Feb 29, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

आभास की वास्तव? (भाग - २५)

Read Later
आभास की वास्तव? (भाग - २५)

राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कथेचे शीर्षक - आभास की वास्तव? 

भाग - २५


" असे का बघत आहात तुम्ही साहेब? मी खरं तेच सांगतोय ना... की, मी दुपारी नाटक आटोपून माझ्या घरी जात होतो आणि तेवढ्यात तुम्ही मला महाराज महाराज म्हणून इकडे आणलं. तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही नुसती वायफळ बडबड करत आहात. मी कितीदा सांगितलं तुम्हाला की हे बघा, मी फक्त नाटकात महाराजाची भूमिका वठवलेली आहे प्रत्यक्षात मी साधा माणूस आहे. माझं इथे स्वतःच्या अभिनयावरच नियंत्रण नाहीये तर मी कुणा आत्म्यावर कसे काय नियंत्रण ठेवणार ओ? " मनोहर बोलला. 


युग गोंधळून गेला होता. तो अडखळतच त्या सिद्धपुरुष महाराज अर्थात मनोहरला उद्देशून म्हणाला, " काय? महाराज असे का बोलत आहात? तुम्ही मला आणि संकर्षणला प्रत्येकी एक रुद्राक्षमाळ दिली होती. शिवाय एक स्टार सारखी रांगोळीही काढली होती आणि तिथेच मंत्र देखील लिहिले होते की... धराच्या आत्म्याला कैद करण्यासाठी... " 


" कोणती रांगोळी आणि कोणते मंत्र? मुळात कुठे काढली मी ती रांगोळी? " मनोहर वैतागून बोलला. 


" त्या तिथे... " युगने एका ठिकाणी इशारा केला. सगळ्यांनी त्याच्या बोटाच्या दिशेने पाहिले आणि युगसह सगळेच आश्चर्यचकित झाले. युगचे डोळेही आपोआप विस्फारले कारण त्या ठिकाणी काहीच नव्हते. 


युग धावत त्या ठिकाणी गेला. गुडघ्यावर बसून जमिनीवर हात फिरवून चाचपणी करू लागला. तो ओठातच पुटपुटला, " इथेच तर होती ती रांगोळी आणि इथेच तर आरसे देखील होते; पण आता इथे त्यापैकी काहीच दिसत नाहीये. कसं शक्य आहे? काय होतंय हे? " 


" सापडले का रांगोळीचे अवशेष मि. युग? नसेल सापडले तर आपण विशेषज्ञांच्या हस्ते शोधून काढूया, काळजी नका करू! " इन्स्पेक्टर श्रेयस कुत्सितपणे म्हणाले. 


" संक्या, भावा... तू तरी बघ ना यार... तू तरी बोल काही... " युग संकर्षणकडे आशेने पाहून बोलला.


" सर, मी सांगितले आहे ना तुम्हाला! ह्याला गेल्या एक महिन्यापासून सारखे भास होत आहेत. जेव्हापासून डिस्चार्ज मिळाला आहे तेव्हापासून आम्ही दोघेही एकत्र आहोत. मी ह्याच्या सर्व हालचाली टिपल्या. त्यानंतर माझ्या एका मानसोपचारतज्ज्ञ असलेल्या मित्राकडूनच ह्याची तपासणी केली. त्याने सांगितले की, हा वेगळ्याच कल्पना विश्वात रमलेला आहे. त्यातून बाहेर पडला नाही तर बरंच काही अनुचित घडेल. त्यासाठी त्याने काही औषधी दिल्या. शिवाय अशा निसर्गरम्य ठिकाणी भ्रमंती करायला सांगितले. त्यानुसार आम्ही इकडे आलो... पण इकडे येताच ह्याचे खरे रुप कळले. " संकर्षण बोलला पण संकर्षणचे वाक्य ऐकून सगळेच गोंधळले. 


