Feb 27, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

आभास की वास्तव? (भाग - २३)

Read Later
आभास की वास्तव? (भाग - २३)

राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कथेचे शीर्षक - आभास की वास्तव? 

भाग - २३ 


" काय? मि. युग तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना? काहीही काय बरळत आहात तुम्ही? उगाच हवेत तीर सोडल्यागत... " इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे चिडून बोलले. 


" मला माहिती आहे सर, तुम्हाला माझ्यावर विश्वास होणार नाही पण मी बोलतोय तेच खरंय! विश्वास ठेवा, मी खोटं बोलत नाहीये. " युग विनंतीच्या सुरात बोलला. 


" काय विश्वास ठेवा म्हणत आहात? सध्या तुम्ही काय बोलत आहात कदाचित तुमचं तुम्हालाच कळत नाहीये. म्हणूनच असे तर्कहीन बोलत आहात. " इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे म्हणाले. 


" सर! खरंच, जसं दिसतंय प्रत्यक्षात तसं काहीच नाहीये. म्हणून एक संधी द्या मला... जेणेकरून मला तुम्हाला सगळं सविस्तर सांगता येईल. प्लीज सर समजून घ्या ना... आणि एक फेअर चान्स द्या! " युग म्हणाला. 


" काय समजून घेऊ मि. युग? आणि कोणता फेअर चान्स हवा आहे तुम्हाला आणि कशासाठी? कारण तुमच्या मते तर तुमच्यावर हल्ला अशी व्यक्ती करतेय, ज्या व्यक्तीचे काही अस्तित्वच नाहीये. थोडक्यात, संकर्षणच्या अंगात धरा या व्यक्तीची आत्मा शिरलेली होती आणि ती तुमच्यावर हल्ला करत होती कारण तिला सूड हवा आहे... पण मुळातच ती तथाकथित आत्मा तुमच्या मागावर का आहे, या प्रश्नाचे उत्तर मात्र तुम्हालाही माहीती नाही. व्वा! व्वा! तुमच्या या फडतूस थेअरीसाठी टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा, नाही का? " इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे म्हणाले व त्यांनी कुत्सितपणे हसून टाळ्या देखील वाजवल्या. 


" सर, प्लीज! " युग म्हणाला. 


" ओके, पाच मिनिटे देतोय मी तुम्हांला! आणि तुम्हाला या पाच मिनिटातच ऑल ऑव्हर तुमची ही गूढकथा सांगायची आहे. मला सांगा का तुमचाच मित्र तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न करत होता? आणि सांगा त्या तथाकथित ' धरा: द ग्रेट आत्मा ' विषयी देखील थोडेबहुत! ओके? तुमची वेळ सुरू होतेय आता! " इन्स्पेक्टर श्रेयस हातातल्या घड्याळात पाहत म्हणाले. 


" ठीक आहे सर! " युग म्हणाला. 


                नंतर युगने इस्पितळातून डिस्चार्ज मिळताच पोलीस ठाण्यात जाऊन इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे यांच्याशी घेतलेली भेट अन् अगदी त्या दिवसापासून त्याच्यासोबत घडलेल्या सर्व घटनांची इत्थंभूत माहिती त्याने दिली. इन्स्पेक्टर श्रेयस सुद्धा लक्षपूर्वक युगचा एकूण एक शब्द ऐकत होते. 


" दॅट्स ऑल सर! खरंच सर, ना मला माहीत आहे धराबद्दल काहीच ना संकर्षणला... पण तिच्या आत्म्यावर सिद्धपुरुष महाराजांना नियंत्रण साधता आले तर ते नक्कीच तिच्याकडून तिचा भूतकाळ वदवून घेतील, असे ते म्हणाले होते. म्हणूनच संकर्षण त्यांना इथे घेऊन आला होता. ओव्हरऑल मी हेच सांगतोय की, संकर्षण अपराधी नाहीये. " युगने सर्व सांगितले व नंतर थोडा उसासा घेतला. 


