूल सरकवून दिला. त्यामुळे कुणालचा थोडासा काही होईना बॅलन्स बिघडला म्हणून मनोहरने खिशातून लगेच काही गार कंचे काढले व जमिनीवर फेकले. कुणालचा त्यावर पाय पडताच तो पूर्णतः इम्बॅलन्स झाला आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर श्रेयसने त्याच्या कंबरेवर लाथ मारली. कुणाल अगदी तोंडाच्या भारावर पडला. त्याच्या नाकातून रक्त वाहू लागलं. तसेच त्याच्या हातातून दोन्ही पिस्तुले थोड्या अंतरावर पडले. 


                ती दोन्ही पिस्तुले हवालदारांनी उचलून घेतली. तोपर्यंत कुणाल परत उठून उभा राहिला आणि त्याने इन्स्पेक्टर श्रेयसवर ठोसा उगारला पण इन्स्पेक्टर श्रेयसने त्याचा हात अडवला व उलट त्याच्याच दोन्ही गालावर दोन ठोसे मारले. त्यामुळे तो गटांगळ्या खात संकर्षणच्या अंगावर गेला. संकर्षण काही हालचाल करणार त्याआधीच कुणाल खुनशी हसला व त्याने संकर्षणवर रागीट कटाक्ष टाकला अन् तो संकर्षणचा गळा आवळू लागला. इन्स्पेक्टर श्रेयस संकर्षणच्या मदतीला जाणार तेवढ्यात स्वसंरक्षणासाठी संकर्षणनेच बळ एकवटून कुणालला हिसका मारला व त्याला दूर ढकलले अन् कुणालच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली. 


                कुणालचे हात संकर्षणच्या गळ्यापासून विलग होताच संकर्षण मोठमोठ्याने धापा टाकू लागला. काही वेळाने त्याने हृदयाची वाढलेली स्पंदने अन् वाढलेल्या श्वासांवर नियंत्रण साधले व नंतर त्याने कुणालकडे नजर भिरकावली. कुणालकडे पाहताच त्याचे डोळे विस्फारले कारण कुणाल जमिनीवर बेशुद्धावस्थेत पडलेला होता. संकर्षणने कुणालला ढकलल्यामुळे तो जवळच्याच एका टेबलवर जाऊन आपटला. त्यामुळे हलकीशी जखम त्याच्या कपाळावर झाली व हलकासा रक्तस्राव झाल्यामुळे तो बेशुद्ध झाला होता; पण कुणालची ती अवस्था बघून संकर्षण घाबरून गेला. 


                संकर्षण स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होता पण इन्स्पेक्टर श्रेयसने संकर्षणची समजूत घातली. हलकीशीच जखम असल्याने कुणालला काही वेळातच जाग येईल, असेही सांगितले. हे कळताच संकर्षणच्या जीवात जीव आला. त्याने सुटकेचा श्वास घेतला. 


थोड्याच वेळात संकर्षण बऱ्यापैकी शांत झाला. म्हणून मग इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे यांनी संकर्षणची विचारपूस करायला सुरुवात केली. ते म्हणाले, " संकर्षण, जर आता तुम्हाला हरकत नसेल तर तुम्ही खरं खरं सांगाल का की, तुम्हाला कसे कळले कुणालच्या या रहस्याबद्दल? तसेच कुणालने ज्या धराची हत्या केली, ती नेमकी कोण आहे? आणि कुणाल हा तुम्हा दोघांच्या बालपणीचा मित्र असताना तुमच्याच जीवाचा वैरी कसा काय झाला? "


" सर, सांगतो सगळं! धरा माझी मानस बहिण... दिसायला अगदी सुंदर आणि क्युटदेखील... गोरा वर्ण, सडपातळ बांधा, काळे रेशमी केस, चाफेकळी नाक, लक्षवेधक स्मित आणि आकर्षक डोळे! अगदीच सालस, कुणालाही एका क्षणात आपलेसे करणारी... बरीच बोलकी पण तेवढीच शांत, थोडा विरोधाभासच जाणवायचा तिच्या स्वभावात! 


