आभास की वास्तव? (भाग -१८)

आभास अन् वास्तवाच्या कचाट्यात गुंतलेली रहस्यकथा... सत्य आणि असत्याचा सुगावा घेणारी कथामालिका...

राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कथेचे शीर्षक - आभास की वास्तव? 

भाग - १८


युग वारंवार अंबरवाडीला न जाण्याचा उल्लेख करत होता म्हणून त्याला शांत करण्यासाठी डॉ. शुभम माने मंद हसून म्हणाले, " युग, तू अंबरवाडीला नको ना जाऊ! तू तुला वाटेल तिथे फिरायला जा! ओके! " 


" नाही, मी तरीही कुठेच जाणार नाही. मला माहीत आहे, मी बाहेर पडलो तर माझ्यासोबत काहीही घडू शकतं. ती माझा जीव घेईल आणि संकर्षण... तुझा जीव... तुला माझ्यामुळे दुखापत होईल... तुझ्याही जीवाला धोका आहे म्हणून आपण सावध राहायलं हवं आणि त्याकरिता आपण दोघेही कुठेच नाही जायचं. कळतंय ना... आपण कुठेही नाही जाणार आहोत. इथेच राहू! " युग संकर्षणचा हात हातात घेऊन भावूक होत म्हणाला.


" ठीक आहे, ठीक आहे! आपण नाही जाणार कुठेच... आणि डोन्ट वरी राजा! माहिती आहे ना, आपण दोघेही सोबत असताना आपल्याला काहीच होणार नाहीये! सो रिलॅक्स! म्हणून आता तरी ही स्वारी हॅप्पी आहे ना! " संकर्षण युगच्या अस्वस्थ मनाला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. 


" हो, हो... आपण कुठेच नाही जायचं. " तरीही युग वारंवार तेच बडबडत होता आणि आवेगात त्याने लगेच संकर्षणला कडाडून मिठीही मारली. संकर्षण जरी गोंधळलेला होता तरीही तो युगच्या पाठीवरून हात फिरवून त्याला शांत करत होता. 


                दुसरीकडे डॉ. माने यांनी दिलेला सल्ला युगने ऐकताच त्याच्या डोळ्यापुढे आतापर्यंत घडलेले सर्व क्षण तरळत होते. म्हणून त्याने फिरायला जाण्यासाठी नकार दिला होता. युगचा स्पष्ट नकार पाहता डॉ. शुभम माने यांनीही परत त्याच्यावर बळजबरी केली नाही. काही वेळानंतर युगचं लक्ष अचानक त्याच्या डाव्या हाताकडे गेले. 


                त्या हातावर एका मुलीचा टॅटू होता, ज्यात एकाच मुलीची दोन परस्परभिन्न रूपं दिसत होती. थोडक्यात सांगायचे झाल्यास, त्या मुलीचे एक रुप अगदी शांत अन् निरागस तर दुसरे रुप क्रूर अन् आसुरी भासत होते. तो त्या टॅटूकडे एकटक पाहत होता अन् अचानक त्याला त्या टॅटूमध्ये काहीशी हालचाल जाणवली. ते पाहून युग आणखी घाबरला.


                युग त्याच्या हातावरील टॅटू संकर्षण आणि डॉ. माने यांना दाखवत होता पण त्या दोघांना काहीच दिसत नव्हते. त्या दोघांनीही युगकडे गोंधळून पाहिल्यावर त्याने त्याच्या हाताकडे परत एकदा पाहिले तेव्हा मात्र त्याच्या हातावर कोणताच टॅटू नव्हता. तो देखील अविश्वासाने स्वतःच्या हातकडे पाहत होता पण सातत्याने डॉ. माने आणि संकर्षणला त्याची बाजूही मांडत होता पण ते दोघेही त्याचं ऐकून घेत नव्हते.


" प्लीज, माझं ऐका! माझ्या हातावर एक टॅटू मी आताच पाहिला. त्यातून हालचालही होत होती. मी तुम्हांला हाक देताच तो टॅटू मात्र दिसेनासा झाला. ट्रस्ट मी! " युग काकुळतीने बोलला. 


" युग सिरियसली? तू मस्करी करतोय का? तू विसरलास का तुला टॅटू काढायला नाही आवडत तर मग तुझ्या हातावर टॅटू असणार कसा? थोडा तरी विचार कर बोलण्याआधी... " संकर्षणही बराच वैतागला होता. 


" संकर्षण मला माहीत आहे सर्व! आणि मी कुठे म्हणालोय की, तो टॅटू मी काढला होता. मी कधीच तो टॅटू काढून नाही घेतला. मला तर आजच तो टॅटू माझ्या हातावर दिसला आणि लगेच तो टॅटू अक्षरशः मला काही कळायच्या आत मिटला देखील... मला माहीत आहे, हे सर्व विश्वास करण्यापलिकडे आहे पण मला तरी या बिनबुडाच्या थापा मारण्यात रस नाहीये. मी खरंच सांगतोय, माझ्या हातावर होता टॅटू! " युग कळकळीने बोलत होता. 


" ओह! म्हणजे टॅटू दैवाने तुझ्या हातावर कोरला नि नंतर दैवानेच पुसून काढला, असं म्हणायचंय ना तुला! बरं! कळलं हा! " संकर्षणचीही बरीच चीडचीड होत होती. 


" मी असं कुठे म्हटलं? संक्या, भावा... माझं एकदा ऐकून तरी घे ना! तो टॅटू... " युग स्वतःची बाजू लागोपाठ मांडत होता. 


" युग, रिलॅक्स! तू म्हणतोय ते पटतंय मला! " डॉ. शुभम माने युग आणि संकर्षणच्या संवादात मध्यस्थी करत म्हणाले. 


" खरंच! " युगच्या चेहऱ्यावर थोडा आनंद पसरला. 


" ह्म्म! " डॉ. माने यांनी होकारार्थी मान हलवली. 


" काय? " संकर्षण मात्र जवळजवळ ओरडलाच.


" हो, म्हणजे ऍक्च्युअली आधी जेव्हा युग तू टॅटू दाखवला तेव्हा दिसला नाही मला... पण नुकताच मला तुझ्या हातावर एक टॅटू आपोआप उमटताना अन् मिटताना दिसला. " डॉ. शुभम माने म्हणाले. 


" काय? " संकर्षणने परत गोंधळून विचारले. डॉ. शुभम माने यांनी मात्र त्याला तात्पुरते शांत राहण्यास सांगितले. इशारा उमजताच संकर्षणही गप्प झाला. 


" बघितलं? बघितलंस संक्या! मी म्हणत होतो ना मी खरं बोलतोय पण तू ऐकलंच नाहीस. थॅंक्यु डॉक्टर! ऍटलीस्ट तुम्ही तरी माझी बाजू समजून घेतली. " युगने डॉ. मानेचे आभार मानले. संकर्षण मात्र मनात असंख्य प्रश्न घेऊन डॉ. माने आणि युग या दोघांकडेही आळीपाळीने पाहत होता. 


" अरे, त्यात काही नाही एवढं! यात कसले आभार मानतोस! बरं असो! आणि आता तू थोडा वेळ आराम कर! डोकं शांत ठेव! ही एक गोळी घे! आणि मी तुला हे एक इन्जेक्शन इन्जेक्ट करतोय त्यामुळे तुला थोडा वेळ शांत चित्ताने निवांत होऊन आराम करता येईल. ठीक आहे! " डॉ. माने युगला म्हणाले. 


" हो चालेल! " युगने लगेच डॉ. मानेच्या मताला दुजोरा दिला आणि गोळी घेतल्यानंतर तो बेडवर आडवा झाला. त्यानंतर डॉ. माने यांनी त्याला इंजेक्शन इन्जेक्ट केले व त्यांनी परत एकदा युगला थोडा आराम करायला सांगितले. युगनेही होकार दिला व लगेच तो झोपी गेला. तो झोपल्याची खात्री केल्यानंतर डॉ. माने आणि संकर्षण खोलीबाहेर अगदी दाराजवळ उभे राहिले. 