" ह्म्म! युग, तुम्ही जे बोललात त्यातली कुठलीही गोष्ट मला पटत नाहीये पण तरीही तुम्ही तुमच्या शब्दांवर कायम आहात म्हणून आम्हाला त्या तथाकथित सिद्धपुरुष महाराजांचे तसेच तुमच्या मित्राचे स्टेटमेंट नोंदवून घ्यावे लागेल. ते काय सांगतात, त्यानुसार पुढची प्रक्रिया करता येईल... पण एक गोष्ट लक्षात असू द्या, सत्याचा शोध घेण्यासाठी त्या दोघांपुढेही एक खोटी परिस्थिती आम्ही सादर करणार आहोत.


                थोडक्यात, मी त्यांना म्हणेल की, तुम्ही त्या दोघांच्याही विरुद्ध स्टेटमेंट दिलेले आहे. जसे की, ते दोघेही तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न करत होते आणि मि. युग तुम्ही स्वतःचा बचाव करत होते व तेवढ्यात आम्ही सगळे घटनास्थळी म्हणजेच या वाड्यात पोहोचताच त्या दोघांच्या तावडीतून तुमची सुटका झाली. तुम्ही थोडक्यात बचावले. 


                असा फितुरी कबुलीजबाब त्यांच्यापुढे सादर केल्यावर ते दोघे काय स्टेटमेंट देतील, त्यावरूनच सत्याचा शोध घेता येईल. जर त्या दोघांचेही स्टेटमेंट परस्पर विरोधी असतील तर निश्चितच त्यांचे स्टेटमेंट खोटे असेल. एवढेच नव्हे तर, याचा सरळ सरळ अर्थ हा देखील असेल की, तुमच्या जीवाला धोका कुणा तथाकथित आत्म्यापासून नव्हे तर तुमच्या स्वतःच्या मित्राकडून आहे; हे सिद्ध होईल. सो, बी रेडी टू एक्सेप्ट फर्दर सिच्युएशन! " इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे यांनी युगला आधीच पूर्वकल्पना दिली. 


" ठीक आहे सर, चालेल मला! कारण मला माहीत आहे, जीवापाड जपणाऱ्या या युगला संकर्षण कधीच त्रास देऊ शकत नाही. " युग ठाम विश्वासाने बोलला. 


" मि. युग, विश्वास असावा पण अतिरेक नसावा आणि अंधविश्वास तर मुळीच नसावा. मग मैत्रीवर असो वा जिवलग मित्रावर... असो... निर्णय तुमचा आहे. " इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे गूढ हसले व त्यांनी खिशातला गॉगल काढून एकदा परत डोळ्यावर चढवला.


" ह्म्म... " युगने केवळ हुंकार भरला. 


" बरं! सध्यातरी मला वाटतं, मि. संकर्षणला एवढ्यात शुद्ध येईलच तर त्यांची विचारपूस करायला हवी आणि एकदाची विचारपूस करून त्यांच्याकडून माहिती मिळाली की, मग सत्यही सहज उघड होईल. नाही का? " इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे खोचकपणे म्हणाले. त्यावर युग काहीच बोलला नाही, त्याने फक्त खोल श्वास घेतला. 


                काही वेळाने संकर्षणला शुद्ध आली. त्याने चौफेर नजर फिरवली व सभोवताली पोलीस बघून तो थोडा गोंधळून गेला पण नंतर त्याची नजर इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळेकडे गेली आणि तो आश्वस्त झाला. लगेच तो सोफ्यावर नीट उठून बसला. तोपर्यंत इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे देखील संकर्षण ज्या सोफ्यावर बसला होता त्या सोफ्यालगतच्या दुसऱ्या सोफ्यावर बसले. युग संकर्षणच्या सोफ्यावर बसला आणि तो संकर्षणच्या तब्येतीची विचारपूस करू लागला. 

