आभास की वास्तव? (भाग - २६)

आभास आणि वास्तवाच्या कचाट्यात गुंतलेली रहस्यकथा... सत्य आणि असत्याचा शोध घेणारी कथामालिका...

राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कथेचे शीर्षक - आभास की वास्तव? 

भाग - २६


" संकर्षण हे सर्व तुम्ही आम्हाला आधीच का नाही सांगितलं? तुम्हाला माहित आहे, जर तुम्ही आम्हाला कळवायला आणखी उशीर केला असता तर काय घडले असते? किंवा आम्ही तुमच्या एका कॉलवर इथे आलो नसतो तर सध्या परिस्थिती काही वेगळी असती, असे नाही का वाटत तुम्हाला? " इन्स्पेक्टर श्रेयस संकर्षणला चढ्या आवाजात बोलले.


" सॉरी सर! " संकर्षणने दिलगिरी व्यक्त केली. 


" सॉरी बोलून परिस्थितीचे गांभीर्य कमी होणार नाहीये पण असो! आणि आता सांगा पुढे... " इन्स्पेक्टर श्रेयस म्हणाले. 


" सर, तो बोलतोय त्यात काहीच तथ्य नाहीये. " युग मध्येच बोलला. 


" तथ्य आहे की नाही ते आम्ही ठरवणार. कळलं? आणि तुम्ही फक्त तुम्हाला जेव्हा बोलायची संधी दिली जाईल तेव्हाच बोलायचं. मध्येच संवादात उडी घ्यायची नाही. " इन्स्पेक्टर श्रेयस नजर रोखून म्हणाले. 


" पण सर... " युग पुढे काही बोलण्याआधीच इन्स्पेक्टर श्रेयसने त्याला अडवले व संकर्षणला बोलण्याचा इशारा केला. 


संकर्षण बोलू लागला, " सर, सत्य काही वेगळेच होते. ह्या ढोंगी माणसाने आतापर्यंत फसवणूक केली माझी... हा मुद्दाम मला इथे घेऊन आला कारण इथे स्वतःच्या साथीदारांच्या साहाय्याने माझा जीवे मारण्याचा बेत याने आधीच आखला होता... आणि माझा जीव घेण्यामागे फक्त एकच कारण होतं ते म्हणजे कुणालच्या केसबाबतीत माझे बारीक लक्ष असणे! मी कुणाल केस संदर्भात शोधाशोध करण्यात कायम गुंतून होतो आणि ह्या बनावटी युगच्या मनात आधीच भीती दाटलेली होती, ह्याचा काळा चेहरा माझ्यापुढे येण्याची... म्हणूनच पूर्वनियोजन करून ह्याने सगळं ढोंग केलं. 


                सर्वप्रथम मला विश्वासात घेतलं आणि जसा ह्याने कुणालचा खून केला ना हेवी ड्रग्जचा ओव्हरडोझ देऊन... अगदी त्याचप्रकारे तो माझा खून करणार होता पण बाप्पाच्या कृपेने मी ह्या बनावटी युगने खास माझ्यासाठी बनवलेला ज्युस पिला नाही कारण चुकून माझ्याकडून ज्यूस खाली पडला होता... पण योगायोगाने मी बेडवर डोळे मिटून पडून होतो आणि मला असे पाहून ह्याला गैरसमज झाला की, मला ड्रग्जचा ओव्हरडोझ झालेला आहे अन् त्यामुळेच मी बेशुद्ध पडून असावा. म्हणून मी तिथेच असताना हा ह्याच्या सहकाऱ्यांशी कॉलवर बोलत राहिला. 


                कॉलवरचे ह्याचे बोलणे ऐकून मला कळले की, हा तर युग नाहीच आहे. हा कुणी ढोंगी आहे आणि ह्याच्या ताब्यात माझा युग आहे. सर, हाच खूनी आहे कुणालचा! ह्याला काही हॅल्युसिनेशन वगैरे होत नाहीये. हा निव्वळ बनावटी माणूस आहे. हाच खूनी आहे कुणालचा! आणि हा माझ्या युगचा पण खून करणार आहे. "


" काय? नाही सर, असं काहीच नाहीये. मी निर्दोष आहे. " युग इन्स्पेक्टर श्रेयसकडे पाहून बोलला. नंतर तो संकर्षणला उद्देशून म्हणाला, " संक्या, असा खोटा आरोप का लावतोय यार? हे बघ माझ्याकडे बघ! मी तुझाच युग आहे. "


