राज्यस्तरीय करंडक कथामालिका
कथेचे शीर्षक - आभास की वास्तव?
भाग - २४
इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे यांनी खिशातून मोबाईल बाहेर काढला. त्यांनी स्क्रीनवर पाहिले तर हवालदार भिडेचा मॅसेज होता. त्यांनी इनबॉक्स उघडून मॅसेज पाहिला. मॅसेज पाहताच ते गूढ हसले. नंतर त्यांनी मोबाईल खिशात ठेवला व गूढ हसूनच खोलीचे दार उघडून ते बाहेर गेले आणि त्यांनी संकर्षणला त्यांच्या मागे यायला सांगितले. संकर्षणही आज्ञेनुसार बाहेर हॉलमध्ये गेला.
बाहेर हॉलमध्ये येताच त्याला एका सोफ्यावर सिद्धपुरुष महाराज बसलेले दिसले अन् दुसऱ्या सोफ्यावर युग बसलेला दिसला व त्यांच्या सभोवती हवालदार उभे दिसले. हॉलमध्ये इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे थोड्या ऐटीत उभे राहिले. संकर्षण देखील थोड्या अंतरावर उभा राहिला. दुसरीकडे इन्स्पेक्टर श्रेयस येताच युग आणि सिद्धपुरुष महाराज उठून उभे राहिले.
इन्स्पेक्टर श्रेयस दिसताच हवालदार भिडे बोलायला पुढे सरसावले पण त्याआधीच इन्स्पेक्टर श्रेयसने त्यांना अडवले व ते युगला उद्देशून म्हणाले, " तर, मि. युग तुम्ही माझ्यापुढे एक थेअरी मांडली होती की... तुमच्या मित्राने तुमच्यावर हल्ला केला नव्हता. तर अभिनंदन मि. संकर्षण यांनीही अगदी तसाच कबुलीजबाब दिलेला आहे आणि तुमच्या या तथाकथित सिद्धपुरुष महाराजांनी देखील... "
" येस, मला माहीत होतं आणि मला शंभर टक्के खात्रीही होती. सर मी बोललो होतो ना तुम्हाला आणि बघा तेच सिद्ध झालं. " युग उत्साहात म्हणाला व तो लगबगीने संकर्षण जवळ गेला आणि त्याला मिठी मारली. थोड्या वेळाने इन्स्पेक्टर श्रेयसने थोडा घसा खाकरताच युग संकर्षण पासून वेगळा झाला.
इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे जरा गूढ हसले आणि युगला म्हणाले, " मि. युग तुम्ही आनंदी आहात याची मला खंत नाहीच; पण माझं बोलणं सध्या अपूर्ण आहे आणि मी जे सांगणार आहे ते कळल्यावर तुम्ही कसे रिऍक्ट करणार आहात मला ते पाहण्याची जास्त उत्सुकता आहे. "
" सर, तुम्ही जे बोललात मला ते समजले नाही. " युग म्हणाला.
" समजून घ्यायचं आहे ना तुम्हाला तर म्हणूनच हा भरत मिलाप नंतर करा आणि आधी मी काय म्हणतोय, ते ऐकून घ्या. कुठल्याही निष्कर्षावर पोहोचण्याआधी... " इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे म्हणाले.
" बरं! ठीक आहे सर. " युग म्हणाला.
" ह्म्म! जर तुम्ही तिघेही म्हणत आहात की, संकर्षण यांनी तुमच्यावर हल्ला केला नव्हता तर आता प्रश्न येतो की, नेमका तुमच्यावर हल्ला कुणी केला? " इन्स्पेक्टर श्रेयस सूचक बोलले.
" सर, कुणी हल्ला केला काय कुणी केला? मी म्हणालो ना की, हल्ला धराने केला होता. " युग थोडा आक्रमकपणे बोलला.