 

                सोफ्यावर बसताच संकर्षण मात्र थोडा अवघडला. तो कसनुसे हसून युगला टाळाटाळीचे उत्तर देत होता, हे इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळेच्या नजरेतून सुटले नाही पण त्यांनी तात्पुरते दूर्लक्ष केले. थोड्या वेळाने इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे यांनी घसा खाकरला. इन्स्पेक्टर श्रेयसचा इशारा उमजून युग गप्प बसला. 


" तर मि. संकर्षण तुमची तब्येत आता कशी आहे? फीलिंग बेटर? आणि हाताची जखम जास्त दुखत वगैरे नाहीये ना? " इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे यांनी एक भुवई उंचावून प्रश्न केला. 


" हो, मी ठीक आहे आणि माझा हात पण बरा आहे. " संकर्षण म्हणाला. 


" बरं! मग आता तुम्ही ठीक आहात असं कबूल केलेच आहे तर चला आता आपण थोडासा संवाद साधायला हवा, असं मला वाटतं... पण तुम्हाला काय वाटतं मि. संकर्षण आपण बोलायला हवे की नको? बरं असो! तुम्हाला काय वाटतं याच्याशी मला तरी घेणंदेणं नाहीये, होईल तर तेच जे मी ठरवलंय. नाही का? " इन्स्पेक्टर श्रेयस थोडे कोड्यात बोलले. 


" अं... सर, मला कळले नाही. " संकर्षण अडखळत म्हणाला. 


" ओके काही हरकत नाही. आता जरी कळले नाही तरी काही वेळात कळेलच... म्हणून जास्त गोंधळ करून घेऊ नका आणि सध्यातरी चला, मला या वाड्यातली तुमची खोली दाखवा. मला तुमची खोली बघायची आहे... शिवाय तुमच्याशी थोडं बोलायचं देखील आहे. तर या आणि रुम दाखवा. " इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे म्हणाले. 


                संकर्षण मात्र इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळेकडे गोंधळून बघत होता. तेवढ्यात इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे यांनी अगदी टशनमध्ये डोळ्यावरून गॉगल काढून संकर्षणला डोळ्यांनीच खोलीत जाण्यासाठी इशारा केला. इशारा कळताच संकर्षण निमूटपणे युग आणि तो ज्या खोलीत राहात होता, त्या खोलीच्या दिशेने जाऊ लागला. त्याच्या मागोमाग इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे देखील गेले पण खोलीत शिरण्याआधी त्यांनी हवालदार भिडे यांना डोळ्यांनीच एक इशारा केला. 


                हवालदार भिडे यांनी मानेनेच इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे यांना हामी भरली व त्यानंतर ते त्या सिद्धपुरुष महाराजांना एका दुसऱ्या खोलीत घेऊन गेले आणि त्यांनीदेखील खोलीत जाण्याआधी तिथे उपस्थित उर्वरित हवालदारांना युगवर नीट लक्ष ठेवायला सांगितले. युग मात्र एकदा सिद्धपुरुष महाराज आणि हवालदार भिडे गेले त्या दिशेने पाहत होता अन् एकदा इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे आणि संकर्षण गेले त्या दिशेने पाहत होता. काही वेळ तो उभा राहिला पण नंतर एका हवालदाराने त्याला सोफ्यावर बसायला सांगितले. युगही निमूटपणे सोफ्यावर बसला. 


                दुसरीकडे संकर्षण खोलीत पोहोचला अन् त्याच्या दुसऱ्याच क्षणाला इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे देखील आले. त्यांनी खोलीत येताच खोलीचे दार लावून घेतले. त्यांनंतर काही वेळ इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे संकर्षणची विचारपूस करत होते आणि संकर्षण त्याच्या परीने उत्तर देत होता. बरीच विचारपूस केल्यानंतर खोलीत थोडा वेळ शांतता पसरली होती आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळेच्या मोबाईलची मॅसेज ट्यून वाजली. 


क्रमशः

__________________________________________


©®

सेजल पुंजे 

०२-०९-२०२२.

टीम नागपूर. 


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//