" नाहीये तू माझा युग! आणि कधी होऊ पण शकणार नाहीस. " संकर्षण युगशी परत तुसडेपणाने बोलला व नंतर इन्स्पेक्टर श्रेयसला उद्देशून म्हणाला, " सर, अटक करा ह्याला... ह्याला अटक केली तर ह्याचे साथीदार आपोआप शरणागती पत्करतील. "


" मि. संकर्षण तुम्हाला पूर्ण खात्री आहे तुम्ही जे बोललात त्याविषयी? मी परत एकदा विचारतोय, तुमचे आपापसातील मतभेद वा वैयक्तिक वैमनस्य यामुळे तर तुम्ही असा गंभीर आरोप करत नाहीये ना? किंवा तुम्हाला काही गैरसमज झालेले नाहीत ना? तुम्हाला खरंच वाटतं की, ही व्यक्ती म्हणजे तुमचा मित्र युग दिक्षित नाहीये " इन्स्पेक्टर श्रेयसने संकर्षणला विचारले. 


" सर! मी केव्हाही, कधीही आणि कुठेही हाच कबुलीजबाब देणार! एवढेच नव्हे तर, जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी मी लेखी नमूद करून देतो की, हा माणूस बनावटी युग आहे. हा अस्सल युग नाहीये. " संकर्षण त्याच्या मुद्द्यावर ठाम होता. 


" हवालदार ह्या व्यक्तिला आधी बेड्या घाला. " इन्स्पेक्टर श्रेयसने आदेश सोडला. 


दोन हवालदारांनी युगला घट्ट पकडून घेतले. युग पाणावलेल्या डोळ्यांनी संकर्षणला म्हणाला, " संक्या, एकदा विचार कर रे की, तू कुणाबद्दल बोलतोय ह्याचा... आपण बालपणीचे जिवलग मित्र आहोत यार आणि तू एवढा कसा बदललास? " 


" मी बदललेलो नाहीये. मी माझ्या मित्रांशी प्रामाणिकच आहे. मला कुणालला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि युगची सुटका तुझ्या तावडीतून करायची आहे. म्हणून मला शहाणपणा शिकवू नको! " संकर्षण चिडून म्हणाला. 


" संक्या यार... तू नको ते आरोप लावतोय माझ्यावर... मीच युग आहे तुला कळत कसं नाहीये... बरं! जर तू म्हणतोय की, मी युग नसून कुणी बनावटी आहे. तर हे तू कसं सिद्ध करणार आहेस? संक्या, बिन बुडाच्या गोष्टी करू नको, उगाच थापाही मारू नकोस. मीच युग आहे आणि हेच सत्य आहे. " युग बोलला. 


" नाही इन्स्पेक्टर साहेब! हा माणूस खोटं बोलत आहे. ह्या माणसाने मघाशी संकर्षण साहेबांवर हल्ला करण्याआधी स्वतःच कबूल केले होते की, ते बनावटी आहेत. साहेब, खूप खतरनाक माणूस आहे हा आणि ह्याचे साथीदार सुद्धा... " मनोहर बोलला. 


" नाही! तुम्ही सर्व खोटं बोलत आहात आणि माझ्यावर उगाच खोटे आरोप लावत आहात. श्रेयस सर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी... मीच युग आहे. " युग बोलला. 


" गप रे चल! भंकस करू नको हं! तू म्हटलंस ना सिद्ध कर की, तू युग नाहीये. तर कानात तेल घालून ऐक, माझ्याकडे पुरावा आहे. " संकर्षण म्हणाला. 


" काय पुरावा आहे तुझ्याकडे? हे बघ, हा कोण माणूस बोलतोय ना मनोहर नावाचा या व्यक्तीचं स्टेटमेंट देखील कायदा विचारात घेणार नाही. म्हणून कितीही तू उगाच आरडाओरडा केलास ना तरीही काहीच सिद्ध होणार नाहीये. म्हणून मीच युग आहे, या सत्याचा स्विकार कर... मी तुझ्यावर नाराज नाहीये. तू माझ्यावर आरोप केलेस तरी माझ्या मनात आपल्या मैत्रीसाठी कायम प्रथमच स्थान आहे. " युग बोलला. 


" बास हं! उगाच सभ्यतेचा अन् भोळेपणाचा कळस गाठू नको. तुझ्या मनात मैत्रीची जागा काय आहे ते कळलंय मला... म्हणून तर एकीकडे कुणालचा खून केलास आणि दुसरीकडे युगचं अपहरण करून त्याच्या जागी स्वतःचा जम बसवू पाहतोय. हं! " संकर्षण तावातावाने बोलत होता. 


इन्स्पेक्टर श्रेयस आळीपाळीने दोघांकडे पाहत होते व त्यांच्या हालचाली टिपत होते. तेवढ्यात युग परत बोलला, " संक्या, तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे. तू असा माझ्यावर खोटा आरोप लावू नको. एकदा विचार कर रे मित्रा... कुणाल जिथे कुठेही असेल तिथून तो आपल्याला पाहत असेल, तर त्याला कसे वाटत असेल, आपल्याला असे भांडताना पाहून? निदान तू आपल्या एवढ्या वर्षाच्या मैत्रीची मर्यादा तरी पाळ! "


" कसली मर्यादा आणि कसलं काय? आणि तू दिलेल्या शपथा वा आणाभाकांमुळे मी माझा कबुलीजबाब का म्हणून बदलू? तू माझा कोणीच नाहीये म्हणून उगाच ही अशी मैत्रीची खोटी शपथ दिलीस तर मी इमोशनल होईल असं वाटलं का तुला? तर हा गैरसमज दूर कर कारण मी जे करतोय ते फक्त नि फक्त माझ्या मित्रांसाठी! कुणाल आणि युगसाठी... " संकर्षण बोलला. 


युगला एक क्षणही बोलू न देता संकर्षण युगला म्हणाला, " ए मला तुझ्याशी आता एक शब्द बोलायचा नाहीये. " 


" संक्या... " युग अर्धवटच बोलला.


" सर, अटक करा ह्याला... ह्या मनोहर व्यतिरिक्तही माझ्याकडे इतर पुरावे आहेत या बनावटी युगविरुद्ध! ज्यामुळे स्पष्टच अधोरेखित होईल की, हा व्यक्ती युग नसून पाखंडी आहे. त्याचप्रमाणे हे देखील सिद्ध होईल की, ह्यानेच कुणालचा खून केलाय. " संकर्षण आक्रोश व्यक्त करत म्हणाला. 


" इन्स्पेक्टर हा संकर्षण खोटं बोलतोय! मीच खरा युग आहे विश्वास ठेवा माझ्यावर... " युग बोलला. 


" सर, तुम्ही त्याचं काहीही ऐकू नका. माझ्याकडे सत्य उघडकीस आणण्यासाठी बरेच पुरावे आहेत. एवढेच नव्हे तर कुणालचा खून ह्यानेच केला आहे, ह्याची ग्वाही देणारा साक्षीदारही माझ्याकडे आहे. एका व्यक्तीने स्वतः पाहिले आहे, ह्याला कुणालचा खून करताना... आणि तो व्यक्ती तयार आहे ग्वाही द्यायला... " संकर्षण म्हणाला. 


" संकर्षण तुमच्याकडे पुरावा आणि साक्षीदार आहे ना... बास! आणखी चर्चा नको. " इन्स्पेक्टर श्रेयस संकर्षणला उद्देशून बोलले व नंतर त्यांनी हवालदारांना फर्मान सोडले, " हवालदार या बनावटी युगला ताब्यात घ्या पण तत्पूर्वी त्याच्या हातात बेड्या ठोका. " 


एकीकडे संकर्षण आणि मनोहर युगवर वारंवार आरोप करत होते. दुसरीकडे हवालदारांनी युगच्या हातांना जखडून घेतले होते. सरतेशेवटी युग खूप संतापला आणि स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करताना चिडूनच बोलला, " संकर्षण तू बोलतोय ते सर्व अशक्य आहे. " 


" का अशक्य आहे? " इन्स्पेक्टरनेही चढ्या आवाजात विचारले. 


" कारण कुणाल मी आहे आणि युगचा खून निर्जन ठिकाणी मी स्वतः केला होता व सर्व पुरावे नष्ट झाल्याची खबरदारी मी स्वतः घेतली होती. " युग चिडून बोलला; पण त्याचे वाक्य ऐकून तिथे उपस्थित सगळ्यांनाच आश्चर्याचा जबर धक्का बसला, त्याला अपवाद फक्त संकर्षण आणि मनोहर होते. बाकी सगळेच मात्र डोळे विस्फारून जागीच स्तब्ध उभे राहिले. 


क्रमशः

______________________________________


©®

सेजल पुंजे.

०६-०९-२०२२.

टीम नागपूर. 


🎭 Series Post

View all