" युग, पहिलं तर तुमचा आक्रमकपणा तुमच्या खिशात घालून ठेवा आणि दुसरं म्हणजे, तुम्हाला एक सांगू का माझा शब्द कुणी मध्येच कापला ना तर माझी खरंच जाम सटकते. म्हणून मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, लेट मी फिनिश फर्स्ट! " इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे बोलले.
" सॉरी सर... " युगने लगेच माफी मागितली.
" बरं असो... तर मी काय म्हणत होतो... ह्म्म आठवलं! युग तुम्ही म्हणालात की, तुमच्यावर हल्ला हा कुणी सजीव व्यक्तीने केलेला नसून अस्तित्व हीन अशा धरा नाव असलेल्या एका आत्म्याने केलाय. बरोबर ना! पण युग, तुम्हाला नवल वाटेल हे ऐकून की, तुमच्या मित्राने तुमच्या या विधानाचे समर्थन केलेले नाहीये. " इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळेने असे म्हणताच युग संकर्षणकडे गोंधळून पाहू लागला.
" काय? " युग तुटकच बोलला.
" हो! संकर्षण म्हणाले की, त्यांनी तुमच्यावर हल्ला केलेला नाहीये त्याउलट तुम्हीच स्वतःच्या हातात काच घेऊन त्यांच्यावर हल्ला करत होते आणि ते फक्त तुमच्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी धडपडत होते. म्हणूनच त्यांनी तुमच्या हातातून काच सोडवून स्वतःच्या हातात घेतला होता, जेणेकरून तुम्ही त्यांना दुखापत करू शकणार नाही. संकर्षण हातातील काच फेकणार होते पण त्याआधीच आम्ही सर्व आलो आणि काहीही ऐकून घेण्याआधी त्यांच्या हातावर गोळी झाडली. नंतर रक्तस्राव झाल्याने त्यांना चक्कर आली. पुढे काय घडले त्याचे साक्षीदार आपण सर्व आहोतच! " इन्स्पेक्टर श्रेयस म्हणाले.
" नाही, हे सगळं खोटं आहे. " युग आवेगाने बोलला.
" म्हणजे तुमचा जिवलग मित्र संकर्षण खोटं बोलतोय, असं म्हणायचं आहे का तुम्हाला? " इन्स्पेक्टर श्रेयसने एक भुवई उंचावून प्रश्न उपस्थित केला.
" सर, मला तसं म्हणायचं नाहीये. संकर्षण माझ्याविरुद्ध स्टेटमेंट देऊच शकत नाही कारण मला फसवून त्याचा काहीच फायदा नाहीये... पण एका व्यक्तीचा फायदा आहे ती म्हणजे धरा! कदाचित सर, संकर्षणच्या शरीरात धराची आत्मा अजूनही असेल आणि तीच हे असे खोटे बोलत असावी! कारण संकर्षण कायम मला प्रोटेक्ट करत असतो. जर संकर्षण आणि माझ्या मैत्रीत अंतर पडलं तर यात निश्चितच तिला फायदा होईल अन् तिला तीच एक संधी मिळेल, मला मारण्यासाठी... " युग अडखळत म्हणाला.
" बरं! एक वेळ तुमच्या या थेअरीवर देखील मी विश्वास ठेवला असे समजा... पण मला सांगा, धराची आत्मा एकट्या संकर्षणच्या शरीरात आहे ना? मग अगदी तेच स्टेटमेंट या तुमच्या तथाकथित सिद्धपुरुष महाराजांनी ही कसे दिले बरे? " इन्स्पेक्टर श्रेयसने युगला विचारले.
" काय? सिद्धपुरुष महाराज देखील हेच बोलले... पण ते असे का बोलले? त्यांना तर सगळं माहिती आहे ना... महाराज? " युग बोलला आणि गोंधळून आळीपाळीने संकर्षण आणि सिद्धपुरुष महाराजांकडे पाहू लागला.
