Mar 03, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

आभास की वास्तव? (भाग - २०)

Read Later
आभास की वास्तव? (भाग - २०)

राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कथेचे शीर्षक - आभास की वास्तव? 

भाग - २०


युग बेडकडे आश्चर्याने पाहत होता आणि तेवढ्यात संकर्षण म्हणाला, " युग, कुठे आहे ती डायरी? सांग ना कुठे आहे? " 


" ती डायरी इथेच होती. आय स्वेअर! " युग अडखळत म्हणाला. 


" मग ती डायरी आता कुठे आहे युग? " संकर्षणचा आवाज हळूहळू वाढत होता. 


" मला नाही माहिती पण संक्या... तू माझ्यावर विश्वास ठेव ती डायरी इथे बेडवरच फेकली होती मी... मला वाटतं, कदाचित ती डायरी या बेडखाली पडली असेल... थांब मी बघतो एकदा... " असे बोलून युग खाली वाकून बेड खाली पाहू लागला. त्याने बेडच्या खाली आणि सभोवती काही वेळ पाहिले, थोडी बेडवरही शोधाशोध केली व नंतर तो उठून उभा राहिला. 


" युग भेटली डायरी? " संकर्षणने एक भुवई उंचावून परत प्रश्न उपस्थित केला. 


" ना... नाही! पण ती डायरी... ती धराची डायरी मी बेडवरच घाईगडबडीत फेकली होती. ती इथेच असायला हवी होती पण कळत नाहीये ती कुठे गेली... बट गाईज, प्लीज लिसन टू मी! " युग पाणावलेल्या डोळ्यांनी बोलला. 


" जस्ट शट अप युग! इनफ इज इनफ! केव्हापासून तुझंच तर ऐकतोय आम्ही... तू म्हटलं की, तुला वाईट स्वप्न दिसलं, आम्ही ऐकलं. तू म्हटलं की, टॅटू होता तुझ्या हातावर, आम्ही ऐकून घेतलं... तू म्हटलं की, या खोलीत डायरी होती, आम्ही तेसुद्धा ऐकलं... पण मला आता फक्त एवढंच सांग की, या खोलीत जर डायरी होती तर ती डायरी गेली कुठे युग? त्या डायरीची राख झाली का एका क्षणात? दे आता माझ्या प्रश्नाचं उत्तर आणि सांग ती डायरी कुठे आहे? " संकर्षण चढ्या आवाजात युग सोबत बोलत होता. 


" संक्या... मला नाही माहिती पण खरंच इथे ती डायरी होती आणि त्या डायरीने आणि कुणालने माझ्यावर खरंच झडप घेतली होती रे... " युग काकुळतीने म्हणाला. 


" हे अति होतंय युग! तुला का सारखं वाटतं की, अख्खं जग तुझा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहे. जी व्यक्ती मेलेली आहे ती व्यक्ती तुझा जीव खरंच घेईल का? आणि ज्या डायरीचे अस्तित्वच नाहीये ती तुझ्यावर झडप घेईल? हे तुझ्या तरी बुद्धीला पटण्यासारखे आहे का? विचार कर, तुझ्या जागी मी असेल आणि मी असं काहीही निरर्थक बडबडत असेल तर तू विश्वास ठेवशील? मी जे प्रश्न तुला विचारतोय, ते प्रश्न तू मला विचारणार नाहीस? " संकर्षण बोलला. 


" संक्या पण... " युग अर्धवटच बोलला. डॉ. शुभम माने गप्प बसून दोघांचेही निरिक्षण करत होते. 


" काय पण युग? हे बघ, तू जे बोलतोय त्याचा वास्तविक आयुष्याशी संबंध नाहीये. तू जे अनुभवतोय तो निव्वळ भास आहे. थोडक्यात, तू सध्या कल्पना विश्वात रमलेला आहेस. सो, फर्स्ट डील विथ इट! तू त्या आभासी जगातून बाहेर पड. " संकर्षण बोलला.


                थोड्या वेळाने त्याने युगकडे पाहिले. युग मात्र काहीच न बोलता शांत बसून होता. संकर्षणच्या लक्षात येताच त्याने जीभ चावली कारण तो आवेगात युगला बरंच काही बोलून गेला होता. तो गोंधळून गेला म्हणून तो थोड्या अंतरावर पाठमोरा उभा राहिला व कपाळावर अंगठा घासू लागला. तोपर्यंत डॉ. शुभम माने युगजवळ गेले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला समजावण्याचा प्रयत्न करू लागले.


ते म्हणाले, " काळजी आहे त्यालाही तुझी म्हणून तो असे बोलून गेला पण त्याचा हेतू वाईट नव्हता हे तुला देखील माहिती आहे ना... " 


" हो मला माहीत आहे म्हणून मी त्याच्यावर रुसलेलो नाहीये. मला फक्त आभास आणि वास्तवाचा फरक कळत नाहीये. मला नाही कळतंय की, मी जे अनुभवले ते सर्व माझं कल्पनाविश्व होतं की, आता हे जे मी अनुभवतोय ते कल्पनाविश्व आहे. खरंच, मला कळत नाहीये. " युग निर्विकारपणे म्हणाला. 


" इट्स ओके! हळूहळू हा पेच ही सुटेल पण तोपर्यंत खंबीर राहा! " डॉ. शुभम माने म्हणाले. 


" ह्म्म... काय माहित काय लिहिले आहे नशिबात... " युग एवढे बोलून शांत झाला.


                डॉ. शुभम माने यांनी लगेच त्याला मिठीत घेतले. तेवढ्यात संकर्षणने मागे वळून पाहिले. युगला असे शांत बघून त्याला गहिवरून आले. संकर्षण लगेच युगजवळ गेला म्हणून डॉ. शुभम माने यांनी त्याला मिठीतून बाहेर काढले. युग तरीही खाली मान घालून बसला होता. 


तेवढ्यात संकर्षणने युगचा हात हातात घेतला व म्हणाला, " युग, सॉरी... मला तुझ्याशी असं तुसडेपणाने बोलायचं नव्हतं पण नकळत मी बोलून गेलो. मला काळजी वाटते रे तुझी! तुझ्या अशा वागण्यामुळे लोक तुला वेड्यात काढतील, मला ही भीती वाटते. म्हणून माझं तुला एवढंच म्हणणं आहे की, आभास आणि वास्तवाचा पेच सोडविणे फक्त नि फक्त तुझ्या हातात आहे. तुला फक्त भास होत आहेत या सत्याला तू जेवढ्या लवकर स्विकारशील तेवढे बरे होईल राजा... 


                 भावा, तू कल्पना विश्वात अनुभवलेल्या घटनांचा तर्क वास्तविक आयुष्याशी वारंवार जोडू पाहतोय हे पाहून माझा स्वतःवरूनच ताबा सुटला आणि मी असा बोलून गेलो. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की, झाले गेले विसरून तू नवी सुरुवात कर! ना कुणालचे सध्या अस्तित्व आहे ना तू स्वप्नात पाहिलेल्या कोणत्याही व्यक्तीचे वा वस्तूचे मग ती एखादी डायरी असो वा कुणी धरा नावाची मुलगी वा आत्मा... " एवढे बोलून संकर्षणने युगला मिठी मारली आणि त्याच्या डोळ्यातून अश्रूचा एक थेंब ओघळला. 


युग म्हणाला, " सॉरी संकर्षण... मी परत तुला हर्ट होईल असं वागणार नाही. मला सध्यातरी कल्पनाविश्व आणि वास्तविक आयुष्य यात ताळमेळ साधता नाही येत आहे पण तुझ्या सोबतीने मला ते देखील जमेल. " असे बोलून युगनेही हातांचा विळखा घालून मिठीची पकड घट्ट केली. त्याच्याही डोळ्यातून अश्रूचा थेंब बाहेर आला. लगेच डॉ. शुभम माने यांनीही त्या दोघांना मिठी मारली. 