" सर, या कथेत आणखी एक नवीन ट्विस्ट! सर, मला तर वाटतं हे सर्वच जण आपापल्या परीने आपली दिशाभूल करत आहेत. " हवालदार भिडे हळूच इन्स्पेक्टर श्रेयस जवळ आले व त्यांच्या कानात बोलले. इन्स्पेक्टर श्रेयसने नजरेनेच हवालदार भिडे यांना तात्पुरते शांत राहायला सांगितले. 


" कोणते वेगळे रुप यार? माझा इलाज करणारा मानसोपचारतज्ज्ञ तुझाच मित्र आहे. इकडे येण्यासाठी इनसिस्ट करणाराही तूच... एवढेच नव्हे तर, या सिद्धपुरुष महाराजांशी माझी ओळख करून देणाराही तूच आणि आता बोलतोय की, तुझी यात काही भुमिकाच नव्हती? सिरियसली संक्या? तू असा माझ्यावर आरोप तरी कसा करू शकतोस? " युग म्हणाला. 


" ए गप्प बस हा! खूप ऐकलं मी तुझं पण आता यापुढे काहीही ऐकून घेणार नाही कारण आता इथे माझ्या संरक्षणासाठी इन्स्पेक्टर श्रेयस आहेत. तू माझं काहीच वाकडं करू शकणार नाहीस. " संकर्षण तुसडेपणाने बोलला. 


" ओह माय गॉड! हे मी काय बघतोय? जय - वीरूची जोडी गब्बर आणि ठाकूर मध्ये रुपांतरित होणार की काय? हे कसे काय घडले? मि. युग संकर्षण तुमचा जिवलग मित्र आहे आणि तोच तुमच्याशी तुसडेपणाने बोलतोय? तुमचा तर खूप विश्वास होता ना मैत्री आणि मित्रावर? " इन्स्पेक्टर श्रेयस म्हणाले. 


" संक्या? काय झालं तुला? तू का बोलतोय असा? " युग काकुळतीने म्हणाला. 


" हा सभ्यपणाचा आव माझ्यापुढे नाही आणायचा बरं का! कळतात मला तुझे सारे चाळे! म्हणून हे असे सोंग करून तू माझ्या डोळ्यात धूळ फेकू शकत नाहीस ढोंगी माणसा... " संकर्षण तावातावात बोलला. 


" कसले सोंग? कोण ढोंगी? काय बोलतोय तू संकर्षण? मला काहीच कळत नाहीये भावा... मला काय गरज आहे, तुला वेड्यात काढायची? आणि बरं एक वेळ समजा तू म्हणतोय तसे असेलही तर मग तुझ्या मानसोपचारतज्ज्ञ मित्राने माझ्या तब्येतीबाबत वा मला भास होत असल्याची माहिती खोटी दिली का? हे तुझ्या मित्राने दिलेले क्लिनिकल रिपोर्ट्स फसवे आहेत का? आणि ते रिपोर्ट्स फसवे असेलही पण तो तुझा मित्र असताना माझी साथ का देईल? हे रिपोर्ट्स बघ ना तूच... " युग म्हणाला व त्याने सोफ्याजवळील टेबल वरील एक फाईल उचलली. त्यातले क्लिनिकल रिपोर्ट्स हातात घेऊन ते रिपोर्ट्स संकर्षणला दाखविण्यासाठी युग त्याच्याजवळ जाऊ लागला. 


" ए माझ्या जवळ येऊ नकोस. " संकर्षण धमकीच्या सूरात बोलला. त्याचा चढलेला आवाज ऐकून युग जागीच थबकला. 


पुढे संकर्षण इन्स्पेक्टर श्रेयसला उद्देशून म्हणाला, " सर, तुम्ही ह्याला अडवा! नाहीतर हा माझा खरंच जीव घेईल. इन्स्पेक्टर श्रेयस प्लीज... " 


इन्स्पेक्टर श्रेयसने दोन हवालदारांना इशारा केला. इन्स्पेक्टर श्रेयसचा इशारा उमजून दोन्ही हवालदारांनी युगला संकर्षणच्या जवळ जाण्यापासून अडवले. युगही त्याच्या जागेवरून हलला नाही पण त्याने त्याचे क्लिनिकल रिपोर्ट्स इन्स्पेक्टर श्रेयसला दिले व त्यांना उद्देशून तो म्हणाला, " सर, निदान तुम्ही तरी हे रिपोर्ट्स बघा. " 


