Mar 04, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

आभास की वास्तव? (भाग - १६)

Read Later
आभास की वास्तव? (भाग - १६)

राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कथेचे शीर्षक - आभास की वास्तव? 

भाग - १६


                भिंतीवर आपटले गेल्याने संकर्षण खूप जखमी झाला होता पण धराचे तेवढ्यात समाधान झालेले नव्हते. तिने क्षणात तिथे असलेल्या सर्व आरशांना तिच्या नजरेनेच तडा दिल्या आणि नंतर त्या काचांच्या तुकड्यांचा प्रहार संकर्षणवर करू लागली. त्यामुळे तो रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध झाला. शांत दिसणाऱ्या धराचे हे रुप पाहून युग अगदीच हादरला होता. 


                दुसरीकडे सिध्दपुरूष महाराज मंत्रोच्चार करत होते, जेणेकरून त्यांना धराच्या आत्म्याला त्यांनी रांगोळीने आखलेल्या यंत्रात बंदिस्त करता येईल... पण त्यात यश मिळत नव्हते! धराचे सामर्थ्य बलवत्तर ठरत होते पण त्यांनीही हार मानली नव्हती. त्यांनी युगला हनुमान चालीसा म्हणायला सांगितली पण त्याने कधीच हनुमान चालीसा पठण केले नसल्याने त्याच्या तुटक हनुमान चालीसा म्हणण्याचा धरावर काहीच फरक पडत नव्हता. ती बारीक डोळे करून सिद्धपुरुष महाराज व युग या दोघांनाही घाबरवत होती आणि जोरजोरात किंचाळत होती. 


                धरा त्या दोघांवरही आळीपाळीने काचांच्या तुकड्यांचा प्रहार करत होती. ते दोघेही स्वतःचा बचाव करत होते. तेवढ्यात युगचे लक्ष त्याच्या हातातल्या रुद्राक्षमाळेकडे गेले. त्याला ती रुद्राक्षमाळ गळ्यात घालण्याची कल्पना सुचली तो ती माळ गळ्यात घालणार होता पण त्याआधीच धराचे युगकडे आणि त्याच्या हातातल्या रुद्राक्षमाळेकडे लक्ष गेले. म्हणून तिने एक जळजळीत कटाक्ष त्या रुद्राक्षाच्या माळेवर टाकला व ती माळ लगेच तुटली आणि त्या माळेतील सर्व रुद्राक्षमणी विखरून खाली पडले.


                नंतर धराने लगेच युगचं शर्ट फाडून फेकलं आणि ती तिची धारदार नखे त्याच्या छातीत खुपसण्याचा प्रयत्न करू लागली. ती लागोपाठ युगवर नखांनी वार करत होती त्यामुळेच त्याचं सारं त्राण गळून पडलं. तो तिचे प्रहार सहन करून अगदी हतबल झाला होता. त्याने जवळजवळ हार मानली होती पण तेवढ्यात सिध्दपुरूष महाराजांनी त्यांच्या झोळीतून एक छोटीशी कुप्पी काढली अन् त्यातून थोडे पवित्र पाणी तळहातावर घेऊन धरावर त्या पाण्याचे शिंतोडे शिंपले. 


                पाणी शिंपताच धराने कर्णकर्कश किंकाळी फोडली व तिचे धुळीत रुपांतर झाले व ती किंकाळी फोडूनच धूळ होऊन झुंबराच्या दिशेने वर उडाली. सिध्दपुरूष महाराजांनी तळहातावर पवित्र पाणी घेऊन परत काही मंत्र ओठातल्या ओठात पुटपुटले आणि क्षणार्धात तिला यंत्राच्या मध्यभागी उभे केले. त्यानंतर सिध्दपुरूष महाराजांनी तिच्या सभोवताली मंत्राची तटबंदी केली. त्यामुळे यंत्रमंत्राच्या कोषात धरा बंदिस्त होताच तिच्या तावडीतून युगची सुटका झाली. सुटका होताच युग जोरजोरात धापा टाकू लागला. 


                सिद्धपुरुष महाराजांनी युगलाही काही मंत्र म्हणायला सांगितले आणि स्वतःसुद्धा एका क्षणाचाही विसावा न घेता मंत्रोच्चार करत होते. साधारण एक मिनिटानंतर सभोवतालून पवित्र पाणी शिंपून त्यांनी धराच्या अतृप्त आत्म्याला हतबल करून त्या आत्म्यावर नियंत्रण साधले. ती अक्षरशः त्या यंत्रयज्ञात बांधल्या गेली होती. ते सिध्दपुरूष महाराज प्रयत्न करत होते धराकडून सत्य जाणून घेण्याचा पण ती काहीच सांगत नव्हती. 


                सरतेशेवटी सिध्दपुरूष महाराजांनी युगला तिच्या एखाद्या खास वस्तूबद्दलची माहिती विचारली. युगने बराच वेळ आठवण्याचा प्रयत्न केला पण त्याला आठवत नव्हते. सिध्दपुरूष महाराजांनी त्याला आणखी विचार करायला वेळ दिला आणि तेवढ्यात युगला आठवले धराच्या डायरीबद्दल! हो एक डायरी, ज्या डायरीला ती स्वयंपाक करतानाही सोबत बाळगायची आणि एरवीही... 

   

                युगने डायरीबद्दल सिध्दपुरूष महाराजांना सांगताच त्यांनी ती डायरी युगला शोधून आणायला सांगितली. प्रसंगावधान साधून युग पळतच धराच्या खोलीत गेला व त्याने कपाटात शोधाशोध केली. इतर ठिकाणीही जिथे जिथे त्याला आशंका होती की, तिथे डायरी असू शकते; अशा सर्व ठिकाणी त्याने तपासले. तिच्या पलंगावरील उशीखालीही युगने पाहिले पण तिथेही त्याला डायरी मिळाली नाही अन् तेवढ्यात त्याची नजर ड्रेसिंगटेबलजवळ गेली. त्या ड्रेसिंगटेबलच्या एका ड्रॉव्हरला कुलूप लावलेले होते. युगला संशय आला म्हणून तो तडकाफडकी त्या ड्रेसिंगटेबल नजीक गेला. त्याने चावी शोधण्याचा थोडा प्रयत्न केला पण वेळेची मर्यादा जाणून घेत त्याने त्या ड्रॉव्हरचे कुलूप अक्षरशः तोडले आणि त्यातून डायरी बाहेर काढली.


                एकीकडे ती डायरी युगच्या हातात आली आणि दुसरीकडे यंत्रयज्ञात बंदिस्त असलेली ती धराची आत्मा खूप जोरात किंचाळली. ती किंकाळी वाड्यात सर्वत्र घुमत होती. युग डायरी घेऊन लगबगीने धराच्या खोलीबाहेर आला. तो बाहेर येताच कित्येक वटवाघूळ, कावळे आणि मधमाशांचा थवा एकाएकी त्याच्यावर हल्ला करण्यासाठी आला. सिध्दपुरूष महाराजांनी त्या वटवाघळांवर, कावळ्यांवर आणि मधमाशांच्या थव्यावर देखील थोडे पवित्र पाणी शिंपले. पाणी शिंपताच वटवाघळांसह कावळे आणि मधमाशांचा थवा भस्म झाला. डोळ्यादेखत घडणारे दृश्य पाहून युग घाबरलाच. 


                सिध्दपुरूष महाराजांनी मात्र त्याला नजरेनेच आश्वस्त केले व नंतर युगला ती डायरी उघडून वाचायला सांगितली. त्याने भीतीने एक आवंढा गिळून पुढाकार घेतला. त्याने डायरीचं पहिलं पान उघडताच त्यातून एक किंकाळी बाहेर पडली आणि त्या डायरीतून अगदी रडवेल्या अन् किंकाळीयुक्त आवाजात खामोशियॉं गाण्याचे बोल ऐकू येत होते पण तो आवाज एवढा कर्णकर्कश आणि भयावह होता की, युगच्याही नकळत त्याचे हात त्याच्या कानावर गेले. ती डायरी त्याच्या हातातून गळून पडली. त्या आवाजाने त्याचे डोळे आपोआप मिटल्या गेले आणि तो खाली पडला. 


