आभास की वास्तव? (भाग - २१)

आभास आणि वास्तवाच्या कचाट्यात गुंतलेली रहस्यकथा... सत्य आणि असत्याचा शोध घेणारी कथामालिका...

राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कथेचे शीर्षक - आभास की वास्तव? 

भाग - २१


डॉ. शुभम माने यांनी अशारीतीने हातात पेन पकडला होता जणू तो पेन नसून एखादा चाकू असावा. ते पाहून युग अगदी भेदरलेल्या नजरेने डॉ. शुभम मानेकडे पाहून अडखळत बोलू लागला, " डॉ. शुभम तुम्ही... तुम्ही पाणी आणण्याऐवजी असे का हसत आहात? आणि तुम्ही पेन असा का हातात पकडला आहे? डॉ. शुभम... " 

 

                दुसरीकडे डॉ. शुभम माने हातात पेन चाकूप्रमाणे पकडून युगच्या दिशेने चालत येऊ लागले. युग त्यांना हाका मारत राहिला पण ते कुठलाही प्रतिसाद न देता वेडेवाकडे चाळे करून, खिदळून हसत राहिले. थोड्या वेळात ते युगजवळ येऊन उभे राहिले. युग मनोमन पूर्णतः घाबरलेला होता. त्याने संकर्षणला बेडवर झोपवले आणि तो पापण्यांची उघडझाप न करता एकटक एकदा डॉ. शुभम मानेकडे आणि एकदा त्यांच्या हातातील धारदार पेनकडे पाहत होता. त्याने डॉ. शुभम माने यांना हाक मारण्यासाठी ओठांची हालचाल केली पण त्याचे शब्द ओठातच राहिले कारण तो काही बोलणार त्याआधीच डॉ. शुभम माने युगच्या छातीवर पेनच्या धारदार निबद्वारे प्रहार करू लागले. 


                पेनची निब युगच्या छातीला शिवताच युगने किंकाळी फोडली व आपोआप त्याचे हात त्याच्या चेहऱ्यावर गेले आणि त्याचे डोळे मिटल्या गेले. काही वेळाने युगच्या कानावर काही पुसटसा आवाज ऐकू येत होता आणि तो आवाज त्याला ओळखीचा वाटला. त्याने कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. तो डोळे मिटूनच त्याला कोण हाक मारत असावे, याचा अंदाज घेत होता. 


युगला परत हाक ऐकू आली आणि यावेळी त्याने तो आवाज ओळखला. म्हणून तो डोळे न उघडता मनातल्या मनात पुटपुटला, " हा आवाज तर सिद्धपुरुष महाराजांचा आहे पण संकर्षण बोलला होता की, मी कल्पनाविश्वात गुंतून आहे आणि त्या आभासी जगातून बाहेर निघण्याचा मार्ग हाच आहे की, मला त्या आभासी जगाकडे साफ साफ दुर्लक्ष करायचे आहे. त्यामुळेच मी त्या आभासी दृश्यांचा वास्तविक जीवनात तर्क जोडण्याचा प्रयत्न करणार नाही... " 


बराच वेळ युग डोळे मिटून होता पण त्या हाका काही केल्या थांबेना. म्हणून त्याने उसासा घेतला व तो स्वतःलाच म्हणाला, " जर आभास आणि वास्तवाचा फरक जाणून घ्यायचा असेल तर पळवाट काढणे सोईचे नाहीये. मला नाही माहिती की, मी या आभासी जगातून कधी बाहेर पडणार पण या हाकांकडे दुर्लक्ष केले तर माझी आणखी दमछाक होईल, असेच वाटते मला... म्हणून सध्या मी स्वतःवर विश्वास ठेवायला हवा! परिस्थिती काहीही असो मला स्वतःला खंबीर ठेवायचे आहे. कमकुवत पडायचे नाहीये. जे होईल ते पाहता येईल पण आता मी मला ऐकू येणाऱ्या या हाकांकडे दूर्लक्ष करू शकणार नाहीच... कान्हा, तू सोबत आहेस ना माझ्या! बास! एवढेच पुरेसे आहे. " 


                युगने मनोमन निश्चय केला आणि त्याने डोळे किलकिले करून सावकाश डोळे उघडले. त्याला पुढील दृश्य धुसर दिसत होते म्हणून त्याने थोडा वेळ पापण्यांची उघडझाप केली आणि परत सैरभैर नजर फिरवली. तेव्हा त्याला काही अंतरावर संकर्षण जखमी अवस्थेत दिसला आणि संकर्षणच्या सभोवताली काचेचे तुकडे पसरलेले दिसले. थोड्याच अंतरावर त्याला सिद्धपुरुष महाराजही दिसले, ते त्यालाच हाका मारत होते. 