" हो! मग यावर आता तुमचं काय मत आहे? तुमचा जिवलग मित्र हा का म्हणून खोटं बोलत असावा आणि संकर्षणच्या मताला हे तुमचे तथाकथित सिद्धपुरुष महाराज देखील का म्हणून दुजोरा देत असावेत? यात त्यांचा कोणता सुप्त लाभ दडलेला असेल बरं? " इन्स्पेक्टर श्रेयस म्हणाले.
" सर, मला नाही माहिती पण वास्तव तेच आहे जे मी तुम्हाला सांगतोय. संकर्षण का खोटं बोलत आहे आणि सिद्धपुरुष महाराज देखील का त्याची साथ देत आहे, मला खरंच नाही माहिती... " युग इन्स्पेक्टर श्रेयसला उद्देशून म्हणाला व नंतर तो संकर्षण आणि सिद्धपुरुष महाराजांकडे पाहू लागला.
युग संकर्षणला म्हणाला, " संक्या, यार सांग ना तू का खोटं बोलत आहेस? वस्तूस्थिती तुलाही माहिती आहे आणि मलाही मग तरीही तू असं खोटं स्टेटमेंट का दिलंस? " संकर्षण गप्प उभा राहिला. त्याने युगला काहीच प्रतिसाद दिला नाही.
पुढे युग सिद्धपुरुष महाराजांकडे पाहत बोलू लागला, " आणि महाराज तुम्ही? तुम्हीही तेच स्टेटमेंट कसे दिले? एक वेळ मला वाटले की, कदाचित संकर्षण धराच्या नियंत्रणात असावा म्हणून तो असा बोलला असावा पण अगदी तेच स्टेटमेंट वर्ड टू वर्ड तुम्ही हवालदार भिडे यांना दिले. सांगा ना, तुम्ही असे का केले? " युग बोलत होता आणि इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे त्याचा प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकत होते.
" सर! मी माझं स्टेटमेंट दिलेलं आहे. तुमची परवानगी असेल तर मी आता जाऊ शकतो का इथून? " सिद्धपुरुष महाराज बोलले.
" जाऊ शकतो का म्हणजे? अजून काहीच सिद्ध झालेले नाहीये आणि तुम्ही अशी पळवाट नाही काढू शकत महाराज! मला उत्तर हवंय! सांगा, तुम्ही का खोटं स्टेटमेंट दिलं ज्याअर्थी तुम्हीच म्हटलं होतं की, धराची अतृप्त आत्मा मला जीवे मारण्याचा प्रयत्न करतेय म्हणून... आणि तिच्या तावडीतून तुम्हीच माझी सुटका करणार होते. बरोबर ना? त्यासाठीच तर हॉलमध्ये रांगोळीने तुम्ही एक मंत्रबद्ध यंत्रही बनवले होते ना जेणेकरून धराच्या आत्म्यावर नियंत्रण साधून तिच्याकडून तिचा हेतू तुम्हाला जाणून घेता येईल व तिच्या सापळ्यातून माझी सुटका करता येईल. " युग चिडून बोलला आणि त्याला चिडलेले पाहून संकर्षण घाबरला.
दुसरीकडे इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे सगळीकडे लक्षपूर्वक पाहत होते, सगळ्यांचे हावभाव टिपत होते आणि म्हणून संकर्षणला घाबरताना पाहून इन्स्पेक्टर श्रेयसच्या भुवया आपोआप उंचावल्या.
" कोण महाराज, कोण धरा आणि कोण आत्मा? हे बघा साहेब, मी तुम्हांला आधीच सांगितलेलं होतं की, माझं नाव मनोहर आहे आणि तुम्ही हे काय म्हणत आहात ना तो महाराज बिहराज मी नाहीये! मी एक साधाभोळा नाटकात अभिनय करणारा नट आहे ओ... " सिद्धपुरुष महाराज अर्थात मनोहर बोलला आणि त्याचा प्रत्येक शब्द ऐकून युगचे डोळे आणखीच विस्तारले.
क्रमशः
________________________________________
©®
सेजल पुंजे.
०४-०९-२०२२.
टीम नागपूर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा