राज्यस्तरीय करंडक कथामालिका
कथेचे शीर्षक - आभास की वास्तव?
भाग - १७
" संक्या, अरे धरा? जिने आपल्याला आश्रय दिला होता. जी मुलगी तुला पाहत्या क्षणीच पसंत आली होती पण ती मुलगीच नव्हती. ती एक अतृप्त आत्मा होती. हे तूच मला सांगितले होते पण तुझं मी ऐकलंच नाही... पण आता जेव्हा प्रत्यक्ष अनुभव घेतलाय तर मला कळून चुकलंय की, धरा आत्माच होती. तिने तुला पार गंभीर जखमी केलं होतं आणि तिच्या तावडीतून सिद्धपुरुष महाराज आपली सुटका करत होते, विसरलास का? प्लिज संक्या, जर तुला आठवण असेल सर्व तर आता तरी सांग ना... आपण अंबरवाडीतून कधी परत आलो? धराने तिचा खरा भूतकाळ सांगितला का आणि महाराजांनी तिच्यापासून आपली सुटका कशी केली? " युगने संकर्षणला सर्वकाही थोडक्यात सांगितले व परत तो विचारपूस करू लागला.
" युग आता तू खरंच खूप जास्त मला कन्फ्युज करतोय. आधीच धरा कोण आहे तेच कळत नव्हतं आणि आता त्यात तू अंबरवाडीबद्दल काय मध्येच विचारतोय? अरे, आपण पूणे सोडून कुठेच गेलेलो नाहीये आणि तुला बरं नसताना आपण कसं कुठे प्रवास करणार? " संकर्षण म्हणाला.
" संक्या, तू शुद्धीवर आहेस ना? असं कसं तू अंबरवाडीबद्दल वा धराबद्दल विसरू शकतोस? ज्याअर्थी भटकंती करण्यासाठी ते ठिकाण तूच निवडले होते. शिवाय धरासोबत तुलाच तर लगाव जास्त होता. महाराजांना पर्सनली तू भेटलास मग तरीही तुला काहीच कसे आठवेना? " युग थोडा हायपर झाला.
" युग पण मला कसं सर्व आठवणार? ज्याअर्थी आपण कुठे गेलोच नाही. तू लक्षात घे, ना आपण कुठे गेलो होतो ना आपण कुणाची भेट घेतली. " संकर्षण म्हणाला.
" घ्या, परत तू तेच बोलतोय. संक्या, आपण गेलो होतो अंबरवाडीला कारण डॉ. शुभम माने यांनीच तसा सल्ला दिला होता, माझे चेकअप करून झाल्यावर... तेच म्हणाले होते की, मला भटकंतीची गरज आहे आणि म्हणून तू भटकंतीसाठी अंबरवाडी हे ठिकाण निवडले होते. आपण तिथे डॉ. माने यांनी चेकअप केल्यानंतर दोन दिवसांनी गेलो होतो, साधारण एक आठवड्याच्या सुट्ट्या काढून! जर तुला तरीही आठवत नसेल तर मी तारीखही सांगू का? " युगची आता चीडचीड होत होती.
" युग तू का मनमानी करतोस? मी सांगतोय त्यावर का तुझा विश्वास नाहीये? " संकर्षण म्हणाला.
" हाच प्रश्न मी तुलाही विचारू शकतो ना! मला सांग, तू का ऐकत नाहीये माझं? हे बघ, डॉ. शुभम माने यांनी पाच तारखेला माझ्यावर काही थेरेपी केल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी काहीतरी निष्कर्ष काढले त्यानुसार आपण सात तारखेला अंबरवाडीला गेलो होतो. एवढे मी सांगितले तरीही तुला आणखी सविस्तर माहिती हवीच आहे का? " युग वैतागून म्हणाला.
" युग कोणती पाच तारीख? तुझ्या मते, जर पाच तारीख झालीय तर मग आज कोणती तारीख आहे? युग, कॅलेंडर बघ एकदा! तुझं चेकअप आजच होतंय आणि आजच तर पाच तारीख आहे ना! " संकर्षण म्हणाला.
युगने त्याच्या बेडनजीक असणाऱ्या टेबलवर ठेवलेले कॅलेंडर पाहिले. त्यात साल २०१२ आणि तारीख मे महिन्याची ५ तारीख होती. ते पाहून युग हादरूनच गेला होता. तो वारंवार अविश्वासाने हातातल्या कॅलेंडरची पाने पलटत होता. त्याचा त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसेना म्हणून त्याने तावातावात ते कॅलेंडर देखील बेडवर आपटलं.
" युग रिलॅक्स! शांत हो! " डॉ. शुभम माने म्हणाले.
" डॉ. शुभम तुम्ही तरी संकर्षणची समजूत घाला. तुम्ही दोघे घनिष्ठ मित्र आहात ना... सो, प्लिज! तुम्ही त्याला समजावून सांगा ना! " युग डॉ. शुभम मानेकडे आशेने पाहून बोलला.
" युग काय म्हणालास? तू शुद्धीवर आहेस का? अरे, युग डॉ. शुभम माने माझे मित्र आहेत पण माझ्याआधी तुम्ही दोघे मित्र आहात ना... गेल्या वर्षी व्हिडिओ कॉलवर माझी आणि त्यांची ओळख तूच करवून दिली होतीस. आमची प्रत्यक्ष भेट काल झाली, ती सुद्धा तुझ्यामुळे! त्यांना जेव्हा तुझ्याबद्दल कळलं ते स्वतःच आले मदत करायला... आम्हाला वाटलं होतं की, स्मृतिभ्रंश झाल्याने तुला शुभमची ओळख असेल वा नसेल म्हणून आम्ही कुठलीही रिस्क न घेता तुझी आणि शुभमची मैत्री असल्याचा वगैरे तुझ्यापुढे काही उल्लेख केलाच नाही. " संकर्षण म्हणाला.