                बराच वेळ त्याच कर्णकर्कश आवाजात खामोशियॉं गाण्याचे बोल त्याला ऐकू येत होते. तेवढ्यात त्याच्या तळहातांना काहीसा उष्ण द्रव जाणवला. त्याने डोळे उघडून त्याच्या दोन्ही हातांकडे पाहिले तर त्याच्या हातांना रक्त लागले होते. त्याने एक बोट त्याच्या उजव्या कानात व दुसरे बोट डाव्या कानात घातले तेव्हा कळले की, रक्त त्याच्या कानातून बाहेर येत होते. परत एक रक्ताचा थेंब त्याच्या उजव्या कानातून ओघळून खाली पडला आणि तेवढ्यात तो कर्णकर्कश आवाज तीव्रतेने ऐकू येऊ लागला. तो आवाज ऐकताच युगने गच्च डोळे मिटून घेतले. 


                काही वेळानंतर त्याला तो कर्णकर्कश आवाज ऐकू येईनासा झाला पण त्याला काही पुसट आवाज ऐकू येऊ लागले. खरंतर त्याचे धाडसच होत नव्हते डोळे उघडण्याचे पण तरीही त्याने मनाशी द्वंद्व करून डोळे उघडले. त्याने डोळे उघडले तेव्हा तो त्याच्या घरी बेडवर झोपून होता. त्याने सभोवताली नजर फिरवली तर ते त्याचेच घर असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने बाजूला पाहिले तर डॉ. माने आणि संकर्षण त्याच्याकडे एकटक पाहत होते. 


                संकर्षणला पाहताच युग खूप भावूक झाला आणि त्याने संकर्षणला आवेगाने मिठी मारली. तो अगदी वेंधळ्यासारखा संकर्षणची काळजीने विचारपूस करत होता. वारंवार त्याची ख्यालीखुशालीची विचारणा करत होता हे पाहून संकर्षणचा चेहरा अगदी गोंधळलेला होता. त्याला काही कळत नव्हते. तो गोंधळलेल्या नजरेने युगकडे पाहत होता. 


युगचे मात्र संकर्षणला काळजीने प्रश्न विचारणे लागोपाठ सुरूच होते पण तेवढ्यात डॉ. माने युगला उद्देशून म्हणाले, " युग! जस्ट रिलॅक्स! तू शांत हो आधी! हे बघ, संकर्षण अगदी ठीक आहे. त्याला काहीच झालेलं नाहीये... शांत हो जरा! " 


" संकर्षण नक्की तू ठीक आहेस ना? " युगने तरीही संकर्षणला प्रश्न विचारलाच त्यावर संकर्षणने फक्त हलकासा हुंकार भरला. 


" मग ठीक आहे! " युगने थोडा सुस्कारा सोडला पण लगेच त्याला काही आठवले अन् तो पुढे बोलू लागला, " पण... पण धरा म्हणजे ती आत्मा... ती कुठे आहे? आपण... आपण तेथून कसे सुटलो आणि आपल्या घरी कधी परतून आलो? सिध्दपुरूष महाराज ते कुठे आहेत आता? ते ठीक आहेत ना? धराचा भूतकाळ कळला का? तिने काही सांगितले का? "  


                युगचे प्रश्न ऐकून संकर्षण पार गोंधळून गेला होता. त्याने डॉ. शुभम मानेकडे पाहून खांदे उडवले तर डॉ. माने यांनी संकर्षणला नजरेनेच शांत राहायला सांगितले. 


" संकर्षण सांग ना! तिच्यापासून पिच्छा सोडवण्यात आपल्याला यश कसे मिळाले? " संकर्षण काहीच उत्तर देत नसल्याचे लक्षात येताच युगने संकर्षणचे खांदे पकडले.


" युग, कोण आहे धरा? आणि तिच्याबद्दल तू मला का विचारतोय? " संकर्षणचे असे प्रत्युत्तर ऐकून युग अगदी शांत झाला आणि त्याची संकर्षणच्या खांद्यावरील पकड सैल झाली व तो अविश्वासाने संकर्षणकडे पाहू लागला. 


क्रमशः

____________________________________


©®

सेजल पुंजे. 

२४-०८-२०२२.

टीम नागपूर. 
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//