                त्याने स्वतःकडे पाहिले तर आता तो त्याच वाड्यात होता जिथे तो आणि संकर्षण मुक्कामाला होते. युगने वाड्याकडेही पाहिले तर वाड्याची अवस्था पाहून त्याला अंदाज आलेला की, जेव्हा धराच्या आत्म्याने त्याच्यावर हल्ला केला होता. तेव्हा तो गंभीरपणे जखमी होऊन बेशुद्ध झाला होता आणि त्या बेशुद्धावस्थेत तो भयंकर स्वप्न बघत होता. ज्या स्वप्नात त्याचाच जिवलग मित्र अर्थात संकर्षण त्याच्या विरोधात उभा होता.


                युग विचारांच्या चक्रात गुरफटलेला असताना सिद्धपुरुष महाराजांची हाक परत एकदा त्याच्या कानावर पडली आणि त्याची नजर आपोआप त्यांच्याकडे गेली. त्यांच्याकडे पाहताच त्याला दिसले की, ते धराच्या आत्म्याला मंत्रबद्ध यंत्रात काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांच्या एकट्याची मंत्रशक्ती अपूर्ण पडत आहे आणि म्हणूनच मदतीसाठी ते युगला वारंवार हाका मारत आहेत. लगेच ते दृश्य पाहता युगची विचाराची तंद्री भंग पावली. तो खडबडून उठून उभा राहिला व यथेच्छ जप करू लागला. तो " हरे कृष्ण, हरे कृष्ण " म्हणत होता आणि त्यामुळे त्या आत्म्याची सिद्धपुरुष महाराजांपेक्षा वरचढ ठरण्याची शक्ती कमी पडू लागली. 


                ती आत्मा हळूहळू कमकुवत होऊ लागली आणि सिद्धपुरुष महाराजांना त्या आत्म्याला मंत्रबद्ध यंत्रात जखडून ठेवण्यासाठी तेवढीच संधी मिळत होती पण अचानक ती आत्मा खाली ढासळून पडली. ते पाहून सिद्धपुरुष महाराजांनी त्यांचा मंत्रजप करण्याचा स्वर कमी केला अन् दुसरीकडे युगनेही एकाएकी " हरे कृष्ण " चा जप करणे थांबविले आणि अगदी तीच संधी साधून त्या आत्म्याने संकर्षणच्या शरीरात प्रवेश केला. संकर्षणच्या शरीरात प्रवेश करताच ती आत्मा खिदळून व अगदी कुरूप रीतीने हसू लागली. युगला संकर्षणकडे पाहून दरदरून घाम फुटला.


                दुसरीकडे संकर्षणच्या शरीरात त्या आत्म्याने प्रवेश करताच तो अगदी भयंकर रितीने युगकडे चालत येऊ लागला. एखाद्या भयपटात जसे दृश्य दाखवितात अगदी त्याच पद्धतीने हात आणि पाय जमिनीला टेकवून, तिरकस मान करून, अधूनमधून दात विचकत व भयंकर रितीने खिदळत अन् जोरजोरात हसून युगच्या दिशेने संकर्षण चालत आला आणि त्याने क्षणात युगच्या अंगावर झडप घेतली. 