" शुभम? तू खरंच टॅटू पाहिलास की फक्त त्याला थाप दिलीस? आणि जर तुला टॅटू दिसला तर मला का नाही दिसला? युगला नक्की काय झालंय शुभम? तो असा का वागतोय? तो ठीक आहे ना? हे टॅटू वगैरेचं नेमकं काय प्रकरण आहे? मला माहिती आहे, युग तुझाही मित्र आहे सो... तू त्याचे भलेच चिंतणार पण मला खरंच त्याची काळजी वाटते. म्हणून सांग ना खरंखुरं त्याच्या हातावर खरंच टॅटू होता? " खोलीबाहेर येताच संकर्षण लागोपाठ डॉ. माने यांना प्रश्न विचारतो होता पण हळू आवाजात जेणेकरून युगची झोपमोड होऊ नये. 


" नाही! मी युगच्या हातावर टॅटू नाही पाहिला! " डॉ. मानेही हळू आवाजात म्हणाले. 


" काय? मग तू त्याच्याशी खोटे का बोललास? त्याला अंधारात ठेवून तुला काय मिळणार? मला नव्हतं वाटलं, एक डॉक्टर असून आणि युगचा मित्र असूनही तू त्याला असं वेड्यात काढशील ते... लिटरली... मला नव्हतं वाटलेलं... " संकर्षण डॉ. माने यांच्यावर चिडला होता. 


" संकर्षण, मला तुझ्या आणि युगच्या जिवलग मैत्रीची कल्पना आहे म्हणून तुझी मनोवस्था मी समजू शकतो. म्हणून पहिलं तर सॉरी की, मी युगशी खोटं बोललो पण ट्रस्ट मी त्यामागे कारण होतं. ते असं की, युग त्याच्या बाजूवर ठाम होता आणि शब्दागणिक तो हायपर होत होता. तो आणखी ताण घेत होता म्हणून नाईलाजाने का होईना पण त्याच्या शब्दांना दुजोरा देत मी त्याची मनधरणी केली. मी त्याची लहान बाळाप्रमाणे समजूत घातली. 


               मी त्याला वेड्यात काढले नाही फक्त बेबी सिटिंग केल्याप्रमाणे त्याची पॅम्परिंग केली. त्यावेळी त्याच्या मताला मी दुजोरा दिला नसता तर युग आणखी हायपर झाला असताच... किंबहुना, त्याचा स्वतःवरील ताबा सुद्धा सुटला असता म्हणूनच मला नाईलाजाने त्याची साथ द्यावी लागली. आय ऍम सॉरी एक डॉक्टर असून माझे असे वागणे अपेक्षित नव्हते पण युगचा मित्र या नात्याने मी मला जे योग्य वाटले ते केले. " डॉ. शुभम माने म्हणाले. 


" सॉरी! मी तुला उगाच जास्त बोललो. तुला सुद्धा युगची काळजी आहे, हे मी एका क्षणाला विसरूनच गेलो होतो. " संकर्षणलाही त्याची चूक लक्षात आली म्हणून त्याने लगेच माफी मागितली. 


" ह्म्म! " डॉ. शुभम माने यांनी हलकासा उसासा घेताच संकर्षण डॉ. शुभम माने यांच्या खांद्यावर थोडा दाब देऊन त्यांना आधार देऊ लागला. 


" ह्म्म! हे सगळं तर ठीक आहे पण आता युगचं काय करायचं? तो कधी ठीक होईल? " संकर्षणने डॉ. शुभम माने यांना प्रश्न विचारला अन् डॉ. शुभम माने विचारांच्या चक्रीवादळात हरवले. 


क्रमशः

_____________________________________


©®

सेजल पुंजे

२६-०८-२०२२.

टीम नागपूर. 


🎭 Series Post

View all