                   काही वेळापुरतं वातावरण भावूक झालं होतं. ते तिघेही शांत होते. कुणीच काहीही न बोलता एकमेकांना बिलगून होते. थोड्या वेळाने डॉ. शुभम माने मिठी सोडवून उभे राहिले. त्यानंतर युगने करंगळीने त्याचे अश्रू पुसले व तो संकर्षणला हलकीच हाक मारून त्याची मिठी सोडवण्याचा प्रयत्न करू लागला पण संकर्षण प्रतिसाद देत नव्हता. युगला संशयास्पद वाटले त्याने डॉ. शुभम माने यांना हाक मारली पण त्यांनीही काहीच प्रतिसाद दिला नाही. तो आता थोडा गोंधळला पण निर्धाराने व थोडासा जोर लावून त्याने संकर्षणची मिठी सोडवली आणि त्याचा चेहरा ओंजळीत घेतला.  


                युगची नजर संकर्षणच्या चेहऱ्यावरच खिळून राहिली. तो संकर्षणला पाहून अस्वस्थ झाला. संकर्षणने डोळे मिटलेले होते आणि त्याच्या डोळ्यांतून रक्ताचे थेंब वाहत होते. युग संकर्षणला हाका मारत होता पण काहीच प्रतिसाद येत नव्हता. तो संकर्षणला शुध्दीवर आणण्यासाठी त्याच्या गालावर हळूच चापट मारत होता पण तरीही संकर्षण काहीच हालचाल करत नव्हता. 


युगचा हळूहळू धीर खचत होता त्याने संकर्षणवरून नजर वळवली व तो डॉ. शुभम माने यांना उद्देशून म्हणाला, " डॉ. शुभम बघा ना हा संक्या... हा असा कसा बेशुद्ध झाला? मी ह्याला किती हाका मारतोय पण हा काहीच प्रतिसाद देत नाहीये. डॉ. शुभम... " 


                युगची नजर डॉ. शुभम मानेकडे गेली आणि त्यांना पाहताच पुढचे शब्द त्याच्या ओठातच राहिले. युग पुढे काही बोलूच शकला नाही कारण डॉ. शुभम माने त्याच्याकडे पाहून खुनशी हसत होते. त्यांच्या डोळ्यातील आक्रमकता आणि ओठांवरील खुनशी हसू पाहून युग अक्षरशः नखशिखांत घाबरला. 


तरीही तो अडखळत पण मोठ्या हिंमतीने डॉ. शुभम माने यांना उद्देशून म्हणाला, " डॉ. शुभम... तुम्ही... तुम्ही असे का हसत आहात? बरं असो... पण सध्या हे बघा ना... संक्या... तो... तो कदाचित बेशुद्ध झाला आहे. प्लीज... प्लीज तुम्ही किचनमधून थोडं पाणी आणा ना... कदाचित... कदाचित पाण्याचे शिंतोडे त्याच्या चेहऱ्यावर उडवताच तो शुध्दीवर येईल. " 


                युग वारंवार डॉ. शुभम माने यांना विनंती करत होता पण त्यांनी त्यांच्या जागेवरून ना तसूभर हालचाल केली ना त्यांच्या खुनशी हास्याचा विस्तार कमी केला. 


ते पाहून युगने त्यांच्यावर एक रागीट कटाक्ष टाकला व म्हणाला, " डॉ. शुभम प्लीज... प्लीज हेल्प मी... " 


                 युगचा चढलेला स्वर ऐकून डॉ. शुभम माने जोरजोरात खिदळून हसू लागले आणि ते पाहून युग आश्चर्यचकित झाला व तो त्यांच्याकडे आश्चर्याने पाहतच राहीला. 


क्रमशः

_________________________________________


©®

सेजल पुंजे

२८-०८-२०२२.

टीम नागपूर. 


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//