सिद्धपुरुष महाराजांनी युगला हाक दिली व ते ओरडून म्हणाले, " युग, स्वतःवर विश्वास ठेव आणि तुझ्या कान्हावर विश्वास ठेव. "


                सिद्धपुरुष महाराजांचा आवाज ऐकताच युगने निर्धार केला आणि तो संकर्षणच्या डोळ्यात डोळे घालून " हरे कृष्ण! हरे कृष्ण! " म्हणू लागला. संकर्षणच्या शरीरात प्रवेश केलेली ती आत्मा परत कमकुवत पडू लागली पण ती आत्मा देखील हार मानत नव्हती. त्या आत्म्याने दूरवर पडलेल्या काचा नजरेनेच लगेच स्वतःजवळ खेचून घेतल्या आणि त्यापैकी एक मोठी धारदार काच  हातात घेऊन ती आत्मा युगच्या छातीवर वार करण्यासाठी पुढे सरसावली पण अचानक बंदूकीच्या ठोक्याचा आवाज झाला.


                युगची नजर आपोआप आवाजाच्या दिशेने गेली. सिद्धपुरुष महाराजांनीही त्या दिशेने पाहिले. संकर्षण म्हणजेच ती आत्मा मात्र अजूनही हातात चाकू घेऊन युगच्या छातीवर वार करण्याच्या प्रयत्नात होती आणि तेवढ्यात वाड्याचा मुख्य दरवाजा तोडून इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे हॉलमध्ये शिरले. त्यांच्यासोबत काही हवालदारही होते. इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे यांनी प्रत्येक हवालदाराला हातवारे करून काही इशारे केले. आदेशाप्रमाणे त्या सर्वांनी हॉलच्या चहूबाजूंनी वेढा घातला. तोपर्यंत इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे यांनी लक्ष्य साधून संकर्षणच्या हातावर गोळी झाडली. त्यामुळे त्याच्या हातातून काच खाली पडली आणि संकर्षण बेशुद्ध झाला. 


                संकर्षण बेशुद्ध होताच त्याच्या शरीरातून काहीसा धूर बाहेर पडला पण ते फक्त युगलाच दिसले. दुसरीकडे संकर्षण बेशुद्ध झाल्याचे कळताच एका हवालदाराने सिद्धपुरुष महाराजांवर बंदूक ताणली व त्यांच्या हातात बेडी ठोकली. तर एकीकडे काही हवालदारांनी संकर्षणला ताब्यात घेतले. त्याच्या हातावरील जखमेची मलमपट्टी करून त्याच्या दोन्ही हातात बेड्या ठोकल्या व त्याला सोफ्यावर बसवले अन् त्याच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहू लागले.


                दुसरीकडे इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे यांनी युगच्या पुढे हात केला व त्याला उठून उभे राहायला मदत केली. थोड्या वेळातच इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे यांच्या आधाराने युग उठून उभा राहिला पण तो गोंधळून इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे यांच्याकडे पाहू लागला. किंबहुना, तो प्रत्येक हवालदाराकडे गोंधळून पाहत होता. त्याच्या मनात असंख्य प्रश्न दाटलेले होते. 


सरतेशेवटी थोडा मनाचा हिय्या करून त्याने खोल श्वास घेतला आणि तो इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे यांना उद्देशून म्हणाला, " सर, तुम्ही... तुम्ही सर्व इथे अचानक कसे काय आलात? आणि तुम्हाला या घराचा पत्ता कुणी दिला? आम्ही अंबरवाडीला आहोत, याची कल्पना कुणालाच नव्हती मग तुम्हाला कुणी सांगितले? आणि तुमच्या हवालदारांनी सिद्धपुरुष महाराज आणि संकर्षणच्या हातात बेड्या का ठोकल्या आहेत? आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्ही... तुम्ही संकर्षणच्या हातावर गोळी का झाडली? " 


" मी गोळी का झाडली हा प्रश्न विचारण्याऐवजी मी संकर्षणवर गोळी झाडली याचे तुम्ही समाधान मानायला हवे मि. युग दिक्षित! " इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळे म्हणाले आणि त्यांनी असे म्हणताच युग आणखीच गोंधळला व तो आश्चर्याने इन्स्पेक्टर श्रेयस जोंधळेकडे पाहू लागला. 


क्रमशः

___________________________________


©®

सेजल पुंजे. 

३०-०८-२०२२.

टीम नागपूर. 


🎭 Series Post

View all