" काय? हे अशक्य आहे? कारण तूच म्हटलं होतं की, डॉ. शुभम तुझे मित्र आहेत आणि त्यानंतर आमच्या दोघांची मैत्री माझ्या चेकअपच्या दिवशी झाली होती. मी तर डॉ. शुभम यांच्याशी तुसडेपणाने वागत होतो पण तुम्ही दोघे मित्र आहात कळल्यावर मीही डॉ. शुभम यांच्याशी मैत्री केली. मी बरोबर बोलतोय ना डॉ. शुभम? " युग डॉ. शुभम माने आणि संकर्षणकडे आळीपाळीने पाहत होता.
" युग आणि संकर्षण, तुम्ही दोघेही आधी शांत व्हा! " डॉ. शुभम माने यांनी असे म्हणताच युग आणि संकर्षणने हुंकार भरला.
" ओके! आता युग शांत डोक्याने माझं म्हणणं ऐकून घे! संकर्षण बोलतोय ते खरं आहे. आज पाच तारीखच आहे आणि मी सकाळपासून तुझ्यावर हिप्नोटाइज थेरेपी वापरतोय. त्यामुळेच तू बेशुद्धावस्थेत होता. मला वाटतं, कदाचित जेव्हा बेशुद्धावस्थेत होता तेव्हा तू हे स्वप्न पाहत असावा...
थोडक्यात, अशावेळी काय होतं, आपलं मन अशा आभासी अवस्थेत असतं. म्हणून कळत नकळत ते मन अशा काही कल्पनाविश्वात रमून जातं. आभासी जग रंगवून मनाला वाटतं की, जे घडतंय ते वास्तव आहे पण प्रत्यक्षात तो निव्वळ भ्रम असतो. म्हणून तू जे स्वप्नात पाहिलंस तेच तुला सत्य वाटत असेल... पण सध्या माझं ऐक! युग, धरा असो वा सिद्धपुरुष महाराज यांच्याशी तुझा संबंधच नाही आला कधी ना कधी येणार कारण त्यांचं काही अस्तित्वच नाहीये. ते फक्त काल्पनिक पात्र आहेत. शिवाय तू अंबरवाडीलाही गेलेला नाहीस. सो रिलॅक्स! " डॉ. शुभम माने म्हणाले.
" व्हॉट रबिश! इट्स जस्ट इम्पॉसिबल! " युगने डोके पकडले.
" रिलॅक्स! होतं असं कधीकधी... तर, आता त्या स्वप्नांच्या आभासी जगातून, कल्पनाविश्वातून बाहेर पड आणि वास्तविक जगात ये! " डॉ. शुभम माने युगची समजूत घालत होते. युग मात्र शून्यात नजर घालून बेडवर बसलेला होता.
" युग आणखी एक ऐक! मी तुला हिप्नोटाईज केलं होतं पण तू हिप्नोटाईज अवस्थेत असतानाही तुझ्याकडून पाहिजे अशी माहिती मला मिळालेली नाहीये. फक्त एवढंच कळलंय की, कुणालच्या अवेळी निधनाचा तुला जबर धक्का बसलेला आहे आणि... " डॉ. शुभम माने बोलत असतानाच युगने त्यांना अडवले व त्याने बोलायला सुरुवात केली.
" आणि माझा स्मृतिभ्रंश झाल्यानेही मी मानसिकरित्या अस्थिर आहे. जास्त भावूक तर झालोच आहे पण थोडा आक्रमकपणा देखील माझ्या स्वभावात शिरलाय. म्हणूनच कदाचित मला अशी भयावह स्वप्न दिसतात. यासाठी तुम्हाला वाटतं की, रिलॅक्सेशनसाठी मी निदान काही दिवस तरी मोकळ्या वातावरणात फिरून यावं. जेणेकरून मला थोडं बरं वाटेल. हेच म्हणायचंय ना तुम्हाला डॉ. शुभम? " युग डॉ. शुभम मानेकडे पाहून म्हणाला.
" अं हो! मला हेच म्हणायचं होतं पण तू अगदी तेच बोललास जे मी बोलणार होतो. एवढं तंतोतंत आणि मुद्देसूद अगदी जे मला म्हणायचं होतं तेच कसं बोललास तू? " डॉ. शुभम माने थोडं गोंधळून म्हणाले.
" कारण हे सगळं घडलेलं आहे. हे सगळं आधीच घडलंय. मी सांगतोय ना! प्लिज ट्रस्ट मी! " युग काकुळतीने म्हणाला.
" युग आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ओके! आता शांत हो आणि खोल श्वास घे! " डॉ. शुभम माने म्हणाले.
" ह्म्म... " युगने हलकासा हुंकार भरला व त्याने खोल श्वास घेतला.
" ओके! आता बरं वाटतंय ना! " डॉ. शुभम माने यांनी युगला विचारले व त्याने होकारार्थी मान हलवली.
नंतर डॉ. शुभम माने पुढे म्हणाले, " तर मग युग, काय ठरलंय तुझं? मी सुचविल्याप्रमाणे तू बाहेर थोडं मोकळ्या वातावरणात फिरायला जाणार आहेस का? आफ्टरऑल इट्स गुड फॉर युअर हेल्थ! "
" नाही! मी कुठेच जाणार नाहीये. मी अंबरवाडीला जाणार नाहीये. " युग चढ्या आवाजात पण जरा घाबरूनच म्हणाला. त्याच्या डोळ्यात भीती आणि काळजी स्पष्ट दिसून येत होती.
क्रमशः
________________________________________
©®
सेजल पुंजे.
२४-०८-२०२२.
टीम नागपूर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा