Feb 27, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

आभास की वास्तव? (भाग - २२)

Read Later
आभास की वास्तव? (भाग - २२)

राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कथेचे शीर्षक - आभास की वास्तव? 

भाग - २२


" समाधान? मी कशासाठी समाधान मानायला हवे? इन्स्पेक्टर तुम्ही... तुम्ही असे का बोललात? " गोंधळलेल्या अवस्थेत युगने अडखळून इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे यांना प्रश्न विचारला. 


" कारण एका क्षणाचाही आम्हाला इथे यायला विलंब झाला असता ना तर कदाचित या तुमच्या जिवलग मित्राने आतापर्यंत तुमचा जीव घेतला असता. " इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे उत्तरले. 


" काय? सर, हे अशक्य आहे. तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय. मला जीवापाड जपणारा संकर्षण माझाच जीव घेईल, हे समीकरणच मुळात माझ्या बुद्धी आणि मनाला न पटणारे आहे. " युग ठाम विश्वासाने म्हणाला. 


" पटत नाहीये तर मनावर बिंबवून घ्या मि. युग दिक्षित! " इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे गूढ हसून बोलले. 


" म्हणजे? " युग न कळून बोलला. 


" म्हणजे तुमचा मित्रच तुमचा जीव घेण्याचा कसोशीने प्रयत्न करतोय आणि मी हे सिद्ध करू शकतो. तरीही विश्वास नसेल तर, याची शहानिशा तुम्ही स्वतः तुमच्या मित्राकडूनही करू शकता... पण मला वाटतं की, त्याची गरज नसावीच मुळी... कारण, जेव्हा आम्ही सर्व घरात शिरलो तेव्हा मि. संकर्षणने तुमच्या अंगावर झडप घेतलेली होती. शिवाय त्यांच्या हातात आम्हाला धारदार काचेचा तुकडा दिसला, ज्याचा हत्येसाठी सहज वापर केल्या जाऊ शकतो आणि मि. संकर्षणही तो काच हातात घेऊन होते, ते देखील निव्वळ तुमच्यावर हल्ला करण्यासाठीच आणि मला वाटतं तुम्ही त्यांना अडविण्याचा प्रयत्न करत होते. मग तरीही तुम्ही तुमच्या मित्राची बाजू का घेत आहात? तुम्ही तुमच्या मित्राचा बचावच मुळात का करत आहात, माझ्या बुद्धीला हे पटत नाहीये. 


                सहसा पिडीत व्यक्ती आरोपीला शिक्षा देण्यासाठी प्रयत्नशील असतात तुमच्या बाबतीत सर्व उलटच का घडतं? म्हणजे मी तरी माझ्या उभ्या आयुष्यात तुमच्यासारखा मैत्री जपणारा व्यक्ती पाहिलेला नाहीये पण तरीही थोडा गोंधळ माझ्या मनात अद्याप आहेच की, खरंच हा मैत्री जपण्याचा अट्टाहास आहे की काहीतरी लपविण्याचा महत्प्रयास? " इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे युगवर नजर रोखून बोलले. 


" काय? इन्स्पेक्टर माहिती नाही तुम्ही काय बोलत आहात. किंबहुना, मलाच काहीही तर्क लागत नाहीये पण मला वाटतं तुम्हाला संकर्षणबद्दल गैरसमज झालाय. हो, त्याने हातात काच पकडला होता पण तो काच त्याने हातात पकडला नव्हता ना त्याने माझ्या अंगावर झडप घेतली होती. " युग घडलेला प्रकार समजावण्याचा प्रयत्न करत होता पण मध्येच इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे यांनी त्याला अडवले. 


" काय? मि. युग तुम्ही डोक्यावर पडले आहात का? तुम्ही आम्हालाच खोटं ठरवत आहात? मी आणि माझ्या सर्व हवालदारांनी संकर्षणला तुमच्यावर हल्ला करताना पाहिले आणि म्हणून आम्ही त्याला ताब्यात घेतले ना? आणि तुम्ही म्हणत आहात की, असं काहीच नाहीये? म्हणजे काहीही हं? म्हणजे आम्ही सर्व इथे घडलेला हा प्रसंग स्वतःच्या डोळ्यांनी पाहणारे आंधळे आहोत का? " इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे यांनी एक भुवई उंचावून युगला प्रश्न विचारला. 


" नाही. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका पण तुम्ही जे पाहिलं ती वस्तुस्थिती नाहीये. म्हणजे, प्रथमदर्शनी कुणालाही तुमच्या सारखाच गैरसमज होईल पण ज्याने हे अनुभवलंय तोच वस्तुस्थितीचे नेमके वर्णन करू शकेल, उदाहरणार्थ मी! म्हणजेच मला पूर्ण खात्री आहे की, नेमके काय घडले तर त्यानुसार मी सर्वकाही स्पष्ट सांगू शकणार. बरोबर ना! आणि म्हणूनच मी संकर्षणची बाजू घेतोय कारण मला माहीत आहे की, तो अपराधी नाहीये. मुळात तो निर्दोष आहे कारण तो फक्त प्यादा आहे ओ सर! आणि मास्टरमाईंड कुणी दुसरेच आहे, जो अख्खा खेळ पालटतोय वेळोवेळी भिन्न चाली खेळून... " युग इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे यांना वास्तविक परिस्थितीचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत होता पण संवादाला जास्तच क्लिष्ट कलाटणी मिळत होती. 