इन्स्पेक्टर श्रेयसने हातात रिपोर्ट्स घेतले आणि साधारण एक दोन मिनिटे ते रिपोर्ट्स चाळले. त्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा संकर्षणकडे वळवला व त्याला त्यांनी विचारले, " पण संकर्षण तुम्हाला का वाटतंय की, मि. युग तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहेत? " 


" कारण ह्याचं पितळ उघडं पडलंय आणि मला सत्य कळलंय. " संकर्षण दात ओठ खाऊन बोलला. 


" भावा... तुला नक्कीच गैरसमज झालाय यार! " युग मेटाकुटीला येऊन बोलला. 


" गप्प बस तू... तुझ्या या फसव्या भोळेपणाला मी बळी पडणार नाहीये आता... " संकर्षण म्हणाला.


" बरं! पण कोणतं सत्य उघडकीस आलंय तुमच्यापुढे संकर्षण? निदान ते तरी तुम्ही जरा स्पष्ट सांगितले तर बरं होईल! " इन्स्पेक्टर श्रेयस म्हणाले. 


" सर, हा माझा युग नाहीये. " संकर्षण म्हणाला आणि काही वेळासाठी तिथे शांतता पसरली. 


" काय? " इन्स्पेक्टर श्रेयसने आश्चर्यचकित होऊन विचारले. 


" हो सर! हा युग नाहीये. चित्र विचित्र स्वप्न बघून त्याचा वास्तविक जीवनाशी संपर्क जोडण्याचा खोटा प्रयत्न करून हा सगळ्यांची दिशाभूल करतोय. माझ्या मित्रापुढेही ह्याने जाणीवपूर्वक ढोंग केले. हा पूर्ण शुद्धीत होता पण उगाच हिप्नोटाईज झाले असल्याचे भासवले. मुद्दाम एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे याने काही घटना सांगितल्या, ज्यातून शुभमने थोडक्यात निष्कर्ष असा काढला की, हा डिप्रेशन आणि इन्झायटी डिसऑर्डरने ग्रासलेला आहे. नकारात्मक विचारांच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी म्हणून त्याने दोन उपाय सांगितले. पहिलं तर काही औषधी दिल्या आणि दुसरे असे की, भटकंती करायला सांगितले. 


                मग काय सारे फासे ह्याच्याच इच्छेनुसार पडत गेले. हा जाणीवपूर्वक असे भासवत राहिला की, इथे कुणीतरी धरा नावाची मुलगी राहते. मी देखील ह्याच्या सत्यापासून अबोध अनभिज्ञ असल्याने उगाच ह्याच्या डोक्यावर ताण नको म्हणून हो ला हो करत राहिलो. मी बरेचदा सांगितले की, इथे कुणीच नाहीये पण हा ऐकून घ्यायचाच नाही. 


                त्यानंतर लगेच काही दिवसांनी हा सांगू लागला की, धरा ही व्यक्ती नसून आत्मा आहे. मला वाटले, हा देखील ह्याचा भ्रम असावा. म्हणून मी आक्षेप घेतला नाही पण आज अचानक दुपारी मी घरी असताना ह्याने ह्या मनोहर नावाच्या इसमाला घरी आणले. माझ्याशी खोटी ओळख करवून दिली की, हा कोणी महंत, ज्ञानी आणि काय तर म्हणे सिद्धपुरुष महाराज आहे. मी ह्या व्यक्तीची विचारपूस केली तर त्याने सांगितले की, हा जबरदस्ती ह्या माणसाला घेऊन आलेला आहे. मी त्यावेळीही असा समज करून घेतला की, निदान आतातरी सर्व ह्याच्या मनाप्रमाणे होत असल्याने ह्याच्या नकारात्मक विचारांचा अंत होईल... " संकर्षणने एवढे बोलून सुस्कारा सोडला. 


क्रमशः

____________________________________________


सेजल पुंजे. 

०५-०९-२०२२.

टीम नागपूर. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//