                खूप खास नातं होतं आमचं... अगदी रक्ताच्या नात्यालाही लाजवणारं... मी ऑस्ट्रेलियाला बी. एच. एम. फर्स्ट इयरला होतो पण काही कामानिमित्त भारतात आलेलो असताना तिची माझी ओळख झाली. म्हणजे माझा तिच्या कॉलेजजवळ अपघात झाला होता, त्यात माझा बराच रक्तस्राव झाला होता. त्यावेळी माझ्या रक्तगटाची बाटली इस्पितळात उपलब्ध नव्हती. योगायोगाने ती त्याच शासकीय इस्पितळातील विद्यार्थिनी होती. तिने ऐन वेळेवर स्वतः रक्तदान करून मरणाच्या दारातून मला वाचवलं होतं. मी तिचे आभार मानले, तिने मात्र स्वतःचा मोठेपणा झाकोळून राखी पौर्णिमाच्या निमित्ताने एका भावाचा जीव वाचवला असल्याचे ती बोलली. मला तिचे खूप कौतुक वाटले आणि तिथून आमच्या नात्याला सुरुवात झाली. 


               तिच्याबद्दल मी युगला फक्त कल्पना दिली होती. प्रत्यक्ष भेट घडवून दिली नव्हती; कारण तिच्या घरी काही मर्यादा होत्या. त्यामुळे ती माझ्याशीही क्वचितच भेट घ्यायची; पण कायम ' दादूस दादूस ' बोलून लळा लावायची. आम्ही दोघेही आमचे नाते जपत होतो. मी तिच्याकडे माझा इमर्जन्सीकरीता एक नंबर दिलेला होता. त्यानंबरवर मला एकदा तिने तातडीनेच कॉल केला. त्यानंबरवर सहसा कुणी कॉल करायचे नाही, अनोळखी नंबर दिसताच मी कॉल उचलला अन् लगेच पलिकडून मला तिचा आवाज आला. 


               धरा कॉलवर बोलली की, तिच्या बाबांनी व मोठ्या वडीलांनी मिळून तिचं लग्न त्यांच्या एका मित्राच्या मुलाशी करून देण्याचा हट्ट धरलाय. तिने तिच्या आई व बाबांची बरीच समजूत घातली पण त्यांनी तिचे काहीही एक ऐकून घेतले नाही. पर्यायी घरून पळून जाण्याशिवाय तिला अन्य कोणताही मार्ग सुचला नाही. तिला तिच्या सख्ख्या भावाकडून खूप अपेक्षा होत्या पण तो त्याच्या पेशामुळे घरापासून लांब राहत होता. तिने त्याला तिच्याबद्दल कळवण्याचे अथक प्रयत्न केले; पण त्याचा मोबाईल नंबर कायम नॉट रिचेबल यायचा. म्हणून ती सरतेशेवटी कोणालाही सूचना न करता घरातून पळून गेली आणि यात तिला एका अनोळखी व्यक्तीने साथ दिली. 


               जेव्हा तिच्यासाठी अनोळखी असलेल्या व्यक्तीविषयी मी तिच्याकडून माहिती घेतली. तेव्हा कळले की, धराची मदत करणारा दुसरा तिसरा कुणी नसून स्वतः युग होता. पुढे युगने तिच्या हातातून मोबाईल घेतला व तो माझ्याशी कॉलवर बोलला. तेव्हा त्याने सांगितले की, तो महाबळेश्वरहून पहाटेच्या सुमारास एक डिल आटोपून त्याच्या कारने येत असताना त्याला एका छोट्याशा गावाच्या सीमेलगत सामसूम ठिकाणाहून धरा पळताना दिसली. आडवळणाचा रस्ता त्यात धुके असल्याने तो सावकाश कार चालवत होता नि तेवढ्यात त्याला दिसले की, धराला ठेच लागल्याने ती खाली पडली व थोडी जखमही झाली होती. युगने कार थांबवून तिला उठायला मदत केली. तिच्या पायाच्या जखमेवर रुमाल बांधली अन् तेव्हा कचरूनच तिने त्याच्याकडे लिफ्ट मागितली. 


               एरवी युग अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देणे नाकारायचा पण त्यावेळी सामसूम ठिकाणी तिला एकटे सोडणे त्याला गैर वाटले. म्हणून त्याने तिला लिफ्ट द्यायला होकार दिला. त्याने तिची सुटकेस डिक्कीत ठेवून दिली व तिला कारच्या बॅक सीटवर बसायला सांगितले. त्यानंतर तो ही कारमध्ये बसला व नंतर त्या दोघांचा प्रवास सुरू झाला. " संकर्षणने एवढे बोलून टेबलवर ठेवलेला पाण्याचा प्याला ओठांना लावला. 


क्रमशः

_________________________________________


©®

सेजल पुंजे 

०७-०९-२०२२.

टीम नागपूर. 


🎭 Series Post

View all