" काय? मि. संकर्षण प्यादा आहे आणि मास्टरमाईंड कुणी दुसरे आहे! म्हणजे मि. संकर्षणला कुणी धमकी दिली आहे का? आणि त्यामुळे ते तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न करत होते? याचा अर्थ त्यांच्या कुटुंबियांचा जीव धोक्यात असावा. म्हणजे नक्कीच कुणीतरी त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देऊन तुमची हत्या करण्यास सांगितले असावे, हो ना? " इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे यांनी काही अंदाज बांधले. 


" नाही, नाही, नाही! मला हे म्हणायचं नव्हतं. संकर्षणच्या कुटुंबाला काहीही धोका नाहीये. " युग म्हणाला. 


" काय? मग मि. युग तुम्ही असे का म्हटले की, संकर्षण निव्वळ प्यादा असून मास्टरमाईंड कुणी दुसरी व्यक्ती आहे? " इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे यांनी त्यांची धारदार नजर युगवर रोखून धरली. 


" हो, सर मी आता देखील माझ्या वाक्यावर ठाम आहे. मास्टरमाईंड कुणी दुसरी व्यक्ती आहे. " युग म्हणाला. 


" मग मास्टरमाईंड कोण आहे, हे सांगायला तुम्ही मुहूर्त काढणार आहात का? " इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे थोडे चढ्या आवाजात बोलले. या त्यांच्या प्रश्नाला प्रतिसाद देऊन युगने नकारार्थी मान हलवून नाही म्हणाला. 


" हे बघा, तुसडेपणाने वागणे माझ्याही तत्त्वात बसत नाहीच म्हणून जास्त कन्फ्युज न करता तुम्ही खरे काय ते सांगा. ओके? " इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे म्हणाले. 


" हो! " युग म्हणाला. 


" ह्म्म... गुड! सांगा आता. " असे बोलून इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे यांनी युगला बोलण्याचा इशारा केला. 


" सर, मी आधीच सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाहिली ती स्थिती आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यात जमीन - अस्मानाचा फरक आहे. संकर्षणने नक्कीच माझ्या अंगावर झडप घेतलेली होती आणि त्याच्या हातात काचही होता. शिवाय त्याच्या साहाय्याने तो माझ्यावर हल्ला देखील करणार होता पण माझ्यावर हल्ला तो करतच नव्हता मुळी... माझ्यावर हल्ला ती धरा करत होती. संकर्षण माझ्यावर हल्ला करत होता फक्त नि फक्त तिच्यामुळे! " युग म्हणाला. 


" काय? कोण म्हणालात धरा? आणि ही धरा कोण आहे? कुठे राहते आणि तिचे तुमच्याशी काय वैर आहे आणि ती तुमची हत्या करण्यासाठी तिने संकर्षणला का लक्ष्य केले? " इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे म्हणाले. 


" तेच तर माहिती नाहीये सर... म्हणजे मला नाही माहिती की, तिचे माझ्याशी काय वैर आहे पण तरीही ती माझा जीव घेण्याचा प्रयत्न करतेय. " युग म्हणाला. 


" बरं! मग ही धरा सध्या कुठे आहे? आणि तुम्हाला कुणी सांगितले की तीच मास्टरमाईंड आहे? " इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे म्हणाले. 


" इतर कुणी सांगितले असते तर मी विश्वास ठेवलाच नसता पण तिने स्वतःच कबूल केले की, तिला सूड घ्यायचा आहे आणि काहीही झाले तरी ती तिची शपथ पूर्ण करणार मला ठार मारून! " युग कपाळावरून ओघळणारा घामाचा थेंब पुसत म्हणाला. 


" काय? मग तुम्ही त्याच वेळी मला कॉल करून का कळवलं नाही? आम्ही तात्काळ तिला अटक केली असती ना... " इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे ओरडून म्हणाले. 


" सर, तुम्ही तिला कसे ताब्यात घेणार? ज्याअर्थी ती कुणाच्याही हातात लागणारच नाहीये. " युग म्हणाला. 


" मि. युग दिक्षित बोलताना भान ठेवा! तुम्ही पोलिस खात्याच्या कारकिर्दीवर प्रश्न उठवित आहात, हे लक्षात असू द्या! आणि महत्त्वाचे म्हणजे मि. युग अपराधी कितीही चपळ, चतुर, हुशार, मास्टरमाईंड प्लेयर असला ना तरी कुठे ना कुठे तो चुकतोच व तीच चूक ओळखण्यात पोलिसांची बुद्धीमत्ता वरचढ ठरते. म्हणूनच जरी ती धरा आतापर्यंत कुणाच्याही हातात लागली नसेल पण आता ती माझ्या तावडीतून सुटणार नाहीये. कळलं मि. युग दिक्षित? " इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे म्हणाले व त्यांनी डोळ्यावर ऐटीत गॉगल चढवला. 


" सर, ना मी तुमच्याबद्दल साशंक आहे ना पोलिस खात्याच्या कारकिर्दीबद्दल... कारण तुमच्यासारखे कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व असतील तर पोलिस खाते समर्थच असेल; अपराधींचा फडशा पाडायला, यात दुमत नाहीच... पण सर, तरीही धराला तुम्ही ताब्यात घेऊ शकणार नाही. " युग म्हणाला. 


" पण का? " इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे यांनी विचारले. 


" कारण धरा ही कुणी सजीव व्यक्ती नसून ती एक आत्मा आहे. " युग म्हणाला आणि युगचे वाक्य ऐकताच इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे यांनी तावातावाने डोळ्यावरून गॉगल काढला. 


क्रमशः

___________________________________________


©®

सेजल पुंजे

३१-०८-२०२२.

टीम नागपूर. 


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//